-शाहजहान मगदुम
हरियाणा-पंजाबमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता आपला देश अजूनही किती जोखंडामध्ये अडकला आहे याची प्रचिती येते. श्रद्धेच्या नावाखाली अंधविश्वास आणि धर्माच्या नावाखाली अत्याचार इतका फोफावला आहे की त्याच्या समोर कायदा, सरकार आणि प्रशासन लाचार ठरले आहेत. हरियाणा-पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती. डेरा सच्चा सौदाचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरून घोषणा देत होते की ‘आम्ही आमच्या गुरूला काहीही होऊ देणार नाही.’ ‘जर त्यांना काही झाले तरक भारताचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू!’ अशी धमकी जाहीरपणे दिली जात होती. राष्ट्रप्रेमाचा उदोउदो करणारे आणि भारतमातेचा जबरदस्तीने जयघोष करविणाऱ्यांवर या धमकीचा काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. अल्पसंख्याकांना देशप्रेमाचा पुरावा मागणाऱ्या लोकांनी बाबा गुरमितच्या समर्थकांसमोर आश्चर्यकारकरित्या मौन बाळगले होते. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की पॅलेट गन’चा वापर फक्त काश्मिरी तरुणांसाठीच सुरक्षित आहे काय? देशाच्या संविधानाला आव्हान देणाऱ्यांविरूद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही? तर दुसरीकडे इस्पितळात बालकांच्या मृत्युचे तांडव माजते अथवा एखाद्या ठिकाणी असामाजिक तत्त्वांच्या झुंडीद्वारे हत्याकांड घडविण्यात येते त्याचा जाब विचारण्याकरिता कुणीही पुढे येत नाही. हेच ते माझ्या प्रिय देशाच चरित्र? बुवा-बाबाकडे वाट झिडविण्यासाठी लोकांकडे वेळ आणि पैसा आहे, मात्र आपल्या समाजातील लोकांच्या किंवा देशातील जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता राजकारण्यांना सवाल करण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात पुâरसत नाही. सत्ताधाऱ्यांनी तर न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करण्याची परंपराच सुरू केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाद्वारे फटकारले जाते, माफीनामा लिहून देण्याचा आदेश दिला जातो, तर हरियाणा सरकारवर बाबा गुरमितवरील खटला सुनावणीच्या वेळी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती योग्य प्रकारे न हाताळल्यामुळे तेथील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. गदर आंदोलनाची सुरूवात झालेल्या ज्या पंजामधून शीख धर्मगुरूंनी ब्राह्मण्यवादाविरूद्ध चळवळ सुरू केली, याच भूमीतून डॉ. बाबासाहेब आंबोडकरांच्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने लोकांनी पाठिंबा लाभला, त्याच पंजाबमध्ये अकालींनी धर्माचे राजकारण केले आणि त्याविरोधात ब्राह्मण्यवादी शक्तींनी डेऱ्यांना पुढे केले. आज हेच डेरे पंजाबमधील राजकारण नियंत्रित करण्याचे एक मोठे केंद्र बनली आहेत. ज्या बाबा-बुवांनी आपले प्रस्थ समाजातच नव्हे, तर सत्ताकारणातही निर्माण केले होते, त्यांच्या चेहऱ्यांवरील आध्यात्मिकतेचे बुरखे टराटरा फाटू लागले आहेत आणि त्यांचे खरे अवतार जगासमोर येऊ लागले आहेत. आसाराम बापू नावाचा एक तथाकथित कृष्णावतार यातूनच गजाआड गेला. भगव्या कफनीतील साऱ्या मुखवट्यांना सरसकट देवत्व नाही, याची जाणीव समाजाला होऊ लागली असतानाच हरियाणातील डेरा सच्चा सौदा पंथाचा प्रमुख बाबा गुरमित सिंग रामरहीम याला नुकतेच साध्वींवरील बलात्काराच्या आरोपाखाली २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावून गुरमितची गुर्मी खटल्याच्या निकालाद्वारे उतरविली आणि तो न्यायालयातच ढसाढसा रडू लागला. याच बाबा गुरमितने गत निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आपल्या भक्तांना आवाहन केले होते. बाबा गुरमित सिंगच्या चेल्यांनी जो धुडगूस घातला त्यात सुमारे ३५ हून अधिक जणांचा बळी गेला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पंचकुला जळू दिले अशा शब्दांत न्यायालयाने हरयाणा सरकारला व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना फटकारले. भाजपचा नेता साक्षी महाराजने तर पंजाब व हरियाणात उद्भवलेल्या परिस्थितीस चक्क न्यायालयालाच दोषी ठरवून टाकले. नित्यानंद नावाच्या एका कोवळ्या चेहऱ्याच्या आध्यात्मिक गुरूने शयनगृहात भक्त महिलांसोबत केलेल्या चाळ्यांची चलतदृश्ये समाजमाध्यमांतून जगजाहीर झाली. बाबा गुरमित सिंग, चंद्रास्वामी, आसाराम बापू, राधे माँ, जयेंद्र सरस्वती, बाबा प्रेमानंद, इच्छाधारी संत, स्वामी सदाराचारी, सत्य साईबाबा अशा बाबांवर अपार भक्तिभावाची अविचारी उधळण करणाऱ्या वर्गाची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे. बाबा-बुवाबाजीच्या नादाला लागून स्वत:ची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या भक्तांचे डोळे उघडले, तरच या भोंदूबाबांच्या कुकृत्यांना पूर्णविराम मिळेल, हे वास्तव अजूनही समाजातील भक्तवर्गाच्या पचनी पडलेले नाही, हेच बुवाबाजीच्या उदयाचे कारण आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील सूक्ष्म सीमारेषा हेच अशा धंद्यांच्या फोफावण्यामागचे कारण आहे. यामधील फरक ओळखण्याची क्षमता समाजात निर्माण करणे हे एक आव्हान आहे. समस्यामुक्त समाज हे कदाचित आवाक्यापलीकडचे स्वप्न असल्याने, समस्याग्रस्तांना किमान दिलासा देण्यासाठी शासन आणि शासकीय व्यवस्था सक्षम आहेत, एवढा विश्वास देणारे संदेश समाजात गेले, तर कदाचित या वर्गाचा उदय रोखणे शक्य होईल. नाही तर, एक बाबा-बुवा गजाआड गेला, तर त्याची जागा घेणारा दुसरा भोंदू उदयाला येईल.
Post a Comment