Halloween Costume ideas 2015

पैगंबरी न्याय : प्रेषितवाणी (हदीस)

आजपासून सुमारे १४५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरबस्थानच्या वाळवंटामध्ये लोक कबिले (समूह) बनवून राहायचे. प्रत्येक कबिल्याचा एक सरदार असे. वर्ण, वंश, व्यवसाय यावरून  प्रत्येकाची आपापली एक ओळख होती. प्रत्येक कबिला एकदुसऱ्यांवर आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असे. यातूनच त्यांच्यात युद्धाच्या ठिणग्या पडायच्या. अज्ञानाचा अंधकार  पसरलेला होता. मर्जीत आले तोच कायदा. दिवसाढवळ्या चोऱ्या, दरोडे पडायचे. अशा या परिस्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाले. एका मार्गभ्रष्ट   समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ज्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती ते या कुरआनच्या शिकवणीतून देण्यात येत होते. तसेच समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी कुरआनच्या  स्वरूपात एक संविधान ईश्वराने प्रेषितांच्या स्वाधीन केले. ज्याच्या माध्यमाने पैगंबरांनी समाज पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले.
समाजातील उच्चनीचता, भेदभाव, अन्याय, अत्याचार दूर करून त्या जागी न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करण्याचा पैगंबरांनी प्रयत्न केला. लोकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत करून  कुरआनमधील कायद्याची कठोर अंमलबजावणी केली. हळूहळू लोकांची मानसिकता बदलत होती, जीवनाचे वास्तविक ज्ञान वाढत होते, जीवन जगण्यासाठी काही नीतिनियम असले  पाहिजेत याची जाणीव निर्माण झाली होती. या सर्व मानवी प्रकृतीला अनुकूल गरजांची कुरआनच्या माध्यमातून पूर्तता करण्यात येत होती. चोरीची शिक्षा ठरविण्यात आली. जो चोरी  करेल त्याचे मनगटापासून हात छाटण्याचे आदेश देण्यात आले. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली. चोऱ्या दरोड्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. या काळात मदीनेत बनू मक़्जुम  नावाच्या उच्चभ्रू काबिल्यातील फातिमा नावाच्या स्त्रीकडून चोरीचा गुन्हा घडला होता! चोरीचे हे प्रकरण पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या न्यायालयात दाखल झाले! साहजिकच आता  कुरआनच्या कायद्यानुसार त्या स्त्रीला शिक्षा होणार होती; तरीसुद्धा लोकांमध्ये ही उत्सुकता लागली होती की पैगंबर (स.) आता काय न्याय देतील? कारण ही स्त्री एका उच्चभ्रू  कबिल्याची सदस्य आहे आणि त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. कबिल्यामध्ये अस्वस्थता वाढू लागली! त्या स्त्रीच्या शिक्षेमध्ये काही कपात व्हावी यासाठी प्रयत्न होऊ लागले.  पैगंबरांच्या जवळच्या लोकांना मध्यस्तीसाठी विनवणी केली गेली, शेवटी एक शिष्टमंडळ त्या स्त्रीची शिफारस घेऊन पैगंबरांच्या न्यायालयात पोहचला व शिक्षा कमी करण्याची मागणी  केली. पैगंबर (स.) काही वेळ शांत राहिले, चेहरा लाल झाला होता. थोड्या वेळाने पैगंबरांनी त्या शिष्टमंडळाला उत्तर दिले; नव्हे तर आपला निकाल सांगितला. पैगंबर (स.) म्हणाले,  ‘‘मला अल्लाहने न्याय प्रस्थापित करण्यासाठी या जगात पाठविले आहे, तुम्ही शिक्षा कमी करण्याची शिफारस करता!’’ पुढे पैगंबर (स.) जे म्हणाले ते अगदी मन सुन्न करणारे आहे.  पैगंबर (स.) शेवटी म्हणाले, ‘‘हा चोरीचा अपराध जर या फातिमाऐवजी माझ्या फातिमाच्या (पैगंबरांची प्रिय मुलगी) हातून जरी घडला असता तर तिलासुद्धा मी हीच शिक्षा दिली  असती.’’ आता यापुढे कोणाची हिंमत होती शिफारस करण्याची? सर्व जण निमूटपणे निघून गेले. न्यायानुसार त्या स्त्रीला शिक्षा करण्यात आली.
(संदर्भ:- बुखारी (हदीस संग्रह) खंड क्र.२, पान क्र. १००३)
आज आमच्या समाजाला अशा प्रकारच्या न्यायाची नितांत गरज आहे. जेणेकरून अपराधांचे प्रमाण कमी होतील. न्यायदान करताना जर ही भावना निर्माण झाली की, कोणत्याही  परिस्थितीत कोनावरही अन्याय होऊ नये, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवारिल विश्वास नक्कीच वाढेल. न्यायालयात न्यायदान करणाऱ्यांकडूंन हीच अपेक्षा!!

-संकलन : शेख अब्दुल हमीद, मो.: ७३८५३१४१४३

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget