Halloween Costume ideas 2015

संततीला चांगलं भविष्य द्या : पैगंबरवाणी (हदीस)


हजरत सअद बिन अबी वकास म्हणतात की मी गंभीर आजारी असताना प्रेषित मुहम्मद (स.) माझी विचारपूस करण्यासाठी घरी आले. मी त्यांना सांगितले की आपण पाहता, मी किती गंभीर आजाराने ग्रस्त आहे. माझ्याकडे बरीच संपत्ती आहे. मला फक्त एकच मुलगी आहे. अशात मी माझ्या संपत्तीतून दोनतृतियांश दानधर्म करू इच्छितो. प्रेषितांनी सांगितले, "नाही. " मी विचारले की अर्धी संपत्ती. प्रेषित (स.) म्हणाले, "नाही." मग मी विचारले की एकतृतियांश संपत्ती दान करू का? प्रेषित म्हणाले, "होय. एकतृतियांश, पण तीही जास्तच आहे. तुम्ही आपल्या वारसदारांना चांगल्या आर्थिक स्थितीत सोडून जाणे बरे आहे. त्यांना दारिद्र्याशी तोंड द्यायला लागू नये."

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "तुम्ही जे अन्नाचे सेवन करता ते तुम्ही दान दिल्यासारखे आहे. जे अन्न तुम्ही आपल्या मुलाबाळांना कायला देता, तेही दानच आहे. तसेच जे तुम्ही आपल्या पत्नीला खाऊ घालता तेही दान दिल्यासारखेच आहे. (म्हणजे याचासुद्धा मोबदला अल्लाहकडून दिला जाईल.)" (अल-अदद अल मुफर्द, मुकबाम बिन मादीकद, तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "असा मुस्लिम जो लोकांशी मिळूनमिसळून राहतो, त्यांनी दिलेल्या यातना सहन करतो, अशा मुस्लिमापेक्षा चांगला आहे जो लोकांशी संबंध ठेवत नाही आणि जर कुणी त्याला त्रास दिला तर त्याचे त्याला वाईट वाटते." (ह. इब्ने उमर, तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "ज्या माणसाच्या मनात थोडासुद्धा अहंकार आहे आणि घमेंड आहे तर तो स्वर्गात जाणार नाही." त्यावर एका माणसाने विचारले की कुणाला चांगली वस्त्रे पसंत असतील किंवा त्याचे बूट चांगले असावेत. यावर प्रेषितांनी उत्तर दिले, "अल्लाह स्वतः सुंदर आहे आणि सौंदर्य त्याला आवडते. अहंकार म्हणजे स्वतः ऐटीत राहणे आणि इतरांना कमी लेखणे आहे." (ह. अब्दुल्लाह इब्ने मसऊद, मुस्लिम मिश्कात)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, (अंतिम निवाड्याच्या दिवशी) एक दास अल्लाहच्या समोर येईल, अल्लाह त्याला विचारील, ``हे अमुक माणसा, मी तुला प्रतिष्ठा दिली नव्हती काय? तुला पत्नी दिली नव्हती काय? तुझ्या ताब्यात घोडे आणि उंट दिले नव्हते काय? आणि मी तुला अवधी दिला नव्हता काय? तू तुझे राज्य चालवित होता आणि लोकांकडून कर वसूल करीत नव्हता काय?'' तो त्या ईशदेणग्यांचा स्वीकार करील. मग अल्लाह त्याला विचारील, ``तुला एक दिवस माझ्यासमोर हजर व्हावे लागेल, असे तुला वाटत होते काय?'' तो म्हणेल, ``नाही.'' मग अल्लाह त्याला म्हणेल, ``ज्याप्रकारे तू मला जगात विसरला होतास, तसेच आज मी तुला विसरेन.'' मग असाच एक दुसरा मनुष्य (अंतिम निवाड्याचा दिवस नाकारणारा) अल्लाहसमोर हजर होईल आणि त्यालादेखील वरीलप्रमाणे प्रश्न केले जातील. मग एक तिसरा मनुष्य हजर होईल आणि अल्लाह त्यालाही तेच प्रश्न विचारील जे पूर्वीच्या दोन्ही मनुष्यांना (जे सत्य नाकारणारे होते) विचारले होते, तेव्हा हा तिसरा मनुष्य उत्तर देईल, ``हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझ्यावर, तुझ्या ग्रंथावर आणि तुझ्या पैगंबरांवर ईमान बाळगले होते, मी नमाज (प्रार्थना) अदा करीत होतो, रोजे (उपवास) करीत होतो, तुझ्या मार्गात माझी संपत्ती खर्च करीत होतो.'' (पैगंबर मुहम्मद (स.) पुढे म्हणाले,) आणि अशाचप्रकारचे पूर्ण क्षमतेने आपले आणखीन अनेक पुण्यकर्म सांगेल, तेव्हा अल्लाह त्याला म्हणेल, ``थांब, पुरे झाले.'' मग अल्लाह म्हणेल, ``आम्ही आता तुझ्याविरूद्ध साक्ष देणाराला बोलवितो.'' तेव्हा तो आपल्या मनातल्या मनात विचार करील की माझ्याविरूद्ध साक्ष देणारा हा कोण असेल. मग त्याचे तोंड मोहोर लावून बंद केले जाईल. (कारण तो अल्लाहसमोरदेखील खोटे बोलायला मागेपुढे पाहणार नाही, ज्याप्रमाणे जगात पैगंबर आणि ईमानधारकांच्या समोर निर्लज्जपणे खोट्या पवित्रतेचा डांगोरा पिटत होता. मग त्याच्या मांड्या, मांस आणि हाडांना विचारले जाईल तेव्हा ते सर्व त्या व्यक्तीची एक-एक लबाडी व्यवस्थितपणे सांगतील. मग अशाप्रकारे अल्लाह अनावश्यक संभाषणाचा दरवाजा बंद करील. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ``हा तोच मनुष्य आहे ज्याने जगात धर्मद्रोह केला आणि हा तोच मनुष्य आहे ज्यावर अल्लाहचा कोप झाला. (हदीस : मुस्लिम)

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget