उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळून राजकीय शक्तींसह धार्मिक शक्तीसुद्धा पणाला लावली आहे. पण काही केल्या वर्तमान स्थितीवरून उत्तर प्रदेश निवडणुका आपल्या पदरात पाडण्यात भाजपाला यश मिळेल असे दिसत नाही. पहिल्यांदाच भाजप सोडून समाजवादी पक्षामध्ये जाणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचीच नव्हे तर मंत्री आणि आमदारांची रीघ लागलेली आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली सुद्धा स्वतः भाजपाचेच आमदार, मंत्री, निवडणूक लढण्यास तयार नाहीत. ओमप्रकाश राजभर हे दलित समाजाचे नेते आणि निषाद समाजाचे एक नेते या दोघांनीही अगोदर भाजपाला साथ दिली. पण नंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या भाजपाचे धोरण ब्राह्मण समाजाभिमुख असते त्या समाजाने सुद्धा आपली निवडणूक भूमीका स्पष्ट केली नाही. मात्र सपाला साथ देण्याची गोष्ट ब्राह्मण समाजातील काही नेत्यांनी बोलून दाखविलेली आहे. तसेच ब्राह्मण समाज खऱ्या अर्थाने यावेळी कोणाबरोबर असणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. योगी आदित्यनाथ यांच्याविषयी ब्राह्मण कमालीचे नाराज आहेत. बसपाचे नेते सतिश मिश्रा म्हणतात की, योगींच्या काळात उत्तर प्रदेशात 500 ब्राह्मणांची हत्या झाली. 100 ब्राह्मणांचे एन्काऊंटर केले गेले. एवढेच नव्हे तर राम मंदिराच्या नावाखाली ब्राह्मणांची दिशाभूल केली गेली. कित्येक मंदीरे उध्वस्त केली. ते योगींना विचारतात केवळ मठांद्वारेच हिंदू धर्म चालविणार आहेत काय? मायावती सध्या निवडणुकीत का सहभागी होताना दिसत नाहीत, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, गोष्ट अशी नाही, बसपाने हजारो कार्यक्रम पार पाडलेले आहेत. पण दलित समाज आणि त्यांच्या नेत्याकडे माध्यमे तुच्छ भावनेने पाहतात म्हणून त्यांच्या निवडणूक प्रचाराला या माध्यमांनी लोकांसमोर आणले नाही. मायावती चार वेळा राज्याच्या मुख्यमंत्री आणि सशक्त मुख्यमंत्री राहिल्या. 2007 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतःच्या बळावर जिंकली होती. सतिश मिश्रा पुढे म्हणाले की, मायावती आणि बसपाला यश मिळेल.
तिकडे प्रियंका गांधी यांनी सुद्धा ब्राह्मणांसाठी काळजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार योगी सरकारने ब्राह्मणांच्या विकासासाठी काहीच केले नाही. पण योगींनी कोणाच्या विकासासाठी काही केले आहे का? असा प्रश्न प्रियंका गांधींना विचारावा लागेल. ’लडकी हूं लढ सकती हूं’ या घोषणेद्वारे प्रियंकांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूक दंगलीत उडी घेतली आहे. त्यांना तिथे विशेष करून महिलांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. पण त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे इतर नेते का उत्तर प्रदेशात आजपर्यंत सक्रीय होताना दिसत नाहीत हा गंभीर प्रश्न आहे. त्यांनी कोणाशी हातमिळवणी तर केली नाही ना?
लखमीपूर हत्याकांडाला न्यायालयात पोहोचविण्याचे कार्य प्रियंका गांधी यांनीच केली ही वास्तविकता आहे. त्यांच्या अट्टाहासामुळेच आज गृहराज्यमंत्री पुत्राविरूद्ध हत्येचा खटला दाखल झाला आहे. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट वाटण्याची घोषणा केली आहे. पण त्यांच्या पक्षाने याबाबत आपले मौन सोडलेले नाही. प्रियंका गांधी एकट्या निवडणूक प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. -(उर्वरित पान 2 वर)
स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजप समोरील अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या 35 वर्षांपासून ते उत्तर प्रदेशच्या सक्रीय राजकारणात आहेत. चार वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देणे म्हणजे त्यांच्या एकट्याचीच नाही तर त्यांच्या बरोबर उत्तर प्रदेशातील दुर्बल, दलित आणि इतर मागासवर्गीयांचा समावेश असणार आहे.
त्यांनी पक्ष सोडताना जी कारणे दिली आहेत त्यात लहान व्यापारी, बेरोजगार तरूण, शेतकरी वर्ग, इतर मागासवर्ग यांच्या समस्येंचा उल्लेख केलेला आहे. पाच वर्ष कोणाचा विकास होत होता की केवळ विनाशाच्या मार्गावर सरकार जात होते. भाजपासाठी इतर मागासवर्गीयांच्या पक्ष सोडण्याची समस्या गंभीर आहे. त्यांच्या राजकीय शक्तीला उत्तर प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. योगी आदित्यनाथ यांची चिंता आणखीन गंभीर आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या यशावर त्यांचे भावी पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे स्वप्न अवलंबून आहे. उत्तर प्रदेश हातातून निसटले की त्यांच्या राजकीय प्रवासाला विराम लागणार आहे हे निश्चित आणि जर योगी यांचे स्वप्न साकार झाले नाही तर भाजपाच्या 2024 च्या निवडणुका जिंकण्याचे स्वप्न भंग होणार हे निश्चित. म्हणून हया निवडणुका कोणत्या न कोणत्या प्रकारे जिंकणे हे भाजपाचे लक्ष्य आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष असोत की मग दुसऱ्या कोणत्याही मार्गाने.
कोणताही पक्ष मुस्लिमांविषयी काही बोलत नाही. त्यांनी ’मु’ जरी म्हटले की थेट जिन्नहपर्यंत त्यांचा संबंध जोडला जाईल याची सर्वांना भीती आहे. एकेकाळी मुस्लिम-यादव या समीकरणाद्वारे उत्तर प्रदेशात निवडणुका लढविल्या जात होत्या. आता मुस्लिम मैदनात नसल्याने बऱ्याच ’गढी’ या त्या समाज घटकांच्या, जाती जमातीच्या उलगड्या लागत आहेत. आणखीन किती गाठी उघडाव्या लागतील हाच प्रश्न सर्व पक्षांसमोर आहे. ओबीसी, दलित राजभर कुर्मी, निषाद समुदाय आणि काय काय...
Post a Comment