Halloween Costume ideas 2015

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज

महाराष्ट्राची एकात्मतेची आणि शांततेची संस्कृती बिघडविण्याचा सातत्याने होतोय प्रयत्न !


महाराष्ट्रावर सध्या चोहोबाजूंनी आक्रमण सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सहिष्णुतेवर कुठल्या न कुठल्या प्रकारे हल्ला चढवला जात आहे. कधी शासकीय संस्थांना हाताशी धरून तर कधी संवैधानिक मुल्य पायदळी तुडवित. लोकशाहीत लोकांना बोलायचा अधिकार आहे मात्र कायदा सुव्यवस्था बिघडून लोकांची मने दुखविण्याचा अधिकार मुळीच नाही. महाराष्ट्रातील नेते अजूनही उघडपणे धार्मिक द्वेषाचे बोलत नाहीत परंतु, हे राज्याबाहेरील नेते बोलावून आपले राजकीय हित साधत असल्याचे पहावयास मिळत आहे. धार्मिक द्वेष वाढेल असे वक्तव्य करण्यात तेलंगणाचे आमदार टी.राजासिंग आणि सुदर्शन चॅनलचे चव्हाणके आघाडीवर आहेत. अशा व्यक्तींना वारंवार शांततेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातुरात बोलावून वातावरण खराब करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत घटनेच्या दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

वाचाळवीर, द्वेष पसरविणाऱ्या मंडळींना बोलावण्यात साहजिकच भाजप आणि त्यांच्या समविचारी संघटना आघाडीवर होत्या. खासदार, आमदार आणि काही संघटनांनी मिळून धार्मिक द्वेष वाढेल अन् महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेत आपल्याला एकगठ्ठा मत मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आखलेला डाव दिसतोय, अशी प्रतिक्रिया  जनसामान्यांतून उमटत आहे.     

इतिहास विकृत करून सांगणे आणि धार्मिक द्वेष वाढेल अशी वक्तव्य करणे भाजप व त्यांच्याशी निगडित संघटनांचे रोजचचे काम झाल्याचे कुठे ना कुठे पहायला मिळत आहे. खरंच धार्मिक द्वेष आणि इतिहासाची विकृती करून लोकांसमोर सादर करण्याने काय महाराष्ट्राचा वा देशाचा सर्वांगीण विकास होणार आहे? निश्चितच नाही. परंतु, लोकशाही आणि संविधानाला तोडून मोडून आपले इप्सित साध्य करण्याकडे काही लोक लागले असल्याने महाराष्ट्रातील एकात्मताप्रिय जनतेत अस्वस्थता पसरली आहे. महापुरूषांच्या जयंती साजरी करताना त्यांचे सत्य विचार सांगून जनतेला नैतिक मार्गाकडे वळविण्याऐवजी त्यांच्याच पुतळ्याखाली थांबून द्वेषी विचार लोकांत पसरवून वातावरण खराब करण्याचे काम राजनीतिक हव्यासापोटी केले जातेय असे दिसून येत आहे. 

नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूर येथे तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या गोशामहाल मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंग यांना भाजप व त्यांच्या समविचारी संघटनांनी बोलावले होते. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल  रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. समारोप कार्यक्रमात आमदार टी. राजासिंग यांनी आक्षेपार्ह भाषण केले. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला. समाजात द्वेष निर्माण होईल, अशी वक्तव्य करण्यात आली. या कार्यक्रमात खा.सुधाकर शृंगारे,  माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांसहित भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रॅलीतील लोक समोर बसलेले होते. 

यावेळी आमदार टी. राजासिंगच्या भाषणाचे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले. समाजमाध्यमांवर आणि शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. लातूर हे शांततेचे शहर असल्याने येथील सुजान नागरिकांनी आयोजकांवर टिका करायला सुरूवात केली.  छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यामध्ये लातुरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे सामील असतात. त्यामुळे या घटनेचे पडसाद जनसामान्यांत मोठ्या प्रमाणात उमटले आणि आयोजकांसह आमदार टी. राजासिंग यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. पोलिस अधीक्षकांसह प्रशासनाला लातुरातील सर्व शांतताप्रिय संघटनांना ज्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जमाअते इस्लामी हिंद, जमियते उलेमा हिंद, दलितबांधवांच्या संघटनांनी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या मागणीची निवेदने दिली. काहींनी पोलिस अधीक्षकांसमवेत लातूरच्या एकात्मतेचा वारसा निदर्शनास आणून दिला आणि टी.राजासिंगवर कारवाईची मागणी केली. सध्या सर्वत्र भाजपाप्रणित सरकार असल्याने प्रशासनाला ताक फुकून प्यावे लागत आहे. त्यामुळे अखेर लातूरच्या पोलिस प्रशासनाने याबाबत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता संचालनालयाला आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी अभिप्राय मागितला तो सोमवारी प्राप्त झाला. जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल, असे वक्तव्य केल्याचे अभिप्रायात म्हटले आहे.

त्यावरून घटनेच्या दहा दिवसानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 28 फेब्रुवारी रोजी पोलिस उपनिरिक्षक पंकज नीळकंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार टी. राजासिंग लोध विरोधात गु.र.नं.90/2023 कलम 145 (अ), 153 (ब),294 (अ), 505 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल शहाणे करीत आहेत. 

लातूर शांततेचे शहर आहे आणि हे शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. उद्योग, व्यापार येथे भराभराटीस येत आहेत. 40 हजारांहून अधिक जिल्ह्याबाहेरील राज्यातील मुलं-मुली येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे शांतता अबाधित असणे गरजेचे आहे. अशातच येथील नागरिक संवेदनशील असल्याने त्यांनी पुढाकार घेत शहर शांत ठेवले आणि पोलिसांना आ. टी. राजासिंग आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

लातूरच्या सूजान नागरिकांनी शांतता आणि एकात्मतेचे प्रदर्शन करीत कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम केले. मात्र इतर ठिकाणी असे होईलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक शहरातील नागरिकांनी धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या तसेच शांतता आणि एकात्मतेला धक्का पोहोचविणाऱ्या राजकीय नेते आणि संघटनांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने पुढे येत गुन्हे दाखल केले पाहिजेत. तेव्हाच अशा वाचाळविरांना लगाम लागेल. 

महाराष्ट्रात राजकीय वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या राजकारण्यांना संवैधानिक मार्गाने धडा शिकविणे हीच सध्याची निकडीची गरज आहे. जिथे शांतता आणि एकोपा नांदतो तिथे प्रगतीचे द्वार उघडतात. महाराष्ट्राला संत परंपरा आणि दिशादर्शक महापुरूषांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे अजूनही इथली जनता त्यांच्या विचारांना आदर्श माणून चालते. संयम आणि धैर्याने वाईटाचा प्रतिकार करते. मात्र हल्ली लोकशाहीचे स्तंभ धडाधडा कोसळू लागल्याने एकात्मताप्रिय जनता कुठेतरी निराश होताना पहायला मिळत आहे. अशातच सामाजिक आणि सांस्कृतिक वारश्यांना विकृत करून समाजासमोर मांडले जात असल्याने मने दुभंगत आहेत. त्यामुळे लेखक, सुजान नागरिक, पत्रकार आणि  प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढे येत महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का लागणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावा, अशी मागणी करीत मी थांबतो. 


-बशीर शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget