Halloween Costume ideas 2015

देशातील ज्वलंत समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठीच असंवैधानिक कायदे - उमर खालिद

पिंपरी (वकार अहमद अलीम)
 प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्षात, देशातील नागरिकांना, स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे, हे निषेधार्ह आहे. आपल्या वंशावळीसह इतर कागदपत्रे सरकारडे सादर करावे लागणार आहेत. पण स्वतः पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री (मनु) स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी कागदपत्रे मागितल्यानंतर, ते अद्याप सादर करू शकले नाहीत. मोदी याबाबत शांत बसले आहेत. अनेक (बोगस) आश्‍वासने भारतीय जनतेला दिली पण एकाही आश्‍वासनांची त्यांनी पूर्तता केली नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी वाढ, बेकारी, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, महिलांची सुरक्षितता आदी प्रश्‍नांनी गंभीर रूप धारण केले आहे. या गंभीर प्रश्‍नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच, संघाच्या अजेंड्यानुसार भाजप सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे असंवैधानिक कायदे आणून देशाचे वातावरण बिघडवत आहेत, असा हल्लाबोल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी केला आहे.
    पिंपरी चिंचवड येथे 17 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संविधान बचाव समितीच्या वतीने नागरिकता सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्याच्या विरोधात आयोजित निषेध सभेत उमर खालिद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध आंबेडकरी चळवळीचे नेते मानोजी कांबळे होते. यावेळी कोलकाता येथून आलेले सर्वोच्च न्यायालयाचे वकील अविक शहा, मारूती भापकर, प्रताप गुरव, अकील मुजावर, प्रताप शुक्ला, सुरेश बेरी, माधव आव्हाड आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तीनही कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
    पुढे बोलताना खालिद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्याही धर्मात भेदभाव केला नाही. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्या सैन्यात व प्रशासनात अनेक मुस्लिम अधिकारी व सैनिक होते.  त्यांचे कार्य आदर्शवत आहे. कर्तव्य बजावताना आपले प्राण अर्पण करणार्‍या धाडसी, निःपक्षपणे कार्य करणार्‍या शहीदे वतन हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात 2 महिन्यात 1100 च्यावर आंदोलने झाली. पण कुठेही हिंसाचार झाला नाही. याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना उमर यांनी सलाम केला. सभेला जनसागर लोटला होता. तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. अत्यंत शिस्तीत व शांततेत निषेधसभा पार पडली. या सभेसाठी बौद्ध समाज विकास महासंघ, संभाजी ब्रिगेड, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघर्ष समिती, नागरी हक्क सुरक्षा समिती, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महासंघ, जमाअत-ए- इस्लामी हिंदसह स्टूडन्ट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन व परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी सहभाग नोंदविला.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget