धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या कोणती? धर्म माणसाची गरज आहे काय? ही वैयक्तिक बाब की समाजाशी संबंधित बाब? अशा अनेक गोष्टी धर्माच्या बाबतीत विचारल्या जात असतात. त्याचा अभ्यास केला जातो. अशाच काही धर्माशी निगडीत प्रश्नांचा विचार या लेखात करण्याचा एक प्रयत्न इथे केला जात आहे.
धर्माच्या बाबतीत असे म्हटले जाते की ती एक प्रकारची सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था आहे. माणसाच्या वागण्यासाठी नैतिकेचे बंधन घालणारा समाजजीवनात नैतिक मूल्यांची स्थापना आणि त्या मूल्यांवर आधारित समाजरचना हे धर्माचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर समाजाला या मूल्यांद्वारे संघटित करणेदेखील धर्माची परिभाषा केली जाते. धर्माचा माणसाशी हे नाते त्याच्या या जगी जीवनाशीच संबंधित नसते तर मृत्यूनंतर देखील पारलौकिक जीवनात सुद्धा माणसाशी धर्माचे नाते असणार आले आणि फक्त भौतिक जीवनापर्यंतच ते मर्यादित नसून त्याच्या आत्मिक जीवनाशी सुद्धा नाते असते.
जगात विविध राष्ट्रे, समाज, समूह वेगवेगळ्या धर्माचे पालन करत असले तरी वरउल्लेखित बाबींचा संबंध धर्मामध्ये थोड्याफार फरकाने सारखाच असतो. धार्मिक संस्कृतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे ज्या त्या धर्मियांचे सण-उत्सव असतात. वेगवेगळ्या धर्माचे समाज समूह आपल्या संस्कृती आणि इतिहासावर आधारित विविध सण आणि उत्सव साजरे करत असतात.
विविध धर्मांची या जगातील मानवी जीवनाचा इतिहास त्याच्या उत्पत्तीच्या बाबतीत वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर्कवितर्क भिन्नभिन्न आहेत आणि ही भिन्नता त्या त्या धर्माच्या शिकवणीत प्रदर्शित होते. धर्माच्या आचारविचार आणि नैतिक मूल्यांचे अधिष्ठान त्या त्या धर्माच्या याच मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे.
धर्माची आणखीन तेवढीच महत्त्वाची बाब म्हणजे त्याची एक दुसरी व्याख्या. धर्म म्हणजे इतर माणसांशी असलेल्या नात्यांशी, स्वधर्मियांशी, परधर्मियांशी, इतरांशी, ज्यांच्याशी कसलेच नाते नाही अशा सर्व घटकांशी केला जाणारा व्यवहार.
अशा तऱ्हेने मातापित्यांचा धर्म, शेजारधर्म, मुलाबाळांशी पाळला जाणारा धर्म, राष्ट्रधर्म, समाजधर्म, पाहुणचाराचा धर्म, ह्या सगळ्या बाबींशी धर्माचा संबंध येतो. प्रत्येकाशी केला जाणारा धर्म म्हणजे त्याविषयी धर्माने आखून दिलेल्या मर्यादा, घालून दिलेले निकष, त्या त्या धर्माशी व्यवहार करण्यासाठ दिलेल्या धार्मिक शिकवणी.
धर्माच्या बाबतीत उपरोक्त व्याख्येचा अर्थ असा होतो की धर्म माणसाची वैयक्तिक बाब नव्हे. काही व्यक्तींनी एखादा धर्म स्वीकारला आणि काहींनी दुसरा धर्म स्वीकारला आणि काहींनी कोणताच धर्म स्वीकारला नाही. एवढेच नाही तर त्यांनी धर्माला नाकारले असेल तर समाजावर याचा परिणाम काय होणार? म्हणजे काही लोक एकेश्वरी धर्माचा अवलंब करतील, काही अनेकेश्वरी असतील, काही निरेश्वरी असतील तर काही असे असतील जे ईश्वराला मानतील, पण ईश्वराचा मानवाशी किंवा मानवाचा ईश्वराशी कोणताच संबंध नाही, ईश्वर आपल्या जागी, माणूस आपल्या जागी. दोन्हींचे अस्तित्व वेगवेगळे, दोहोंचा एकमेकांशी कोणता संबंध नाही. प्रश्न असा पडतो की मग माणसाला कुणी जन्म दिला? ईश्वरानेच दिला असेल तर मग जन्म देणाऱ्याचा संबंध माणसाशी संपुष्टात कुणी आणले, स्वयं ईश्वराने की माणसाने स्वतःहून. ही धर्माची सर्वांत निरर्थक व्याख्या आहे.
जे लोक ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतात त्यांच्या मते ही सृष्टी आपोआप बनली. धरतीवरील सर्व सजीव, निर्जीव निर्मिती स्वतःहूनच निर्माण झाली. अशा परिस्थितीत दुसरा प्रश्न असा पडतो की जर ही सृष्टी आणि सारं काही अवकाश आपोआप अस्तित्वात आले तर ती प्रक्रिया इथेच का थांबली आणखीन दुसरी सृष्टी निर्माण होत नाही. धरतीवरील मानवनिर्मितीसारखी दुसरी निर्मिती का उदयास येत नाही? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.
अनेकेश्वरत्वाचे पालन करणाऱ्यांच्या मते या सृष्टीचा निर्माता एक नसून अनेक आहेत. म्हणून ते सर्व ईश्वरांची, त्यांच्या देवदूतांची उपासना करतात. असे असेल तर मानवजातीला निर्माण करणारे देखील अनेक ईश्वर असतील. जेवढे धर्म तेवढे त्यांचे अनुयायी. मग इतर धर्मियांच्या माणसांची निर्मिती कुणी केली? जर ईश्वर अनेक असतील तर साहजिकच धर्मांच्या शिकवणी वेगवेगळ्या असाव्यात. एकेश्वरींच्या मते या सर्व चराचराची निर्मिती केवळ एकाच ईश्वराने केली. सजीव, निर्जीव सर्वांचा निर्माता एकच आहे. सर्व मानवजातीला एकाच ईश्वराने निर्माण केले. त्या सर्वांचाच त्याचबरोबर इतर सजीव सृष्टीचा पोसणारा पोशिंदा तोच एकमेव ईश्वर आहे. असे असताना साऱ्या मानवजातीला त्याने एकच धर्म दिला. धर्माच्या शिकवण सर्वांना सारख्याच दिल्या. नंतर परस्पर विरोध करीत माणसांनी नवनवीन धर्म, पंथ, समाज, समूह, जाती बनवल्या आणि आपल्या मर्जीनुसार सोयीनुसार धार्मिक शिकवण, आचारसंहिता तयार केली.
एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो, जे निरीश्वरवादी आहेत किंवा जे ईश्वराचे अस्तित्व तर मानतात पण त्याने माणसांच्या जीवनात ढवळावळ करू नये, अशा विचारधारकांची कोणती आचारसंहिता, कोणती नीतीमूल्ये? यावर त्यांचे उत्तर अनेकदा असे असते की ते विज्ञानवादी विचारांचे लोक आहेत. पण कोणत्या वैज्ञानिकांनी कोणती आचारसंहिता कधी तयार केली, ती कुठे आहे, ग्रंथ स्वरूपात आहे की ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार सोयीनुसार वैयक्तिकरित्या त्या आचारांचे पालन करतात? याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीच. फक्त स्वतंत्रपणे आपल्या मर्जीनुसार आपल्या आशा-आकांक्षांच्या आहारी जाऊन जगणे हेच तेवढे त्यांना माहीत असते, असे लोक समाजविरोधी असतात. आपले हित साधण्यापलिकडे त्यांचा काहीच हेतू नसतो. ते स्वार्थी असतात. समाजाशी, समाजाच्या समस्यांशी, सामाजिक बांधिलकीशी त्यांचे काही देणे घेणे नसते. समाजघटकांशी व्यवहार करताना, त्यांच्याशी वागताना ते फक्त स्वतःचे हित जपण्यापलिकडे कशाचाच विचार करत नाहीत. समाजात वैर, द्वेष पसरला, लोक हिंसेवर उतारु झाले तर हे लोक दुरून पाहात असतात. अशा परिस्थितीत लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्यासाठी काहीच करत नाहीत. हेच लोक धर्माला माणसाची वैयक्तिक बाब म्हणतात आणि त्यावर आग्रह धरतात. धर्म कधीही वैयिक्तक बाब नाही. ही समाजाची सामूहिक गरज आहे. जर सर्वांनी धर्माला ऐच्छिक बाब समजून त्यानुसार वर्तन केले तर समाजावर कुणाचा अंकुश राहाणार नाही. समाजातील माणसांना एकमेकांशी सौहार्द साधता येणार नाही. समाजातून सौहार्द आणि सामूहिक स्नेह संपला तर असा समाज विखरून गेल्याशिवाय राहाणार नाही. म्हणून घातक घटक समाजाचा कुणी असेल तर तो अशा लोकांचा समूह असेल जे धर्माला मानवी समूहाची गरज न समजता ती प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक इच्छा समजतात. खोलात जाऊन जर वचार केला तर असे लोक धार्मिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच ही गोष्ट आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत सांगितली आहे. ते म्हणाले की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर टीका करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. धार्मिक शिकवण आणि धार्मिक व्यक्तीवर टीका करण्याचे पडसाद इतरत्र उमटत असतात. आणि हे चक्र थांबत नाही.
आता धार्मिक मंडळींविषयी सांगायचे झाल्यास त्यांना एक प्रश्न विचारावा लागतो तो म्हणजे खरोखर ते आपल्या धार्मिक आचारविचार, त्याच्या शिकवणी आपल्या आचरणात प्रत्यक्षपणे आणत असतात का की त्यांना फक्त आस्था आणि श्रद्धा म्हणून बाजुला सारून वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनात आपल्या मर्जीनुसार आचरण करतात. कारण कोणत्याही राजकीय व्यवस्थेत राज्यकर्ते आणि इतर राजकारणी भोळ्याभावड्या जनतेच्या धार्मिक भावना त्यांच्या आस्थांवर हात घालतात. धर्म आणि राजकारणाइतके विस्फोटक मिश्रण दुसरे कोणते नाही. एकदा हे शिक्षण तयार झाले की मग समाजात आणि राष्ट्रात धार्मिक, जातीय, पंथीय उन्मादाला सीमा राहात नाही. राज्यकर्ते आपले हित साधत असताना आम जनतेला हे कळू सुद्धा देत नसतात की त्यांच्या आचारविचार शक्तीला केव्हाच त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे आणि हे राज्यकर्ते खऱ्या अर्थाने त्यांच्या श्रद्धास्थानांचे आणि आस्थांचे शोषण करत आहेत. राज्यकर्त्यांच्या या खेळीमुळे समाजात तेढ निर्माण होतो. कलह पसरतो. हिंसाचाराला सुरुवात होते आणि हिंसा करणाऱ्यांना याचे भानसुद्धा राहात नाही की आपण राज्यकर्त्यांच्या हातातले बाहुले झालेलो आहोत.
मुळात धर्माचा किंवा धार्मिक शिकवणींचा आचार कशासाठी करायचा? ईश्वरानं घालून दिलेल्या मर्यादांचे पालन का करावे? यात ईश्वराचं कोणतं भलं आहे की स्वतः माणसाचा साऱ्या जगातील मिळून जरी ईश्वराशी बंड केले तरी त्याच्या अधिकारात काही फरक पडणार नाही आणि जर साऱ्या मानवजातीने ईश्वराच्या आज्ञांचं पालन केलं तरी त्याचा यात कुठलाही फायदा नाही. या शिकवणी ज्या धार्माच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी ही माणसांची मानवजातीच्या भल्यासाठी आहे. धार्मिक शिकवणी माणसाला संस्कार देतात. त्या संस्काराद्वारे माणूस सभ्य बनतो. एका माणसापासून सारा समाज सभ्य बनतो. माणसांना मिळून एक लोकसमूहापासून सभ्यता जन्माला येते. कोणताही धर्म हिंसेची शिक्षा देत नाही. देत असेल तर मानवी मूल्यांच्या विरोधात होईल. प्रत्येक धर्मात अपराधासाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असते. ही तरतूद आधुनिक राज्यव्यवस्थेने सुद्धा स्वीकारलेली आहे. पाशवी वृत्तीला पायबंद घालण्यासाठी हे निकडीचे आहे.
कोणत्याही धर्माने इतर धर्मावर, परधर्मियांवर टीकाटिप्पणी करू नये. पवित्र कुरआनात अल्लाहने आदेश दिलेला आहे की इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करू नका. तेथेदेखील ईश्वराचीच उपासना होत असते. तसेच एखाद्या समुहाचा धर्माच्या नावाने इतका वैरभाव करू नका की त्या धर्मियांशी न्याय करण्यात बाधा येईल. धर्म माणसाची वैयक्तिक बाब नसली तरी कोणता धर्म स्वीकारावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. कुरआन म्हणतो की धर्माच्या बाबतीत कुणावर सक्ती करू नका.
इस्लाम धर्माच्या आगमनापूर्वी अरबस्थानातील लोक जहाल आणि पाशवी वृत्तीचे होते. समाजातील दुर्बल घटक आणि स्त्रियांवर अत्याचार करीत. कुणी त्यांना रोखणारा नव्हता. धर्म तर नव्हताच चालता चालता कुणाचीही हत्या करणं त्यांना सहज वाटे. कोणी त्या हत्येसाठी शिक्षा देणार नव्हता. कुणाकडे दाद मागता येत नव्हती.
एक कवी आपल्या कवितेत म्हणतो की-
आम्ही भल्या पहाटे अमुक टोळीवर हल्ला केला, आमच्या चमकत्या तलवारीने त्यांच्यामधील पुरुषांचे तुकडे केले. त्यांच्या महिला सोबत घेऊन आम्ही परतलो.
ज्या लोकांनी ज्यांना बेदुईन म्हणतात, सबंध अरबस्थान जिंकले! आपल्या इस्लामपूर्व जीवनाचे वर्णन करताना ते म्हणतात,
‘‘आमच्यापेक्षा वंचित इतर कोण नव्हता. आम्ही उपाशी असायचो आणि आमची उपासमारी कुणाच्याही आकलनापलिकडची. आम्ही झाडंझुडपं, पाळेमुळे खात असत. सापाला आम्ही अन्न समजून खात होतो. उंटाच्या केसांपासून आम्ही अर्धवट वस्त्र तयार करून ते परिधान करत होतो. आमचा धर्म म्हणजे एकमेकांची हत्या करणं आणि एकमेकांना लुटणं. आपल्या मुलींना आम्ही जीवंतच जमिनीत पुरत होतो कारण आम्ही त्यांना खायला देऊ शकत नव्हतो. अशातच आमच्याकडे एक माणूस आला आम्ही ओळखले की तो एका प्रतिष्ठित कबिल्याचा होता. ते सर्वोत्तम होते. विश्वसनीय होते. ते सर्वांत उल्लेखनीय होते. सहनशील होते. त्यांनी आम्हाला नवधर्मात येण्याचे निमंत्रण दिले. ते जे बोलत होते आता आम्ही तेच बोलू लागलो. ते सत्य बोलत होते. दिवसेंदिवस त्यांचा मानसन्मान वाढत गेला. अल्लाहने आमच्या हृदयांमध्ये त्यांची आस्था रुजवली आणि आम्ही त्यांचे पालन करू लागलो.’’
काही लोकांनी त्यांची साथ दिली, काहींनी नाकारले. निवडक लोकांनी त्यांचा धर्म स्वीकारला. काहींनी राजीखुशीने त्यांची साथ दिली तर काहींनी नापसंती दर्शवित त्यांची साथ दिली. शेवटी हे दोन्ही गटांतील लोक आपल्या निर्णयावर आनंद व्यक्त करू लागले. समाधानी झाले. आम्हा सर्वांना त्यांच्या धर्माची प्रतिष्ठा समजली आणि त्याचबरोबर आमचे मागील जीवन किती जहाल आणि पाशवी वृत्तीचे होते हेदेखील कळलं.
धर्माच्या शिकवणी स्वीकारल्यावर बेदुईनचे जीवन कसे आहे याचे हे उदाहरण हजारो प्रसंगांपैसी एक आहे. याच लोकांनी नंतर मध्य आशिया आणि स्पेनपासून मध्यपूर्वेतील इतर युरोपीय देशांत इस्लामचा प्रसार केला. इतिहास सर्वांसमोर आहे. धर्म माणसाची कशी जडणघडण करतो, त्याच्या अस्तितत्वात त्याच्या चारित्र्यात नीतीमूल्यांमध्ये काशी भूमिका पार पाडतो याचा हा दाखला.
Post a Comment