Halloween Costume ideas 2015

रामनवमीनिमित्त हिंसेचा नवीन पॅटर्न

जातीय दंगली आणि मुस्लिमांची भूमिका


आजही बहुसंख्य हिंदू समाज सहिष्णू व राष्ट्रवादी समाज आहे. सांप्रदायिकतेतून होत असलेली देशाची हानी तो फारकाळ सहन करणार नाही. संविधान हेच भारताला एकत्र ठेवण्याचे एकमात्र डाक्युमेंट आहे हे लवकरच सर्वांच्या लक्षात येईल आणि हा उन्मादाचा अंधार सुद्धा इन शा अल्लाह लवकरच संपेल आणि एकात्मतेचा सूर्य लवकरच उगवेल यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.

’’आता हे अत्याचारी लोक जे काही करीत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही बेसावध समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे, त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहतील.’’(सुरे इब्राहीम 14: आयत नं. 42)

980 च्या दशकात महाराष्ट्रात शिवजयंतीच्या दिवशी ठरवून मुस्लिमांविरूद्ध हिंसा केली जात होती. परंतु मराठा सेवा संघाद्वारे प्रबोधन केल्यामुळे व शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या स्थापनेमध्ये महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांची कर्तबगारी समोर आणल्यामुळे ती हिंसा बंद झाली.

अलिकडे काही वर्षांपासून उत्तर भारतात राम नवमीच्या दिवशी त्याचप्रकारे ठरवून हिंसा करण्याचा एक नवीन पॅटर्न सुरू झालेला आहे. त्याच पॅटर्नच्या अंतर्गत गेल्या आठवड्यात 30 मार्च गुरूवारी रामनवमीच्या दिवशी उत्तर आणि मध्य भारतात तब्बल 24 ठिकाणी हिंसा करण्यात आली. ज्यात मुस्लिमांच्या मस्जीद, मदरसे, घरे आणि दुकानांवर हल्ला करण्यात आला, जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे ही जाळपोळ भाजपाशासित राज्यांपेक्षा जास्त त्या राज्यांमध्ये करण्यात आली ज्या राज्यात भाजपाचे शासन नाही. त्यात विशेषकरून पश्चिम बंगाल आणि बिहारचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

बिहारमधील हिंसा तर अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल ज्यात शेकडो वर्षांपूर्वीचा अजीजीया मदरसा जो की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृहजिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये आहे जाळून टाकण्यात आला. हा मदरसा ऐतिहासिक मदरसा आहे. शोभायात्रेच्या नावाखाली तलवारी आणि पेट्रोल घेऊन तथाकथित रामभक्तांनी मदरशाला वेढा घातला आणि त्याला उभा आडवा जाळून टाकला. या मदरशाबरोबर शंभर वर्षापूर्वीची दुर्मिळ अशी पुस्तके विशेषकरून युनानी वैद्यकीय मेडिसीनची पुस्तके, शेकडो कुरआनच्या प्रती पूर्णपणे जळून भस्म झाल्या. मदरशामध्ये जुने शिसम आणि सागवानचे ऐतिहासिक फर्निचरसुद्धा जळून राख झाले. मदरशाचे प्राचार्य मौलाना कासीम यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितले की, 4 हजार 500 पेक्षा दुर्मिळ पुस्तके जळून राख झाली. हा मदरसा अतिशय सुसज्ज असा मदरसा होता. याचा स्वतःचा असा सोनेरी इतिहास होता. याची स्वतःची संपत्ती आहे. म्हणून हा मदरसा कुठल्याही लोकांच्या चंद्यावर चालत नाही. या मदरशाला बीबी सुगरा वक्फ स्टेट द्वारे संचलित केले जाते. एक दानशूर महिला बीबी सुगरा यांनी आपले पती अब्दुल अजीज यांच्या स्मरणार्थ हा मदरसा सुरू केला होता. 1896 मध्ये बीबी सुगरांनी आपली सर्व संपत्ती ज्याचे त्यावेळेस वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार होते. त्यांनी मदरशाला दान केली. आजही  बीबी सुगरा वक्फ स्टेट नालंदा द्वारे हा मदरसा संचलित केला जातो. 

महाराष्ट्रातसुद्धा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) च्या किराडपुरा भागामध्ये रामनवमीनिमित्त राममंदिरासमोर ठरवून हिंसा करण्यात आली. यात एक व्यक्ती ठार तर अनेक वाहनांची आणि इतर संपत्तीची जाळपोळ करण्यात आली. विशेष म्हणजे या वेळेस बिहारमधील रामनवमीच्या हिंसेचा वनवा पहिल्यांदा नेपाळमध्ये सुद्धा पोहोचला आणि त्या ठिकाणी अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना हानी पोहोचविण्यात आली. 

सर्वच ठिकाणच्या दंगलीचा आढावा या लेखामध्ये घेता येणे शक्य नाही. वाचकांना इतर ठिकाणचा तपशील बातम्यांमधून कळालेलाच आहे. आता आपण हे दंगे का घडविले जातात याबद्दल उहापोह करूया.

हिंसा का घडविली जाते?

भारतात मुस्लिमांविरूद्ध होणाऱ्या हिंसेचा इतिहास जूना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशी हिंसा होत आलेली आहे. परंतु फाळणीनंतर दंगलींची तिव्रता अधिक वाढली आहे. दंगल झाली म्हणजे मुस्लिमांची हानी झाली ही ठरलेली बाब आहे. याचे प्रमुख कारण एकच आहे ते म्हणजे हिंदू-मुस्लिमांमधील वैरभाव. 

सनातन हिंदूधर्म अनेकवेळेस विभाजित झालेला आहे. त्यातून जैन आणि लिंगायत धर्मासारखे धर्म उदयास आलेले आहेत. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्विकार केल्याची ऐतिहासिक घटना फार जुनी नाही. शिखही हिंदू धर्मातून वेगळे होऊन एक नवीन धर्म घेऊन पुढे आलेले आहेत. या सर्वांप्रमाणेच बहुसंख्य बहुजनहिंदूही हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाममध्ये सामील झालेले आहेत. ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नाही. शेकडो वर्षांचा यामागे इतिहास आहे. बरे ! हे सर्व घटक जे हिंदू धर्मापासून वेगळे झाले आहेत त्या साठी  सनातन धर्मियांची वर्णव्यवस्थाच कारणीभूत आहे. वर्णव्यवस्थेएवढी माणसामाणसामध्ये भेद करणारी दूसरी व्यवस्था जगाच्या पाठीवर दिसून येत नाही. उच्च वर्णीयांना केवळ जन्माच्या आधारे अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक लाभ मिळतात. तर निम्न वर्णियांसाठी प्रयत्न करूनही हे लाभ मिळू शकत नाहीत, अशी भूतकाळात स्थिती होती. त्यांना मंदिरात जावू दिले जात नव्हते. म्हणून ते मस्जिदीमध्ये गेले. पुरोहित त्यांना स्पर्श करत नव्हते म्हणून ते मुस्लिम सुफी संतांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या सर्वाचे स्वागत केले. स्वतःच्या दस्तरखानवर सोबत घेऊन जेवण केले. खांद्याला खांदा लावून नमाज अदा करण्याची संधी दिली. त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार केला. त्यामुळे साहजिकच क्षुद्र आणि बहुजन या सुफी संतांच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममय झाले. यात दोष त्यांचा नाही तर सनातन पुरोहितांचा आहे. ही गोष्ट आज 21 व्या शतकात संघाच्या लक्षात आलेली आहे व सरसंघचालक यांनी यासाठी ’पंडित’ जबाबदार असल्याची नुकतीच खंत व्यक्त केलेली आहे. व्यापक हिंदुत्त्वाच्या नावाखाली जरी बहुजणांनी एका झेंड्याखाली संघाने आणण्यामध्ये यश मिळविले असले तरी ग्राऊंड रिअ‍ॅलिटी पूर्वीसारखीच आहे. आजही खेड्यापाड्यात मागासवर्गीयांशी भेदभाव केला जातो. याची तीव्रता भूतकाळातील भेदभावाएवढी तीव्र जरी नसली तरी काही प्रमाणात का असेना ती आजही अस्तित्वात आहे. आजही यांच्यामध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाही. सुशिक्षित हिंदू तरूणींनी दलित तरूणाशी विवाह केलाच तर त्याचे काय परिणाम होतात हे पहायचे असेल तर नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट वाचकांनी आवर्जुन पहावा. 

सनातन धर्मावलंबियांच्या मानसिकतेमध्ये आजही तीळमात्र फरक पडलेला नाही. याचा पुरावा रामनवमीची हिंसा आहे. दोष स्वतःचा असतांना हे लोक धर्म सोडून मुसलमान का झाले? हा राग त्यांना स्वस्थ बसू देत नाही. परिणामी, त्यांचा तो राग दंगलींच्या मार्गाने अधूनमधून व्यक्त होत असतो. पण हा त्यांचा राग केवळ मुसलमानांची हानी करणारा नाही तर राष्ट्राची हानी करणारा आहे. एवढी साधी बाबही त्वेषाची बाधा झालेल्या त्यांच्या या तरूणांच्या लक्षात येत नाही. 

गेल्या 75 वर्षांमध्ये झालेल्या एकूण जातीय दंगलींमध्ये झालेल्या एकूण राष्ट्रीय संपत्तीची हानी किती झाली याचा अंदाज जरी केला तरी शालेय स्तराच्या बुद्धिमत्ता असणार्या व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येईल की, महासत्ता होण्याची पात्रता असतांनासुद्धा आपला देश महासत्ता का होऊ शकला नाही? जोपर्यंत जातीय दंगली बंद होणार नाहीत, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांवर अत्याचार बंद होणार नाहीत आणि त्यांना राष्ट्रनिर्माणाच्या कामामध्ये योग्य भूमिका दिली जाणार नाही, स्पष्ट आहे तोपर्यंत देश महासत्ता होऊ शकणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पण हे सनातनी सवर्ण वर्गाच्या लक्षात येईल तो सू दिन. 

जातीय दंगली आणि मुस्लिमांची भूमिका 

मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि गरीब लोकांचा भरणा आहे. हे लोक दैववादी आहेत. त्यांच्यात जातीयदंगली का होत आहेत? याची चिकित्सा करण्याइतपत क्षमता नाही. दुर्दैवाने ज्या उलेमांचा हा समाज ऐकतो त्यांनीही कधी अशी चिकित्सा करण्याचा आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. इतर मुस्लिम बुद्धीजीवींचे म्हणणे हा वर्ग ऐकत नाही. परंतु समाज माध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे अलिकडे परिस्थितीमध्ये बदल घडत आहे. अनेक मुस्लिम तरूण आणि बुद्धीजीवी यांच्यात जातीय दंगली, युएपीएचा दुरूपयोग आणि मुस्लिमांविषयी सर्वपक्षीय राजकारण्यांची दुटप्पी भूमिका इत्यादींबद्दल समज निर्माण होत आहे आणि ते व्यक्तही होत आहेत. 

हिंसेवर उपाय

याबद्दल माझे मत दोन मुद्यांवर आधारीत आहे. पहिला मुद्दा असा की मुस्लिमांनी ज्यू समाजाचा अभ्यास करावा. ज्या ज्यू समाजाने प्रेषित येशू ख्रिस्त (अलै.) यांना सुळावर चढविले. त्यांच्याबद्दल बहुसंख्य ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र घृणा असायला पाहिजे हवी होती. सुरूवातीच्या काळात ती होतीही. परंतु ज्यू समाजाने आपल्या बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर ख्रिश्चनांच्या घृणेवर विजय मिळविला आणि आज ज्यू समाज युरोप आणि अमेरिकेमध्ये एवढा शक्तीशाली झालेला आहे की, जो बायडन यांच्या वक्तव्याला सपशेल उडवून लावण्याचे धाडस बेंजामिन नेतनयाहू यांनी मागच्याच आठवड्यात केले आहे. हिटलरच्या अभूतपूर्व अशा छळानंतर ज्युंनी स्वतःला कसे सावरले? 50 टक्क्यांपेक्षा जास्त नोबल पारितोषिके कशी पटकावली? नवनवीन हत्यारांची निर्मिती कशी केली? नवनवीन वैज्ञानिक शोध कसे लावले? आणि या सर्वांचा उपयोग सर्वांसाठी कसा खुला केला? त्यांच्या कडे सिनेमा उद्योग का नाही? याचा अभ्यास मुस्लिमांनी करावा व आपल्याला ज्यूंनी जसे स्वतःला ख्रिश्चनांसाठी उपयुक्त समूह म्हणून सिद्ध केले तसेच मुस्लिमांना हिंदूंसाठी ते उपयुक्त समूह आहेत हे सिद्ध करावे लागेल. 

दूसरा मुद्दा असा की, मुस्लिम समाज हा एक मिशनरी समाज आहे. याचाच विसर या समाजाला पडलेला आहे. या समाजाला जोपर्यंत कुरआनने त्यांना दिलेल्या उद्देशाची जाणीव होणार नाही व ते स्वतःला वैचारिक व शैक्षणिकरित्या प्रत्यक्ष कृतीसाठी व्यवहारिकरित्या तयार करणार नाहीत तोपर्यंत हा समाज न स्वतःच्या उपयोगाचा आहे ना देशाच्या. 

कारणे काहीही असोत मुस्लिमांची ही स्थिती यासाठी झालेली आहे की, मुस्लिमांनी कुरआनच्या शिकवणी पासून स्वतःला विलग करून घेतलेले आहे. जोपर्यंत हा समाज स्वतःला कुरआनच्या मार्गदर्शनाशी पूर्णपणे जोडून घेणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध होणारी हिंसा, त्यातून होणारी हानी का होत आहे व तीला कसे सामोरे जावे हे त्यांच्या लक्षात येणार नाही. घृणेचे रूपांतर प्रेमामध्ये, शत्रुत्वाचे रूपांतर मित्रत्वामध्ये करण्याची कला त्यांना कुरआनी मार्गदर्शन आत्मसात केल्याशिवाय अवगत होणार नाही. कुरआनमधून केवळ एका आयातीचा दाखला देतो. 

’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. ’’ (सूरे हाम मीम सज़दा क्र. 41: आयत क्र. 34)

आपल्याविरूद्ध होत असलेल्या हिंसेमुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु शांत डोक्याने मुस्लिमांनी या सर्व परिस्थितीचे विश्लेषण प्रेषितांच्या जीवनाच्या परिस्थितीशी जोडून करावे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना अशाच घृणेचा सामना मक्का शहरातील मूर्तीपूजकांकडून करावा लागला होता. त्यांच्या सोबत्यांची आज होत आहे तशीच मॉबलिंचिंग झाली होती. आज जसे मुस्लिमांवर अत्याचार होत आहे तसेच अत्याचार मक्का शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होत होते. त्या परिस्थितीवर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कशी मात केली याचा अभ्यास मुस्लिमांनी करावा आणि कुरआनच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आपली भविष्यातील योजना करावी. सुलह हुदैबियामध्ये ज्याप्रकारे एकतर्फी संयम राखण्यात आला होता अगदी तसाच संयम राखून या देशाच्या निर्मितीमध्ये स्वतःला झोकून द्यावे. 

लक्षात ठेवा मित्रानों! आजही बहुसंख्य हिंदू समाज सहिष्णू व राष्ट्रवादी समाज आहे. सांप्रदायिकतेतून होत असलेली देशाची हानी तो फारकाळ सहन करणार नाही. संविधान हेच भारताला एकत्र ठेवण्याचे एकमात्र डाक्युमेंट आहे हे लवकरच सर्वांच्या लक्षात येईल आणि हा उन्मादाचा अंधार सुद्धा इन शा अल्लाह लवकरच संपेल आणि एकात्मतेचा सूर्य लवकरच उगवेल यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. 

शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, हे अल्लाह माझ्या या प्रिय देशबांधवांपैकी जे घृणेच्या मार्गावर चालून राष्ट्रीय संपत्तीची हानी करीत आहेत त्यांना चांगली समज आणि शक्ती प्रदान कर. आमीन.

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget