सलीम देशमुख : पैसे परत केल्याशिवाय मृत्यू न यावा
शेतकऱ्याचे पैसे परत करण्यासाठी आपणास अल्लाहने मार्ग दाखवला, पैसा परत केल्याशिवाय मृत्यू न यावा, एक एक रुपयाची काय किंमत असते याची आपणास जाणीव आहे. लोकांचा माझ्यावर अतोनात विश्वास होता, त्यामुळे पैसा बुडाला, हे समजत असून देखील एका ही शेतकऱ्याने त्रास दिला नाही. त्यामुळे पैसा येताबरोबर तो देत आहे, असल्याचे बोरनार (ता. जळगाव) चे कापूस व्यापारी अ. सलीम देशमुख यांनी म्हटले आहे.
लाबादाप्रमाणे उधारीवर कापूस घेतला, पण दुर्दैवाने दिवाळे निघाले, एक नवा पैसा देण्याची परिस्थिती राहिली नाही. 17 वर्षानंतर दिवस पालटले, दिवस पालटताबरोबर ज्यांचा कापूस उधारीने घेतला होता, त्यांना घरी जाऊन पैसे देण्याचे काम बोरनार (ता. जळगाव ) या गावातील व्यापारी सलीम देशमुख हे करीत आहे.
उद्ध्वस्त माळरानावर अचानक वसंत बहरावा... अशा या घटनेने ज्यांचे पैसे बाकी होते तेही आश्चर्य व्यक्त करीत सलीम’ला सलाम करीत आहेत.
अधिक वृत्त असे की, बोरनार हे जळगाव तालुक्यातील लहानसे गाव, इथे राहणाऱ्या अब्दूल सलीम अब्दूल खालीक देशमुख या प्रामाणिक व्यापाऱ्याची ही कहाणी. आधी किराणा दुकान नंतर कापसाचा व्यापार त्याने सुरु केला. हळू हळू जम बसला, विश्वासामुळे उधारीवर मोठ्या प्रमाणात कापूस मिळू लागला.
सन 2005 मध्ये त्यांचे ग्रह फिरले, म्हसावद, बोरनार, दहिगाव, डोकलखेडे, वरसाडे माहिजीसह परिसरातील 25- 30 खेड्यातील सुमारे तीन ट्रक म्हणजे 300 क्विंटलच्या पुढे माल खरेदी केला. (उर्वरित पान 7 वर)
पण एकाही शेतकऱ्याचे ते पैसे देऊ शकले नाही. शेतकरी दररोज पैसे मागायला येत, पण व्यापारात मोठा घाटा आल्याने पैसे देता येत नव्हते. वर्षे दोन वर्ष उलटले, वर्षभराच्या कमाईचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले, वायदा मिळत होता, पण पैसे मिळत नव्हते. शेवटी पैसे बुडाले, असे समजून शेतकऱ्यांनीही त्याचा नाद सोडला. एक दोन नव्हे तब्बल 17 वर्ष झाल्यानंतर देशमुख यांची शेती विकून पैसा आला. (शेतीची कोर्टात केस असल्याने निकाल आल्यानंतर पैसा आला.) पैसा मिळताबरोबर या व्यापाऱ्याने सन 2005 मध्ये उधारीवर व तोंडी घेतलेल्या कापसाच्या चिटोऱ्या काढल्या, ज्याचा जेवढा भाव होता तेवढे पैसे चेक द्वारे घरी जाऊन ते सध्या देत आहेत. म्हसावद दहीगाव परिसरात हे पैसे परत करण्याचे काम सध्या करीत आहेत.
बुडालेले, तसेच विसर पडलेले पैसे अचानक मिळाल्याने या व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची घराघरात चर्चा होत आहे. 17 वर्षात कोणता शेतकरी वारला आहे. त्याच्या वारसाला, कुणाजवळ देखील या व्यवहारातील कोणताही पुरावा नाही, माल किती होता, भाव काय होता, किती रक्कम होती, हे कुणालाच माहिती नाही. पण त्यावेळच्या चिठ्ठया बरोबर सांभाळून ठेवल्याने घरोघर जाऊन पैसे वाटणारा हा इसम कदाचित विरळाच आहे.
(साभार : लोकमत : प्रमोद पाटील, कासोदा)
Post a Comment