सावित्रीमाई असोत किंवा फातिमा असोत, या दोघींही जात, धर्माच्या पलीकडे होत्या, तरी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून जाणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलीं जास्त दिसत नाहीत.त्यांच्या मार्गात धार्मिक आदेश आणि फतव्यांच्या जाडजूड श्रृंखला पडल्या होत्या, हे वास्तव नाकारता येत नाही.खरंतर फातिमा मुस्लिम समाजासाठी आणि विशेषत: स्त्री शिक्षणासाठी आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. फातिमा शेख यांनी कदाचित धर्म सुधारणा आघाडीवर काम करायला सुरुवात केली असतीतर निश्चितच चित्र वेगळे दिसले असते.. खरंतर सावित्रीबाईंबरोबरच पहिली शिक्षिका हा मान फातिमा शेख यांनाही जातो पण तिच्या लेकींना तो सन्मान सार्थक करून दाखवता आला नाही, सावित्रीच्या लेकी ज्याप्रमाणे मुसंडी मारून पुढे गेल्या आहेत, तसे चित्र मुस्लिम समाजातील मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत दिसत नाही हे वास्तव आहे.
भारतातील परंपरावादी समाज संस्थेची व सामाजिक रूढी, चालीरिती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांसह मुठभर उच्चवर्णीयांचे प्रभुत्व असलेल्या नियमादी धर्माची पकड हजारों वर्षे येथील लोकसमुहावर पक्की बसलेली होती, त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गाचे शोषण केले जात होते. याविरुद्ध जोतीराव फुले यांनी कृतीशील बंड पुकारले. स्वातंत्र्य,समता, आणि बंधुभाव या त्रिसूत्रीचा अंगीकार केला.
गुलामगिरी, जातीभेद, वर्णभेद या सारख्या समाजविघातक प्रवृत्तींचा मुळापासून बीमोड करण्यासाठी, तसेच हरिजन, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता स्त्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आयुष्याच्या अंतापर्यंत प्रखरपणे लढले. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी कृतिशील बंड करणारे ते भारतांतील पहिलें पुरूष होत.विद्येविना कोणतीही प्रगती शक्य नाही,हे त्यांनी अचूक ओळखले होते. शिक्षणाचा अभाव हे आपल्या बौद्धिक गुलामगिरीचे प्रमुख कारण आहे, यासाठी निरक्षरता दूर केली पाहिजे,तर मग या समाजातील दैन्य,दारीद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा,व भेदभाव नष्ट होईल आणि प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव होईल, असा विचार त्यांनी सातत्याने मांडला.
या देशातील पहिली मुलींची शाळा जोतीराव फुले यांनी काढली. त्यासाठी शिक्षिका पाहिजे म्हणून स्वतःच्या पत्नीला शिकविले.सावित्रीबाईंच्या शिक्षणासाठी प्रचंड विरोध झाला. मात्र त्या डगमगल्या नाहीत. स्त्री शिक्षणासाठी प्रसंगी दगडगोटे,शेणाचे गोळे अंगावर झेलले,पण स्त्री शिक्षणासाठी घेतला वसा टाकला नाही.अशा या कृतिशील समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्यासोबत राहून स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्या फातिमा शेख यांची काल जयंती झाली.गुगलने फातिमा यांच्या कार्याला सलाम करताना खास डुडल ठेवले. त्यामुळे अनेकांना फातिमा शेख यांची आठवण झाली, अन्यथा अपवाद वगळता कुणाला त्याची आठवण सुद्धा झाली नसती. हे वास्तव आहे. फातिमा यांनी त्या काळात मुख्य प्रवाहातील शिक्षणाला मदत करणे हे मुस्लिम धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे काही चांगले काम नव्हते. धर्मानुसार फातिमा यांनी काफरांच्या मुलांना केलेली शैक्षणिक मदत हे धर्माला काळे फासणारीच कृती होती, म्हणून कदाचित फातिमा यांची आठवण मुस्लिम वर्गात ठेवली जात नसावी, असे वाटते.
सावित्रीच्या लेकी जशा तिचा वारसा घेत पुढे गेल्या, प्रतिभाताई पाटील यांच्या सारख्या सावित्रीच्या लेकीने देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचा हक्क मिळवला, तोच हक्क फातिमा यांच्या लेकींना का मिळवता आला नाही? असा प्रश्न यानिमित्ताने माझ्या समोर निर्माण होतो. सावित्रीमाई असोत किंवा फातिमा असोत, या दोघींही जात, धर्माच्या पलीकडे होत्या, तरी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून जाणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलीं जास्त दिसत नाहीत.त्यांच्या मार्गात धार्मिक आदेश आणि फतव्यांच्या जाडजूड श्रृंखला पडल्या होत्या, हे वास्तव नाकारता येत नाही.खरंतर फातिमा मुस्लिम समाजासाठी आणि विशेषत: स्त्री शिक्षणासाठी आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. फातिमा शेख यांनी कदाचित धर्म सुधारणा आघाडीवर काम करायला सुरुवात केली असतीतर निश्चितच चित्र वेगळे दिसले असते.. खरंतर सावित्रीबाईंबरोबरच पहिली शिक्षिका हा मान फातिमा शेख यांनाही जातो पण तिच्या लेकींना तो सन्मान सार्थक करून दाखवता आला नाही, सावित्रीच्या लेकी ज्याप्रमाणे मुसंडी मारून पुढे गेल्या आहेत, तसे चित्र मुस्लिम समाजातील मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत दिसत नाही हे वास्तव आहे.
फातिमाच्या लेकींना तो काळ जेवढा कठीण आणि यातनामय होता तेवढाच आजही आहे, त्यात फारसा फरक पडलेला नाही. मुस्लिम समाजात आजही ५ ते १० टक्के मुलींनाच शिक्षणासाठी घराबाहेर पडू देतात. इतर ९० टक्के मुलींच्या आणि एकूणच महिलांच्या वाट्याला काय येते हे समजून घ्यायचे असेल तर मुस्लिम महिलांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करायला हवा.आज फातिमाच्या लेकी काय भोगत असतात हे मी जवळून पाहिले आहे, ते वास्तव फार विदारक आहे.सावित्रीच्या लेकी शिकल्या,सवरल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या,मात्र फातिमाच्या लेकी डोळे असून, चाचपडत आहेत, त्यांना दृष्टी देण्यासाठी समाजपुरुषाने प्रयत्न केले पाहिजेत.
जोतिराव फुले यांची शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अर्थपूर्ण रचना आता महामंत्र झाली आहे.ती म्हणजे......
विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेलीं !
नीती विना गती गेली,गतीविना वित्त गेले !
वित्ताविना शूद्र खचले,!!इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले....
ते स्वतः व सावित्रीबाई स्त्री स्वातंत्र्याचे ही प्रवर्तक होते. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत शतकानुशतके अज्ञान आणि अंधःकारात बंदीस्त झालेल्या स्त्री वर्गाची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल उचलले, पुण्यात पहीली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले., समाजातील तळागाळातील लोकांच्या मध्ये आपल्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी 'गुलामगिरी' हे पुस्तक लिहिले, जनजागृती केली. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेली समाजव्यवस्था मोडून त्या जागी समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी,या मुख्य उद्देशाने त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.हा सगळा इतिहास डोळ्यासमोर असूनही फातिमाच्या लेकी तुलनेने शिक्षणाच्या बाबतीत मागे का, असा सवाल फातिमाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने माझ्यासमोर उभा राहतो.
मुस्लीम समाजाच्या विकासाचा प्रश्न हा फार जुना आहे. समाजाच्या एकूणच मागासलेपणा विषयी अभ्यास करण्यसाठी विविध आयोग, अभ्यासगट आणि समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व अहवालांमधून मुस्लीम समाजातील मागासलेपण, जातीव्यवस्था आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासंदर्भात सविस्तर विश्लेषण आणि शिफारशी करण्यात आल्या. परंतु या प्रलंबित विषयाकडे आजतागायत गांभीर्याने पाहण्यात आले नाही. परिणामी समाजातील निरक्षरता आणि दारिद्र्य वाढत गेले.हे जरी सत्य असले तरी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक प्रश्नांविषयी राजर्षी शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र बोर्डिंग ची उभारणी तर केलीच,शिवाय मुस्लिम समाजातील कोणी पुढे येत नाही हे पाहून स्वतः या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली, राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर मुस्लिम समाजासाठी शिक्षणाचा प्रसार झाला की नाही,याचा उहापोह होणे अगत्याचे आहे.ज्या फातिमा शेख यांनी सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण प्रसारासाठी स्वतः चे आयुष्य वेचले,शिक्षणाचा अभाव हे आपल्या बौद्धिक गुलामगिरीचे महत्वाचे कारण आहे, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणाऱ्या फातिमा शेख होत्या, पण त्यांच्या लेकी आजही शिक्षणापासून वंचित का,या प्रश्नाचा विचार त्यांच्या जयंतीनिमित्त होणे मला गरजेचे वाटते.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment