Halloween Costume ideas 2015

मानवी जीवाचा आदर

जालियनवाला बाग हत्याकांड ज्या दिवशी घडले तेव्हा तीन दिवस देशभरात चूल पेटलेली नव्हती. कारण त्याकाळी लोकांमध्ये मानवी जीवाचा आदर मुबलक प्रमाणात होता. मात्र १० ऑगस्ट ला गोरखपूरमध्ये ६३ चिमुकल्यांचा हकनाक जीव गेल्यानंतर ही देशात फारशी खळखळ झाली नाही. उलट मुख्यमंत्री अजयसिंह
उर्फ योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरातील पोलिसांना पोलीस ठाण्यात कृष्णाजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्याचे असंवैधानिक आदेश दिले. टी.व्ही. वाहिन्यांवरच्या आचरट मालिका नेहमीप्रमाणे सुरूच राहिल्या. व्हॉट्‌सॲप, फेसबुकमध्ये थोडेसे वादळ उठले मात्र लगेच सर्व काही शांत झाले. खरे पाहता कुणाच्या का चुकीने असेना ते चिमुकले जीव गेले होते. ही घटना म्हणजे राष्ट्रीय शर्मेचा विषय होता. तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळून त्या चिमुकल्या जीवांना श्रद्धांजली द्यावयास हवी होती. पुन्हा अशा घटना देशात कोठेच घडणार नाही, याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी लाल किल्यावरून घ्यावयास हवी होती. परंतु असे काही घडलेले नाही. कारण! याचे कारण असे की, आजकाल मानवी जीवाचा म्हणावा तेवढा आदर राहिलेला नाही. गोरखपूरचे बालमृत्यूकांड आपल्या सामाजिक असंवेदनशीलतेचे एकमेव उदाहरण नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या मते अशा घटना भारतारसारख्या मोठ्या देशात अधून मधून घडतच असतात. रस्ते अपघातातून जेवढी माणसे आपल्या देशात मरतात किंवा जायबंदी होतात तेवढी जगात कुठेच होत नाहीत. तरी पण रस्ते बांधणी मधील भ्रष्टाचार थांबत नाही. याचे ही कारण हेच की मानवी जीवनाचा हवा तेवढा आदर राहिलेला नाही. शहरी भागात सुद्धा आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. शहरे बकाल होत आहेत. गरीबांना तेथे सन्मानाने राहता येत नाही. त्यामुळे शहरी आत्महत्यांचा दरही वाढत आहे. महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी गरीबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत.  शेकडो करीत आहेत. फक्त 7 दिवसात मराठवाड्यात ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (लोकसत्ता १७/८/१७) तरी शेतकऱ्यांच्या मृत्यूसंबंधी महाराष्ट्रामधील इतर गबर लोकांना कीव येत नाही. त्यांच्या चंगळवादी जीवनशैलीमध्ये काही फरक पडत नाही. हे का घडते? मानवी जीवाचा आदर कमी झाला किंबहुना  संपला म्हणून असे घडते. देशात सर्व स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार, प्रत्येक  क्षेत्रात गुन्हेगारीचा वाढता आलेख, स्त्रियांवरील अत्याचार यातून हेच सिद्ध होते की, मानवी जीवनाचा आदर राहिलेला नाही. तो पुनःप्रस्थापित व्हावा यासाठी समाजातून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र या महत्वाच्या प्रश्नाकडे एसआयओ (स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन) ने लक्ष दिलेले आहे. त्यांनी यासंदर्भात जनजागृती करण्याची सुरू केलेली मोहिम नुकतीच संपली. यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमिच आहे. ज्या वयामध्ये तरूण कॉलेजच्या अभ्यासाकडे कमी व कॅम्पस मधील ईतर गोष्टींमध्येच अधिक ’रस’ घेतांना आढळून येतात, त्याच वयामध्ये एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाने ‘मानवी आदर’ वृद्धींगत व्हावा यासाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान एक यशस्वी आंदोलन केले. कॉलेज व कॅम्स मध्ये यासंबंधी जनजागृती केली. केली. विद्यापीठातून मानवी आदरासंबंधीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले. कॉर्नर मिटींग्ज घेतल्या, पत्रकार परिषद घेतल्या या विषयावरील साहित्य प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. माणसा माणसांमधे प्रेम वाढावे एकमेकांचा आदर वाढावा यासाठी काय करावे लागेल यासंबंधीची चर्चा यानिमित्ताने करणे अनुचित राहणार नाही. म्हणून या आठवड्यात मी वाचकांसमोर या महत्वाच्या विषया संबंधीची चर्चा करणार आहे.

एकमेकांचा आदर कमी होण्याची कारणे

मानवी जीवनाचा आदर कमी होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत़ त्यातील सर्वात मोठे कारण व्याज आहे़ व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांएवढे दुर्देवी जीव दूसरे नसतील़ कारण की व्याजामुळे माणसाची मने कठोर होतात. त्यांच्यातील दयाभाव संपतो. ते वस्तू व संपत्तीशी प्रेम करतात आणि माणसांना वापरून घेतात.वास्तविक पाहता माणसाशी प्रेम करून वस्तू आणि संपत्ती यांचा वापर व्हायला हवा. व्याजामुळे लोभ वाढतो व लोभामुळे सामाजिक व्यवस्थेचा प्रवास उलट्या दिशेने सुरू होतो. व्याजासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी रहे़ म्हणतात, ‘‘जगातील कोणताच देश असा नाही ज्या देशात महाजन (सावकार) आणि महाजनी (सावकारी) संस्था व्याजाच्या मार्गाने गरीब, मजूर, शेतकरी आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांचे रक्त पीत नाहीत़ व्याजामुळे अल्प उत्न्न गटातील लोकांना आपल्या डोक्यावरील कर्ज फेडने अत्यंत कठीण होऊन जाते. बऱ्याचदा अशक्य होऊन जाते़ मग एक कर्ज फेडण्यासाठी दूसरे कर्ज, दूसरे फेडण्यासाठी तीसरे कर्ज घेतली जातात़ मूळ कर्जापेक्षा अधिक रक्कम अदा करून सुद्धा मूळ कर्ज जसचे तसे बाकी राहते़. कष्टाने कमविलेला पैसा सावकार घेऊन टाकतो व या गरीबाला स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे देखील कठिण होऊन जाते़ व्याजाच्या विळख्यात अडकलेले लोक आतल्या आत जळत जातात़ हात तंग असल्याने पौष्टिक अन्न मिळत नाही़ वेळेवर औषध उपचार करता येत नाही म्हणून त्याचे आरोग्य कधिच चांगले राहत नाही़ अशाप्रकारे काही लोक लाखो गरीबांचे रक्त पीऊन धष्टपुष्ट होतात़ मात्र सगळा समाज खंगून जातो़’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड १, पान क्र. २१८) अशा समाजामध्ये जे लोक कर्जदार आहेत त्यांच्या विषयीचा आदर आपोआपच कमी होतो़.
    दूसरे कारण आर्थिक प्रगती आहे़ जशी-जशी आर्थिक प्रगती होत जाते तशी-तशी नवश्रीमंतांच्या मनामध्ये स्वत: बद्दलचा आदर वाढतो व गरीबांबद्दलचा आदर कमी होतो.
    तीसरे कारण कारखानदारी आहे़ कारखानदारी सुद्धा जशी-जशी वाढत जाते, तशी-तशी मजुरांची गरज वाढत जाते.  मग कारखानदार आणि सरकार यांच्या अभद्र युतीतून गरीबांच्या विरूद्ध शासकीय ध्येय धोरणे आखली जातात व मोठ्या प्रमाणात मजूर तयार होतील, याची व्यवस्था केली जाते. अशा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये मजुरांच्या जीवाचा आदर आपोआप कमी होतो.
     चौथे कारण अध्यात्मिकतेचा अभाव. वेगाने आर्थिक विकास साधण्यासाठी सनदशीर मार्गांचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून वाम मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे असे मार्ग चोखाळणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ईश्वरावरचा विश्वास कमी होत जातो. त्यांच्यातून रूहानियत (अध्यात्मिकता) कमी होत जाते, परिणामी, तक्वा कमी होतो, ईश्वराची भीति राहत नाही. जे काही होते ते पैशाने होते, असा गैरसमज श्रीमंतामध्ये निर्माण होतो. या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो की समाजामध्ये गरीबाच्या जीवाची पर्वा रहात नाही आदर तर लांब राहिला.

यावर उपाय काय?

    जगात प्रचलीत जीवन पद्धतीमध्ये केवळ इस्लामी जीवन पद्धतीच अशी पद्धती आहे की ज्यामध्ये यावर उपाय नुसते सुचवलेलेच नाहीत तर एकमेकांच्या जीवाचा आदर करणाऱ्या एका आदर्श समाजाची रचना अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी करून दाखविलेली आहे़ या जीवन व्यवस्थेची मुलभूत तत्वे खालीलप्रमाणे -
   १) कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे कि, ’ऐ! लोगों हमने तुम्हें एक मर्द और एक औरत से पैदा किया, और फिर तुम्हारी कौमें और बिरादरीयाँ बना दी, ताकी तुम एक दूसरे को पहेचान सको’ (सुरे हुजरात आयत नं १३)
   समस्त मानव समाजाला या आयातीवर विश्वास ठेवल्या शिवाय गत्यंतर नाही़ आज जरी एका स्त्री आणि एका पुरूषाच्या मिलना शिवाय मनुष्य निर्मिती होणे शक्य नाही परंतु जगाची सुरूवात स्वर्गातून पाठविण्यात आलेल्या पहिल्या जोडप्या आदम अलै. व हव्वा अलै़  पासून झालेली आहे. हे जोडपे पूर्ण विकसीत जोडपे होते व त्यांच्यापासून मानव वंशाचा विस्तार झाला़ या नात्याने आज जगभर पसरलेली ७ अब्जापेक्षा जास्तीची माणसे रक्ताच्या नात्याने आपसात भाऊ-बहीण आहेत. इस्लामने दिलेला हा उदात्त विचार जर का एकदा स्विकारला तर त्याचे दोन परिणाम होतात. एक - माणसाची संकुचित विचारसरणी संपत्ते रंग, वंश, राष्ट्रवाद इत्यादी संकुचित विचारांचा त्याग करून माणूस व्यापक दृष्टीकोणातून हे विश्वची माझे घर या विचारापर्यंत पोहोचतो. माणसाच्या लोभी प्रवृत्तीला लगाम लागण्यास बरीच मदत होते़ तो आपल्याबरोबर दूसऱ्यांच्या जीवाचीही चिंता करतो व यातूनच माणसा-माणसांत आदराची भावना विकसित होते.
   २) ‘’जिसने एक इन्सान का नाहक कत्ल किया उसने सारी इन्सानियत का कत्ल कर दिया़  और जिसने किसी एक बेगुनाह की जान बचा ली तो उसने सारी इन्सानियत की जान बचा ली.’’ (संदर्भ : सुरे मायदा आयत नं.३२). मानवी जीवाचे मुल्य किती मोठे आहे? हे या आयातीमध्ये स्पष्ट केलेले आहे़ या आयातीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाच्या जीवाचा आदर केल्याशिवाय राहूच शकत नाही.
   ३) ’’आणि आपल्या गरजांपेक्षा दुसऱ्यांच्या गरजांना ते अधिक महत्व देतात मग ते स्वतः कितीही गरजवंत का असेनात.’’ (सुरे अल हश्र : आयत नं. १३).
   चारित्र्यवान मुस्लिमांचा व्यवहार दुसऱ्या माणसांशी कसा असावा या संदर्भाचे वर्णन करत असताना कुरआननी सुरे हश्रमध्ये म्हटलेले आहे कि, मुस्लिम स्वतः कितीही गरजवंत असो आपल्या गरजांपेक्षा तो इतर लोकांच्या गरजांना प्राधान्य देतो. हा एक असा मानवी गुण आहे कि,  गरजेच्या वेळेस मदत करणारा आणि ज्याची मदत केली गेली आहे, अशा लोकांमध्ये रक्ताच्या पेक्षाही जास्त दृढ नातेसंबंध निर्माण होतात. ईतरांना निर्वाज्य मदत करण्याचा गुण त्याच वेळेस निर्माण होतो ज्यावेळेस गरजवंत व्यक्तीच्या जीवाची पर्वा मदत करणाऱ्याला आपल्या जीवापेक्षा जास्त असते.

मानवी आदर आणि मुस्लिमांची भूमिका

कार-ए-कम्बख्त खुद करो
लानत करो शैतान पर
    पश्चिमेकडून आलेली भौतिक हितसाधणारी आधुनिक  शिक्षण आणि जीवन पद्धतीचा अंगीकार करून या देशातील बहुसंख्यांकांनी आपल्या जीवनाची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे निश्चित केलेले आहे़ व्याजाला आपल्या देशात अर्थव्यवस्थेचा कणा बनविण्यात आलेले आहे. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे सर्व अवगून आपल्या समाजात आपोआप झिरपलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो का गोरखपूरच्या बालमृत्यूची घटना असो. त्यातून बहुसंख्यांक बोध घेऊन पेटून उठतील व मानवी जीवनाचे मुल्य ओळखून त्यांची पर्वा करतील ही शक्यता कमीच आहे. मात्र या देशाचे जबाबदार नागरिक व बहुसंख्यांकांचे बंधू म्हणून मुस्लिमांचे मात्र हे दुहेरी कर्तव्य आहे की, ज्या-ज्या गोष्टी या मानवी जीवनाच्या अनादराला कारणीभूत ठरत आहेत़, त्यांचे उच्चाटन करून मानवी जीवनाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. यासाठी एसआयओ ने पुढाकार घेतलेला आहे़ तसाच पुढाकार सर्व मुस्लिमांनी घ्यावा. कारण या कामाचे महत्व व त्याचा आकार एवढा मोठा आहे कि, हे काम एकट्या एसआयओने होने शक्य नाही़  मात्र त्यांनी या कामी पुढाकार घेऊन हे सिद्ध केलेले आहे की, सामाजिक समस्यांची त्यांना जाण आहे. सामाजिक दुर्गूणांच्या उच्चाटणासाठी ते यथाशक्ती निरंतरम प्रयत्नशील आहेत़ बहुसंख्यांक बांधवांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण हवा, पानी आणि प्रकाशाएवढेच महत्व मानवी जीवनामध्ये इस्लामी तत्त्वांचे आहे. मुस्लिमांविषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे जर का त्यांनी इस्लामच्या कल्याणकारी तत्वांकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे ना मुस्लिमांचे नुकसान होणार ना इस्लामचे, नुकसान त्यांच्या स्वत:चे होईल. सर्व साधारणपणे मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्याक समाजाप्रमाणे पश्चिमेकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आदर्श मानतो़ स्वत: वाईट वागतो व ‘‘ये तो शैतान का बहेकावा है’’ म्हणून दोष सैतानावर टाकून मोकळा होतो. मात्र आजही एसआयओमधील तरूणांसारखे मुठभर लोक असेही आहेत की त्यांना आपल्या देशातील खऱ्या सामाजिक समस्यांची जाण आहे.

मुसलमां को मुसलमां कर दिया तुफाने मगरिबने
तलातुम हाय दरिया ही से हे गौहर की सैराबी

    मानवी जीवनाचा आदर किती महत्वाचा आहे? ह्याची जाण असणे किती महत्वाचे आहे़  हे शेतकरी आत्महत्या, मानवी चुकीमुळे झालेले गोरखपूर बालमृत्यूकांड तसेच देशभरात होत असलेल्या मॉबलिंचिंगच्या घटना मधून स्पष्ट झालेले आहे़  एसआयओच्या नुकत्याच संपलेल्या मोहिमेनंतर मानवी जीवनाचा आदर हा विषय मागे पडता कामा नये. या संदर्भात सर्व समाजामध्ये जाणीवेचा स्फुल्लिंग पेटो व त्यातून निर्माण झालेल्या उर्जेतून सामाजिक जाणीवा प्रगल्भ होवो हीच सर्वश्रेष्ठ अल्लाहकडे प्रार्थना करून थांबतो. (आमीन) जय हिंद!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget