पृथ्वीवर एका कुटुंबाच्या नावावर एखाद्या देशाचे नाव असल्याचे एकमेव उदाहरण म्हणून सऊदी अरबकडे पाहता येईल. मक्का व मदीना ही जागतिक श्रद्धास्थाने येथे असल्याकारणाने या देशाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. तेल समृद्ध राष्ट्र म्हणूनही सऊदी अरबची ओळख आहे. मानवतेला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे खेचून आणणारे समतावादी आंदोलनाचे प्रणेते हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणूनही पृथ्वीच्या नकाशावर सऊदी अरबला आगळे-वेगळे स्थान आहे. अशा महत्त्वपूर्ण देशाविषयी अनेकांना फारशी माहिती नसल्याचे लक्षात आल्यावरून या आठवड्यात या देशाविषयी माहिती देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
सऊदी अरबचे क्षेत्रफळ 2,149,690 स्क्वेअर कि.मी. आहे. जनसंख्या 4 कोटी व चारचाकी वाहनांची संख्या 10 कोटी आहे. मानव विकास सूचकांकाच्या दृष्टीने सऊदी अरब उच्च गटांच्या देशामध्ये सामील असून, जागतिक क्रमवारीत तो 34 व्या क्रमांकावर आहे. या देशाचा एसटीडी कोड 966 असून, चीनच्या हुवाई या दूरसंचार कंपनीचे 5जी नेटवर्कचे जाळे देशभर पसरलेले आहे.
सऊदी अरबचा इतिहास
18 व्या शतकात सध्याच्या रियाद या राजधानीच्या शहराजवळ नज्द या गावी सऊद नावाचा एक लढाऊ वृत्तीचा कबीला राहत होता. त्या कबिल्याचा प्रमुख मुहम्मद इब्ने सऊद याची नज्द या गावी सत्ता होती. तो अतिशय महत्त्वकांक्षी होता. संपूर्ण अरबस्थान व प्रामुख्याने मक्का आणि मदीना या शहरांवर आपले वर्चस्व असावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. 1744 साली एक खानाबदोश (फिरस्ती) धार्मिक कबिल्याचे आगमन नज्द या गावी झाले. त्या कबिल्याचा प्रमुख मुहम्मद इब्ने अब्दुल वहाब नावाचा इस्लामी धर्मगुरू होता. तो कट्टर एकेश्वरवादी होता. एका ईश्वराशिवाय दुसर्या कोणाची उपासना करणे तर लांब, कोणी इतरांचे नाव जरी आदराने घेतले तरी तो त्याला मुश्रीक (शिर्क करणारा/अल्लाहचा भागीदार ठरवणारा) किंवा काफीर (अल्लाह आणि पैगम्बर सल्ल. यांचा इन्कार करणारा) ठरवायचा. त्याची भेट मुहम्मद इब्ने सऊद याच्याशी झाली. दोघांनी एकमेकांचा अंदाज घेतला. आपण दोघे जर का एकत्र आलो तर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यासारखे होईल व संपूर्ण अरबस्थान ताब्यात येईल याची जाणीव दोघांनाही झाली. या जाणीवेतूनच दोघेही एकत्र आले. दोघांनी केलेल्या अंदाजाप्रमाणे प्रवृत्तीने धार्मिक असलेली बदवी (ग्रामीण) अरब जनता उपासनेसाठी मुहम्मद इब्ने अब्दुल वहाबकडे तर सत्तेसाठी मुहम्मद इब्ने सऊदकडे पाहू लागली. येणेप्रमाणे दोघांनाही जनसमर्थन लाभले व दोघेही बळकट झाले. मुहम्मद इब्ने सऊदने मुहम्मद इब्ने अब्दुल वहाबचे धार्मिक वर्चस्व मान्य केले. यालाच ’वहाबी’ विचारधारा असे म्हणतात. या विचारधारेला मुहम्मद इब्ने सऊद याने राजकीय मान्यता दिली. त्या बदल्यात मुहम्मद इब्ने अब्दुल वहाब यांनी मुहम्मद इब्ने सऊद यांच्या राजकीय सत्तेला धार्मिक मान्यता दिली. धर्म आणि राजकारणाचे हे रसायन इतके प्रभावी झाले की, लवकरच मक्का, मदीनासह तांबड्या समुद्रापासून पार्शियन आखातापर्यंत मुहम्मद इब्ने सऊदच्या साम्राज्याचा विस्तार झाला. मात्र 1818 साली त्याकाही प्रबळ असलेल्या तुर्कस्तानातील आटोमन साम्राज्याने (उस्मानिया खिलाफतीने) युद्धात मुहम्मद इब्ने सऊदचा पाडाव करून ते राज्य उस्मानी खिलाफतीखाली आणले. त्यानंतर 80 वर्षांनी म्हणजे 15 जानेवारी 1902 रोजी मुहम्मद इब्ने वहाब यांचा मुलगा अब्दुल अजीज इब्ने सऊद याने रियादचा राजा अब्दुल रशीद जो की उस्मानिया खिलाफतीचा प्रतिनिधी होता चा पराभव करून आपल्या वडिलांचे राज्य पुन:श्च मिळविले. ही सत्ता मिळविण्यासाठी अब्दुल अजीज इब्ने सऊद याने प्रचंड हिंसाचार घडवून आणला. शेकडो खिलाफत समर्थक मुस्लिमांचा शिरच्छेद केला. पहिल्या महायुद्धामध्ये तुर्की खलीफाने जर्मनीची साथ दिली होती. म्हणून जर्मनीच्या विरूद्ध असलेल्या अमेरिका आणि ब्रिटन यांनी मिळून ब्रिटिश योद्धा टी.एन. लॉरेन्स आणि ब्रिटिश गुप्तचर हॅम्प्रे यांच्या मदतीने अरबस्थानामध्ये उस्मानी खिलाफतीचा पाडाव केला आणि 22 सप्टेंबर 1932 रोजी अरबस्थानाचे नाव आपल्या कबिल्याच्या नावावर ठेऊन मुहम्मद अजीज इब्ने सऊद यांनी नव्याने सत्तास्थापन केली. या सत्तेचा पहिला राजा म्हणून किंग अब्दुल अजीज यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. राजधानी म्हणून रियाद या शहराची निवड करण्यात आली.
राजे अब्दुल अजीज यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1953 रोजी झाला. त्यांच्यानंतर सत्तेची सुत्रे त्यांचे पुत्र मुहम्मद बिन अब्दुल अजीज अल सऊद यांचेकडे आली. त्यांनी 2 नोव्हेंबर 1964 पावेतो राज्य केले. त्यांच्या नंतर किंग अब्दुल्लाह इब्ने सऊद यांनी 25 मार्च 1975 रोजी त्यांची हत्या होईपर्यंत राज्य केले. त्यांच्यानंतर किंग अल जवाराह बिन मसऊद इब्ने सऊद यांनी 13 जून 1982 पावेतो म्हणजे मृत्यूपर्यंत राज्य केले. त्यांच्यानंतर किंग हुसा बिन अहेमद यांनी त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 1 ऑगस्ट 2005 पर्यंत राज्य केले. त्यांच्यानंतर किंग फहद बिन असी अल शुरैम यांनी त्यांचा मृत्यू पर्यंत म्हणजे 23/1/2015 पावेतो राज्य केले. त्यांच्यानंतर 23 जानेवारी 2015 पासून किंग सलमान अल सऊद हे राजे बनले व सध्या तेच या देशाचे राजे आहेत. परंतु स्मृतीभ्रंशच्या आजाराने पीडित असल्यामुळे प्रत्यक्षात सत्ता त्यांचे पुत्र मुहम्मद बिन सलमान अल सऊद यांच्या हाती आहे. त्यांना एमबीएस नावानेही ओळखले जाते. मुहम्मद बिन सलमान अल सऊद हेच सऊदी अरबचे पुढील राजे असतील हे जवळजवळ निश्चित आहे. त्यांचे आणि ट्रम्प यांचे जावाई जेरॉड कुश्नर यांच्या मैत्रितून एक नवीन आधुनिक सऊदी अरब आकार घेत आहे.
एमबीएस फक्त राजकीयच महत्त्वकांक्षेनेच पछाडलेले नसून सऊदी अरबला एक आधुनिक राष्ट्र बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी शरियतच्या विरोधात जाऊन सऊदी महिलांना अनेक सवलती दिलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर लग्नाशिवाय गैर सऊदी जोडप्यांना सऊदी अरबच्या हॉटेलमध्ये प्रवेश खुला केला आहे. आधुनिक मॉल, मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहे सुरू केलेली आहेत. त्यातून जागतिक दर्जाची चित्रपटं दाखविली जातात. सिगारेट पिण्यावरची बंदी उठवलेली आहे. फॅशन स्पर्धा, संगीत रजनी, नवीन वर्षाचा उत्सव इत्यादी गोष्टींना मान्यता दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी या गोष्टी त्या देशात अशक्य होत्या. एमबीएस यांनी आपल्या महत्वकांक्षेतूनच शेजारी असलेला देश यमनवर युद्ध लादून जगातील सर्वात मोठे मानवी संकट निर्माण केले आहे. एवढेच नव्हे तर जमाल खशोज्जी या पत्रकाराची त्यांनी हत्या घडवून आणली आहे. त्यांचे अमेरिका आणि इजराईल या दोन्ही देशांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. सध्या जगातील सर्वात मोठे निओम डिजिटल शहर बांधण्याचे काम त्यांनी हाती घेतले असून, 2030 पर्यंत ते पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या शहरात व्याजावर आधारित सर्व व्यवहार केले जातील. तसेच तेथे जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांची कार्यालये असतील.
खनिज तेलाचा शोध
सऊदी अरब अत्यंत गरीब देश होता. त्याला मक्का आणि मदीना शहरामध्ये येणार्या हाजींच्या व्यवस्थेचा खर्च सुद्धा झेपत नव्हता म्हणून खनिज तेलाचा शोध लागेपर्यंत हैद्राबादचा निजाम तो खर्च उचलत होता. 3 मार्च 1938 रोजी एका अमेरिकी अभियंत्याने सऊदी अरबच्या भूमीमधून पहिल्यांदा खनीज तेल शोधून काढले आणि याच तारखेपासून सऊदी अरबचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले.
सुरूवातीला बेंदाड सदृश्य दिसणारा व घाण वास येणारा चिकट पदार्थ आपल्या जमिनीतून निघतो व तो अमेरिका आणि ब्रिटनच्या कंपन्या एक डॉलर प्रती बॅलर देऊन व कमरेतून वाकून नमस्कार करून का घेऊन जातात हेच सऊदी राजाच्या लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. धूर्त अमेरिकेने 1944/45 साली ’तेलाच्या बदल्यात सुरक्षा’ करार करून सऊदी अरबमधील बहुमुल्य अशा खनिज तेलाच्या खजिन्यावर आपले वर्चस्व कायम केले. तेलाच्या विहिरींच्या सुरक्षेच्या नावाखाली आपली मिलिट्री सऊदी अरबमध्ये घुसविली. अमेरिका आणि ब्रिटनच्या संपन्नतेमागे सऊदी अरबच्या तेलाचा फार मोठा वाटा आहे. अमेरिका ज्याचा मित्र असतो तो शत्रूपेक्षा वाईट असतो. हे समजेपर्यंत सऊदी अरब अमेरिकेच्या पूर्ण आहारी गेला होता. आजमितीला सऊदी घराण्याच्या सर्व राजपुत्रांची अब्जावधींची संपत्ती ही अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गुंतविलेली आहे, जी की सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफी यांच्या संपत्तीप्रमाणे कधीही गोठवली जाऊ शकते.
आज 21 व्या शतकात देखील तंत्रज्ञानासाठी सऊदी अरब अमेरिकेवर अवलंबून आहे. तेलाच्या खानीतून उपसा करणारी यंत्रे सऊदी अरब तयार करणार नाही किंवा दुसर्या देशातून आयात करणार नाही, याची पूरेपूर दक्षता अमेरिकेने घेतलेली आहे. गगनचुंबी इमारतींशिवाय, दुसर्या कुठल्याही वस्तू सऊदी अरबमध्ये तयार केल्या जाणार नाही, हे ही अमेरिकेने सुनिश्चित केले. म्हणूनच सऊदी अरबमध्ये सुईपासून विमानापर्यंत सर्व वस्तू आयात केल्या जातात व त्यातच अरबी नागरिक खुश असतात.
सऊदी अरब जरी एक स्वतंत्र देश असला तरी तो पूर्णपणे अमेरिका, ब्रिटन आणि इजराईल यांच्यावर अवलंबून आहे. अगदी अलिकडेच ट्रम्प यांनी असे विधान केले होते की, त्यांनी जर का सऊदी राजांची सुरक्षा काढून घेतली तर त्यांना 15 दिवससुद्धा देशावर राज्य करता येणार नाही.
मक्का आणि मदीना ही पृथ्वीवरील दोन सर्वात मोठी पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी भेट देण्यासाठी जद्दा विमान तळावर फुलपाखरासारखी विमाने दर पाच मिनिटाला एक याप्रमाणे उतरत असतात. जगाच्या विविध भागातून येणारा प्रत्येक नागरिक किमान 1 लाख रूपये सऊदी अरबमध्ये खर्च करतो. लाखो लोक रोज येत असतात. जरी या देशाला तेलाची देणगी मिळाली नसती तरी केवळ पर्यटनावर हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश बनला असता. सऊदी अरबमध्ये तेलाचा एवढा अमाप साठा पृथ्वीमध्ये कसा काय सामावलेला आहे, याचे कोडे वैज्ञानिकांना सुद्धा पडलेले आहे. मात्र सर्व मुस्लिम धर्मीयांची ही श्रद्धा आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या भूमीमध्ये एवढी खनिज संपत्ती असण्यामध्ये कुठलेही आश्चर्य नाही.
- एम.आय.शेख
Post a Comment