Halloween Costume ideas 2015

खोटारडेपणा : एक दुर्लक्षित अवगुण

मुझे तराशना है मेरे कौम की बच्चों का किरदार, बिना तराशे हीरे मुझे अच्छे नहीं लगते

ज्यानैतिकतेला जग हिमालयाच्या खोर्यात, साधूंच्या मठात, सुफिंच्या आस्तान्यात, बाबा लोकांच्या शरणात जावून शोधतो, इस्लाम त्या नैतिकतेला संसारी लोकांत, घरात, बाजारात, शासनात, प्रशासनात, कोर्टात, शैक्षणिक संस्थांत, रूग्णालयात आणि प्रत्येक माणसात उत्पन्न करू इच्छितो. हे शक्यही आहे आणि आवश्यकही. नसता जग नरकासमान होऊन जाईल, किंबहुना झालेले आहे. माणसाची वर्तवणूकच या जगाला एक तर स्वर्गासमान बनविते किंवा नरकासमान. जगाला नरकासमान बनविणार्या सवयींपैकी सर्वात वाईट सवय म्हणजे खोटारडेपणा. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खोटारड्या व्यक्तींची तीन वैशिष्ट्ये विषद केलेली आहेत.
एक - जेव्हा बोलेल तर खोटे बोलेल,  दोन- वायदा करील तो पूर्ण करणार नाही. तीन - त्याच्याकडे विश्वासाने काही अमानत ठेवली असेल तर त्यात विश्वासघात करील.
    खोटारड्यापणापासूनच समाज नासविण्याची प्रक्रिया सुरू होते. खोटारडेपणा हाच सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या मुळात असतो. असे असले तरी आज खोटे बोलण्याला फारसे वाइट मानले जात नाही. माणसं अगदी सहजपणे खोटं बोलत असतात. तरीपण खोटारड्या माणसाच्या खोटेपणाचा अंदाज येतोच. अशा लोकांपासून इतर लोक हळू-हळू लांब राहू लागतात. खोटे बोलण्याचा सर्वात वाईट परिणाम हा होतो की, खोटारड्या माणसाची विश्वासर्हता संपून जाते. लोग त्याला टाळू लागतात. त्याच्याशी व्यवहार टाळले जातात. तो अल्पावधीतच समाजात उघडा पडतो. समाज त्याचा अघोषित बहिष्कार करतो. हा बहिष्कार खोटारड्या माणसाच्या सुरूवातीला लक्षात येत नाही. खोटे बोलून मिळविलेल्या लाभामध्ये तो खुश असतो. जेव्हा त्याच्या लक्षात येते की, आपल्या खोट्यारड्यापणामुळे लोक आपल्याला टाळत आहेत, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चारही बाजूंनी त्याची कोंडी झालेली असते. त्याची विश्वासर्हता संपलेली असते. अशा परिस्थितीत तो जरी खरं बोलायचा प्रयत्न करू लागला तरी त्याच्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही. एकंदरित अशा लोकांचे आयुष्य फक्त खोटारड्यापणामुळे अयशस्वी होऊन जाते. त्यातून निर्माण होणार्या तणावामुळे विजय माल्या, मेहूल चोकसी, निरव मोदी, ललित मोदी सारखे लोक देश सोडून पळून जातात. ज्यांना हे जमत नाही ते आत्महत्या करून आपली सुटका करून घेतात.
माणूस खोटे का बोलतो?
    माणूस खोटे का बोलतो? याचे उत्तर कुरआनने खालीलप्रमाणे दिलेले आहे. ”ज्या लोकांचा अल्लाहवर विश्वास नाही तेच (लोक) खोटे रचत असतात आणि तेच लोक खोटारडे आहेत. ” (सुरे नहल आयत नं. 105). ही आयत कुठल्याही सश्रद्ध मुस्लिमाच्या अंगावर शहारे आणण्यासाठी पुरेशी आहे. या आयातीचा अर्थ सोप्या शब्दात सांगायचा असेल तर असे म्हणता येईल की, ”माणूस खोटे तेव्हाच बोलतो जेव्हा त्याचा या गोष्टीवर ठाम विश्वास असतो की, खरे बोलल्यास (नाऊजुबिल्लाह)अल्लाहची मदत येणार नाही.” झाले! येथे सारेच संपले. इस्लामची इमारत मुळात खरेपणाच्या पायावर उभी आहे. मुस्लिम एकवेळेस गुन्हेगार असू शकेल, भित्रा असू शकेल मात्र तो कधीच खोटारडा असू शकत नाही. या गृहितकालाच खोटारड्यापणामुळे सुरूंग लागतो. माणसात खरेपणा, स्वत:चे नुकसान होण्याची शक्यता गृहित धरून वर्तन केल्यानेच येते. खरेपणामुळे होणारे नुकसान  अल्लाह मोठ्या फरकाने भरून काढणार आहे, असा विश्वास ज्याच्या मनात असतो तोच खरे बोलू व वागू शकतो. म्हणून अनेक इस्लामी विद्वानांचे असे मत आहे की, खोटारडा माणूस इस्लामच्या परिघाबाहेर निघून जातो. म्हणजे तो मुस्लिम राहत नाही. जरी नावाने मुस्लिम वाटत असता तरी.
    खरे बोलण्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी साधारणपणे माणसं खोटं बोलत असतात. परंतु असे नेहमी होत नाही. खोटारडेपणा एक मानसिक आजार आहे. खोटारडा माणूस लाभ मिळविण्यासाठीच खोटे बोलेल असं नाही. एकदा का खोटं बोलण्याची सवय लागली की ती त्याची प्रवृत्ती बणून जाते. मानसिक आजार बळावत जातो. मग तो लहान-सहान बाबतीतही सराईतपणे खोटे बोलू लागतो. कुठलाही लाभ होणार नसेल तरीही खोटे बोलू लागतो. 
खोटारडेपणाचे परिणाम
    साहजिकच जेव्हा एखाद्या समाजात खोटारड्यांची संख्या वाढते तेव्हा इतर समाजातील लोकांच्या मनात त्या समाजाबद्दल शंका निर्माण होते. मग प्रत्येक लहानसहान गोष्ट तपासून पाहिल्याशिवाय कोणीही त्यांच्याशी व्यवहार करीत नाही. या तपासणीमुळे लोकांवर अतिरिक्त ताण पडतो. कोणाचाच कोणावर विश्वास राहत नाही. पतीचा-पत्नीवर तर पत्नीचा-पतीवर, वडीलांचा-मुलावर तर मुलांचा- वडिलांवर विश्वास राहत नाही. अशी परिस्थिती ज्या समाजात उत्पन्न होते तो समाज वेगाने रसातळाला जातो. माणसाच्या अंगी खोटेपणा एकटाच येत नाही तो सोबत अनेक वैगुण्यांना घेऊन येतो. त्यामुळे सामुहिक चारित्र्याचा र्हास होतो. समाजात गुन्हेगारी वाढत जाते.
    आजकाल अगदी लहानपणापासून म्हणजे ’जॉनी-जॉनी यस प्पपा’ पासून ते ’एप्रिल फूल’ पर्यंत खोटे बोलण्याचे एकप्रकारचे प्रशिक्षणच मिळत आहे. त्यामुळे खोटे बोलणे हे वाईट असते हे अनेकांच्या गावीच नसते. त्याला ते सामान्य बाब समजतात. अलिकडे भारतीय जनजीवनातही अशी प्रवृत्ती फोफावल्याने खोटारडेपणा हा बाय डिफॉल्ट वाढत चाललेला आहे. किंबहुना काही लोकांच्या अंगात भिनलेला आहे. सर्वच समाज घटकात या आजाराची लागण झालेली आहे. कित्येक मुस्लिम सुद्धा या रोगाने पीडित आहेत. आजमितीला भारतात असे कोणते क्षेत्र आहे ज्यात खोटारडी माणसे नाहीत. आरोग्या सारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा खोटारड्या माणसाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. त्यामुळे बहुतेक खाजगी रूग्णालयांचे खाटीक खाण्यात रूपांतर झालेले आहे. याचा अनुभव तेथे जाणार्यांना नेहमीच येतो. आपल्या राजकारणाचा डोलारा तर खोटारडेपणाच्या पायावरच उभा आहे. नगरसेवकांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सर्वच खोटे बोलत असतात. म्हणूनच निवडणूक जाहिरनाम्यात दिलेली वचने पाळण्यासाठी असतात असे कोणालाच वाटत नाही. निवडणुकांच्या वेळी दिलेल्या वचनांना, ”जुमला” म्हणून नाकारण्यात कोणालाही वाईट वाटत नाही.
    भारतातच ही परिस्थिती आहे असेही नाही. अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी अनेकवेळा खोटे बोलल्याचे सिद्ध झालेले आहे. याची सुजाण वाचकांना जाणीव आहे. त्यावर विवेचन करण्याची गरज नाही. फक्त एक उदाहरण देऊन थांबतो की, इराकला बेचिराख करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ’वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन्स’ सद्दाम हुसेननी बाळगलेली आहेत, असे धादांत खोटे विधान केले होते, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे.
    आज परिस्थिती अशी आहे की, कुठल्याही संस्थेतील अगदी मोठ्या पदावरील व्यक्तीही रेटून खोटे बोलतांना दिसत आहेत. सीबीआय सारख्या प्रिमीअर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या पहिल्या दोन पदावरील व्यक्तींपैकी कोणीतरी एक नक्कीच खोटे बोलत आहे. मीडियामध्ये खोट्या बातम्या प्रसारित करण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. सोशल मीडियावर तर कोणती बातमी खरी आणि कोणती खोटी? याचा मागोवा स्वतंत्ररित्या घेतल्याशिवाय विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
    खरे पाहता अल्लाहने माणसाची रचनाच अशी केलेली आहे की, त्यांनी खरे बोलावे व खरे वागावे. त्याशिवाय जगाचे व्यवहारच सुरळीत चालणे शक्य नाही. तरी सुद्धा बहुतांशी लोक खोटे बोलतात व खोटे वागतात. म्हणून जगात जीवन जगणे कठीण झालेले आहे.
    इस्लाममध्ये खोटारडेपणाचे स्थान
    इस्लाममध्ये खोटारडेपणाला अजिबात स्थान नाही. ही बाब सिद्ध करण्यासाठी मी खालीलप्रमाणे पुरावे आपल्या सेवेत सादर करीत आहे. 1. ”हे श्रद्धावंत लोकांनो! अल्लाहची भिती बाळगा आणि जे सत्यवान आहेत त्यांची साथ द्या” (सुरे तौबा : आयत नं. 119)    या आयातीमध्ये दोन आदेश आहेत. एक - अल्लाहचे भय बाळगण्याचे व दोन - खर्या लोकांच्या सानिध्यात राहण्याचे.                 हे दोन्ही आदेश समजण्यासाठी सोपे आहेत. परंतु, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी हा प्रश्न आहे. त्यासाठी दोन ट्रिक्स (युक्त्या) अशा आहेत की, कुरआनला समजून घेतल्याशिवाय अल्लाहचे भय बाळगता येत नाही आणि कुरआन समजण्यासाठी त्याला समजून नियमितपणे वाचने आवश्यक आहे. शिवाय, हदीसचा सुद्धा कुरआन समजण्यासाठी मोठा उपयोग होतो. आजकाल कुरआनचे सविस्तर भाष्य (तफसीर) जवळ-जवळ सर्वच प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या वाचनाने अल्लाहला समजणे प्रयत्नांती शक्य आहे.
    लक्षात ठेवा मित्रांनो! आज माणसं शरिराने जरी सदृढ दिसत असली तरी समाजातील एक मोठा वर्ग आत्मिकदृष्ट्या आजारी आहे. अशा आजारी आत्म्यांवरच खोटारडेपणाचा सैतानी वार सहज शक्य होतो. ज्यांची नाळ कुरआन-हदिस आणि नमाजशी जुळलेली असेल त्यांच्यावर सैतानचा हा वार होऊच शकत नाही. त्यांचे रक्षण फरिश्ते (ईशदूत) करीत असतात. मात्र अनेक माणसं अगदी क्षुल्लक आणि क्षणिक लाभासाठी स्वत:हून खोटे बोलण्यास व वागण्यास तयार असतील तर हे फरिश्ते त्यांच्यापासून दूर जातात. यासंबंधी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी फारच सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. ते म्हणतात, (अ) ”ज्या गोष्टी संबंधी विश्वसनिय माहिती असेल की ही गोष्ट पुण्यकर्म आहे तीच बोलली जावी. राहिलेल्या इतर गोष्टींबाबत अजिबात बोलू नये.” (ब)”माणसाच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द फरिश्ते त्याच्या नामे आमाल (प्रगती पुस्तक) मध्ये नोंद करीत असतात.” प्रेषित सल्ल. यांनी एके ठिकाणी एका वाक्यात मानवी जीवनाला समृद्ध करण्याची गुरूकिल्ली सांगितलेली आहे. पण बरेच लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. प्रेषित सल्ल. म्हणतात की, ”जो व्यक्ती मला आपल्या जीभ आणि गुप्तांगाच्या सदुपयोगाचा जामीन देईल मी त्याला जन्नतचा जामीन देतो” एकदा एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना प्रश्न केला की, अशी कोणती गोष्ट आहे जी माणसाला नरकामध्ये नेण्यासाठी कारणीभूत ठरेल? तेव्हा प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले की, ”जीभ आणि गुप्तांग” (तिर्मिजी) अर्थात या दोन्ही अवयवांचा दुरूपयोग.
    आजकाल कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्डच्या जमान्यात अहले ईमान (मुस्लिमां)साठी पुढील हदीस अतिशय मार्गदर्शक अशी आहे. प्रेषित (सल्ल.) म्हणतात,”माणसाला खोटारडा ठरविण्यासाठी एवढीच गोष्ट पुरेशी आहे की, माणूस प्रत्येक ऐकीव गोष्ट (खरेपणाची खात्री न करता) इतर लोकांना सांगेल.”
    आजकाल अनेक ठिकाणी नियमितपणे गप्पांचे फड रंगत असल्याचे आपण पाहू शकतो. तेथे सगळ्याच गोष्टी, खर्या आणि चांगल्या चर्चिल्या जात असतील असे नाही. अवाजवी बडबड करण्याचा काही लोकांना जणू रोगच जडलेला आहे. नको तिथे व नको ते बोलण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. पण या आजारापासून सुटका सहज शक्य आहे. त्यासाठी एक सोपी युक्ती प्रेषित सल्ल. यांनी सांगितलेली आहे. ती अशी की, ” जो अल्लाह आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवतो त्याने एक तर चांगले बोलावे किंवा गप्प रहावे.” (बुखारी).
लक्षात ठेवा मित्रांनों! मनोरूग्णाचे एक मोठे लक्षण अनावश्यक बोलणे, सतत बडबड करत रहाणे हे सुद्धा आहे. वर नमूद हदीसवर जर निश्चयपूर्वक अंमल केला गेला तर आपण वेडे होण्यापासून सुरक्षित राहू शकतो. तासन्तास मोबाईलवर बोलणार्यासांठी ही हदीस वरदान सिद्ध होऊ शकते. पानपट्या, कट्टे (चबूतरे), चौक, हॉटेल, नाके, कॅरमहाऊस इत्यादी ठिकाणी आजकाल अनेक लोक, विशेषत: मुस्लिम युवक रात्री उशीरापर्यंत अनावश्यक गप्पा मारतांना दिसून येतात. अशा निरूपयोगी मैफिलींबाबत डोक्यात तिडीक उठेल अशी एक चेतावनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी देऊन ठेवलेली आहे. जगातील सगळ्यात खरी व्यक्ती अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. म्हणतात की, ” जे लोक अशा मैफिलीतून उठतील जिच्यामध्ये अल्लाहचा उल्लेख झालेला नसेल तर ते अशा ठिकाणाहून उठलेत असे समजावे जेथे मेलेले गाढव पडलेले होते. आणि याच मैफिली त्या लोकांसाठी निवाड्याच्या दिवशी पश्चातापाचे कारण बनतील.” (अबु दाऊद).
उपाय
    कुरआन आणि हदीसचा विषय मनुष्य आहे आणि मनुष्यासाठी उपयोगी अशाच आज्ञा त्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रेषित सल्ल. यांचे वरील नमूद सर्व आदेशसुद्धा अंमलबजावणीसाठी अगदी सोपे आहेत. मात्र जरा काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
    मित्रांनों लक्षात ठेवा! ज्या माणसाला एकदा का खरे बोलण्याची आणि खर्याने वागण्याची सवय झाली की तो समाजात ठळकपणे उठून दिसतो. लोक आपोआपच त्याचा सन्मान करावयास लागतात. त्याच्यावर विश्वास ठेऊ लागतात. तो आपोआपच प्रतिष्ठित होऊन जातो. एवढे की लोक आपले तंटे सोडविण्यासाठी त्याच्याकडे येतात. त्याने दिलेला निर्णय प्रमाण मानला जातो. त्यामुळे परत खरे बोलण्याची ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होते. ज्याप्रमाणे एका दिव्याने हजारो दिवे प्रज्वलित होतात मात्र मूळ दिव्याचा प्रकाश कमी होत नाही, अगदी त्याच प्रमाणे तुम्ही खरे बोलण्या/वागण्याचा निश्चय करा, मग पहा तुमच्या संपर्कात येणारी सर्व माणसे आपोआप खरे बोलायला / वागायला सुरूवात करतील व समाज सत्य प्रकाशाने उजळून निघेल. सातव्या शतकात मध्य-पूर्वेत अरबी टोळ्यांनी खोटे बोलण्याची सीमा ओलांडून गुन्हेगारी जीवनात प्रवेश केला होता. एका बदू (खेडूत) अरबीला ज्याने नव्यानेच इस्लामची माहिती घेतली आहे, लक्षातच येत नव्हते की, खोटे बोलण्यात, वागण्यात आणि दुसर्या टोळीला लुटण्यात काय वावगे आहे? अशा रानटी अरबी टोळ्या जेव्हा इस्लामच्या प्रकाशाने न्हाऊन निघाल्या तेव्हा त्याच रानटी लोकांचे अद्भूत अशा सभ्य समाजामध्ये ट्रान्सफार्मेशन (रूपांतरण) झाले. इतके की, याच लोकांनी 100 वर्षात एका तृतीयांश पृथ्वीवर सत्ता मिळविली व जगाला एका नव्या कल्याणकारी सभ्यतेची देणगी दिली.
    प्रेषित सल्ल. यांच्या अद्भूत मार्गदर्शनाची देणगी लाभलेल्या आम्हा मुस्लिमांनीही त्या देणगीची म्हणावी तशी कदर केलेली नाही एवढे निश्चित. त्यामुळे आपल्यामध्येही खोटारड्या लोकांची संख्या कमी नाही. प्रेषित सल्ल. यांचे जबाबदार वारसदार या नात्याने ही परिस्थिती बदलावयाची असेल आणि आपल्या प्रिय भारताला कल्याणकारी इस्लामी सभ्यतेची देणगी द्यावयाची असेल तर खरेपणाची सुरूवात स्वत:हापासून करावी लागेल. आमच्यासाठी ही शरमेची बाब आहे की, 1300 वर्षापासून येथे राहून सुद्धा आपल्या देशबंधूंना इस्लामची ओळख, ” ईद-मिलन” चे कार्यक्रम आयोजित करून द्यावी लागते. याचा दूसरा अर्थ असा की, आपण भारतीय मुस्लिम इस्लामला अपेक्षित असलेल्या सामुहिक चारित्र्याचे ते स्तर अद्याप गाठू शकलेलो नाही, ज्या स्तराची अपेक्षा इस्लामने आपल्याकडून केलेली आहे. इस्लामच्या या उपेक्षेचे काय परिणाम होत आहेत? हे आपण सुजाण जाणूनच आहात. अजूनही वेळ गेलेली नाही.
    मित्रानों! मनाच्या पाटीवर आज लिहून घ्या की, तन्मयता नसेल तर विद्वत्ता व्यर्थ असते. आजच निश्चय करा आणि त्यावर कायम रहा की, आजपासून बोलेन तर बोलेन आणि वागेन तर खरे वागेन. मग भलेही त्यासाठी कोणतेही मुल्य चुकवावे लागो. मग पहा अल्लाहची मदत किती वेगाने येते. तुम्ही स्वत: अचंभित व्हाल. अल्लाह मला, तुम्हाला आणि आपल्या देशबांधवांना खरेपणे बोलण्या-वागण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.

- एम. आय. शेख
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget