Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद सल्ल. सर्वांचे पैगंबर

-सय्यद सालार पटेल
अल्लाहने या पृथ्वीवर मानवाच्या भौतिक गरजांच्या पूर्ततेची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे अल्लाहने नेहमी सातत्याने मानवाच्या नैतिक व  अध्यात्मिक अपेक्षा पूर्ततेचीही व्यवस्था केलेली आहे. अल्लाहने स्पष्ट स्वरूपात मार्गदर्शन केलेले आहे. माणसाला सांगितलेले आहे कि, या विश्वात त्याचे स्थान 
काय आहे? पृथ्वीवर तो कोणत्या कार्यास पाठविण्यात आलेला आहे. जीवनाचा वास्तविक उद्देश कोणता आहे? जीवन यापन करण्यास त्याने कोणती तत्वे व नियमांचे पालन करावे, या मुलभूत व मौलिक मार्गदर्शनासाठी अल्लाहने प्रेषितांना या भूतलावर वेळोवेळी पाठविलेले आहे. संपूर्ण मानवजात एका माता-पित्याची संतान आहे. पहिले मानव ज्यांची आपण पाल्य आहोत ते आदम अलै. नुसते पहिले मानवच नव्हे तर पहिले पैगंबरसुद्धा होते. अल्लाहने त्यांना आदेश दिला होता कि, आपल्या संततीला अल्लाहची अज्ञाधारक बनवा. तो अल्लाह जो एकमेव आहे. त्याच्याशिवाय कोणीच पूजनीय व स्वामी नाही. तसेच त्यांचे जीवन अल्लाहच्या आदेशानुसार त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या प्रयत्नातच व्यथित व्हावी.
    आदम अलै. सलाम यांची संतती भूतलावर कालांतराने विभिन्न भागात पसरली. त्यातून विभिन्न जाती धर्मांची निर्मिती झाली. लोक अल्लाहचा आदेश विसरले. त्यांच्यात वैचारिक दोष निर्माण झाले. माणसाने आपल्या इच्छापूर्तीसाठी नाना प्रकारचे रितीरिवाज निर्माण केले. त्यातून अज्ञान वाढत गेले. शेवटी अज्ञान एवढे वाढले की त्यातून अनेकेश्वरवाद, मूर्तीपूजा, अंधश्रद्धा इत्यादी जीवनाचा अभिन्न भाग बनले. अल्लाहने प्रत्येक समुदायात व भूभागात आपले प्रेषित पाठविले. ज्यामुळे लोकांनी सावध व्हावे व त्यांनी सर्व अंधश्रद्धांचा त्याग करून एकमेव अल्लाहचे दास्यत्व स्विकारण्यास प्रेरित करावे.
    मानव जातीतील निर्माण झालेल्या बिघाडामध्ये सुधार घडविण्यासाठी निरंतर प्रेषित येत राहिले. कुरआनमध्ये चर्चित पैगंबरांची जी नावे आलेली आहेत, ती म्हणजे आदम अलै., नूह अलै., इद्रिस अलै., शोएब अलै., सालेह अलै., जुलकिफ्ल अलै., इब्राहीम अलै., इसहाक अलै., इस्माईल अलै., अय्युब अलै., इलियास अलै., अलयसआ अलै., दाऊद अलै,, सुलेमान अलैहसलाम, याह्या अलैसलाम, जकरिया अलै., लूत अलै, याकूब अलै., युसूफ अलै., युनूस अलै., मूसा अलै., हारूण अलै, ईसा अलै. व शेवटचे प्रेषित मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम या सर्व प्रेषितांतवर अल्लाहची दया व कृपा असो. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अन्य प्रेषितांसारखेच अल्लाहचे पैगंबर (संदेश देणारे) होते. परंतु, अल्लाहने त्यांना काही विशेषतः प्रदान केल्या होत्या.
     प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सर्व जगासाठी पैगंबर बनवून पाठविण्यात आले होते. त्यांचे कार्यक्षेत्र केवळ अरबवासियांपुरते मर्यादित नव्हते. तर त्यांच्या शिकवणीच्या कवेमध्ये अखिल विश्वातील मानवजातीला घेतलेले होते. पवित्र कुरआन स्पष्ट शब्दात घोषणा करतो कि, ’ हे मुहम्मद सल्ल. ! सांगा की, हे मानवानों मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा पैगंबर आहे. जो पृथ्वी व आकाशाच्या राज्यांचा स्वामी आहे.’ (कुरआन ७:१५८). दुसऱ्या जागी स्पष्ट म्हटलेले आहे कि,’ हे मुहम्मद सल्ल.आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगंबर बनवून पाठविलेले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. ’ (कुरआन ४:७९). तिसऱ्य ठिकाणी सांगितलेले आहे कि, ’ आणि हे पैगंबर सल्ल. आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावध करणारा बनवून पाठविले आहे. परंतु, भौतेक लोक जानत नाहीत.’ (कुरआन ३४:३८). अन्य एका ठिकाणी सांगितलेले आहे कि, ’ हे मुहम्मद सल्ल. आम्ही तुम्हाला संपूर्ण जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविलेले आहे.’ (२१:१०७).
    प्रेषित सल्ल. हे कोणत्याही विशिष्ट युवगासाठी प्रेषित नसून या विश्वाच्या अंतापर्यंत त्यांचीच पैगंबरी राहणार आहे. पैगंबरी श्रृंखलेची अंतिम कडी म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्ल. होय. अल्लाहने याची घोषणा पवित्र कुरआनमध्ये केलेली आहे. ’ लोक हो! मुहम्मद सल्ल. तुमच्या पुरूषांपैकी कोणाचे पिता नाहीत, परंतु ते अल्लाहचे पैगंबर आणि अंतिम प्रेषित आहेत. आणि अल्लाह प्रत्येक वस्तुचे ज्ञान राखणारा आहे.’ (कुरआन ३३:४०).
    अल्लाहचे अंतिम पैगंबर मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाची विशिष्टता ही आहे कि, त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू अत्यंत विस्तारपूर्वक ज्ञात व सुरक्षित आहे. या जगात केवळ त्यांचेच जीवन विस्तारपूर्वक सुरक्षित करण्यात आलेले आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने प्रेषितांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिलेली आहे. ’अल्लाह लोकांच्या दुष्पटतेपासून प्रेषितांचे रक्षण करणारा आहे.’ (कुरआन : ५:३७). दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे, ’ शत्रुच्या कटकारस्थानापासून प्रेषितांचे अल्लाह संरक्षण करतो.’ (कुरआन ८:३०).
    अंतिम प्रेषितांचे अनन्य साधारण महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ते संपूर्ण मानवतेसाठी एक परिपूर्ण मार्गदर्शक आहेत. पवित्र कुरआनची स्पष्टोकत्ती आहे कि, ’ वस्तुतः तुम्हाला लोकांसाठी अल्लाहचे पैगंबर, एक उत्कृष्ट आदर्श आहेत. प्रत्येक माणसासाठी जो अल्लाह व मरणोत्तर जीवनातील मोबदल्याच्या दिवसाचा उमेदवार असेल आणि बहुतांशी अल्लाहचे स्मरण करत असेल.’ (कुरआन : ३३:२१). उत्तम आदर्श त्यालाच म्हणता येईल, जो सुंदर व दोषरहित आहे. जो परिपूर्ण आहे आणि अपूर्णतेचा अभाव जेथे होत नाही.
    पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना ही विशेषता सुद्धा प्राप्त आहे कि, अन्य समुदायाप्रमाणे त्यांना माणणारा समुदाय केव्हाही पूर्णपणे नष्ट होणार नाही किंवा वाम मार्गावर जाणार नाही. या संबंधी प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे कि, ’ माझ्या समुदायात एक समुदाय नेहमी सत्यावर कायम आणि प्रभावी राहील.’ (हदिस : बुखारी व मुस्लिम).
    दुसऱ्या ठिकाणी अल्लाहच्या विशेष कृपेला स्पष्ट करतांना प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, ’ अल्लाहने तुम्हाला तीन वस्तुंची सुरक्षा प्रदान केलेली आहे. त्यापैकी तीसरी सुरक्षा अशी की, तुम्ही सर्वच्या सर्व कधीच पतप्रष्ट होणार नाही.’ (हदीस : अबु दाऊद) अशा एकमेवाद्वितीय प्रेषितांचे आपण वारसदार आहोत, याची जाण प्रत्येक मुस्लिमाने ठेवून, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने आयुष्य जगणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. एवढेच नव्हे तर आपल्या वाणी आणि वर्तनातून आपण प्रत्येक बिगर मुस्लिमासमोर आदर्श मुस्लिम कसा असतो, याचे मॉडेल ठेवणे ही अपेक्षित आहे. आज मुस्लिमांच्या बिगर इस्लामी वर्तनामुळे व मुठभर लोकांच्या हिंसक कारवायांमुळे बहुतेक मुस्लिमेत्तर लोक सर्व मुस्लिमांच्या बद्दल द्वेष बाळगून आहेत. त्यांच्या मनातील हा द्वेष गैरसमजावर आधारित आहे. तो गैरसमज दूर करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे, याचे भान ठेवून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाचा आदर्श आपण डोळयासमोर ठेवला तरच या ६०-७० वर्षाच्या जीवनाचे सार्थक होईल, अन्यथा मरणोत्तर जीवनामध्ये अनंत काळासाठी यातना भोगाव्या लागतील, याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget