Halloween Costume ideas 2015

संस्कारविहीन समाजाकडे वाटचाल


आज आपल्या आजूबाजूचे वातावरण पाहिल्यास असे जाणवते की, माणसाचे वर्तन हे सातत्याने संस्काराच्या मर्यादा ओलांडून गैरवर्तन कडे वाटचाल करत आहे. वन्य प्राण्यांपेक्षा अधिक क्रूर मानवाची कृत्ये, प्रत्येक क्षणाला माणुसकीला काळिमा फासणारा आहे. सर्वत्र द्वेष, लोभ, ताणतनाव, गुन्हेगारी, फसवणूक, अंमली पदार्थांचे व्यसन, भ्रष्टाचार, भेसळ, खोटेपणा, घरगुती वाद, गोंगाट, प्रदूषण हे सर्वत्र शिगेला पोहोचलेले दिसते. मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचे व्यसन ही मोठी समस्या बनत आहे. कुठे संयुक्त कुटुंब लहान तुकड्यांमध्ये विभागले जात आहे, तर कुठे नाती ताणली जात आहेत. आजच्या काळात स्वाभिमान, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, समर्पण, समाधान, संयम, परोपकार, समता, बंधुता या शब्दांना माणसांसाठी काहीच किंमत वाटत नाही. सध्या पैसा हेच सर्वस्व आहे, तो कसाही कमावला जात असला तरी, प्रत्येकजण फक्त आपले हित पाहतो, भलेही त्याला अनेकांचे हक्क हिरावून घ्यावे लागतील. असा संस्कारहीन समाज राष्ट्राला विनाशाकडे नेतो, जिथे सर्वत्र समस्या असतात.

प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या विभागात कुठे आणि कसे न्याय्य-अन्यायकारक वागणूक होत असते, हे माहीत असूनही सर्वजण मौन पाळत प्रेक्षकांची भूमिका बजावतात. चुकीची गोष्ट थांबवायची कोणातच हिम्मत नसते, त्यामुळे चुकीच्या कामाला सतत प्रोत्साहन मिळते. आता चुकीच्या लोकांचा समूह वाढत आहे आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांचा समूह कमी होत आहे, असे दिसून येते. जोपर्यंत समस्या स्वतःवर येत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या समस्येचे गांभीर्य कळत नाही. एकाच कामाच्या ठिकाणी काम करूनही सहकारी एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न असतात, आपापसात गोडवा दाखवूनही द्वेषाची भावना जपत असतात, आता हे दांभिक वर्तन नात्यातही खूप पाहायला मिळते. शेवटी आपला समाज प्रगती करत आहे की अनैतिक होत आहे? माणसांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक म्हणजे बाहेरून दिसणारे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळे, असे दुहेरी आयुष्य जगणे आता सामान्य झाले आहे. जेव्हा स्वतःच्या फायद्याचा विचार येतो तेव्हा चूक देखील बरोबर असते आणि दुसऱ्याच्या फायद्याचा विचार केला की दोष शोधू लागतात. लोक फॅशन, स्टेटस सिम्बॉल आणि शो च्या नावाखाली आयुष्य नाश करत आहेत. मुलांचे रोल मॉडेल आता फॅशनेबल फिल्म स्टार बनले आहेत, इतिहास घडविणारे शहीद देशभक्त, समाजसेवक नाहीत. टेलिव्हिजन आणि मोबाईल, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे याची पुरेपूर जाणीव आपण ठेवायला हवी.

एखादी व्यक्ती जितक्या उच्च पदावर असते तितकीच ते त्याच्या कामासाठी जनतेला जबाबदार असते. समस्येसाठी आपण अनेकदा एकमेकांवर आरोप करतो, पण ज्यांना आपण मतदानाने निवडून समाजाच्या विकासासाठी सत्तेत बसवतो, त्यांनाच प्रश्न विचारण्यात आपण टाळाटाळ करतो. आपण आपल्या लोकांवर किंवा घरी जेवढे आपुलकीने, धाडसाने वागतो, इतके धाडस आपण बाहेर आपल्या हक्कांसाठी का दाखवत नाही? सरकारी नियमांचे सर्रास पायमल्ली केली जाते. भोळ्याभाबड्या लोकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेण्यासाठी लोभी लोक गिधाडा सारखे नेहमी तयार असतात. ऑक्सिजनचे महत्त्व जाणून सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, स्वतःच्या क्षुल्लक फायद्यासाठी निरपराध लोकांना प्रदूषण, नशा, भेसळ द्वारे स्लो पॉयझन देऊन, गंभीर आजाराने ग्रासून त्यांचा छळ केला जात आहे. लोक घरासमोरील रस्त्याला आपल्या वैयक्तिक मालमत्तेप्रमाणे उपभोगाची वस्तू मानतात आणि हळूहळू अतिक्रमण करून रस्ता कमी करतात, पण आपली छोटीशी चूक इतरांसाठी किती वेदनादायी ठरू शकते याचा कधी विचारच करत नाही. एकीकडे लोक भुकेने जीव गमावत आहेत तर दुसरीकडे हजारो टन धान्याची नासाडी होत आहे. रोज अनेक समस्या आपल्या समोर दिसतात, म्हणजे एकाचा निष्काळजीपणा, भ्रष्टाचाराची शिक्षा दुसऱ्यांना भोगावी लागते, पण कुणी काही बोलत नाही, तर कुणी आपल्या पदाचा गैरवापर करतो, तर कुणी ओळख आणि शिफारस द्वारे प्रामाणिक माणसाचा हक्क हिरावून घेतो. लोक अनेकदा सरकारी नियमांचे उल्लंघन करतात, असभ्य भाषेचे वर्तन करतात, उघड्यावर कचरा जाळतात किंवा फेकतात, नेहमी भांडायला तयार असतात, मुलांसमोर खोटे बोलतात किंवा त्यांना खोटे बोलायला लावतात. लोकांच्या दुःखावर हसल्या जाते आणि सुखावर हेवा करतात. लोक काय म्हणतील, कशाला विनाकारण त्रास, आपण दूरच बरे, अशा विचारात सत्य हे भयात आणि वाईट भीती दाखवून जगत असते. प्रत्येक वेळी सर्वसामान्यांना भीतीने जगण्याची सवय झाली आहे.

आता माणसाचा दर्जा, प्रतिष्ठा त्याची संपत्ती ठरवते, त्याचे गुण नव्हे. एक रुपया किमतीचा वस्तूवर देखाव्याचा खोटा लेबल लावून शंभर रुपयांना विकला जातो, जेव्हाकी चांगल्या गोष्टीला किंमतही मिळत नाही, हीच खरी परिस्थिती आहे. आपल्या देशात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तरीही वृद्धाश्रम अनाथाश्रमांहून अधिक वाढत आहेत कारण घरांमध्ये ज्येष्ठांचे वर्चस्व आणि आदर कमी लेखला जात आहे. आज माणूस ही उपभोगाची वस्तू बनली आहे, जोपर्यंत फायदा आहे, तोपर्यंत महत्त्व आहे, जेव्हा फायदा संपतो तेव्हा जिव्हाळा संबंध, आदर आणि आपलेपणा देखील संपतो.

आज अनेक घरात मुले आपल्या आई-वडीलांना घरातील वृद्धाशी गैरवर्तन करताना बघतात आणि हीच आई-वडील आपल्या मुलांपासून अपेक्षा करतात की त्यांची मुले सुसंस्कृत होऊन आपली सेवा करून समाजात आपले नाव रोशन करावे. सर्व पालकांना त्यांच्या मुलांच्या आनंदाची आणि उज्ज्वल भविष्याची काळजी असतेच पण मुलांसाठी योग्य वातावरण निर्माण करणे देखील त्यांची जबाबदारी असते. ते आपल्या मुलांना समाजावर किंवा देशावर लादू शकत नाहीत. आपली मुलं बाहेर कोणत्या वातावरणात राहतात?  कोणत्या मित्रांसोबत वेळ घालवतात? किती खरे-खोटे बोलतात? कोणाशी भेटीगाठी करतात? आज किती टक्के पालकांना या विषयाची जाणीव आहे, पालक दररोज मुलांसोबत किती वेळ घालवतात, या प्रकरणाचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक वेळा आई-वडील किंवा वडीलधार्‍यांचे वागणे लज्जास्पद वाटते, मोठ्यांनाच संस्कार नसणार तर ते मुलांना काय शिकवणं देणार? गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. असे अनेकदा दिसून आले आहे की, मूल लहान आहे, असे हसत म्हणून मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे आणि वाईट कृत्यांचा निषेध करणे खूप गरजेचे आहे, तरच मुलांना योग्य आणि अयोग्य मधला अर्थ कळेल. मुलांना पहिली शिकवण घरातूनच मिळते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. पालकांनी मुलांच्या मानसिकतेबरोबरच गरज आणि देखाव्यातला फरक समजून घेतला पाहिजे.

आजचा दिवस खूप खास आहे कारण "राष्ट्रीय युवा दिन" संपूर्ण देशात युवा शक्ती म्हणून साजरा केला जातो. आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. जिजामाता यांनी सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना सुसंस्कृत  मार्गदर्शन करून सर्वोत्कृष्ट माता आणि गुरु म्हणून संपूर्ण जगात आदर्श निर्माण केला आहे. तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना संबोधित करताना “उठा, जागे व्हा, यश मिळेपर्यंत संघर्ष करा” असा ऊर्जावान संदेश दिला. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, तरीही आजची तरुणाई मेहनत करण्याऐवजी झटपट प्रगती करण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबणे पसंत करतात, वरून देशातील वाढती बेरोजगारी, आर्थिक विषमता, महागाई आणि इतर सामाजिक समस्या विकासात अडथळे निर्माण करतात. जागतिक स्तरावर भारतामध्ये तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. ह्या युवकाने देशाच्या विकासाची खंबीर शक्ती बनावे, उलट देशावर ओझे बनून समस्या वाढवू नये, ही जबाबदारी पालक, समाज तसेच शासनाची आहे. युवाशक्तीमध्ये ध्येय, उत्साह, धाडस, संयम, चिकाटी, सोनेरी स्वप्ने असतात, म्हणजेच या अमूल्य वारशाचा योग्य वापर हा देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे. देशाचे भवितव्य या तरुणांच्या खांद्यावर आहे, कारण ज्याप्रमाणे भक्कम इमारतीसाठी असा मजबूत पाया आवश्यक आहे तसेच देशाला सशक्त आणि विकसित बनविण्याकरिता तरुणांना योग्य संस्कारमूल्ये, मार्गदर्शन आणि योग्य वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज घडून देश प्रगतीच्या मार्गावर लागेल.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget