Halloween Costume ideas 2015

डॉ.कफिल खान द्वेषाचा बळी

Dr. Kafil Khan
ज्या हेट स्पीचमुळे डॉ. कफिल खान यांना 9 महिने तुरूंगाची हवा खावी लागली ते भाषण दोन जमातीमध्ये घृणा उत्पन्न करणारे तर नव्हतेच उलट ते देशातील एकात्मता वाढविणारे होते. या निरीक्षणासह अलाहाबाद हायकोर्टाने या आठवड्यात डॉ. कफिल खान यांना फक्त जामीनच दिला नाही तर त्यांच्यावरील लावण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलमांनाही रद्द करून योगी सरकारला योग्य तो संदेश दिला. तबलिगी जमातबद्दल बॉम्बे हायकोर्टाच्या दिलासादायक निर्णयानंतर हा दूसरा दिलासादायक निर्णय अलाहाबाद हायकोर्टाकडून आला. ही बाब अल्पसंख्यांकांमध्ये व्यवस्थेविषयी विश्‍वास वाढविणारी ठरली, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
    बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑगस्ट 2017 मध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 60 पेक्षा जास्त लहान मुलांच्या मृत्यूच्या घटनेमधून प्रकाशझोतात आल्यामुळे डॉ. कफिल खान हे उत्तर प्रदेश सरकार विशेष: योगी यांच्या नजरेत आले. ही त्यांची नियती होती. आपल्या स्व:च्या खाजगी गाडीतून गोरखपूरमध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या आपल्या मित्रांकडून ऑक्सिजनचे सिलेंडर स्वखर्चाने आणून अनेक लहान बाळांचे प्राण वाचविल्यामुळे अचानक नायक म्हणून पुढे आलेल्या डॉ. कफिल खान हे योगी सारख्या सांप्रदायिक व्यक्तीच्या नजरेत आले नसते तरच नवल. एक वैद्यकीय अधिकारी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑक्सिजन पुरवठ्याशी काडीचा संबंध नसतांनासुद्धा त्यांना यात जबाबदार धरून अटक करून त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. मात्र समाजमाध्यमांनी ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपनीचे देणे उत्तर प्रदेश सरकारला फेडता आले नसल्यामुळे पूर्व सूचना देऊन कंपनीने ऑक्सिजन पुरवठा बंद केला. हे सत्य पुढे आल्यावर योगींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता त्यांनी डॉ. कफिल खान यांच्यावरच बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेचे खापर फोडले.
    त्यांच्यावरील कार्यवाहीचा आयएमए पासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच विरोध केला होता. परंतु, कोणाचीही तमा न बाळगता मुलांचा मृत्यू हा डॉ. कफिल यांच्याकडून केला गेलेला नरसंहार होता, असे समजून त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. मात्र यात विभागीय चौकशीत ते निश्कलंक असल्याचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यावरही योगींच्या दबावाखाली काम करणार्‍या उत्तर प्रदेश पोलिसांनी डॉ. कफिल खान यांचा पिच्छा सोडला नाही. 2019 मध्ये सीएए आंदोलनाच्या वेळी सर्व देशातील लोक रस्त्यावर उतरले असतांना डॉ. कफिलही या आंदोलनामध्ये उतरले. डिसेंबर 2019 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये प्रख्यात विचारवंत योगेंद्र यादव यांच्यासह मंचावर सहभागी होवून विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असा आरोप ठेऊन त्यांना 9 महिने तुरूंगात डांबण्यात आले. त्याच किंवा त्यापेक्षा तिखट भाषण करूनही योगेंद्र यादव यांना मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी हात लावण्याचे धाडस केले नाही. स्पष्ट आहे खान आणि यादव या आडनावामधील फरक यामागे कार्यरत होता. हेच भाषण जे उत्तर प्रदेश पोलीस आणि अलिगडचे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रविरोधी वाटले तेच अलाहबाद उच्च न्यायालयाला एकात्मता वाढविणारे वाटले. यातच सर्वकाही आले.
    डॉ. कफिल यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांच्यावर लावलेल्या रासुका कायद्यातील तरतुदी यासुद्धा चुकीच्या आहेत, असे स्पष्ट म्हणून जामीनीचा आदेश दिल्यावरही अलिगडच्या जिल्हाधिकारी आणि तुरूंग अधिकारी तो आदेश घेण्यामध्ये त्यांना शक्य होईल तेवढी टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप डॉ. कफिल यांच्या कुटुंबाने लावलेला आहे.
    नि:संशयपणे राष्ट्रवाद एक पवित्र भावना आहे. परंतु, तारतम्य न ठेवता जर राष्ट्रवादाचे भरते आले तर ते देशहिताच्या विरूद्ध असून आपल्याच नागरिकांवर अत्याचार करणारे असते हे डॉ. कफिल खान यांच्या अटक आणि सुटकेवरून सिद्ध झालेले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget