Halloween Costume ideas 2015

पाणी हेच जीवन


इंग्रजीत अशी म्हण आहे ’'Without Water No Life'’ म्हणजे पाण्याशिवाय जीवन नाही. पाण्याचे महत्व ओळखून असे ही बोलले जाते. तिसरे महायुध्द झाले तर आता पाण्यासाठी होईल. म्हणून ’जलसाक्षरता’ काळाची गरज आहे. शासनाची वाट न पाहता प्रत्येकाने ’पाणी वाचवा आणि जीवन वाचवा’ ही मोहीम सर्वांनी अमलात आणली पाहिजे. यासाठी पाण्याचा योग्य वापर काटकसर, प्रदूषणमुक्त पाणी वापरणे गरजेचे आहे. ’पाणी वाचवा जग वाचवा’ ’जल है तो कल है ’ ही चळवळ आपआपल्या घरापासून सुरु केली पाहिजे.

22 मार्च हे जागतिक जल दिन नुकतेस साजरे करण्यात आले. डॉ. माधवराव चितळे या भारतीयाने जागतीक जल दिन साजरा करण्याचा प्रश्न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच ’यु.एन.ओ.’ च्या सर्वसाधारण सभेने 22 मार्च 1993 रोजी पहिला ’वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेंव्हापासून दरवर्षी युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.

शरीररासाठी पाणी अमृत आहे. प्रत्येक सजीवाला जीवन देणारे आहे. मानवाला, प्राण्याला, जेवढी गरज पाण्याची आहे तेवढीच गरज वनस्पतीना सुध्दा आहे. वनस्पती पासून आपल्याला फळे-फुले, लाकूड, औषध, अन्नधान्य मिळतात. मग वनस्पती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुध्दा केली जाते. पाणी नसल्याने शेती ओसाड ठरत आहे. नद्या, धरण, तलाव, विहीरींमधील पाणीसाठा आता अपुरा पडू लागला आहे. झाडे, मनुष्य आणि इतर प्राणीही या पाणी टंचाईचे बळी पडत आहेत. अन्नाशिवाय एखादा सजीव महिनाभर जगू शकतो. पण पाण्याशिवाय कांही दिवसही अशक्य आहे. आपल्या शरिरात 85 टक्के पाणी असते. शरीराच्या विविध अवयवांच्या हालचालींसाठी पाण्याचे महत्व मोठे आहे. त्यासाठी शुध्द पाण्याची आवश्यकता आहे. शरिराच्या तापमानाच्या नियंत्रणासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी पाण्याचे विशिष्ट प्रमाण आपल्या शरीरात असणे आवश्यक आहे. नाहीतर डिहायड्रेशन (शरीरात पाणी कमी होण्या)चा धोका असतो. पिण्याचे पाणी शुध्द असावे हे आयुर्वेदात आवर्जून सांगितले आहे.

उन्हाळा सुरु झाला की गार पाणी पिण्याकडे कल वाढतो. शक्यतो गार पाणी पिणे टाळावे. माठात गार केलेले पाणी पिणे उत्तम. सध्या बर्फ घालून पाणी पिण्याचा किंवा फ्रिज मधील थंड पेये पिण्याची पध्दत रुढ होत चालली आहे. ती अयोग्यच नसून आरोग्यासाठी हानीकारक आहे. शुध्दपाणी अलिकडे दुर्मिळ झालेले आहे. एकूण उपलब्ध पाण्याच्या 97 टक्के पाणी समुद्राचे खारे पाणी आहे. असलेल्या तीन टक्क्यापैकी दोन टक्के हिमनद्या व ध्रुवीय प्रदेशातील बर्फामध्ये आहे. मानवी उपयोगासाठी फक्त एक टक्का पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी 0.62 टक्के सहज उपलब्ध आहे. तर 0.38 टक्के पाणी भूगर्भात 800 मिटरपेक्षा खोल समावले आहे. पाणी ही एक राष्ट्रीय नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याची मालकी सर्व समाजाची आणि देशातील सर्व लोकांची आहे. याची जान प्रत्येकाला हवी. 

पिण्याच्या पाण्याची टंचाई, तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब अडवणे, त्यांना मुरविणे यासाठी शास्त्रोक्त पाणलोट विकास कार्यक्रम राबविणे हा एकमेव मार्ग आहे. शेतीसाठी पाणी वापर करतांना तुषार अथवा ठिबक प्रणालीचा वापर बंधनकारक असावा, बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी टाळावे, ’पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ हे धोरण अवलंबवावे, सार्वजनिक नळाची रात्रभर चालू राहिलेली तोटी बंद करावी, बेसीन व बाथरुम मधील नळांचा गरजेपूर्ताच वापर करावा, औद्योगिकरणामुळे होणारे पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण टाळावे. डोंगरमाध्यापासून पायाथ्याकडे वाहणारे पाणी अडवून योग्य वापर करावे. छपरावर पडणाऱ्या पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून ठेवावा. वृक्षतोड थांबवून झाडांचे संवर्धन करावे, झाडे पाणी वाहण्याच्या वेगावर मर्यादा घालतात. जलप्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे औद्योगिकरण. कारखान्यातून निघणारा रासायनिक कचरा थेट नद्या व तलावामध्ये टाकला जातो. त्यामुळे नद्यांचे व तलावाचे पाणी विषारी होवून मासे व इतर जलचर प्राण्यांचे जीव धोक्यात येतात. हे पाणी पिण्योग्य नसल्याने आपल्याला पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागतो. माणसा बरोबर इतर प्राण्यांना सुध्दा अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. उद्योगाव्यतिरिक्त पाणी प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. कांही ठिकाणी लोक दैनंदिन कचरा देखील नद्या, नाले व तलावामध्ये टाकतात. आज लोक शेतीत रासायनिक खते व किटकनाशके देखील वापरतात. जेंव्हा नद्यांचे दूषीत पाणी समुद्रात येते तेंव्हा समुद्राचे पाणीही दूषीत होते. प्लास्टीकचा वापर वाढल्यामुळे लोक प्लास्टिकही नद्यांच्या पाण्यात टाकतात. त्यामुळे प्लास्टिकचा ढिग जमा होऊन नद्यांमध्ये गाळ साचतो. शहरात पूर येण्याची शक्यताही वाढते. कधी-कधी जेंव्हा एखादा अपघात होतो तेंव्हा जहाजांचे तेल समुद्रात पसरते. त्यामुळे समुद्राचे पाणी दूषीत होते. हे तेल समुद्रात सर्वत्र पसरुन जलचर पाण्यांचे जीवन धोक्यात येते. लोक नदी किंवा तलावाजवळ कपडे व भांडी धुतात. त्यामुळे नदी आणि तलावांचे पाणी दूषित होते. अशा अनेक कारणामुळे पाण्याचे प्रदूषण होते. जगातील सजीवांना वाचवण्यासाठी आणि हे जग सुंदर करण्यासाठी जलसाक्षरतेची चळवळ उभी करु या. आपला वेळ, आपली बुध्दी आणि आपला पैसा या चळवळीसाठी खर्च करु या. हे जग सुंदर करण्यासाठी प्रयत्न सुरु करु या. एवढेच नम्र आवाहान करतो. धन्यवाद !

- प्रा. डॉ. सय्यद अकबरलाला

9422072105 / 7755979786


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget