(७) आणि तोच आहे ज्याने आकाशांना व पृथ्वीला सहा दिवसांत निर्माण केले जेव्हा की यापूर्वी त्याचे सिंहासन (अर्श) पाण्यावर होते७ जेणेकरून तुम्हाला अजमावून पाहावे तुमच्यात कोण उत्तम काम करणारा आहे.८ आता जर हे पैगंबर (स.)! तुम्ही म्हणता, की लोकहो! मृत्यूनंतर तुम्ही पुन्हा उठविले जाल तर इन्कार करणारे उद्गारतात, ही तर स्पष्ट जादूगिरी आहे.९
(८) आणि जर आम्ही एका विशिष्ट मुदतीपर्यंत त्यांची शिक्षा टाळली तर ते म्हणू लागतात की बरे कोणत्या गोष्टीने तिला थोपवून ठेवले आहे? ऐका! ज्या दिवशी त्या शिक्षेची वेळ येऊन ठेपेल तेव्हा ती कोणाच्याही परतविण्याने परतणार नाही आणि तीच गोष्ट त्यांना वेढून टाकील जिची चेष्टा ते करीत आहेत.
(९) जर एखादेवेळी आम्ही माणसाला आपल्या कृपेने उपकृत केल्यानंतर परत त्यापासून वंचित करतो तर तो निराश होतो आणि कृतघ्नता दाखवू लागतो.
(१०) आणि जर त्या संकटानंतर जे त्याच्यावर आले होते त्याला आम्ही देणगीचा आस्वाद देतो तेव्हा तो म्हणतो की माझे तर सर्व अशुभ दूर झाले मग तो हर्षोन्मादित होतो व ऐटीत मिरवतो.१०
(११) या दोषापासून जर कोणी मुक्त आहेत तर केवळ ते लोक होत जे संयमी११ व सदाचारी आहेत आणि तेच होत ज्यांच्यासाठी क्षमाही आहे व मोठा मोबदलादेखील.१२
७) मूळ विषयाशी हटून येथे मध्येच हे वाक्य आले आहे. लोकांचे असे म्हणणे होते की आकाश व जमीन पूर्वी नव्हते तर नंतर निर्माण केले, मग यापूर्वी काय होते? या प्रश्नाला नमूद न करता त्याचे उत्तर संक्षिप्त् वाक्यात दिले, `येथे प्रारंभी पाणी होते'. आम्हाला माहीत नाही की या पाण्याशी तात्पर्य काय आहे? काय ते हेच पाणी आहे ज्याला आम्ही जाणतो? किंवा हा शब्द रूपक रूपात द्रवाच्या तरलतेसाठी आला आहे जी वर्तमान रूपाच्या पूर्वी होती? अल्लाहचा अर्श (राजिंसहासन) पूर्वी पाण्यावर होते, याचा अर्थ असा होतो की पूर्वी अल्लाहचे सामर्थ्य पाण्यावर होते.
८) या कथनाचा अर्थ होतो की अल्लाहने आकाश आणि धरतीला निर्माण केले ते मुळी मानव निर्मितीसाठीच. अल्लाहने मानवाला यासाठी निर्माण केले की मानवावर नैतिक दायित्वाचे ओझे टाकले जावे. तुम्हाला (मानवाला) खिलाफत (प्रतिनिधित्वा) चे अधिकार देऊन परखले जावे की तुमच्यापैकी कोण या अधिकाराला आणि नैतिक दायित्वाला कशाप्रकारे सांभाळतो? जर मानवी निर्मितीत हा उद्देश निहीत नसता तर हे सर्व निर्मितीकार्य एक व्यर्थ खेळ ठरले असते. म्हणून मनुष्याला अधिकार देऊन त्याची परीक्षा घेण्याची व्यवस्था केली. हिशोब घेणे तसेच मोबदला आणि शिक्षा देण्यासाठी स्वर्ग व नरकाची व्यवस्था करण्यात आली. कारण मानवी अस्तित्वाच्या या तमाम हंगाम्याची स्थिती व्यर्थ जाऊ नये.
९) म्हणजे या लोकांच्या बुद्धीहीनतेची ही स्थिती आहे की सृष्टीला एक खेळणी आणि स्वत:ला त्याच्यात वेळकाढूपणा करण्याचे साधन समजून बसले आहे. या मूर्ख विचारात अतिमग्न होऊन बसले आहेत. तुम्ही त्यांना जीवनउद्देश आणि त्यांच्या अस्तित्वाचा तर्कसंगत उद्देश समजावित आहात, परंतु ते हसण्यावारी नेत आहेत आणि म्हणतात की हा तर एक मोठा जादूगार आहे.
१०) एका मनुष्याचा नीचपणा, संकीर्ण दृष्टी आणि चिंतनाभावाच्या स्थितीची प्रचिती जीवनभर येते. मनुष्य स्वत:चे याविषयी आत्मपरीक्षण करून या स्थितीचा स्वत:मध्ये अनुभव करू शकतो. आज तुम्ही समृद्ध आणि बलवान आहात तर गर्व करता व ताठ बनला आहात. श्रावण महिन्यात चहूकडे हिरवेगार गालिचे पसरलेले असतात. हिरव्या सृष्टीला पाहून एखाद्याला असे वाटत असेल की आता ही स्थिती शाश्वत आहे आणि ग्रीष्म ऋतुची पडझड कधीच येणार नाही तर ही मोठी चूक आहे. एखाद्या संकटात सापडले तर विव्हळून उठता आणि निराश होता आणि अतिव दु:ख व्यक्त करताना खुदा (ईश्वर) ला टोमणे देतात. तसेच ईश्वराच्या ईशत्वावर व्यंग करून मनातील दु:ख हलके करण्याचे प्रयत्न करता. परंतु जेव्हा संकट टळते आणि चांगले दिवस आले तर तोच गर्व, अक्कड आणि मस्ती पुन्हा सुरु होते.मनुष्याच्या या तुच्छ दुर्गुणांचा येथे उल्लेख का होत आहे? तर लोकांना येथे चेतावनी देणे आहे की आज शांतीच्या काळात आमचा पैगंबर तुम्हाला अल्लाहच्या अवज्ञेपासून सावधान करीत आहे. तो तुम्हाला अल्लाहच्या अवज्ञेपासून रोखत आहे. अल्लाहची अवज्ञा केली तर तुमच्यावर अल्लाहचा कोप होईल, यावर तुम्ही त्याला वेडा ठरवित आहात आणि म्हणता, ``वेड्या! पाहात नाही की आमच्यावर कृपेचा वर्षाव होत आहे, चहुकडे आमचा मानसन्मान होत आहे. तुला अशा वेळी हे भयानक स्वप्न दिवसाढवळया कसे पडत आहे की आमच्यावर अल्लाहचा कोप होणार आहे?'' वास्तविकपणे पैगंबरांच्या उपदेशाला तुम्ही दिलेले हे उत्तर तुमच्या दुर्गुणांचा अतिघृणास्पद प्रकार आहे. अल्लाह तुमची पथभ्रष्टता आणि दुष्कर्मांना पाहून केवळ आपल्या कृपेने आणि दयेने तुम्हाला संधी देत आहे आणि शिक्षेसाठी विलंब करत आहे जेणेकरून तुम्ही स्वत: सुधरून घ्यावे. परंतु तुम्ही या संधीच्या काळात हा विचार करत आहात की तुम्ही खुशहाल आहात आणि ही समृद्धी शाश्वत आहे. आमच्या हिरव्या वनराईवर कधीच पानगळीचा ऋतु येणार नाही.
११) येथे `सब्र' (संयम) च्या आणखी एका अर्थावर प्रकाश पडतो. सब्रचे (संयमाचे) वैशिष्ट्य त्या हळवेपणाचा विकल्प आहे ज्याचे वर्णन याआधी आले आहे. संयमी त्या व्यक्तीला म्हटले जाते जो काळाच्या बदलत्या स्थितीत आपल्या विचार, आचार, संतुलनास स्थिर ठेवतो. वेळेची प्रत्येक चाल पाहून तो आपला स्वभाव बदलत नाही. तर एका समुचित आणि सत्य पद्धतीवर प्रत्येक स्थितीत तो कायम राहतो. जर परिस्थिती अनुवूâल असेल आणि तो धन, शक्ती आणि प्रसिध्दीच्या शिखरावर असेल तर तो मातला जात नाही. तसेच एखाद्या वेळी अडचणींना आणि संकटांना सामोरे जाताना आपल्या मानवी तत्त्वांचा तो कधीही त्याग करत नाही. अल्लाहकडून परीक्षा, मग ती सुखसमृद्धीच्या रुपात येवो की संकटांच्या रुपात, या दोन्ही स्थितीत अशा माणसाची नम्रता आणि सहनशीलता अटळ राहते. असा संयमी मनुष्य कोणत्याही स्थितीत विचलीत होत नाही.
१२) म्हणजे अल्लाह अशा लोकांचे अपराध माफ करतो आणि त्यांच्या चांगुलपणाचा त्यांना मोबदलासुद्धा देतो.
Post a Comment