Halloween Costume ideas 2015

स्वयंप्रशिक्षणामध्ये श्रद्धेचे महत्त्व


लालच के समंदर में ईमान की कश्ती है,  हर कौम जमाने की ये देख के हस्ती है

जिस कौम ने अपनी तहेजीब मिटा डाली, वो कौम जमाने में इज्जत को तरसती है

आज आपण अशा जगात राहतोय ज्याचा ताबा चंगळवादी व्यवस्थेने घेतलेला आहे. या व्यवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला स्वार्थी, कपटी, विश्वासघातकी, थिल्लर, अश्लील, व्यसनाधीन माणसांची रेलचेल आहे. इस्लामला निस्वार्थी, प्रामाणिक, विश्वासू, संयमी, निर्व्यसनी, दया आणि करूणेने ओतप्रोत, गरीबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर अशी माणसे अपेक्षित आहेत. परंतु, फक्त अपेक्षा केल्याने अशी माणसे तयार होणार नाहीत. अशी माणसे तयार करण्यासाठी स्वयंशिस्तीने प्रत्येकाला आपल्या व्यक्तीमत्त्वाचा विकास घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी इस्लाम अशी माणसे तयार करण्याचे एक मेकॅनिझम सुचवितो. या मेकॅनिझमांतर्गत स्वयंप्रशिक्षणाने ईमानधारक (श्रद्धावान) लोकांची एक अशी फळी इस्लाम निर्माण करू इच्छितो जी आदर्श समाज घडविण्यामध्ये महत्वाची भूमीका बजावेल. हे मेकॅनिझम काय आहे? स्वयं प्रशिक्षणाने माणसे चांगली कशी बनू शकतात? आणि चांगली माणसे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये इस्लामी श्रद्धेचे महत्त्व काय? ह्या अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित अशा विषयावर या आठवड्यात आपण चर्चा करणार आहोत. 

ईमान म्हणजे काय?

अरबी शब्दकोषात ’ईमान’ या शब्दाचा अर्थ कुठल्याही विशिष्ट अशा गोष्टीला मनातून खरे माणून त्याच्यावर विश्वास ठेवणे असा होतो. इस्लाममध्ये ईमानचा अर्थ, ’’अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि ह. मुहम्मद (स.) हे त्याचे प्रेषित आहेत.’’ असा आहे. प्रत्येक ती व्यक्ती जी स्वतःला मुस्लिम म्हणवून घेते तिचा या तत्त्वावर विश्वास आहे. ज्याचा विश्वास नाही तो मुस्लिमच नाही. या तत्त्वाला कलमा असे म्हणतात. आज मुस्लिमांमध्ये अशाच लोकांची संख्या जास्त आहे जे या कलम्याचा मनापासून स्वीकार करतात परंतु स्वीकार केल्यानंतर त्यांच्यावर मुस्लिम म्हणून कुठल्या गोष्टी लागू होतात व कुठल्या निषिद्ध होतात, ह्याची त्यांना एक तर समज नसते किंवा ती असली तरी प्रत्यक्ष जीवनात इस्लामला अपेक्षित असलेल्या आचार संहितेचे ते पालन करत नाही, म्हणून त्यांची अवस्था फुटबॉलसारखी झालेली आहे जो की आतून पोकळ असल्यामुळे लोक त्याला पायाने मारतात. मुस्लिमांमध्ये इस्लामी चारित्र्याचा अभाव निर्माण झाल्यामुळे जागतिक पातळीवर मुस्लिमांचा तसा ऱ्हास होत आहे ज्याची भीती द्वितीय खलीफा हजरत उमर रजि. यांनी खालील शब्दांत व्यक्त केली होती. ’मला त्या दिवसाची भीती वाटते जेव्हा अल्लाहचा इन्कार करणारे स्वतःवर गर्व करतील आणि मुस्लिम अल्लाहवर ईमान ठेवल्यामुळे स्वतःला खजिल समजतील.’ आज याच स्थितीला जागतिक मुस्लिम समुदाय पोहोचलेला आहे. याचे प्रमुख कारण इस्लामी श्रद्धेच्या आवश्यक तत्वांचे पालन करण्यामध्ये त्यांना आलेले सामुहिक अपयश आहे. 

इस्लामी श्रद्धेचे प्रशिक्षण म्हणजे काय?

तुम्हारे पांव के नीचे जमीन नहीं 

कमाल ये है के फिर भी तुम्हें यकीन नहीं

कुठल्याही आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी समाजातील लोकांचे प्रशिक्षण आवश्यक असते व असे प्रशिक्षण बाहेरून थोपवून फारसा फरक पडत नाही तर स्वयंशिस्तीने असे प्रशिक्षण पूर्णत्वास न्यावे लागते. हे प्रशिक्षण व्यक्तीमत्त्वाचा समग्र वेध घेणारे असावे लागते. अर्धवट प्रशिक्षणाने फारसे काही हाताला लागत नाही. असे प्रशिक्षण घेण्याची गरज सर्वप्रथम लोकांच्या मनामध्ये निर्माण करावी लागते. आजमितीला प्रत्येक क्षेत्रामध्ये अश्लिलता आणि निर्लज्जपणाने कळस घातलेला आहे म्हणून अशा प्रशिक्षणाची गरज जास्त भासू लागलेली आहे. 

आजकाल व्यक्तीमत्वाचा विकास करणारी अनेक पुस्तके आणि्नलासेस उपलब्ध आहेत. परंतु यापैकी कोणीही इस्लामला अपेक्षित असा व्यक्तीमत्त्वाचा समग्र विकास घडवून आणण्यात सक्षम नाही. असा विकास केवळ इस्लामने दिलेल्या व्यवस्थेअंतर्गतच होऊ शकतो. या प्रशिक्षणात ’ईमान’ अर्थात ’श्रद्धे’चा महत्वाचा वाटा असतो. ते कसे ते आपण आता पाहूया. 

श्रद्धेवर आधारित प्रशिक्षण म्हणजे काय? 

खुदाने आजतक उस कौम की हालत नहीं बदली

न हो जिसको खयाल खुद अपने हालत के बदलने का

कुरआनमध्ये ईश्वराने फर्माविले आहे की, ’’वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह     कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करीत नाही जोपर्यंत तो स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही’’ (सुरे अर्रअद आयत नं.11)

वरील आयतीच्या संदर्भाने असे म्हणता येईल की, जोपर्यंत समाजातील माणसे स्वतः आपले स्वयंप्रशिक्षण करण्याची तयारी ठेवणार नाही तोपर्यंत ईश्वरही त्यांना प्रशिक्षणासाठी विवश करणार नाही. कलम्याचा स्वीकार केल्यानंतर ज्या गोष्टी हराम करण्यात आलेल्या आहेत त्याची यादी कुरआनमध्ये दिलेले आहे. तसेच ज्या गोष्टी जायज (वैध) आहेत आणि ज्या गोष्टी नाजायज (अवैध) आहेत या संदर्भातही कुरआन आणि शरियतमध्ये तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. निषिद्ध आणि अवैध गोष्टींपासून अलिप्त राहण्याची सुरूवात करणे ही स्वयंप्रशिक्षणाची पहिली पायरी आहे. उदा. कुरआनमध्ये वायफळ खर्च न करण्याबाबत खालील शब्दात ताकीद करण्यात आलेली आहे की, ’वायफळ खर्च करणारे सैतानचे भाऊ आहेत.’ (बनीइसराईल आयत नं. 27) या गोष्टीला सर्व मुसलमान हलक्यात घेतात. वास्तविक पाहता आपली खोटी प्रतिष्ठा वाचविण्याच्या नादात वायफळ खर्च केल्यामुळे अनेक लोक दारिद्रयाच्या रेषेखाली जातात. स्वयंप्रशिक्षणाने या वाईट सवयीवर आपल्याला ताबा मिळविता येतो. पण यासाठी ईमान मजबूत असायला हवे. खोट्या प्रतिष्ठेपायी आपण लग्न समारंभामध्ये वायफळ खर्च करतो. त्यामुळे अनेक लोक कंगाल होतात. स्वयंप्रशिक्षणाने यावरही विजय प्राप्त करता येतो. स्वयंप्रशिक्षणाने ’निकाह आसान’ केल्याने कोट्यावधी रूपयांची बचत होऊ शकते. परंतु हे सर्व करण्यासाठी ईमान मजबूत असायला हवे. 

ईमानची पातळी आजुबाजूच्या वातावरणाच्या परिणामाप्रमाणे कमी जास्त होत असते. चांगल्या आणि ईस्लामिक वातावरणात राहिल्यास तसेच श्रद्धावान मुस्लिमांच्या संगतीत राहिल्यास ईमानची पातळी उंचावते आणि तेच जर चंगळवादी व्यवस्थेमध्ये राहिल्यास इमानची पातळी आपोआपच कमी होते. म्हणून स्वयंप्रशिक्षणामध्ये या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिले गेले पाहिजे की आपण कोणत्या वातावरणात राहतो आणि कोणाच्या संगतीत राहतो.

जफर आदमी उसको न जानिएगा हो वो कैसाही साहेबे फहम व जका 

जिसे ऐश में यादे खुदा न रही जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा. 

इस्लामी श्रद्धेमुळे स्वयंप्रशिक्षणातून सब्र (सहनशिलता) वाढते. वाईट परिस्थितीवर सुद्धा सहनशील माणसे सहज मात करू शकतात. याचे जीवंत उदाहरण भारतीय मुस्लिमांचे आहे. इतर सर्व समाज शासकीय लाभ घेऊन उत्तरोत्तर प्रगती करत असतांना या लाभांपासून जाणून बुजून वंचित ठेवल्या गेल्यामुळे मुस्लिम समाज अतिशय हलाकीच्या परिस्थितीत आहे. तरी परंतु स्वयंरोजगाराच्या माध्यमातून छोटे-छोटे काम करून हा समाज केवळ तग धरूनच नाही तर बऱ्याच पैकी प्रगती करतांना दिसतो. एवढेच नाही तर हा समाज इतरांच्या मदतीसाठीसुद्धा पुढे येतो. ही बाब देशाने आपण याची देही याची डोळा पाहिलेली आहे. याची प्रेरणा त्यांना कुरआनच्या खालील आयातीतून मिळते. 

‘‘आणि आपल्या स्वतःवर इतरांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः गरजवंत का असेनात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मनाच्या संकुचितपणापासून वाचविले गेले तेच साफल्य प्राप्त करणारे आहेत’’ (सुरे अलहश्र: आयत नं. 9).

जे काही होते ईश्वराच्या मर्जीने होते. यावर ठाम विश्वास जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत माणसं स्वतःच्या हिम्मत आणि कार्यक्षमतेवर खोटा  विश्वास ठेवून जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात. ईश्वरीय मर्जीने व शरीयतच्या आधीन राहून प्रयत्न केल्यानंतर जे काही आपल्या पदरात पडेल तेवढेच आपले व त्यातूनही आपल्याला दुसऱ्या गरजवंतांची मदत करावयाची आहे ही बाब सश्रद्ध मुस्लिम स्वयंप्रशिक्षणातून साध्य करतात. शिवाय, आपण जे काही करतो ते सर्व अकाऊंटेबल आहे. ईश्वर सर्व पाहत आहे ही भावना सुद्धा श्रद्धा आधारित स्वयंप्रशिक्षणामुळे साध्य होते. रमजानच्या उपवासामुळे अगदी बालवयापासून ही भावना मुस्लिमांमध्ये दृढ होण्यास आश्चर्यजनक मदत प्राप्त होते. 

श्रद्धाहीन माणसे स्वार्थी बनतात आणि त्याचा सर्वात मोठा फटका नातेवाईक आणि मित्रांना होतो. वर नमूद सुरे अलहश्रच्या आयत 9 मधून मिळणाऱ्या प्रेरणेतून सश्रद्ध स्वयंप्रशिक्षणाने लैस माणसं आपले मित्र आणि नातेवाईकांची काळजी घेतात नव्हे त्यांना अडचणीमध्ये मदत करतात आणि ही मानवाच्या विकासाला चालना देणारी सर्वात मोठी गोष्ट आहे. 

स्वयंप्रशिक्षणासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुरआन आणि हदीस यावर दृढ विश्वास असणे आवश्यक आहे. कारण माणसाला माणूस बनविण्यासाठी जी गुणवैशिष्ट्ये आवश्यक आहेत. या सर्वांचा समावेश कुरआन आणि हदीसमध्ये करण्यात आलेला आहे. याला सोडून दिले गेलेले प्रशिक्षण हे कुचकामी ठरते यात कुठलीही शंका नाही. ईमान सहज उपलब्ध होणारी गोष्ट नाही. तसे असते तर अरबांनी ईमान ऐवजी युद्धात होणारे नुकसान सहन केले नसते. ईमान माणसाला माणूस बनविते. पण त्यासाठी त्याा मनात उत्पन्न होणाऱ्या आणि त्याला आनंद देणाऱ्या वाईट इच्छा आणि आकांक्षा चा बळी मागते. आपल्या वाईट इच्छा आणि आकांक्षाचा बळी दिल्याशिवाय, हे प्रशिक्षण पूर्ण होवू शकत नाही. पुन्हा त्यात अर्धवट प्रशिक्षण काहीच कामाचे नसते. 

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’’ज्याने वाईट गोष्टी पाहिल्या त्याने त्या वाईट गोष्टींचा सर्व शक्तीनिशी विनाश करावा. तेवढी त्याच्यात शक्ती नसेल तर त्याचा विरोध करावा. तेवढीही शक्ती नसेल तर मनात त्याबद्दल घृणा ठेवावी आणि हा इमानचा सर्वात कनिष्ठ दर्जा आहे.’’ या हदीसमध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे कुरआनमध्ये तीच गोष्ट, ’’अम्रबिल मारूफ नहीं अनिल मुनकर’’ या शब्दात अवतरित झालेली आहे. या दोहोंचा एकत्रित अर्थ असा की, सश्रद्ध स्वयंशिस्तीच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेल्या प्रत्येक मुस्लिमाचा जीवनाचा उद्देशच ’’वाईट गोष्टींचा नायनाट आणि चांगल्या गोष्टींची स्थापना’’ हा असला पाहिजे. केवळ कलमा पठण केल्याने आपण स्वर्गात जाऊ हा बहुतेक मुस्लिमांचा होरा असून, कलमा मुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय स्वर्ग प्राप्ती शक्य नाही, हे  सश्रद्ध स्वयंप्रशिक्षणामधूनच माणसाच्या लक्षात येते. म्हणून शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला सश्रद्ध स्वयंप्रशिक्षणाची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget