माझे एक ज्येष्ठ स्नेही गेली दोन वर्षे काही ना काही कारणाने सतत आजारी आहेत, अर्थात त्यांना आजारी म्हणणे, म्हणजे थोडे धाडसाचेच होईल, कारण ते एक ही दिवस घरी झोपून राहिलेले नाहीत, अनेक व्याधींना तोंड देत त्यांची दैनंदिन भ्रमंती काही थांबलेली नाही, वारकरी संप्रदायातील या व्यक्तीचा सतत फिरत राहणे हा स्वभावच झाला आहे, आजपर्यंत त्यांनी सुमारे पन्नास वेळा चालत पंढरीची वारी केली आहे.अत्यंत मनमिळावू व दिलखुलास स्वभावाचे हे स्नेही हसतमुख असतात, फिरणे आणि लोकांच्या संपर्कात राहणे ही त्यांची अंगची सवयच झाली आहे. माझ्याकडे आल्यानंतर ते आपल्या आजारांचा पाढा वाचतात, मी ही त्यांचा नम्र श्रोता होवून ऐकतो, त्यांना माझ्याकडून बर्याच वेळा याबाबतीत दिलासा व आधार हवा असतो, मी ही त्यांना कधीच नाराज करीत नाही, त्यातल्या त्यात त्यांच्या फायद्यांचा , किफायतीशीर व योग्य सल्ला देवून त्यांचे समाधान करतो.
खरं तर वयाच्या साठीनंतर उतारवयात प्रत्येक माणसाला दिलासा व आधार हवाच असतो, अर्थात अशावेळी नम्रता व हास्यवदन या गुणांचे महत्व पटते. कारण सुहास्य वदनाने समोरचा माणूस मोकळा ढाकळा होतो. त्याचे मुख ही खुलवले जाते आणि मनही. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण" हे तुकोबारायांचे विचार इथे ही लागू पडतात.
खरं सांगायचं तर जगातील कोणत्याही माणसाच्या हृदयात आपल्याला जागा मिळवायची असेल तर नम्रता व हास्यवदनाने त्यांचा प्रथम विश्वास संपादन करायला हवा, न होणार्या गोष्टी नम्रतेच्या मदतीने सहज होवू शकतात. नम्रता आणि शिष्टाचार जीवनात महत्वाचे आहेत. शिष्टाचार शिवाय जीवन सुखी होवू शकत नाही. शिष्टाचार म्हणजेच माणुसकी आणि माणुसकी म्हणजेच दुसर्याला समजून घेणे, त्याला दिलासा व आधार देणे. या वृत्तीमुळे माझ्याकडे माझे ज्येष्ठ स्नेही वारंवार येत असतात. मी त्यांना कधीच नाकारत नाही, मात्र मी चार शब्द बोललो की, त्यांना मनापासून बरे वाटते, हाच माझाही आनंद असतो.अर्थात अशा भेटणाऱ्या व्यक्ती मलाही बरंच काही शिकवून जातात.
विज्ञानामुळे प्रचंड प्रगती झाली आहे, कच्च्या रस्त्यांचे रुपांतर पक्क्या रस्त्यांमध्ये झाले आहे, जगाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत एका क्षणात संपर्क साधण्याचे कौशल्य माहिती आणि तंत्रज्ञानामुळे साध्य झाले आहे, प्रचंड भौतिक प्रगतीमुळे संपूर्ण जग एक खेडे झाले आहे, इतके ते एकमेकांच्या कमालीचे जवळ आले आहे, मात्र एवढ्या सार्या सुधारणा होवून या आधुनिक काळात माणूस माणसांपासून फार दूर गेला आहे. एकमेकांविषयी असणारा जिव्हाळा, आत्मियता व आदरभाव कुठल्याकुठे लूप्त झाला आहे. हे पाहून विज्ञानामुळे खरंच प्रगती झाली आहे का? असा प्रश्न पडतो, पण त्याचे समर्पक उत्तर कुणाकडेच नाही, कारण या विज्ञान युगात माणसाचे सूख कोसोमैल दूर गेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणूस कमालीचा व्यस्त झाला आहे. "पळा पळा कोण पुढे पळे तो",अशी प्रत्येकाची अवस्था झाली आहे. जो तो सुखाच्या मागे शर्यतीसारखा पळतो आहे, मात्र त्याला सुख भेटतच नाही, प्रत्येकजण उपभोगाचेे गुलाम झाले आहेत, त्याला इतरांच्या सुख-दु:खाविषयी काहीही देणे घेणे नाही, एखादा स्नेही भेटायला तुमच्या घरी आला तर त्याच्या कपाळावर आट्या पडतात, त्यातही टी.व्ही. वरील मालिका चालू असतांना कोणी पाहुणा किंवा मित्र आला तर अनेकजण नाके मुरडतात, माणसांपेक्षा टी.व्ही. वरील मालिका त्यांना अतिशय महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. शिवाय सध्या कोण कुणाची विचारपूस ही करीत नाही. मी माझे आणि माझ्यासाठी अशी स्वार्थकेंद्री वृत्ती फारच फोफावली आहे. मात्र समाधान त्यांच्यापासून खूप दूर गेले आहे.
सोलापूरचे दिवंगत गझलकार कवी ईलाही जमादार आपल्या एका गझलेत प्रश्न विचारतात, ,"माणसांना भेटणारी माणसे गेली कुठे?". खरंच आज आधुनिकतेचे व सुधारणेचे वारे भन्नाट वाहत असलेतरी, तसेच सर्व भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असेल तरी संपूर्ण जगच कमालीचे व्यवसायकेंद्री, स्वार्थकेंद्री, झाले आहे. मोठ्या शहरात तर शेजारी कोण रहातात, याची ही दखल घ्यायला कुणाला सवड नाही. कोण काय करतंय हे सुद्धा परस्परांना माहीत नसते, मग परस्परांशी मनमोकळेपणाने बोलणे तर फारच दुरच. अर्थात अशावेळी माणूस क्लब, बार, हुक्कापार्लर सारख्या व्यसनांना चालना देणारी आणि सतत कैफात ठेवणारी केंद्रे जवळ करतो, आणि व्यसनाधिनतेच्या दृष्टचक्रात अडकतो.
आमच्या लहानपणी शेजारधर्म श्रेष्ठ मानला जायचा, शेजारच्या घरात किंवा गल्लीत एखाद्याच्या घरी सुखाचा किंवा दु:खाचा प्रसंग निर्माण झाला, तर सगळी गल्ली त्यामध्ये सहभागी व्हायची, एखाद्याच्या घरी मुलांचे किंवा मुलीचे लग्न असेल तर अख्खी गल्ली त्या घरात उत्साहाने राबायला असायची, एखाद्याच्या घरी काही दु:खद घटना घडली तर पुढे आठवडा पंधरा दिवस गल्लीतील बायामाणसं अशा दु:खद प्रसंगी आधार देण्यासाठी हजर असायचीत, त्यांचा दु:खभार हलका करण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे, मात्र अलिकडे अशाप्रसंगी सुद्धा माणूस माणसाला भेटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, व्हाटसअपवरून संदेश पाठवून त्यावरच समाधान मिळवले जाते, संपूर्ण जग यंत्रवत झाले आहे, यांच्यातील संवेदना खरंच गेल्या कुठे? असा प्रश्न पडतो, कारण प्रत्येकजण चिंताग्रस्त दिसतो.
आज सहवासासाठी आणि संवादांसाठी आसुसलेले अनेकजण आहेत, त्यांना तुमच्याकडून बाकी कसलीही अपेक्षा नाही, त्यांना केवळ दोन घटका मनमुराद बोलायला हवे असते, मात्र आज दोन मिनिटे बोलायलाही कुणाला वेळ नाही, आमचे संगमनेर येथील एक ज्येष्ठ स्नेही सुरेश परूळेकर (वय वर्ष ९०) मला नेहमी सांगत असतात की, तुम्हाला जे काही हवे आहे ते हसतमुखाने तुम्ही मिळवू शकता, जीवनातील यशस्वीतेचा तीन-चतुर्थांश भाग चांगली वागणूक हा आहे, चांगली वागणूकच यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे आणि संपर्कात येणार्या प्रत्येकाशी आपण हसतमुखाने सामोरे गेले पाहिजे.
याबाबत माझा स्वत:चा अनुभव कसा आहे म्हणालं, तर हसतमुखाने व मनमिळावू स्वभावाने लोकांच्या हृदयांत आपल्याला सहजपणे जागा मिळते, आत्मिक सौंदर्य म्हणजे हेच की आपण आपल्या संपर्कात येणार्या किती जणांना सुख, समाधान आणि आनंद देतो, दुसर्याला समजून घेणे हीच माणुसकी. अशी माणुसकी जपण्यासाठी तुमच्या खिशात खूप पैसे, फिरायला अलिशान गाडी व टोलेजंग बंगलाच पाहिजे असे नाही, तुम्ही ज्यांना हवे आहात, त्यांंना तुमच्या सवडीप्रमाणे वेळ द्या, त्यांना झिडकारू नका, त्यांचे मनापासून स्वागत करा, त्यांना सन्मान द्या, तुमच्याबद्दलचा विश्वास द्विगुणीत करा, त्यांचे विचार, शंका, प्रश्न ऐकून घ्या, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा, त्यांचे काही गैरसमज झाले असतील, अज्ञानाने काही दु:ख पदरी पडले असेल तर त्यावर फुंकर घाला, त्यांना प्रेमळ शब्दांनी आपलेसे करा, त्यांना तुमच्याबद्दल विश्वासाने निर्माण होईल असे आश्वासक शब्दांने त्यांचे सांत्वन करा, त्यांना दिलासा द्या, त्यांना आधार द्या, अर्थात त्यांना समजून घ्या, हे सर्वात महत्वाचे.
तुमच्या संवादामुळे त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल, त्यांना आपले कुणीतरी आहे, आपले कुणीतरी ऐकते आहे, याबद्दल विश्वास निर्माण होईल, खरं म्हणजे परस्परांना समजून घेणेे आणि सुख-दु:खाचे भागीदार होणे, हाच खरा मानवतेचा धर्म आहे, हा मानवतेचा धर्म जपणे आजच्या काळात अतिशय गरजेचे आहे.
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर,
भ्रमणध्वनी - 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
Post a Comment