Halloween Costume ideas 2015

वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचे भाषण…


बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ ला येवला येथे ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू सनातनी कर्मठ धर्ममार्तंडाच्या वागणुकीत काही बदल होतो का, म्हणून तब्बल २० वर्षेवाट पाहिली आणि १९५६ मध्ये त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लाखोंच्या संख्येने हिंदूंची संख्या कमी झाली ती मुसलमानांचा अन्याय, अत्याचारामुळे नव्हे तर हिंदुत्वाच्या जन्मजात वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनेने दलितांवर केलेल्या छळामुळे आणि खापर फोडतात मुस्लिमांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे म्हणून!

पाकिस्तान निर्मितीला जबाबदार खऱ्या अर्थाने सनातनी ‘हिंदुत्ववादी’च आहेत. जिना मूळचे हिंदू लोहाना समाजाचे. त्यांच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय. लोहाना समाजात मासेमारीचा व्यवसाय निषिद्ध. म्हणून कर्मठ सनातनी हिंदुत्वाद्यांनी त्यांचा छळ केला. याच छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. दुर्दैवाने खरा इतिहास लिहिल्या गेलाच नाही. काश्मिरी पंडितांवरील मुस्लिमांनी केलेल्या भीषण अन्याय-अत्याचाराचे अतिरंजित चित्रण ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमात केले आहे. मुस्लीमद्वेषावर आधारित या सिनेमाचे ‘प्रमोशन’ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले. या सिनेमाने करोडोचा धंदा केला व मुस्लीम द्वेषाचे भरघोस पीक या माध्यमातून घेतले गेले. जे भाजपाला भविष्यात ‘राजकीय’ फायदा करून देईल. पण या विषयाची एक दुसरीही बाजू आहे. हरिसिंग काश्मीरचे राजे होते तेव्हा मोठ्या संख्येनी हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेल्या मुस्लिमांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेण्याची विनंती केली. हरिसिंगांनी त्यांना सांगितले, ‘हा प्रश्न धर्मक्षेत्रातील असल्यामुळे यावर निर्णय काश्मीरी पंडित घेतील.’ निर्णयासाठी हा प्रश्न काश्मिरी पंडितांकडे सोपविण्यात आला. पण काश्मिरी पंडितांनी या प्रश्नापासून हात झटकत या प्रश्नावर केवळ काशीचे पंडितच निर्णय देऊ शकतात, असा निवाडा दिला. काशीच्या पंडितांनी त्या धर्मांतरित मुस्लिमांना हिंदू धर्मात घेण्यास नकार दिला. आता हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याला जबाबदार कोण? हिंदू धर्माचे धर्ममार्तंड की मुस्लीम?

काँग्रेसच्या काळात शेषनसारखा खमक्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होण्याची शक्यता होती. आता असा शेषन तयार होण्याआधीच कोणत्या का कारणाने होईना तुरुंगामध्ये जाईल आणि वर्ष दोन वर्षेत्याची जमानतही होणार नाही. विरोधकांच्या बाबतीत इतकं टोकाचं, सुडाचं राजकारण आधीच्या सत्तेने केलं नाही. सत्तेच्या माध्यमातून चालणारी न्यायदानाची प्रोसेस हीच आज पनिशमेंट म्हणून उघड्या नागड्या पद्धतीने काम करीत आहे. सत्ताधारी पक्ष आज एक प्रकारे वॉशिंग मशीनचं काम करीत आहे. त्यांच्यासोबत असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! त्याच्याबाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि त्यांच्या विरोधात जालं तर ‘देशद्रोही’! भाजपा म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’. अशाप्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे.

२०१६ नंतर सरकारने ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’मार्फत देण्यात येणारी शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देणं थांबविलं म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, असंही होत नाही. फक्त त्या प्रश्नांची तीव्रता त्यामुळे जाणवत नाही एवढेच. मोदी सरकारने कोरोनाचा कहर सुरू असताना शेतकरी ‘कल्याणा’साठी तीन अध्यादेश घाईगर्दीने काढले. या अध्यादेशातील करार शेतीचे समर्थन करताना सरकार म्हणाले होते, ‘शेतकर्‍यांजवळ शेती आहे, पण भांडवल नाही आणि कंपन्यांकडे भांडवल आहे पण शेती नाही.’ या विधानानंतर परत प्रश्न पडतो; पण मुळात शेतकऱ्यांकडे भांडवलचं का नाही? परंतु हा प्रश्न आपल्याला पडतही नाही आणि पडूही दिल्या जात नाही.

दुधाचे भाव वाढले तर गरिबांच्या मुलांना घोटभर दूधही दुरापास्त. आणि मग यासाठी (भाव पाडण्यासाठी) सरकारचा हस्तक्षेप आनंदी आनंद. पण शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाचे भाव गडगडले तर सरकार हात झटकून मोकळे. हा शेतीच्या लुटीचा कावाच असतो ना! शेतीत येणारे उत्पादन, त्यासाठी होणारा खर्च व त्याला दिली जाणारी किंमत वा मिळणारी किंमत इथेच खरं तर पाणी मुरते. गेल्या कित्येक वर्षांची आकडेवारी पाहिली तर राज्यशासनाने शिफारस केलेल्या भावाच्या तुलनेत केंद्र सरकारने जाहीर केलेले अंतिम हमीभाव हे जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंतच होते. म्हणजे राज्य सरकारने काढलेला खर्च व दिल्या गेलेल्या किमती येथेच मुळात ‘गड्डा’ (तोटा) ३० टक्क्यांचा. शेतकरी ‘खड्ड्यात’ जाणार नाही तर दुसरं काय होणार?

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक शेतकरी ‘कल्याणा’चीच भाषा झाली. पण त्याचे कल्याण तर सोडाच, अकल्याणच जास्त झाले. स्वातंत्र्यानंतर गोरगरिबांच्या कल्याणासाठी एवढा खटाटोप केल्याचं सांगितलं जातं, पण त्यांचं भलं न होता त्यांचं वाईटच होतं. आणि भलं मात्र काही मूठभर लोकांचेच होते. त्यातही अदानी-अंबानीचेच कोट-कोट कल्याण होते. हा काय चमत्कार आहे. कोण्या शायरच्या या ओळी आहेत माहिती नाही. तो विचारतो,

‘देखकर फसल अंधेरो की

आप हैरत में क्यू हो

तुमने अपने खेतो में

उजाले बोये ही कहाँ थे?’

या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमाणसांमध्ये मोठा होऊ शकत नाही. स्वतःची जात व त्या जातीचे हितसंबंध, त्या जातीचे जन्मजात वर्णश्रेष्ठत्व यापलीकडे ज्यांची ‘करुणा’च पोहोचत नाही, ते काय खाक मोठे होणार? त्यांना असंघटनेच्या अंतर्गत कितीही प. पू. म्हटले तरीही. म्हणून मग ते आपल्याच लोकशाहीवादी, समतावादी नेत्यांचे अपहरण करतात. स्वामी विवेकानंदांचं असचं अपहरण केलं. त्यांनी भगवे कपडे परिधान केले असल्यामुळे त्यांनाही ते सोपं गेलं आणि आम्ही त्या अपहरणाला हातभार लावला. पण, आता दत्तप्रसाद दाभोळकरांनी खरा विवेकानंद समजावून सांगितला तेव्हा तो त्यांचा नाहीच हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. आज दत्तप्रसाद दाभोळकरांना त्यांनी विवेकानंदांच्या बाबतीत सत्यकथन केले म्हणून पोलिस संरक्षणात जगावं लागतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही याच मंडळींनी ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून ‘हिंदुत्वाच्या’ तुरुंगात डांबून ठेवले होते. मुस्लिमांच्या विरोधात त्यांचा यथेच्छ वापर करून घेतला. त्यांची ‘हिंदुत्वा’च्या तुरुंगातून गोविंद पानसरेंनी सुटका केली. या पापाची शिक्षा म्हणून पानसरेंची हत्या झाली. आता राहता राहिले सावरकर. पण, त्यांनी सावरकरांच्या कितीही महिमा गायल्या तरीही त्यांच्याबाबत उपलब्ध असलेले पुरावे त्यांचा हा खोटा महिमा काळवंडून टाकणारच आहे. त्या भरोशावर त्यांची उतमाज सुरू आहे. सर्व स्वायत्त संस्था, प्रसारमाध्यमे त्यांनी वेठीस धरली आहेत. अशा वेळेसच खऱ्या अर्थाने ‘विद्रोहा’ची गरच असते.

सत्ताधार्‍यांच्या असत्य प्रस्थापित करण्याला ललकारण, आव्हान देणे, प्रश्न विचारण्याची आता खरी गरज आहे. ते प्रश्नांची ‘नाकेबंदी’ करतील. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून प्रश्नांची ‘नसबंदी’ही करतील. या अन्यायाविरोधात यापुढे प्रखर असा लढा उभारावा लागेल. तोच खरा विद्रोह असेल आणि विद्रोही संमेलनाची फलश्रुतीही.

१९८० मध्ये मी व माझी बायको माया यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या गावी रहायला गेलो. सोबत कोण्यातरी महापुरुषांच्या विचारांनी विणलेली खाट घेऊन गेलो आणि त्या खाटेवर त्या परिसरातील माणसांना बसविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण माणूस त्यावर आडवा करून झोपवायचा प्रयत्न करायचो. तेव्हा तो माणूस पूर्णपणे त्यात मावायाचा नाही. कधी डोके तरी बाहेर यायचे. डोके आत घेतले तर पाय बाहेर यायचे. कड फेरला तर हात बाहेर यायचे. खाट तर महापुरुषांच्या विचारांनी विणलेली. माझ्या लेखी या खाटेमध्ये कोणतीही चूक असण्याची शक्यता नाही. त्यात अपुरेपणा तर असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण ती खाट विणलेलीच महापुरुषाने. तो कसा चूक असणार? चूक असलीच तर त्या माणसात असेल. त्या खाटेच्या बाहेर माणसाचे पाय येत असतील तर त्या माणसाच्या पायातच काही खोट असेल. डोके बाहेर येत असेल तर त्याच्या डोक्यातच काही फरक असेल आणि हात बाहेर येत असलीतल तर त्याच्या हाताचच काही मिस्टेक असेल. महापुरुष कसा चुकू शकतो? काही डिफेक्ट असेल तर तो त्या माणसात.

म्हणून मग मी त्या माणसाला त्या खाटेवर परफेक्टपणे बसविण्यासाठी त्या माणसाचे बाहेर येणार पाय कापू लागलो, हात कापू लागलो. आणि खाटेवर फीट बसविण्यासाठी त्याचे डोकेही कापू लागलो. महापुरुषाने ज्या काळात त्या विचाराची खाट विणली तो काळ. त्याच्या वेळेचा माणूस त्या खाटेवर बरोबर बसला असेल; पण आताच्या माणसाला ती अपुरी पडत असेल. म्हणून त्या खाटेचा ‘विस्तार’ करण्याची गरज आहे हेच मी विसरून गेलो की काय? हाही स्वतःशीच विचार करण्याची गरज आहे. या विचारांची खाट, त्या विचारांची खाट असे आम्ही ‘खाटमांडू’ तर झालेलो नाही ना? माणसापेक्षाही माझी ‘खाट’ आणि खाटमांडूंचे आपआपसात सदासर्वकाळ भांडू-भांडू असे काही तर होत नाही ना? या अंगानेही स्वतःला तपासावे लागेल. माणसांसाठी खाट असेल, खाटेसाठी माणूस असू शकत नाही. तव्दतच माणसांसाठी विचारधारा असेल, विचारधारेसाठी माणूस असणार नाही.एकेकाळी मुंबईत कामगार चळवळ प्रभावी होती व त्यावर कम्युनिस्ट विचारधारेचा मोठा प्रभाव होता. पण, म्हणून गणेशोत्सव मुंबईत थांबला होता, असे दिसत नाही व बंगालमध्ये अनेक दशके कम्युनिस्टांची सत्ता होती म्हणून तिथला दुर्गोत्सव थांबला तर नाहीच. उलट कमीसुद्धा झाला नाही. सर्वसामान्यांना देव लागत असावा. याची जाणीव संतांना सुद्धा असावी असे दिसते. म्हणूनच ‘विठ्ठल विठ्ठल’ करणारे तुकाराम महाराज म्हणतात,

‘देव आहे ऐसी वदवावी वाणी

देव नाही ऐसे जाणावे मनीफ

ज्ञानेश्वरांची एक ओवी अशाच आशयाची आहे. संत गाडगेबाबा पंढरपूरला जायचे; पण कधी मंदिरात गेले नाही. तुमच्या देवावर कुत्रं टांग करून मुतते असे जाहीरपणे ते म्हणायचे आणि लोकही ते ऐकून घ्यायचे. कारण गाडगेबाबांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही टॅग लाईन धरून ठेवली होती. समाजातून देव रिटायर्ड करायला निघालेल्या डॉ. श्रीराम लागूंना आपल्या घरातले देव रिटायर्ड करता आले नाहीत.

कोणत्याही देशात जा. देश प्रगत वा अप्रगत असू द्या. मागासलेला वा पुढारलेला असू द्या. साक्षर वा निरक्षर असू द्या. त्या देशातील राष्ट्रध्वजाबद्दल म्हणा, ‘या फडक्याने मी माझ्या घराची फरशी पुसतो.’ तुम्ही कोणत्याही देशात असा तुमचा मुडदा पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे शेंदूर फासलेल्या दगडाला दगड म्हणून चालत नाही.

आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहीरातील वा कार्यक्रमात ‘आम्ही कोणत्याही देवा धर्माच्या विरोधात नाही’ या वाक्यानेच सुरुवात करावी लागते. यातील गमक ‘विद्रोही’ म्हणविणार्‍यांनी वेळीच ओळखलेले बरे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल. पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील. पण, तेथे येणार्‍या वारकर्‍याला ‘कशाला येथे येतोस मरायला?’ असं कधी म्हणाले नाही. त्याची त्या गर्दीतील गैरसोय बघून, निवार्‍याला जागा नाही बघून त्यांनी त्यांच्यासाठी करुणेतून धर्मशाळा बांधली. विद्रोहातून, क्रांतीतून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं याचही भान ‘विद्रोही’नी बाळगलं पाहिजे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं हासुद्धा विद्रोह ठरू शकतो, याची मला जाणीव आहे. माणसा-माणसांनी दंगलीत केलेल्या परस्परांच्या कत्तलीतून झालेल्या रक्तमांसाच्या चिखलातूनच कमळ चांगला फुलतो, याची कमळीवाल्यांना चांगलीच जाणीव आहे आणि द्वेषाच्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विषाणूचं पोषण होतं, याची कल्पना रेशीमबागेतील भागमभाग करणार्‍याला आहे. त्यामुळे त्या विषाणूंना पोषक ठरणार्‍या द्वेषाला दूर सारत प्रेमाचा अंगीकार करणे, हाच सध्याच्या काळातील ‘विद्रोह’ ठरणार आहे, याची मला खात्री आहे.                                                       

(उत्तरार्ध)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget