येत्या दहा फेब्रुवारीपासून पुढच्या एक महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुका अशा वेळी होत आहेत जेव्हा देशात सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत देशाच्या कोट्यवधी नागरिकांना ज्या आतोनात यातनांमधून जावे लागले ते पाहता या तिसऱ्या लाटेतही सर्व नागरिक भयभीत आहेत. त्यांना आपल्या रोजीरोटीचीच तेवढी चिंता नसून आपल्या जीवांचाही धोका पत्करावा लागत आहे. अशा वेळी निवडणुका घ्याव्यात की नाही यावर बरेच दिवस चर्चा झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आपली चिंताही व्यक्त केली, पण निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेऊन शेवटी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.
राजकारणी लोकांना या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलायच्या नव्हत्या, कारण त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम महिनाभरापेक्षा अधिक काळ अगोदर सुरू केली होती. स्वयंम पंतप्रधानांनी निवडणुकांच्या घोषणेआधी उत्तर प्रदेशला दहा वेळा भेट देऊन सभा घेतल्या, बरेच कार्यक्रम, शिलान्यास, विविध योजनांचे लोकार्पण करून घेतलं. एवढेच नव्हे तर बरेच धार्मिक मेळावेही घेतले. संघाने हिंदू साधूसंतांच्या महाकुंभाचे आयोजन केले. याच धार्मिक वातावरणाने प्रभावित व प्रफुल्लित होऊन साधूसंत मंडळींनी धर्मसंसदेचे आयोजन केले. यात एका विशेष धार्मिक समुदायाच्या नरसंहाराच्या वल्गना केल्या गेल्या. या निवडणुकीत भाजपला कोणता सकारात्मक मुद्दा काही केल्या सापडत नव्हता. म्हणून धर्मसंसदेमार्फत जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. तरीदेखील याचा परिणाम काही निघाला नाही.
महत्त्वाचा प्रश्न असा की जेव्हा देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे त्या वेळी निवडणुका घ्यायच्या की नाही? या प्रश्नाचे उत्तर एका कार्टूनद्वारे अत्यंत प्रभावीपणे देण्यात आले, ‘कोरोनाचे काय हा तर दरवर्षी येतो, निवडणुका पाच वर्षांनी येत असतात’. म्हणजे नागरिकांच्या जीवांची राजकारण्यांना मुळीच चिंता नाही. त्यांना त्यंच्या मतांची जास्त गरज आहे. १०-२० लाखांचे जीव गेले – धोक्यात आले तरी चालेल, पण आम्हाला सत्ता मिळण्याची संधी हुकता कामा नये. या निवडणुका त्यातही उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना या वेळी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या राज्यातील निवडणुकीचा निकाल देशाला कलाटणी देणारा ठरणार आहे. भाजपला हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. तो या निवडणुका हरल्या तर मग पुढे काय? २०२४ साली होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे काय होणार? (जर त्या निवडणुका झाल्याच तर) उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला किंवा विजय झाला तरी देशाच्या व्यवस्थेवर त्याचा परिणाम होणारच. पराभव झाला तर कोणता पर्याय भाजप निवडणार किंवा विजयी झाल्यास ते काय करणार? यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. विजय मिळाला तर लगेच हिंदू राष्ट्राची घोषणा करणार की २०२४ पर्यंत वाट पाहणार? जर पराजय झाला किंवा विजय मिळाला तर २०२४ च्या निवडणुका होतील की नाहीहा महत्त्वाचा विषय आहे.भाजपपुढील खरी अडचण अशी की त्याला आजवर कोणताच मुद्दा निवडणुकीसाठी मिळाला नाही.
ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्यापैकी इतर चार राज्यांत मुस्लिमांचे प्रमाण नगण्य आहे. या राज्यांमध्ये मुस्लिमविरोधी भाषणांनी कोणताच फायदा होणार नाही. राहिला प्रश्न उत्तर प्रदेशचा म्हणून या राज्यावर भाजपने आपला सगळा जोर लावलेला दिसतो. पण वास्तविकता अशी की राज्यातील लोक हिंदू-मुस्लिम यात गुंतण्यास राजी नाहीत. सध्या उत्तर प्रदेशात दलित आणि इतर मागासवर्गीयांसह भाजपमधील आमदारच नव्हे तर कॅबिनेट मंत्रीदेखील पक्ष सोडून जात आहेत. याचे मूळ कारण नागरिकांना आता सांप्रदायिक राजकारण नको आहे. हरिद्वारची धर्मसंसद असो की चित्रकूट येथील महाकुंभ यांचा प्रभाव पडताना दिसत नाही. स्वतः सरसंघचालक म्हणाले होते की आता घरवापसीचा कार्यक्रम करणार. म्हणजे इतका हतबल उत्तर प्रदेशात भाजप झाला आहे की इतर जनकल्याणाच्या कार्याविषयी त्याच्या नावानं मत मागायला त्यांच्याकडे कोणतीच कामगिरी नाही. नकारात्मक, सांप्रदायिक राजकारणाची एक सीमा असते. काही काळ लोटल्यानंतर कोणतेही राष्ट्र असो की जनसमूह त्याची नकारात्मकता त्याच समूहाचा ऱ्हास करते.
- सय्यद इफ्तिखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment