Halloween Costume ideas 2015

देअर व्हॉइसेस फाइंड स्ट्रेंग्थ इन अवर सायलेन्स

नोटाबंदी, आर्थिक सुधारणांच्या नावाने गरीब जनतेचे शोषण, विशिष्ट समाजाविरोधात झुंडशाही, हत्याकांड, अत्याचार, वर्णवर्चस्ववादाचा धिंगाणा, दलित-आदिवासींविरूद्ध षङ्यंत्र, मानवापेक्षा जनावरांना महत्त्व दिले जाते, मतांच्या स्वार्थापोटी विशिष्ट समाजाचे धार्मिक ध्रूवीकरण, विविध सरकारी योजनांची अधोगतीकडे वाटचाल, विशिष्ट विचारसरणीच्या समाजसुधारक, पत्रकार यांना ठार मारले जाते, सीमेवर परराष्ट्र धोरण फोल ठरते, देशभरात अराजकतेचे वातावरण पसरले आहे! तरीही आपण म्हणतोय की आपल्या भारत देशाची वाटचाल महासत्तेकडेच...! संपूर्ण जग हे सर्व चित्र उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. महासत्तेचा टेंभा मिरविणाऱ्यांना ते मात्र दिसत नाही. व्यवस्थेच्या विरोधी, गरीब आणि दलितांचे समर्थनात काम करणाऱ्या ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकत्र्या गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घराबाहेर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांची हत्या ज्या प्रकारे झाली तशाच प्रकारे ही हत्या झाली आहे, असे म्हटले जाते. या विचारवंतांच्या हत्येचा छडा आजतागायत लागलेला नसतानाच लंकेश यांची हत्या झाल्याने देशभरातील विचारी समाज हादरून गेला आहे. गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिके’ हे वृत्तपत्र चालवत होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे ‘लंकेश पत्रिके’ या नियतकालिकाचे प्रणेते होते. व्यावसायिक व सरकार यांचा दबाव अप्रत्यक्षरित्याही आपल्यावर पडू नये म्हणून जाहिरातीशिवाय ते चालवण्याचा पायंडा त्यांनी पाडला. हा वारसा गौरी लंकेश पुढे चालवत होत्या. स्वतंत्र पत्रकारितेच्या मार्गे त्या त्यांना सहन न होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवत होत्या. यामुळे त्या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या डोळ्यांत खुपत. ‘विरोधी बोललात तर अ‍ॅण्टी नॅशनल’, ‘ब्र काढलात तर तुमचा आवाज कायमचा बंद करून टाकू अशी संतापजनक प्रवृत्ती आपल्या देशात वाढीस लागत चाललेली आहे. आपल्या देशातील वातावरण किती दूषित होत चालले आहे आणि आपला समाज किती वेगाने कडेलोटाच्या दिशेने वाटचाल करीत आहे त्याचे मात्र कोणालाच सोयरसुतक नाही. त्यावर ठोस कृती करण्यापेक्षा केवळ त्यावर सोशल मीडियावर बाता मारणे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे राजकारण करणे, आपापल्या सोयीनुसार त्या घटनेचा विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे यातच विचारांचे डोस देणारे आपला वेळ घालवत आहेत. आमचा समाज इतका असहिष्णू बनला आहे की तो विद्वान लेखकांच्या विचारांवर अंकुश लावण्यासाठी आपल्या विचारांद्वारे नव्हे तर बंदुकीचा आधार घ्यावा लागत आहे, त्यांना समाप्त केले जात आहे. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांपासून सुरू झालेले भ्याड तंत्र आता गौरी लंकेश यांच्यापर्यंत पोहोचले आहे. केंद्रातील मोदी सरकारने सांप्रदायिक ध्रूवीकरणासाठी कुख्यात हेगडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून कर्नाटकात त्याला सांप्रदायिक अजेंडेवरच विश्वास असल्याचे संकेत दिले आहेत. देशात लंकेश यांच्यासारख्या विचारवंताला लक्ष्य बनविण्यापूर्वी पूरक वातावरण तयार केले गेले. देशभर हत्याकांड आणि अराजकतेद्वारे भारतीय समाजाचे एका हत्यारा समाजात बदलण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग आहे. गोरखपूरपासून फर्रुखाबादपर्यंत बालकांचे मृत्यू समाजाला संवेदनहीन बनविण्यास पुरेसे आहेत. त्यापूर्वी गोरक्षेच्या नावाखाली जुनैदांच्या, पहलू खानांच्या आणि अखलाकांच्या हत्यांनी मृत्यूसाठी मार्ग प्रशस्त केला होता. संपूर्ण समाज आणि राजकारणात जीवनाची नव्हे तर मरणाच्या आणि स्मशानाच्या चर्चा होत आहेत. आता परिस्थिती अशा आहे की ५०-५० मग १००-२०० लोकांच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूबाबत कुणालाही संवेदनशील ठेवणे शक्य राहिले नाही. सध्या देश एका विशिष्ट क्रांतिकारक बदलातून जात आहे, अशी समजूत अनेकांची झालेली आहे. ते एक वेळ खरे मानले तरी या क्रांतीची अशी कलेवरे पडलेली कुठवर आपल्याला पाहावी लागणार आहेत? ‘देअर व्हॉइसेस फार्इंड स्ट्रेंग्थ इन अवर सायलेन्स’ याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. तुम्ही मूग गिळून बसाल तर त्यांचे फावल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीमध्ये जर व्यवस्थेचे पाऊल वाकडे पडत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा प्रत्येक घटनादत्त नागरिकाला अधिकार आहे. ‘विचारवंत मरत असतात, मात्र त्यांचे विचार कधीही मरत नाहीत,’ हे विसरून चालणार नाही. बाबा आमट्यांनी त्याच्या एका कवितेत क्रांतीविषयी म्हटले आहे- ‘‘पण कवीचा कंठ दाबून जेव्हा गीते ठार केली जातात... तेव्हा कोसळून पडतात ती कलेवरे तिचीच असतात.’’ गौरी लंकेश गेल्या तरी त्यांच्या विचारांची कलेवरे इथेच राहतील, ती कधीही आणि कोणत्याही मारेकल्याला मिटविता येणार नाहीत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget