Halloween Costume ideas 2015

सर्जिकल स्ट्राइक – २

भारतीय हवाईदलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या छावण्या उद्ध्वस्त केल्या. झाले ते अगदी योग्यच झाले. दहशतवाद्यांना धडा शिकवायलाच हवा होता.  पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक व्यक्ती अगदी अस्वस्थ झाली होती. त्याच्या मनात केवळ बदल्याची भावना होती. या अस्वस्थ  मनांमध्ये आजच्या हल्ल्याच्या वृत्ताने समाधानाची भावना निर्माण झाली आहे. निश्चिच भारतीय सैन्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. देशातील सौहार्दाचे वातावरण बिघडले होते.  पुलवामा घडल्यानंतर समाजमाध्यमांतून तर नुसता हैदोस पुलवामा हत्याकांड घडल्यापासूनच सुरू होता. पुलवामात केंद्रीय पोलीस दलांचे तब्बल ४० हून अधिक जवान मारले गेले. हे  कृत्य केले दहशतवादी संघटनेने. भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार भारतीय विमानांनी मंगळवारी पहाटे जी कारवाई केली ती ‘बिगर- लष्करी प्रतिबंधात्मक’ अशा स्वरूपाची होती. याचा अर्थ आपण जे काही केले ते लष्करी कारवाईच्या रूपात नव्हते. याचा अर्थ उरी घडल्यानंतर ज्या प्रकारचे लक्ष्यभेदी हल्ले आपल्या  लष्कराने केले त्या प्रकारची ही कारवाई नव्हती. त्या लक्ष्यभेदी हल्यांनतर भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कर प्रमुख जातीने हजर होते. मंगळवारची  कारवाई हवाई दलाने केली. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी आपली विमाने पाकव्याप्त काश्मिरात गेली, पण त्यांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा भंग करावा लागला नाही.  तसे झाले असते तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या अनुषंगाने ही बाब फारच महत्त्वाची. ही अशी कारवाई केली जाईल अशी जवळपास सर्वांनाच शंका होती. विशेषत: ज्या निर्घृणपणे पुलवामाकांड घडले ते पाहता भारतास प्रत्युत्तर देणे भाग होते. सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याआधी अशी कारवाई करून दाखविली जाईल हे उघड होते. सोशल मीडियावर गरिकांच्या  कल्पनाशक्तीला बहर आला होता तो आता निवळेल. पुलवामा घटनेनंतरही सरकार केवळ मूग गिळून गप्प बसले असते तर त्याची मोठी किंमत सरकारला आगामी लोकसभा  निवडणुकीत मोजावी लागली असती. केवळ युद्धखोरीच्या प्रवृत्तीतून ही कारवाई झालेली नाही हा संदेश पाकिस्तानने नीट समजून घेण्यातच त्यांचे हित आहे. अन्यथा प्रत्यक्ष लष्करी  संघर्षातून दोन्ही देशांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. दोन्ही बाजुंची मोठी आर्थिक व जीवितहानी होईल. या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर आजचे जनमत सत्ताधारी पक्षाच्या  बाजूनेच जाईल असा ढोबळ अंदाज कोणालाही बांधता येईल. सगळ्यातच राजकारण आणून चालत नसते. चाळीस पैसेवाले ट्रोल्स पत्रकारांच्या टाइमलाइनवर जाऊन वातावरण गरम  करायचा प्रयत्न करत होते.
जवळपास सर्वच माध्यमांनी गेल्या काही महिन्यांपासून युद्धज्वर पोसला आहे. आजच्या घडीला सरकारच्या अपयशांच्या बाबतीत प्रश्न विचारणे म्हणजे थेट पाकिस्तानच्या अजेंड्याला  मदत करणे, देशद्रोही वागणे असे सरळ समीकरण जोडले गेलेले असल्यामुळे कुणाला काही बोलण्याची संधीच उपलब्ध नाही. लोकशाहीतील विरोधाची भूमिका या युद्धज्वरात कुणी  समजून घेताना दिसत नाही आणि अशा वातावरणात लोकानुनय करण्याशिवाय राजकीय पक्षांना पर्याय राहात नाही. सध्या सर्व राजकीय पक्ष तेच करताना दिसतात. विकास, रोजगार, अर्थव्यवस्थेवरील दबाव, आर्थिक क्षेत्रातले घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय अशा विविध पातळ्यांवर मोदी सरकारवर प्रचंड टीका होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये  जनतेच्या रोषाचा प्रत्यय ही आला. त्यामुळे मोदी निवडणुकांच्या आधी छोटे युद्ध करू शकतात असा आरोप त्यांच्यावर काही राजकीय नेत्यांनी वारंवार केलेला आहे. या पाश्र्वभूमीवर  बॅकफूटवर गेलेल्या मोदी यांना पुलवामाच्या निमित्ताने नव्याने रणनीती आखायला मिळाली. ज्या पद्धतीची वातावरणनिर्मिती विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसार माध्यमांनी तयार केली  होती, ते पाहता सर्जिकल स्ट्राइक-२ घडवून पुन्हा एकदा याचा राजकीय फायदा मोदी घेऊ शकतात असे चित्र स्पष्टपणे दिसायला लागले होते. मोदींच्या रॅलींमधील, तसंच जाहीर  समारंभांमधील भाषणांमध्ये त्यांनी आवर्जून हा मुद्दा आणला. लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी 'आजका दिन खास हैं' हे वाक्य त्यांनी आवर्जून उच्चारलं आहे. देश सुरक्षित हातात  आहे हे सांगून त्यांनी हात जोडून नमस्कार ही केलाय. त्यामुळे मोदींचा अजेंडा अतिशय साफ आहे. राममंदिराचा मुद्दा काहीसा मागे पडल्यामुळे कदाचित सर्जिकल स्ट्राइक-२ चा फायदा  घेण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. भावनात्मक मुद्दे पुढे आले तर मोदींना शक्ती मिळणार आहे, पण अगदीच २०१४ सारखी स्थिती पुन्हा येण्याची शक्यता कमीच.  सर्जिकल स्ट्राइकवर विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका पाहता हा निवडणुकीचा मुद्दा बनता काम नये अशीच त्यांची रणनिती दिसत आहे. त्यामुळे निवडणुकांचा सर्जिकल स्ट्राइक  एकाचवेळी अनेक ठिकाणांवरून होणार आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget