आजकाल पन्नाशी ओलांडली की,आता संपलं सारं असा सूर अनेकांच्या तोंडातून येऊ लागला आहे, माझ्या परीचयातील काही व्यक्तींनी तर पन्नाशीतच नोकरी व्यवसायातूंन निवृत्ती स्वीकारली आहे. यांच्याशी थोडा संवाद साधला, तेव्हा असे लक्षात आले की, त्या व्यक्ती एकाच पद्धतीचे काम वर्षानुवर्षे करत होत्या.
त्या व्यक्तींना त्याच्या कामाचा कंटाळा आला होता. अशा कंटाळवाण्या कामाचे रूपांतर आळसामध्ये झाले होते. या आळशी वृत्तीमुळे त्यांना जे काम करायचे होते ते काम त्यांच्यातील आळशीवृत्तीने किंवा कामातील पळवाटा शोधून कस बस ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होत्या. अर्थात पन्नाशीनंतर निवृत्ती स्वीकारली तरी ही या व्यक्ती फारशा समाधानी व सुखी नव्हत्या, केवळ नाईलाजाने दिवस ढकलत होत्या. घोड्याच्या डोळ्याला बांधलेल्या झापडीसारखे त्यांचे जीवन एकसूरी झाले होते. पुर्णतः त्या व्यक्ती असमाधानी, निरुत्साही, निराशेने ग्रासलेल्या वाटत होत्या.
आज आपल्या आजूबाजूला सहजपणे नजर टाकली की,अनेक वयोगटातील व्यक्तींमध्ये अशा प्रकारची वृत्ती वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. ही गोष्ट नक्कीच दुर्दैवी आहे.या आळशी वृत्तीपासून दूर राहायचे असल्यास एकमेव उपाय आहे तो म्हणजे, ‘कोणतेही काम असो,त्या कामावर कसल्याही प्रकारचा आळस किंवा कोणत्याही प्रकारच्या पळवाटा न शोधता ते काम प्रामाणिकपणे करणे. त्यावर मनापासून प्रेम करणे आणि ते काम अधिक उत्साहाने करणे, त्यापासून मिळणारे समाधान हे नक्कीच भविष्यकाळात अनेक ठिकाणी उपयोगी पडते.
तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या कामामध्ये उत्साह दर्शविता त्याचप्रमाणे त्यातून मिळणारे यश देखील अवलंबून असते. अनेक व्यक्ती नवीन पिढीला काही कळत नाही, असे समजतात. परंतु नवीन तरुण पिढीही वास्तवदर्शी आणि प्रथम कशाला प्राधान्य द्यावयाचे? यामध्ये खूपच कौशल्यपूर्णतेचा उपयोग करत असतात. त्याचाच परिणाम अनेक मोठमोठी कामे आज खूप लहान वयातील मुले-मुली यशस्वीरीत्या पूर्ण करताना दिसत आहेत.माझ्या परिचयातील अनेक तरुणांनी धाडसाने पाऊल टाकून मोठ्या भांडवली व्यवसायात पदार्पण केले आहे आणि अल्पावधीतच त्यांनी यशाच्या शिखराकडे वाटचाल केली आहे. स्वतःच्या कामावर ही मंडळी मनापासून प्रेम करतात आणि ठरवलेल्या ध्येयावर अचूक लक्ष केंद्रित करून ते यशस्वीरीत्या पूर्ण करतात.
खरंच, यशासाठी स्वतःच्या ध्येयावर किंवा कामावर प्रेम केले पाहिजे. जे काम दररोज करायचेच आहे, त्यामध्ये दररोज नाविन्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे. एखादा निर्णय घेत असताना तुम्ही आळस करत असाल, तर त्यातून तुम्हाला कधीही समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आळशी वृत्ती आवर्जून नाकारली पाहिजे, आळसाला कायमची सुट्टी दिली पाहिजे,एवढेंच नव्हे तर आपल्या अवतीभवती असणाऱ्या आळशी व्यक्तीनाही सतत त्यांना त्यांच्या आळसापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अशाप्रकारे समाजातील आळशीपणा नेस्तनाबूत करायला पाहिजे, यामुळे तुम्हाला यश तर नक्कीच मिळेलच आणि तुमचे आयुष्य ही सात्विक समाधानानी परीपूर्ण होईल.शिवाय स्वतः बरोबरच समाजाला सकारात्मक विचारांच्या पथावर नेऊन समाजाचा उत्कर्ष साधल्याचे राष्ट्रकार्य केले जाईल.
जीवनात जेवढा मोठा संघर्ष करावा लागतो, तेवढं मोठं यश आपल्या पदरात पडतं, ध्येयाचा शोध घेतांना अनेक अडचणी येतात, अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, ही शर्यत पार करताना ठेचा लागणार... रक्तबंबाळ होणार... अनेकदा तर मांजा दोरा तुटलेल्या पतंगासारखी आधारहीन स्थिती निर्माण होणार...पण... तुमच्या ध्येयावर अचूक लक्ष्य ठेवून डोळ्यातल्या स्वप्नांना अथक प्रयत्नांची, अखंड परीश्रमाची, कष्टाची जोड दिली तर काळ बदलतो,... वेळ बदलते...पात्रे बदलतात... आणि भूमिका ही...
बस....
मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची... पंखात बळ निर्माण करण्याची...लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरतपणे संघर्ष करण्याची तयारी असेल तर यश पायाशी लोळण घेत येते. मग अंगातील,आळस, अनास्था, अनुत्साह कुठल्या कुठे पळून जातो, आणि यशाची धुंदी आणि तेज अंगाखांद्यावर विलसते.
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर, भ्रमणध्वनी - 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Post a Comment