महमूद दरवेश यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर प्रत्येक आंदोलनानंतर एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. पॅलेस्टिनी कवी महमूद दरवेज यांनी बैरुतवर इस्रायली हल्ल्याच्या वेळी आपल्या डायरीत लिहून ठेवले होते की ‘विदेशी पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित असतात त्या कमोदोरमध्ये एका अमेरिकन पत्रकाराने मला विचारले, तुम्ही हे युद्ध जिंकू शकाल? नाही. ठामपणा महत्त्वाचा असतो. ठामपणातच यश असते. त्यानंतर काय होईल? नव्या युगाची सुरुवात. सीएए मागे घेतला जाणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही संपूर्ण देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरूद्ध धरणे-आंदोलने सुरू आहेत. घरातून बाहेर पडलेल्या महिला, मुले आणि पुरुष कोणत्याही परिस्थितीत घरात परतण्यास तयार नाहीत. त्यांना सत्तेचे भय वाटत नाही. त्यांना पोलिसांची धमकी, लाठ्या आणि गोळ्यादेखील हटवू शकत नाहीत. खरोखरच हा काळा कायदा रद्द केला गेला नाही तर काय होईल? विरोध हा जनतेचा अधिकार आणि शस्त्र असते. हा लोकशाहीचा पायादेखील आहे. हे शाहीन बाग आंदोलनासंदर्भात न्यायालयाने सांगितले आहे. आंदोलनाचा अंत यशासह होईल ही धारणा अत्यंत चुकीची आहे. आपला आवाज सत्तेत बसलेल्या लोकांपर्यंत पोहोचविणे हा आंदोलनाचा मूळ हेतू असतो. आम जनतेला जागृत करणे होय. समस्येबाबत समाजात वैचारिक चर्चा निर्माण करणे. जनआंदोलन प्रोत्साहन देतात आणि एकतेला चालना देतात. अनेक भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी निरंतर आंदोलने केली. ध्येय एकच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. आंदोलनातील ठामपणा हाच त्या त्या आंदोलनाची मूळ भावना होती. अण्णा हजारेंचे आंदोलनाने हळूहळू संपूर्ण देशात भ्रष्टाचाराला एक मोठा मुद्दा बनविला. तरुणपिढी विशेषत: या आंदोलनाकडे आकर्षित झाली होती आणि आंदोलन व त्यानंतरच्या राजकीय स्थितीत शक्तीदेखील बनली. हे आंदोलन पूर्णत: विफल ठरले असले तरी याच्याच उदरातून एका राजकीय पक्षाचा जन्म झाला. त्या पक्षाने दिल्लीत सत्तादेखील स्थापन केली. त्याचबरोबर अण्णांचे आंदोलन केंद्रात मोदी सरकार स्थापन होण्यास अतिशय पूरक ठरले होते, हेदेखील विसरून चालणार नाही. नक्सलवादी आंदोलन सर्वांत दीर्घकाळ चालणारे ठरले. यातूनच नवीन शब्द ‘अर्बन नक्सली’चा जन्म झाला आहे. महाराष्ट्रात हा एक महत्त्वाचा मुद्दादेखील आहे. असे असतानाही या अनेक आंदोलनांनी देशातील जनतेला वैचारिक शून्यतेतून बाहेर काढले. नवीन चिंतनाची वाट मोकळी झाली. जनतेत संघर्षाची समज विकसित झाली. यामुळे लोकशाही मजबूत झाली आणि देशदेखील. याद्वारेच अनेकदा सत्तापरिवर्तन घडले आणि या जनआंदोलनांनी देशाला अनेक नेतेदेखील दिलेत. सध्या संपूर्ण देशात सीएएविरूद्ध उभे ठाकलेले हे आंदोलन स्वयंस्फूर्त आहे. यामागे कोणताही राजकीय पक्ष नाही. याचा कोणी नेता नाही. खरे तर देशात विरोधीपक्षहीन राजकारणाविरूद्ध जनतेने पाऊल टाकले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भरोशावर राहायचे नाही हे जनतेने आता ठरवून टाकले आहे. जर विरोधी पक्ष दुर्बल सिद्ध होत असेल तर जनता शांत बसणार नाही. हादेखील या आंदोलनाचा सकारात्मक पैलू आहे. या आंदोलनामुळे देशात पहिल्यांदा मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडला आहे. मुस्लिम महिला रस्त्यावर उतरणे हे पहिल्यांदाच घडत आहे. हे आंदोलन मुस्लिमांमध्ये राजकीय समज विकसित होण्याचे माध्यम बनत आहे. इतकेच नव्हे तर मुस्लिम महिला आता आपल्या कुटुंबांदरम्यान आपल्या अधिकारांबाबत जागृत होत आहे. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मुलांवरदेखील पडेल. शाहीन बागपासून ते लखनौ, अलाहाबाद, भोपाळ, मेंगलोर यासारख्या अनेक शहरांमध्ये आंदोलनकर्त्या महिलांची एक मोठी संख्या पुढे येत आहे. त्या संविधानाचे वाचन करीत आहेत. भाषणे देत आहेत. स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. जनवादी गाणे गात आहेत. निश्चिच या आंदोलनानंतर या महिला रिव्हर्स गियरमध्ये जाणार नाहीत. आगामी दोन-तीन वर्षांत याचा सकारात्मक परिणाम देश आणि समाजावर पडलेला आपणास दिसून येईल. आंदोलनाचा परिणाम काहीही असो, मात्र यामुळे देशाचे मूळ सेक्युलर चरित्र समोर आणले आहे. ज्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम आणि शीख या आंदोलनात मुस्लिमांबरोबर सहभागी आहेत ते एक प्रकारे उदाहरण बनले आहे. सरकारला याची अपेक्षदेखील नसावी. सध्या देशातील ४५० हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही आंदोलने होत आहेत. १५० हून अधिक भाषांमध्ये लोक सीएएविरूद्ध घोषणा देत आहेत. हाच देशाचा वारसा आहे. हे आंदोलन मुस्लिमांचे असल्याचे मेन स्ट्रीम मीडिया सांगत असले तरी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या धरणे-आंदोलनात सर्व धर्मांचे लोक सहभागी आहेत. नुकतेच मुंबईतील आझाद मैदानात पार पडलेल्या ‘अलायन्स अगेन्स्ट सीएए-एनआरसी-एनपीआर’च्या महामोर्चामध्ये मुस्लिमांसह इतर सर्व जातीधर्माच्या संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचा पुरावा सादर केला आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४
Post a Comment