Halloween Costume ideas 2015

दिल्लीच्या निकालाचा अन्वयार्थ

Kejariwal
टोकाचा तिरस्कार आणि टोकाचा संयम यात बाजी शेवटी संयमाने मारली आणि 62 विरूद्ध 8 ने आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभेचा सामना जिंकला. सीएए, एनपीआर आणि एनआरसी क्रोनोलॉजीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या निवडणुकीचा सामना रंगतदार करण्याचा भाजपने पराकोटीचा प्रयत्न केला. परंतु केजरीवाल यांनी आपल्या संयमी प्रचाराने हा सामना एकतर्फी करून टाकला. भाजपला सन्मानजनक पराजय सुद्धा मिळू दिला नाही. त्यांना दोन अंकी विजयसुद्धा प्राप्त करता आला नाही. गेल्या एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या सातही मतदारसंघामध्ये विजयी पताका फडकविणार्‍या भाजपला आत्मविश्‍वास होता की ज्या रणनितीच्या बळावर त्यांनी दिल्लीतील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या, त्याच रणनितीच्या बळावर दिल्ली विधानसभा ही जिंकता येईल. म्हणून मुद्दामहून टोकाचा मुस्लिम द्वेष पसरवून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. खरे पाहता एका महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा जास्त महत्व देण्याची गरज नसतांना दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने अकारण आपली प्रतिष्ठा पणाला लावून स्वतःचे हासे करून घेतले.
    एकीकडे जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेला हिंसाचार, सीएए विरोधाचे प्रतीक बनलेली शाहीनबाग, तेथे आणि जामियामध्ये झालेल्या गोळीबाराच्या तीन घटना, गुंजा कपूरने बुरखा घालून भाजपसाठी केलेले अयशस्वी स्टिंग ऑपरेशन ते ’देश के गद्दारों को गोली मारों सालों को’ इथपर्यंत द्वेषाची पातळी भाजपने उंचवत नेली. तर दूसरीकडे आपण पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर केजरीवाल यांनी लक्ष केंद्रीत केले. शाहीनबाग बद्दल त्यांना जेव्हा-जेव्हा प्रश्‍न विचारण्यात आले तेव्हा-तेव्हा त्यांनी मीडियाला निरूत्तर करून टाकले. पत्रकारांनी जेव्हा हा प्रश्‍न विचारला की तुम्ही शाहीनबागला का जात नाही तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. त्यांनी प्रश्‍न विचारणार्‍यालाच प्रतीप्रश्‍न विचारला, शाहीनबाग येथे बसलेले लोक कोणाला भेटू इच्छितात. मला की गृहमंत्र्यांना? गृहमंत्र्यांनी जावं मी कशासाठी जावं? त्यांनी भाजपच्या जयश्री रामच्या घोषणेच्या उत्तरादाखल जय हनुमान ही घोषणा देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर हनुमान चालीसाचे सार्वजनिकरित्या पठन करीत त्यांनी भाजपाच्या हिंदूत्वाच्या मुद्याच्या शिडातील हवाच काढून टाकली. येणेप्रमाणे घृणेचे उत्तर घृणेने न देता संयमाने देऊन त्यांनी दिल्लीच नव्हे तर सर्व देशातील जनतेचे ’दिल’ही जिंकले.
    भाजपच्या आक्रमक प्रचाराच्या केंद्रस्थानी शाहीन बागच नव्हता तर केजरीवालसुद्धा होते. केजरीवालांना आतंकवादी म्हणण्यापर्यंत भाजपने मजल मारली. प्रवेश वर्मा, अनुराग ठाकूर, योगी आदित्यनाथ, गिरीराजसिंह यांच्यात तर कोण कोणापेक्षा जास्त जहाल बोलतो याची जणू स्पर्धाच लागली होती. शाहीनबागची जमेल तितकी बदनामी करण्यात या लोकांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. एवढेच नव्हे तर 70 केंद्रीय मंत्री, 300 खासदार, 11 मुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते कामाला लावून अमित शहा यांनी दिल्ली पिंजून काढली. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील घरोघरी पोलचिट वाटत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. एवढा फौजफाटा आणि कोट्यावधी रूपयांची उधळण यामुळे या निवडणुका अटीतटीच्या होतील असे शेवटी-शेवटी भासू लागले होते. मात्र केवळ व्यवस्थापनाने निवडणुका जिंकता येत नाहीत हे या निवडणुकीने सिद्ध केले.
    माझ्या कामाकडे पहा. मी काम केले असेल तर मला मत द्या नसता देऊ नका, असे म्हणून निवडणूक जिंकणारे केजरीवाल हे स्वतंत्र भारतातील पहिले नेते ठरले आहेत. भाजपच्या आक्रमक प्रचाराला भुलून जर दिल्लीवासियांनी केजरीवालांचा पराभव केला असता तर पुढच्या किमान 100 वर्षापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याने जनहिताची कामे केली नसती. आता प्रत्येक मुख्यमंत्र्याला काही ना काही जनहिताची कामे केल्याशिवाय निवडणुकांना भविष्यात सामोरे जाता येणार नाही. एवढी मोठी रेषा केजरीवाल यांनी ओढून ठेवली आहे.
    या निवडणुकीमुळे मोदी आणि अमित शहा यांचा राजकीय प्रभाव जरी कमी झाला नसला तरी त्यांचा कसा पराभव करता येतो याचे सूत्र मात्र केजरीवालांनी एकदा नव्हे तर दोनदा दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकून देशासमोर ठेवलेले आहे.
    केजरीवालांच्या यशाचा फॉर्म्युला
    निमुटपणे जनतेची कामे करणे, लो-प्रोफाईल राहणे, तामझामाची परवा न करणे, मुस्लिमांचे लागूलचालन होत आहे असा आरोप होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच आपण पक्के हिंदू आहोत याची प्रचिती पावलो पावली येईल याची काळजी घेणे, म्हणजेच केजरीवाल यांच्या यशाचा फॉर्म्युला होय. कुठल्याही मुस्लिम मोहल्ल्यात जावून मुस्लिमांना सुखावह वाटेल असे विधान केजरीवाल यांनी या संपूर्ण निवडणूक प्रचारात केले नाही. उलट आपण पक्के हिंदू आहोत, हनुमान चालिसा पासून हनुमान दर्शन करणारे आहोत, हे त्यांनी आपल्या वर्तनातून सिद्ध केल्याने दिल्लीच्या हिंदू जनतेने त्यांना भरभरून मते दिली.
    कुठल्याही प्रकारची अशांतता ही कुठल्याही महानगराच्या विकासाला बाधा पोहोचणारी असते, हे दिल्लीकरांच्या लक्षात आल्यामुळे भाजपद्वारे केलेला अति आक्रमक प्रचार फोल ठरला आणि केजरीवाल यांच्या विकासाचे मॉडल यशस्वी झाले. असे असले तरीही आज जरी लोकसभेच्या निवडणुकीच्या घेतल्या तरी दिल्लीच्या सातच्या सात लोकसभेच्या जागा भाजपच जिंकणार, अशी आजही परिस्थिती दिल्लीत आहे. लोकांनी आठच महिन्यांपूर्वी सातच्या सात जागा भाजपला दिल्या होत्या, आजही देऊ शकतात. कारण विधानसभेच्या या निवडणुकांमध्येही भाजपच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. केंद्रात मोदी आणि राज्यात केजरीवाल अशी आखणी दिल्लीकरांनी मनोमन करून ठेवलेली आहे. हाच फॉर्म्युला देशातील जनतेच्या मनामध्ये रूढ होवू पाहत आहे. याची प्रचिती 2018 च्या मध्यापासून होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमधून येत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीगड, झारखंड नंतर आता दिल्लीमध्ये सुद्धा राज्यात वेगळे सरकार आणि केंद्रात वेगळे सरकार असे सत्तासमीकरण राष्ट्रीय पातळीवर आकाराला येत आहे. या निवडणुकीपासून बोध घेऊन येत्या काही महिन्यात होणार्‍या बिहार आणि पश्‍चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये आपल्या रणनितीमध्ये काही बदल करेल काय? याचे उत्तर पुढील काही महिन्यातच मिळेल. मात्र काँग्रेससह इतर राजकीय पक्ष एकत्रित मोट बांधून येणार्‍या काळात भाजपविरूद्ध लढा उभारतील, हे ही तेवढेच खरे. यासंबंधी शरद पवार यांनी राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहनही केले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget