Halloween Costume ideas 2015
March 2023


पुणे येथील कस्बा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले. हे अशावेळी जेव्हा भारत जोडो यात्रेनंतर रायपूर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा हा विजय त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे. पुणे आणि पश्चिम बंगालमधील दोन्ही जागांचे आपले महत्त्व आहे. कस्बापेठेत गेल्या 28 वर्षांपासून भाजपाचा उमेदवार जिंकत राहिला. हा भाजपाचा बालेकिल्ला होता. त्याच प्रकारे पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद मतदार संघात तृणमुल काँग्रेसचे वर्चस्व होते. येत्या 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाठबळ वाढवण्यासाठी एवढ्या दोन पोटनिवडणुकीतील विजय काँग्रेससाठी वरदान आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे? याचे कारण असे की जर भारत जोडोने काँग्रेसला संजीवनी दिली असेल तर ईशान्य राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव कशामुळे झाला; कारण त्या राज्यांमध्ये एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. तिथे बाहेरून गेलेल्या पक्षांना राष्ट्रवादी आणि रामदास आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार जिंकून आले. राष्ट्रवादीला सात जागा तर आठवले गटाला दोन जागा मिळाल्या. ममता बॅनर्जी यांच्या पक्षानेसुद्धा जागा जिंकल्या आहेत. टक्केवारी पाहता काँग्रेसला 3.25 टक्के तर राष्ट्रवादीला 9 टक्के मते मिळाली आहेत.

नुकतेच रायपूरमध्ये जे अधिवेशन झाले त्यात असा ठराव पारित करण्यात आला की काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांसोबत काम करायला तयार आहे. पण तसे म्हणतानाच ही देखील अट घातली की संयुक्त पुरोगामी आघाडी सारखी आघाडी करावी लागेल. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त आघाडी करून काँग्रेसने निवडणूक जिंकली होती पण इतर पक्षांना या आघाडीचे नेतृत्व देण्यात आले नव्हते. मनमोहनसिंह यांना पंतप्रधान केले होते तर संपुआच्या अध्यक्षपदासाठी स्वतः सोनिया गांधी होत्या. जर संपुआच्या धर्तीवर येत्या लोकसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचे ठरले तर इतर पक्ष सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना नेतेपद तसेच पंतप्रधानपद देण्यास मान्य करतील का? काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, जर तीसरी कोणती आघाडी केली तर याची भाजपालाच मदत होणार म्हणजे ते संपुआ शिवाय इतर कोणती आघाडी करणार नाही. तसेच याचे नेतेपद काँग्रेसकडेेच असणार? मग इतर समविचारी पक्षांसोबत जाण्यास काँग्रेस तयार आहे असे म्हणण्यात काय अर्थ? 

खरे पाहता काँग्रेस पक्षाच्या अहंकाराने पक्षाला इतक्या दयनीय परिस्थिती पर्यंत आणून सोडले आहे. मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर किंवा त्यापुढे जेव्हा व्ही.पी.सिंह यांना दिवंगत पंतप्रान राजीव गांधीवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून काँग्रेसची सत्ता निवडणुकीद्वारे खेचून घेतली आणि व्हिपी सरकारला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने राममंदिराच्या मुद्यावर आपला पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर मग मंडल आयोगाच्या चळवळीने राजकारणाचे स्वरूप बदलले. भाजपाने हिंदुत्वाची विचारधारा अंगीकारली. बहुजणांनी आपल्या राज्यात नवे पक्ष निर्माण केले. या नव्या पक्षांशी भाजपाने आपली विचारधारा ना सोडता आघाडी केली. पण काँग्रेस पक्षाने ते पक्ष समविचारी असताना देखील त्यांची साथ घेण्यास आणि त्यांना आपल्या बरोबर आणण्यास काही तडजोड केली नाही. आपल्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वात महान पक्ष असण्याच्या गर्व सोडला नाही. 

भाजपाने सर्व प्रकारच्या लहान मोठ्या प्रांतिक पक्षांशी हातमिळवणी केली आणि सर्वांची साथ घेतली. नंतरच्या निवडणुकीत भाजपाने केंद्राची सत्ता ताब्यात घेतली. इथून भाजपाचे अच्छे दिन सुरू झाले आणि काँग्रेसचे बुरे दिन सुरू झाले. अटलबिहारी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपाला लहानाचे इतके मोठे केले की काँग्रेसपुढे त्याचे आव्हान उभे केले. याच काळात आम आदमी पक्षाचा उदय झाला आणि त्याने दिल्लीलाही काँग्रेसकडून खेचून घेतले. काँग्रेस पक्षाचा हाच राजकीय अहंकार आजही कायम आहे. इतर पक्षांबरोबर काम तर करायचे आहे पण त्यांना नेतृत्वात वाटा द्यायचा नाही. परिणामी, तृणमुल, आप, टीआरएस, आंध्रप्रदेश मधील जगन रेड्डी हे सगळे पक्ष काँग्रेसशी हात मिळवणी करण्यास तयार नाहीत. गंमत अशी की, ह्या सर्व पक्षांचे संस्थापक काँग्रेस मधूनच बाहेर पडलेले आहेत. पक्षात असताना त्यांना किंमत दिली गेली नाही. त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेस बरोबरीचे नव्हे तर काही प्रमाणात मोठेच झाले. ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन रेड्डी ह्या सर्वांनी काँग्रेसच्याच तालमित राजकारणाचे प्रशिक्षण घेतलेले. आज काँग्रेसपुढचे आव्हानच नव्हे तर संकट बणून उभे आहेत. 

नितीषकुमार यांनी भाजपाशी आघाडी सोडली आणि पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची साथ घेत आहेत. महागठबंधन बनवणाऱ्या अखिलेशच्या समाजवादी पक्षाने तसेच बसपाने काँग्रेसचा उघड विरोधही केला नाही की संपुआच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला संमती दिली नाही. राष्ट्रवादी आणि द्रमुक काँग्रेस बरोबर जायला सध्या तरी तयार आहेत. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला जे काही करायचे ते लवकर करा असे वारंवार सांगत आहेत. पण काँग्रेसकडून त्यांना कोणतेही उत्तर दिलेले नाही. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल)चे महासचिव दिपंकर भट्टाचार्य यांनी असे आवाहन केले आहे की गुजरात मॉडल किंवा बिहार मॉडल पैकी कोणते तरी एक निवडा आणि प्रतिसाद द्या पण काँग्रेस पक्षाने काहीही म्हटले नाही. काँग्रेस पक्षाने असे जाहीर केले आहे की, राहुल गांधी यांच्या यात्रेचा निवडणुकांशी संबंध नाही तर दुसरीकडे त्या यात्रेद्वारे काँग्रेस पक्षाला किती राजकीय फायदा झाला असे म्हणतानाही चुकत नाही. संभ्रमाची परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार आपली विचारधारा जाहीर केली ती म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्य याच विचारधारेवर ते पक्ष निवडणुका लढणार. दुसरीकडे भाजपाचीही एकमेव विचारधारा आहे ती म्हणजे काहीही करून निवडणुका जिंकणे ते वर्षभर निवडणुकांच्या विचारात मग्न असते ही विचारधारा कुठे कमी पडलीच तर मग राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि 5 किलो अन्नधान्य समीकरणात काँग्रेस पक्षाच्या लोकशाही विचारधारा स्वातंत्र्य टिकू शकत नाही. कारण राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आला की नागरिकांची अशी समज होते की आपण असुरक्षित आहोत. सुरक्षेपलिकडे त्यांना कोणते स्वातंत्र्य किंवा लोकशाही काही नको असते. 

अशा परिस्थितीत जर 2024 च्या निवडणुका देखील भाजपाने जिंकल्या तर ते काँग्रेस पक्षाच्या सौजन्याने असणार हे खरे. 


काँग्रेसचे मुस्लिम भावनांकडे दुर्लक्ष...

रायपूर येथील जे काँग्रेसचे महाअधिवेशन झाले त्यामध्ये काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांशी असा काही व्यवहार केला जसे की त्यांचे अस्तित्वच या देशात नाही काँग्रेसमध्ये तर नाहीच नाही. वर्तमानपत्रांमध्ये जे एक पानी जाहिरात दिले गेले त्यात एकही मुस्लिम नेत्यांचा समावेश नव्हता. मौलाना अबुल कलाम आझाद यांचेही छायाचित्र दिले नव्हते. इतकेच नव्हे तर उर्दूभाषी समाचार पत्रांमध्ये तर जाहीरात सुद्धा देण्यात आली नाही. कमलनाथ धीरेंद्र शास्त्रीच्या चरणी जातात म्हणजे आपणही धार्मिक असल्याचे जगजाहीर करायला. मुस्लिमांविषयी हा जो सवतीच्या लेकरासारखा व्यवहार करण्यात आला त्याचे कारण काय हे त्यांचे त्यांनाच माहित. जयराम रमेश म्हणतात याची चौकशी केली जाईल. चौकशी करण्याइतकी गुपित ही माहिती नाही. ते काँग्रेस मीडियाचे प्रभारी असून सुद्धा जर त्यांना चौकशी करावी लागत असेल तर हे कुणाला मुर्ख बनविण्याचे प्रयत्न आहेत. काँग्रेसमधील नेते भाजपाशीसहानुभूती बाळगत त्यांच्या आणि भाजपाच्या धार्मिक आणि राजकीय भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मुस्लिमांशी असा व्यवहार केला गेला असेल? कदाचित, असो त्यांचे त्यांनाच माहित. नासेर आणि जुनैदची जी हत्या करण्यात आली त्याविषयी काँग्रेस पक्षाने साधे ट्विट सुद्धा केले नाही. असेच काही अख्लाकच्या हत्येवेळी घडले होते. राहुल गांधी अखलाकच्या नातेवाईकांना भेटू इच्छित होते पण काँग्रेस नेत्यांनी त्यांना रोखले. कारण तेच धार्मिक भावना आहत होता कामा नयेत. जाणून बुजून किंवा अजानतेपणाने काँग्रेस तेच काही करत आहे. जे भाजपाला अभिप्रेत आहे. गांधी परिवाराचे काँग्रेस पक्षावरील वर्चस्व त्याला मान्य नव्हते आणि म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधी पक्षापासून दूर गेले. मुस्लिमांना राजकारणापासून दूर ठेवा हे देखील भाजपाचा सर्व पक्षांना राजद असो की, तृणमुल, आप की बाकीचे सारेपक्ष सगळ्या पक्षांनी मुस्लिमांना राजकारणापासून दूर ठेवण्याचे ठरवले आहे. त्याचेच पालन काँग्रेस पक्ष करत आहे. जोपर्यंत मतदार धार्मिक कारणावरून मतदान करतात, विचारधारा वगैरेकडे पाहत सुद्धा नाहीत तोवर सर्वकाही ठीक आहे आणि कोणतेही पक्ष म्हणूनच मुस्लिमांना आपला पाठिंबा उघडपणे कधीच सांगणार नाही हे वास्तव आहे. त्याचेच अनुसरण काँग्रेस पक्ष करत आहे. एवढी एकच गोष्ट.


महिलांविषयी योग्य दृष्टीकोण कोणता? 

समाजाला अनैतिकतेची लागन झाली की वातावरण विशक्त होवून जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. पश्चिमेमध्येच काय तर आपल्या  देशातही सध्या हेच होत आहे.


तेरा वजूद है के फूल है चमेली के

तेरे आने से महेक उठे दरोदिवार हवेली के

हिलांच्या बाबतीत जागतिक दृष्टीकोण असा आहे की, स्त्री-पुरूष समान आहेत. दोघांनाही समान शिक्षण दिले गेले पाहिजे. दोघांना ही समान संधी मिळाली पाहिजे. महिलांना चूल आणि मूल पर्यंत मर्यादित ठेवणे हा त्यांच्यावर अत्याचार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यामध्ये सहशिक्षणाच्या माध्यमातून एवढा आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा की, पुरूषांच्या गराड्यातही त्यांना सहज वावरता आले पाहिजे. कपड्यांच्या बाबतीत त्यांची निवड अंतिम मानली जावी. त्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असाव्यात. मूलं किती जन्माला घालावयाचे? घालावयाचेच की नाही? याचा संपूर्ण अधिकार त्यांचाच राहील. इतकेच नव्हे ‘मायबॉडी माय चॉईस’ चा अधिकार सुद्धा त्यांना मिळावा. आवडेल त्या पुरूषाबरोबर किंवा महिलांबरोबर त्यांना संबंध ठेवण्याचा अधिकार मिळावयास हवा. सारांश त्या पुरूषापेक्षा किंचित ही कमी नाहीत. म्हणून पुरूषांचे वर्चस्व त्यांच्यावर लादता कामा नये.

या उलट इस्लामी दृष्टीकोण असा आहे की, स्त्री-पुरूष मानव म्हणून जरी समान असले तरी ते सारखे नाहीत. म्हणजेच दोघांचे अधिकार व कर्तव्ये ही सारखे नाहीत. दोघांची शारीरिक आणि मानसिक रचनाही सारखी नाही म्हणून त्यांची जडण घडण ही वेगवेगळी व्हावी. अनावश्यकरित्या त्यांना आपसात उघडपणे मिसळू देता कामा नये. ज्या महिलांना खरोखरच कामाची गरज आहे त्यांनी ते करावे मात्र त्यांच्या स्त्रीत्वाचा आदर करत काही सुविधा सरकारने त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्या स्त्री सुलभ हालचालींवर मर्यादा येणार नाहीत असे वातावरण उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य राहील. त्यांचा सन्मान कमी होईल, अशा प्रकारची कामे उदा. अश्लील सीरीज, चित्रपट, नाचणे, पॉर्न आदीमध्ये त्यांना काम करण्यासाठी मज्जाव असावा. जाणत्या वयात आल्यानंतर दोघांचे शिक्षणही वेगळे करण्यात यावेत. जेणेकरून दोघांनाही व्यक्तीमत्व विकासाची समान संधी मिळेल व ते आपापल्या क्षेत्रात परिणामकारकपणे काम करू शकतील. दोघेही एकमेकांचे पूरक आहेत प्रतिस्पर्धी नव्हेत, ही गोष्ट लक्षात ठेवण्यात यावी.  

महिलांसंबंधी महिलांचे विचार

आता आपण महिलांच्या बाबतीत काही प्रसिद्ध महिलांचे विचार जाणून घेऊया. 

1. जमाअते इस्लामी हिंदच्या सचिव अतिया सिद्दीकी  यांचे मत असे की, ’आपल्या मुलांवर संस्कार करण्याचे स्त्रीचे महत्त्वपूर्ण कार्य आज सामाजिक संस्था आणि पाळणाघरा सारख्या संस्थाकडे सोपविण्यात आले आहे ही फार खेदाची आणि चिंतेची बाब आहे. स्त्रीच्या सौंदर्याचा बाजारभरविण्यात आला आहे. सर्वात खेदाची बाब तर ही आहे की आज स्त्री देखील या सर्व बाबींना आपल्या फायद्याची आणि स्वातंत्र्याची गोष्ट समजून बसली आहे. वास्तविक पाहता हे स्त्रिंयाचे मोठ्या प्रमाणावार होत असलेले शोषण आहे.’ (संदर्भ : एसआयओ कॉन्फ्रन्स दिल्ली दि. 25 फेब्रुवारी 2018).

2. पनवेलच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा फातिमा मुजावर यांचे म्हणणे असे की, ‘‘स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारी बरोबर पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात,  अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार करण्यासारखे आहे. मानवजातीच्या उत्पत्ती, सेवा आणि सुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडत असते. त्यासोबत पुरूषांच्या जबाबदारीतही तिने सहभागी व्हावे, हे कितपत योग्य आहे? बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होवून पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्विकारलेल्या आहेत. पुरूषांची कामे न केल्यास तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार नव्हता. कुटुंब व्यवस्थेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोणच बदललेला आहे. आपला आग्रह आहे की, स्त्रीने मातेचे कर्तव्य पार पाडावे, त्याचबरोबर तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेट सारखे पदही भुषवावे. पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्यही करावे, संगीताच्या मैफिलीही सजवाव्यात, अशा अनेक कामांचे ओझे तिच्यावर लादल्या गेल्याने ती एकही जबाबदारी समाधानकारकरित्या पूर्ण करू शकत नाही. ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही, अशी कामे तिच्यावर सोपविण्यात आलेली आहेत. मात्र तिचे कौतूक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळेच होते. सुज्ञ व चारित्र्यवान नागरिक निर्माण करणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला आपण गौण स्थान देत आहोत. गृहिणी सक्षम व सुरक्षित असून, घरकाम व्यवस्थित पार पाडत आहे. या विश्वासाने पुरूषही निश्चितपणे आपल्या घराबाहेरील जबाबदाऱ्या अधिक कार्यक्षतेने पार पाडू शकतो.’’(संदर्भःकाफला-2017 पान क्र. 66).

इस्लाम शिवाय अन्य जीवन पद्धतीमध्ये परदा पद्धती नाही. त्यामुळे मुस्लिमेत्तर महिला बाजारात येतात आणि सार्वजनिक होतात. (अर्थात त्यांचं सौंदर्य सार्वजनिक होतं. वास्तविकपणे त्यांचं सौंदर्य व्यक्तीगत राहणे अपेक्षित आहे). त्यातूनच एकतर्फी प्रेमातून महिलांवर हल्ले होतात. अ‍ॅसिड फेकले जातात. ब्लेड मारले जातात. त्यांची छेडछाड केली जाते. त्यांच्यावर बलात्कार होतात. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, परद्याचा विरोध करणारे ख्रिश्चन पुरूष सुद्धा आपल्या जोगीनींना  परद्यामध्ये पाहून त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात मात्र मुस्लिम महिलांना परद्यामध्ये पाहून त्या त्यांना पीडित वाटतात. कसला हा दुटप्पीपणा.

3.’’कांही पुरूष वासनांध असतात, तेव्हा पुरूषांनी संयमाने वागावे, एवढे सांगून भागत नाही तर महिलांना स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते. समाजात वावरतांना कोणता पुरूष वासनांध आहे हे समजून येत नाही. म्हणून बुरखा घातला तर सर्वच पुरूषांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. मी जेव्हा माझ्या छोट्या बहिनीस स्कर्टमध्ये पहाते तेव्हा माझा जीव कासाविस होतो. पुरूष पहात असतील तर त्यांची काय अवस्था होत असेल? लाखो अत्याचार होऊन सुद्धा या लोकांना परदा पद्धतीचे महत्व लक्षात येत नाही, याचे आश्चर्य वाटते. काही (बहुतेक) महिला उत्तम श्रृंगार करून घराबाहेर पडतात. त्या तशा घरात राहत नाहीत. इस्लाम अपेक्षा करतो त्यांनी उत्तम श्रृंगार बाजारात जाताना नव्हेत तर घरात राहतांना करावा. आपल्या पतीसाठी करावा. असा श्रृंगार दाम्पत्य जीवनात बहार आणतो. महिलांचे शरीर गुपीत ठेवल्याने जास्त आकर्षक दिसते. आमच्यासाठी काय हितावह आहे व काय नाही याचा निर्णय कोणीच करू शकत नाही, आम्ही स्वतः देखील करू शकत नाही मात्र हा निर्णय ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं तो अल्लाह मात्र करू शकतो. मानव संस्कृतीची सुरूवात व स्थैर्य लाज लज्जेवर आहे. जर मानवाने तेच सोडले तर मग मानव आणि जनावर यात फरक तो काय राहतो? परद्याने मला अनोळखी नजरे (वासनापूर्ण) पासून संरक्षण दिले. दाढीधारी नवरा हा सुंदर स्त्रीचा बॉडीगार्ड असतो. एकतर परदा व सोबत अंगरक्षक मला तर व्हीआयपी असल्याचा भास होतो. मला पाश्चिमात्य महिलांची कीव येते, त्या स्वतःला अती शिक्षित समजतात मात्र पर पुरूषाच्या वासनेला सहज बळी पडतात. मला तर महिलांचा तंग पोशाख कैद्यांसारखा वाटतो. त्या पुरूषांच्या  नजरेच्या सतत कैदेत असतात. उलट आम्ही पडद्यात स्वतंत्र असतो. - खौला लगाता (इस्लाम स्विकारणारी एक जापानी महिला) (संदर्भ : दावत 13.11.2010, पान क्र.1).

समाजाला अनैतिकतेची लागन झाली की वातावरण विशक्त होवून जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. पश्चिमेमध्येच काय तर आपल्या देशातही सध्या हेच होत आहे. ह्यातून स्वार्थी, कपटी आणि लिंगपिसाट लोकांची संख्या वाढत आहे. त्याचा सर्वात वाईट परिणाम महिला व बालकांवर होत आहे. शाळेमध्ये गोळीबार होत आहे. शिक्षक आणि चिमुरडी मुले बळी पडत आहेत. अशा व्यवस्थेत गुन्हे वाढतात, पोलिस व न्यायालय त्यांना थोपवू शकत नाही. हे सत्य मात्र लक्षात घेतले जात नाही. हे दुर्दैव आहे.

महिलांसंबंधी कुरआनचे निर्देश

’स्त्री’ ला अरबी भाषेत पर्यायी शब्द ’मस्तूर’असा आहे. ज्याचा अर्थ, ’लपविण्या योग्य’ असा आहे. महिलांना परद्यामध्ये लपविले जाते. म्हणून त्यांना अरबी भाषेमध्ये ’मस्तुरात’ असे म्हणतात. इस्लाम खेरीज जगातल्या कुठल्याही धर्मात महिलांना परद्यात ठेवण्याची व्यवस्था नाही. कुरआनमध्ये परद्याच्या व्यवस्थेसंबंधी एकूण 7 आयाती अवतरित झालेल्या आहेत. त्यापैकी तीन सूरे नूर आणि चार सूरे एहजाबमध्ये आहेत. 70 पेक्षा अधिक हदिस आहेत. महत्त्वाच्या आयाती खालीलप्रमाणे. 1.’’आपल्या घरामध्ये समाधानाने रहा.’’ (संदर्भ : सुरे एहजाब आयात नं. 30.)  

2. ’हे नबी (स.)! आपल्या पत्नी व मुली आणि श्रद्धावंतांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा. ही अधिक योग्य पद्धत होय. जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्यांना त्रास दिला जाऊ नये. अल्लाह क्षमाशील व परमकृपाळू आहे.’ (संदर्भ : सूरे एहजाब आयात नं. 59)

वर नमूद पहिल्या आयातीमध्ये महिलांसाठी घरामध्ये शांती व समाधानाने राहण्याचा आदेश दिलेला आहे. आपण पाहतो ही बिल्कुल नैसर्गिक पद्धत आहे. पुरूषांपेक्षा महिला ह्या घरात जास्त रमतात. ’घरात समाधानाने रहा’, याचा अर्थ असा नव्हे की महिलांनी घराबाहेर निघूच नये. निकड असेल तेव्हा त्या दिवसातून केव्हाही कितीही वेळा घराबाहेर निघू शकतात. मात्र महेरम आणि परद्याची व्यवस्था त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. हे त्यांच्या सोयी व संरक्षणाशी संबंधित आहे. त्यात त्यांच्यावर अत्याचार करण्याचा किंवा त्यांना डांबून ठेवण्याचा दुरान्वये विचार नाही. यात कुठलीही नकारात्मक बाब नाही. किंवा त्यांना कमी लेखण्याचा तर प्रश्नच नाही.

1.‘‘आणि त्याच्या संकेत चिन्हांपैकी ही आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत. त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’(संदर्भ : सुरे रोम : आयत नं. 21). पुरूषसुद्धा घरात जेवढा संतुष्ट राहतो तेवढा तो बाहेर राहू शकत नाही.  पत्नीपासून फक्त लैंगिक संतोष मिळतो एवढेच नाही तर मुलांपासून त्याला मानसिक समाधान मिळते. घरी पत्नी आणि मुलं आनंदी असतील तर पुरूष बाहेर कणखरपणे कोणत्याही परिस्थितीस सामोरे जावू शकतो. घरात जर किरकिर असेल तर बाहेर मोठमोठी संकटे लिलया पेेलणारा पुरूष कोसळून पडतो. अशा कारणांमुळे अनेक पुरूषांनी आत्महत्यादेखील केल्याची अनेक उदाहरणे आजूबाजूला विखुरलेली आहेत. पत्नी आणि मुले ही त्याची भावनिक भूक भागवतात व त्याला आतून शक्तीमान करतात. स्त्रीला जर पुरूषांसारखेच अनावश्यकरित्या इतर कामांना जुंपले तर ती सुद्धा थकून जाईल व कुटुंबाची रचना करण्यामागच्या ईश्वरीय हेतुलाच हरताळ फासल्यासारखेच होईल. स्त्री चार पैसे जरूर कमवील मात्र त्या मोबदल्यात कुटुंबाचे होणारे नुकसान हे फार जास्त असेल यात शंका नाही. स्त्रियांनी रणगाडे आणि पादत्राणे निर्माण करण्यापेक्षा चांगली सुसंस्कारित पिढी निर्माण केली तर जग तिचे कायम ऋणी राहील. 

परदा व्यवस्थेचे उद्देश

1. स्त्री आणि पुरूषांच्या मुक्त भेटी-गाठींमुळे स्वैराचाराचे मार्ग निश्चितपणे खुलतात. त्या मार्गांना रोखून दोघांच्याही चारित्र्याचे रक्षण करणे. 

2.स्त्री आणि पुरूषांच्या कामांच्या ईश्वरीय वाटणीचा सन्मान करणे आणि त्या वाटणीला अधिक मजबूत करणे.

3. कुटुंब व्यवस्था हा कुठल्याही समाजाचा पाठिचा कणा असतो. ती व्यवस्था मजबूत करणे व त्या व्यवस्थेच्या केंद्रामध्ये असणाऱ्या स्त्रिला बाह्य आक्रमणापासून वाचविणे. 

हे तिन्ही उद्देश परद्याच्या व्यवस्थेशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये काही महिला अशा जरूर असतात, ज्यांना स्वतः काम केल्याखेरीज गत्यंतर नसते. अशा वेळेस ही शासनाची जबाबदारी आहे की, त्यांच्या व्यक्तित्वाला शोभेल व त्यांना पेलेल अशा क्षेत्रांना चिन्हित करून सर्व सुरक्षेसह त्यांना त्या क्षेत्रात कामाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

एकंदरित स्त्रियांशी संबंधित दोन प्रमुख जागतिक दृष्टीकोण मी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापुढे प्रत्येक सुजान नागरिकाने आपल्या महिलांना कोणत्या दृष्टीकोणातून सन्मान देता येईल, याचा इस्लामोफोबियाच्या दुष्प्रचाराला बळी न पडता स्वतंत्र विचार करून निर्णय करावा की, महिलांसाठी बिकनी बरी की बुरखा बरा. 

शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की,’’ हे अल्लाह! आम्हा सर्वांना महिलांचा सन्मान करण्याची त्यासाठी त्यांना परदा पद्धती अवलंबविण्याची समज आणि साहस दे.’’ (आमीन).


- एम.आय. शेख


ठोस धोरण अवलंबविण्याची गरज


८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा कुठे गौरव झाला तर कुठे त्यांचे गोडवे गायले गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेत 8 मार्चला महिलांच्या प्रश्नासंदर्भात चर्चाही झाली. ही समाधानाची बाब आहे. महिलांना समानअधिकार मिळाले पाहिजे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यांना कामाच्या ठिकाणी अल्हाददायक वातावरण मिळाले पाहिजे. मात्र असे होताना क्वचितच पहायला मिळते. नुकतेच विधानसभेच्या एका महिला सदस्याला विधानसभेत लहान बाळासाठी हिरकणी घर व्यवस्थित नसल्याने अश्रू अनावर झाले. सुशिक्षित, नोकरदार, राजकारणी महिलांना बऱ्यापैकी सुविधा मिळतात. पण, सामान्य महिलांचे काय? तर त्यांच्या हालअपेष्टांचे वर्णन न केलेलेच बरे.

हुंडाबळी, भानामती, छोट्या-मोठ्या कारणावरून महिलांना मारहाण, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बाळांतीनींची रस्त्याच्या कडेलाच प्रसुती अशा एक ना अनेक घटना महिलांच्या नशीबी येत आहेत. सुशिक्षित महिलांच्या नशिबी जरा कमी त्रास आहे.  सामान्य कुटुंबातील महिलांना जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागत आहे. सरकारला व समाजालाही याचा रामबाण उपाय सापडत नाही. सर्व घटनांना सरकार जरी जबाबदार नसले तरी जेवढ्या घटना घडत आहेत त्यात मोठ्या प्रमाणात सरकारी धोरण समोर येत आहे.  नुकतेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा  कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती काळा जाणवत असल्याने आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालुन प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

तसेच नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तालुक्यामध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिव्हरी केली. त्यात तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. 

रयत साखर कारखान्याकडे (जि.कोल्हापूर)  ऊस तोडणीचे काम करत असलेले कामगार कासेगावात वास्तव्यास आहेत. सायंकाळच्या सुमारास ट्रॅ्नटरमध्ये बसून ते तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेने निघाले होते. ही मंडळी शुक्रवारी (3 मार्च) नऊच्या सुमारास यमगेजवळ आल्यानंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखू लागले. रस्ता खराब असल्याने ट्रॅ्नटर वारंवार आदळत होते. अशातच महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या. महिलेला त्रास होत असल्याचे समजताच तातडीने ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी 108 रुग्णवाहिकेस कॉल केला. त्यानुसार सेनापती कापशीमधून रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याकडेलाच शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला. यावेळी किरण केसू पालवी (रा.खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला. यावेळी बाळाची खुरप्याने नाळ कापावी लागली.

कौटुंबिक हिंसाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नुकतीच सोलापूरमधील घटना समोर आली आहे. फॅ्नट्री खरेदी करण्यासाठी पत्नीला माहेरून एक कोटी रूपये घेऊन ये म्हणत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रावणी प्रेम पोटाबत्ती (वय 28, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रेम श्रीनिवास पोटाबत्ती याच्यासह सासूवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रावणी आणि प्रेम दोघेही आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. लग्नानंतर प्रेमने श्रावणीला पॉवरलूम फॅ्नटरी खरेदी करण्यासाठी एक कोटी रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केला. शिवाय, तू मला पसंद नव्हती, तुझा पगार व माझ्या वडिलांची आम्हाला आर्थिक मदत होईल म्हणून मी तुझ्याशी लग्न केले, असे म्हणत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. असे फिर्यादीत नमूद आहे.

या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्या म्हणाल्या की, यामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून या घटनांतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना आरोग्य संचालकांना दिलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दिली. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2021-22 वर्षी देशातील महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांचे अपहरण, महिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, महिलांची शालीनता भंग करण्याच्या हेतूने त्यांच्यावर हल्ला करणे आणि महिलांच्या विनयशीलतेचा अपमान यासारख्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीनुसार, गेल्या वर्षी महिलांविरुद्ध एकूण 428278 गुन्हे नोंदवले गेले, त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक (56083) गुन्हे नोंदवले गेले, त्यानंतर राजस्थान (40738) आणि महाराष्ट्र (39526) आहेत. महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कापासून दूर करणे आणि अपहरणाच्या प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश 10574 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर बिहार (8661) आणि महाराष्ट्र (7559) आहे. महानगरांच्या बाबतीत, दिल्ली 3948 नोंदणीकृत प्रकरणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई (1103) आणि बेंगळुरू (578) आहेत. महिलांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणांमध्ये, महाराष्ट्र 927 प्रकरणांसह अव्वल, मध्य प्रदेश (758) आणि पश्चिम बंगाल (456) आहे. ओडिशा महिलांवर 14853 हल्ले करून त्यांची विनयभंग करण्याच्या उद्देशाने आघाडीवर आहे, तर महाराष्ट्र 10568 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश (939) आहे. या प्रकरणांमध्ये 2022 प्रकरणांसह दिल्ली अव्वल आहे, त्यानंतर मुंबई (1625) आणि जयपूर (586) आहेत.

महिलांच्या अपमानाच्या बाबतीत आंध्र प्रदेश अव्वल स्थानावर आहे, 2370 प्रकरणे, त्यानंतर महाराष्ट्र (1038) आणि ओडिशा (838) आहेत. या प्रकरणांमध्ये मुंबई 481 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर दिल्ली (415) आणि कोलकाता (222) आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदणीच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की राजस्थानमध्ये सर्वाधिक (6337) गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्यानंतर मध्य प्रदेश (2947), उत्तर प्रदेश (2845) आणि महाराष्ट्र (2496) आहेत. या प्रकरणांमध्ये दिल्ली 1226 प्रकरणांसह यादीत अग्रस्थानी आहे, त्यानंतर जयपूर (502) आणि मुंबई (364) आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार/सामूहिक बलात्काराच्या (48) सर्वाधिक खुनांची नोंद झाली आहे, त्यानंतर आसाम (46), मध्य प्रदेश (35) आणि महाराष्ट्रात (23) आहेत. या यादीत 4 प्रकरणांसह मुंबई अव्वल आहे, त्यानंतर बेंगळुरू (3) आणि अहमदाबाद (2) आहेत, अशी आकडेवारी समोर आली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (फक्त बालिका पीडित) प्रकरणांमध्ये, उत्तर प्रदेशात सर्वाधिक 6970 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (6116) आणि मध्य प्रदेश (6012) आहेत. दिल्लीमध्ये सर्वाधिक 1357 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर मुंबई (1019) आणि चेन्नई (429) आहेत.गर्भपाताच्या प्रकरणांचा विचार करता, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 63 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर महाराष्ट्र (26) आणि पश्चिम बंगाल (24) आहेत. (संदर्भ : फ्री प्रेस जनरलमध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार प्रसिद्ध झालेली माहिती.) 


- बशीर शेख



हज 2023 च्या फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. यावेळी ही सुरुवात थोडी उशिराच झाली कारण, हज साठीची जी पॉलिसी आहे ती उशिराने जाहीर झाली. असो. यावर्षीच्या हज योजनेमध्ये दोन गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला. सगळीकडे त्याचे स्वागत करण्यात येऊ लागले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एक तर हज फॉर्म मोफत भरले जातील आणि दुसरे म्हणजे यावर्षी हज यात्रेकरूंची 50 हजार रुपये वाचणार आहेत!

तसे पाहिले तर मुस्लिम बांधवांनी हज यात्रेसाठी शासनाकडून सबसिडी मिळावी, अनुदान मिळावे, सवलत मिळावी, याविषयी कधीच याचना केलेली नाही. हज यात्रा हे एक असे पवित्र धार्मिक कार्य आहे जे मुस्लिम बंधू संपूर्ण श्रद्धेनिशी करत असतात. त्यासाठी आपली पवित्र संपत्ती खर्च करत असतात. ’हज यात्रेसाठी लागणारी संपत्ती त्यांच्याकडे असेल तरच हज यात्रेचा इरादा करावा अन्यथा हजवर जाण्याची आवश्यकता नाही, अशी इस्लामची शिकवण आहे.’ त्यामुळे कर्जबाजारी होऊन किंवा शासनाकडून अनुदान घेऊन हजला जाण्याची आवश्यकता नाही.

2019 मध्ये औरंगाबादहून हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या हाजींना सुमारे दोन लाख 54 हजार रुपये भरावे लागले होते. आज ती रक्कम सुमारे 16775 रियाल अर्थात सुमारे 370000 रुपये भरावे लागतील. भरलेल्या रकमेतून हज यात्रेकरूंना 2100 रियाल परत केले जातात, जे हाजिंना मक्का-मदिना येथे खर्च करण्यासाठी कामी येतात. या वर्षी मात्र 2100 रियाल परत देण्याचा उल्लेख नाही. या वर्षी 2019 च्या तुलनेत सुमारे 165000 एवढा खर्च वाढला असताना देखील, हजयात्रा पन्नास हजाराने स्वस्त झाली असे म्हणणे हास्यास्पद नाही का? तसेच, हज 2023 मध्ये फॉर्म मध्ये वैद्यकीय पानावर ए आणि बी ची अट ठेवण्यात आली आहे. या अटीनुसार फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक हाजीला आपला चेस्ट एक्सरे आणि सी बी सी रक्त तपासणी रिपोर्ट, पासपोर्ट सोबत जोडावी लागणार आहे. या अटीनुसार प्रत्येक हाजीला चेस्ट एक्स-रे आणि सी बी सी रक्त तपासणी करावयाची असल्यास किमान हजार रुपये खर्च करावा लागेल. हा विनाकारण भुर्दंड हाजींवर बसत आहे. वास्तविक पाहता फॉर्म भरताना अशा प्रकारच्या कोणत्याही वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही. 2017 मध्ये अशी अट ठेवण्यात आली होती परंतु; नंतर हज कमिटी ऑफ इंडिया तर्फे ती मागे घेण्यात आली होती. त्यानंतर 2022 पर्यंत अशा प्रकारे ए आणि बी फॉर्ममध्ये माहिती भरणे अनिवार्य नव्हते. आता पुन्हा 2023 मध्ये ही अट अनिवार्य करण्यात येत आहे. ही 

अट काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. प्रत्येक मुस्लिमाची इच्छा असते की, आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी आणि त्यासाठी लाखो मुस्लिम लोक पासपोर्ट तयार करत असतात. सर्वजण हजला जातातच असे नाही परंतु; या पासपोर्टच्या माध्यमातून भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असते. तसेच एअर इंडियाला देखील मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असते. एअर इंडियाला प्रदेश सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सर्वाधिक भाग हा हज यात्रेपासून प्राप्त होत असतो. एवढेच नव्हे तर भारत सरकारद्वारे दिली जाणारी सबसिडी देखील एअर इंडियाच्या खात्यात जमा होत आलेली आहे. हज सबसिडीचा, हज यात्रेकरूंना कधीच फायदा झाला नाही. फक्त सबसिडीच्या नावाने ढोल मात्र बडवण्यात आले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी फॉर्म भरण्यासाठी पैसे लागणार नाहीत. असे शासनाकडून जाहीर करण्यात आले. परंतु ज्या लोकांचा हजसाठी नंबर लागणार आहे त्यांना फॉर्म ची किंमत द्यावी लागणार आहे. ही किंमत तीनशे रुपये ठेवण्यात आली आहे. नंबर लागल्यानंतर ती रक्कम 300 राहील की, वाढवण्यात येईल, सांगता येत नाही. ऐनवेळी हजार रुपये सांगितले तर भरावे लागतील!


औरंगाबाद 

गेल्या 4 दशकात मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची 12 अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये अत्यंत यशस्वी झालेली आहेत.या काळात अनेक मुस्लिम मराठी साहित्यिक मराठीमध्ये अभिव्यक्त होऊन मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भर घालत आहेत.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचा अभ्यास करतच जे मुस्लिम विद्यार्थी मराठीमध्ये अभिव्यक्त होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना साहित्य निर्मिती प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन, प्रशिक्षण, सादरीकरण  आणि कौशल्यवाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी 3 दिवसीय निवासी शिबिर औरंगाबाद येथे 9.10,11 मार्च,2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. विविध महाविद्यालयातील जे मुस्लिम विद्यार्थी सृजनशील आहेत आणि ज्यांना मराठी भाषेत अभिव्यक्त होण्याची, लेखन करण्याची इच्छा आहे अशांसाठी हे शिबिर असणार आहे. या शिबिरामध्ये अनेक नामवंत साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी, गजलकार, नाटककार, विचारवंत आणि वक्ते या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे निवासी शिबिर विनामूल्य आहे. विद्यार्थ्यांच्या राहणे, भोजनाची व्यवस्था मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ करणार आहे.

विविध  महाविद्यालयातील सृजनशील मुस्लिम मराठी विद्यार्थ्यांनी आपली नावे 7040791137 या व्हॉटस्अप क्रमांकावर कळवावीत. अधिक माहितीसाठी

प्रा.लियाकत अली पटेल/ शेख अन्वर जावेद, सचिव : मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ यांच्याशी संपर्क करावा. मो.9923803347, 9823073882



कोल्हापूर 

येथील करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष, भारत सरकारच्या स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार वसंतराव सरनाईक यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागातून पी.एचडी. पदवी संपादन केली. त्यांनी "भजनी मंडळे : एक जनसंवाद माध्यम - विश्लेषणात्मक अभ्यास" (Bhajani Mandal's: Media of Mass Communication - An Analytical Study) या विषयावरील संशोधनात्मक प्रबंध सादर केला. त्यांना प्रा. डॉ. प्रताप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा मुढे-पवार, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, प्रा. डाॅ.नौशाद मुजावर, नंदकुमार देसाई यांचे सहकार्य लाभले. 

सुनीलकुमार सरनाईक यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने, तसेच ज्येष्ठ पत्रकार ग. गो. राजाध्यक्ष पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एम. जे. परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेबद्दल ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब दप्तरदार पारितोषिकाचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांची माणसं मनातली, रोखठोक, जोतिबा: एक लोकदैवत, ग्राहक जागर, कृपावंत, स्मरणगाथा, महाराष्ट्राच्या पुरोगामी पाऊलखुणा आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सध्या ते 'करवीर काशी' या वृत्तपत्राचे संपादक असून साप्ताहिक 'शोधन'मध्ये त्यांचे निरंतर लेख प्रकाशित होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शोधनच्या माध्यमातून मोठा वाचकवर्ग आहे. वाचकांतर्फे त्यांनी संपादन केलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना पी.एचडी. पदवी मिळाल्याबद्दल शोधन परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!


साहित्याची प्रेरणा व प्रयोजन


लेखक साहित्य का निर्माण करतात आणि वाचक ते का वाचतात? हा साहित्य क्षेत्रात सतत चर्चिला जाणारा विषय आहे. या चर्चेतूनच साहित्याची प्रेरणा व प्रयोजन या संकल्पना पुढे आल्या आणि विकसित झाल्या. या विकास प्रक्रियेचा शोध घेतला तर हे हि लक्षात येते की काही वेळा प्रेरणेमुळे साहित्य निर्मितीला प्रयोजन मिळते. तर काही वेळा प्रयोजनातून साहित्य निर्मितीला प्रेरणा मिळते. याचाच अर्थ असा की प्रेरणा आणि प्रयोजन या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहेत. कदाचित यामुळेच साहित्य निर्मितीच्या इतिहासात एकीकडे साहित्य निर्मितीची वेगवेगळी प्रयोजने नोंदली गेली आहेत. तर दुसरीकडे प्रेरणेमुळे साहित्य निर्मितीला प्रयोजन लाभले आहे. परिणामी एकाच वेळी परस्परांहून भिन्न आणि तरीही परस्परांना पूरक असलेल्या या दोन संकल्पनांमुळे विविध प्रकारची साहित्य निर्मिती होत आली आहे.

या साहित्य प्रकारांचा विचार करता ढोबळपणे ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य असे दोन प्रमुख प्रकार समोर येतात. पुन्हा या दोन प्रकारात काही उपप्रकार असल्याचेही आढळते. उदाहरणार्थ ललित साहित्यात कथा, कादंबरी, काव्य, नाटक, प्रवासवर्णने इत्यादीचा अंतर्भाव करावा लागेल. तर पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र अशा सारख्या वैज्ञानिक विषयांवरील लेखन किंवा इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र धार्मिक आणि सामाजिक परंपरा इत्यादी विषयांवरील साहित्याचा अंतर्भाव वैचारिक साहित्यात करता येईल.

साहित्य ललित असो की वैचारिक, त्याची निर्मिती करणारा लेखक त्याला जे जाणवते, ते तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला व्यक्त करण्याच्या या प्रयत्नालाच आत्माविष्कार म्हणतात. म्हणून लेखकाची सर्व प्रथम बांधिलकी त्याच्या जीवनानुभवाशी आणि ते व्यक्त करणाऱ्या ऊर्मीशी असते. ही ऊर्मीच लेखकाच्या आत्माविष्काराची प्रेरक शक्ती असते. तीच त्याच्या लेखनाचे स्वरूप आणि प्रयोजन निश्चित करत असते. ज्या आंतरिक इच्छेमुळे लेखकाला आत्माविष्कार करावासा वाटतो ती त्याची प्रेरणा असते. तसेच जीवनानुभव आणि जाणिवा यांच्या आधारे लेखक आपल्या साहित्य प्रकारची निवड करत असतो आणि शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्त करत असतो.

माध्यमाशिवाय आत्माविष्कार होऊ शकत नाही. म्हणूनच प्रत्येक कला प्रकाराला त्याचे स्वतंत्र असे माध्यम असते. स्वर हे संगीताचे, रंगरेषा हे चित्राचे, पाषाण हे शिल्पाचे, मुद्रा व ताल हे नृत्याचे, तसेच शब्द हे साहित्याचे माध्यम असते. या माध्यमाच्या द्वारे निर्माण होणारे साहित्य ही एक नवनिर्मिती असते. ललित लेखकाच्या बाबतीत ही नवनिर्मिती साधन नसून साध्य असते. पण वैचारिक साहित्यिकाच्या बाबतीत शब्दाचे माध्यम हे साधन असते.

वैज्ञानिक हा चराचर सृष्टीच्या विविध घटकांचे स्वरूप, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया, त्यातील कार्यकारण भाव याचा शोध घेऊन त्यातून गवसलेलं सत्य लोकांसमोर ठेवून त्यांचे बौद्धिक प्रबोधन व पर्यायाने मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो. तसेच इतिहासाचा अभ्यास वर्तमान जाणून घेऊन भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी करावयाचा असतो. या जाणिवेने आणि बांधिलकीने इतिहासकार भूतकाळाचा वेध घेऊन, होऊन गेलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करीत समाजाने वर्तमान व भविष्यातही कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो.

सामाजिक विषयांवर निर्माण होणारे साहित्य ही नाण्याची दुसरी बाजू आहे. व्यक्ती आणि समाज यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त प्रभाव असतो. त्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी कुंठित झालेली असते. परिणामतः पारंपरिक समाजव्यवस्थेत अंगभूत असलेले अन्याय व शोषण यांचे बळी झालेले समाजघटक त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु काळाच्या ओघात धार्मिक परंपरेतील कालबाह्य मूल्ये व त्यामुळे होणारे शोषण व अन्याय यांची तीव्र जाणीव होणाऱ्या व त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती निर्माण होतच असतात. अशा प्रज्ञावंतांना त्यांच्या अनुभवातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते आणि त्यातूनच प्रबोधन आणि परिवर्तनासाठी ते साहित्य निर्मिती करतात. 

पारंपरिक समाजात माणसांची मने आणि बुद्धी धर्मपरंपरेने बंदिस्त केलेली असतात. या परिस्थितीतून त्यांना मुक्त करण्यासाठी समता व न्याय या मूल्यांचा आणि पुरोगामी विचारांचा प्रभावी प्रचार करू शकणाऱ्या साहित्याची गरज असते. असे साहित्य निर्माण करण्यासाठी या मूल्यांची आणि आधुनिक विचारांची बांधिलकी जशी आवश्यक असते तसेच सामाजिक आणि धार्मिक परंपरेतील कालबाह्य व काळातीत भाग कोणता व कालबाह्य झालेल्या गोष्टींमुळे समाजात निर्माण होणाऱ्या अन्याय अत्याचार वा शोषणाचे नेमके स्वरूप काय आहे, हे जाणून घेणेही आवश्यकच असते. कारण या जाणिवेमुळेच लेखकाच्या अंतर्मनी वैचारिक संघर्ष सुरू होतो. हा वैचारिक संघर्षच त्या लेखकाला त्याचे अनुभव आणि विचार व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असतो. वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाचा हा आत्माविष्कारच असतो. पण ललित लेखन आणि वैचारिक साहित्यातील आत्माविष्कारात एक सूक्ष्म भेद आहे. 

वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाची भूमिका यापेक्षा वेगळी असते. ललित लेखकसारखाच वैचारिक लेखन करणारा लेखकही त्याच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटनांनी प्रभावित होत असतो. या अनुभवांचा अन्वयअर्थ जाणीवपूर्वक समजून घेऊन तो अर्थ आपल्या साहित्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न वैचारिक लेखन करणारा साहित्यिक करत असतो. त्या अर्थाने त्याची वैचारिक अभिव्यक्ती हा त्याचा आत्माविष्कारच असतो. पण असा लेखक केवळ आत्माविष्कार करून थांबत नाही. त्या पलीकडे जाऊन त्याला समाजात प्रबोधन आणि त्या मार्गाने परिवर्तन घडवून आणायचे असते.

बदल हा चराचर सृष्टीचा स्थायी भाव आहे तर स्थितिप्रियता हा पारंपरिक समाजाचा स्वभावधर्म असतो. अशा परिस्थितीत सतत बदलत जाणाऱ्या जीवनाचे स्वरूप समजून घेऊन त्याच्याशी सुसंगत असे परिवर्तन आचारविचारांत घडवून आणल्याशिवाय व्यक्ती आणि समष्टीची प्रगती होऊ शकत नाही. असे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रथम प्रबोधनाची गरज असते. 

मुस्लिम मराठी साहित्य भिन्नता आणि एकात्मता

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक मुस्लिम लेखक मराठीतून लेखन करत आहेत. या लेखकांना आपल्या व्यथा वेदना आणि नातेसंबंधांतून निर्माण होणारे भावनिक ताण तणाव प्राधान्याने काव्यातून व्यक्त करावेसे वाटतात. साहजिकच या लेखनात काव्य निर्मिती अधिक झालेली दिसते. तरीही काही लेखकांनी आपले जीवनानुभव गद्य लेखनातूनही व्यक्त केले आहेत. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे त्याचे पुढचे पाऊल होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम मराठी साहित्य संमेलनांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. ही प्रथा खरोखरच स्वागतार्ह आहे. पण मुस्लिम मराठी लेखकाची साहित्य निर्मिती आणि साहित्य संमेलने चिकित्सक साहित्यिक चर्चेचे विषयही झाले आहेत. ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.

सर्वच भाषांच्या साहित्यिक निर्मितीविषयी मुक्तचर्चा होणे हे त्या भाषेच्या आणि त्या भाषेत निर्माण होणाऱ्या साहित्याच्या प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. तेव्हा मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीविषयी मुक्त चर्चा होत असेल तर ती मुस्लिम मराठी साहित्याच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे, असे समजूनच त्या चर्चेचे स्वागत केले पाहिजे. पण या चर्चेत काही मूलगामी मुद्दे उपस्थित करण्यात आले असतील, तर त्याची योग्य ती दखल घेऊन त्याचे तर्कशुद्ध विश्लेषण करून या साहित्यिक वेगळेपणाचे स्वरूप उलगडून दाखविणे, ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, ही बाब आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर आपण मुस्लिम मराठी साहित्याचा विचार करू गेल्यास आपल्या लक्षात येईल की मुस्लिम मराठी साहित्यिक ज्या मराठी भाषेतून आपल्या साहित्याची निर्मिती करत असतात ती मुख्य प्रवाहातील मराठीपेक्षा कुठल्याही अर्थाने वेगळी नाही. किंबहुना त्यांच्यात पूर्णतः एकरूपता आहे. मात्र मराठी मुसलमानांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन पद्धतीतील एक पैलू मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विविध पैलूंपेक्षा काहीसा वेगळा असतो.                                                 

मराठी भाषा आणि संस्कृतीच्या मूलभूत स्वरूपातील हे वेगळेपण आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे वेगळेपण कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील आहे आणि त्याचा उद्गमबिंदू धर्मभिन्नतेमुळे त्याच्या दैनंदिन जीवनशैलीत आणि संस्कृतीत झालेल्या परिवर्तनात आहे किंवा असतो. हे गुणात्मक परिवर्तन विचारात घेतल्याशिवाय मुस्लिम मराठी साहित्याची समीक्षा यथायोग्य रीतीने करता येत नाही. कारण मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू एकीकडे आपल्या वेगळेपणाचे दर्शन घडवित असतो तर दुसरीकडे व्यापक मराठी साहित्याशी आणि पर्यायाने मराठी संस्कृतीशी असलेले अतूट नाते अधोरेखित करीत असतो.

मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता

मुस्लिम मराठी साहित्यातील हा वेगळा पैलू आणि मुख्य मराठी साहित्य प्रवाहाशी असलेले त्याचे अतूट नाते समजून घेण्यासाठी मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे.

या देशात जन्माला येणारे प्रत्येक मूल आपल्याबरोबर तीन अस्मिता घेऊनच जन्माला येत असते. ज्या आई-वडिलांच्या पोटी ते मूल जन्माला येते त्यांचा धर्म त्याला आपोआपच प्राप्त होत असतो. ही त्याची पहिली अस्मिता असतो. आपण तिला धार्मिक अस्मिता म्हणू शकतो. त्या मुलाचे आई-बाप ज्या प्रदेशाचे किंवा राज्याचे मूळ रहिवासी असतात ती त्यांची प्रादेशिक अस्मिता असते. तीच त्यांच्या मुलाला वारसा हक्काने प्राप्त होते. म्हणजे ही त्याची दुसरी अस्मिता असते. आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्या मुलाचे आईवडील भारताचे नागरिक असतात आणि त्यामुळे भारताचे नागरिकत्वही त्याला त्याच वारसाहक्काने प्राप्त होते. ही त्याची तिसरी आणि राष्ट्रीय अस्मिता असते. या तिन्ही अस्मितात समतोल साधणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असते. पण त्याच वेळेस भाषा आणि साहित्याच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास दुसरी म्हणजेच प्रादेशिक अस्मिताच निर्णायक ठरत असते. कारण त्यामुळेच त्या भाषेतील साहित्य निर्मितीला प्रेरणा आणि प्रयोजन मिळत असते. या साहित्यिक प्रक्रियेमुळेच भाषा समृद्ध होत असते.

या प्रक्रियेत आणखी एक घटक कार्यरत असतो आणि तो म्हणजे धर्म! कुठल्याही राज्यात किंवा प्रदेशात प्रादेशिक आणि राष्ट्रीय अस्मिता समान असतात. पण धर्मभिन्नतेमुळे धार्मिक अस्मिता मात्र भिन्न असते. त्यामुळे मुस्लिम मराठी साहित्यिक लेखकांच्या साहित्यात या धार्मिक अस्मितेचे प्रतिबिंब या ना त्या स्वरूपात पडलेले आढळते. 

‘मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप’ या संपादित ग्रंथात अनेक मराठी कवी व गद्य लेखकांच्या कविता, लेख प्रसिद्ध झालेले आहेत. (संपादक प्रा. फ.म. शहाजिंदे आणि प्रा. फारुख तांबोळी) या लेखांतून आणि कवितांतूनही या लेखकांच्या धार्मिक अस्मितांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष दर्शन घडले. 

डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचे काहीसे वेगळ्या वळणाचे विश्लेषणही दखल घेण्यासारखे आहे. ‘मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप’ या उपरोक्त ग्रंथातील त्यांच्या याच शीर्षकाच्या लेखात त्यांनी म्हटले आहे की “मुस्लिम साहित्य प्रवाह व इतर साहित्य प्रवाह यात एक महत्वाचा असा गुणात्मक फरक आहे आणि तो म्हणजे नव्या मुस्लिम पिढीस हे तीव्रपणे जाणवते की महाराष्ट्रात जवळपास ११ टक्के मुस्लिम समाज असताना देखील या समाजाचे चित्रण तटस्थपणे मराठी साहित्यात झालेले नाही. 

सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे आज पर्यंतच्या (सन १८८५ नंतरचे) मराठी साहित्यात मुसलमानांना एकतर खलनायक, विदूषक किंवा बदमाश गुंड याच रूपात करण्यात आलेले आहे. एक माणूस म्हणून त्याचे चित्रण झालेले नाही. (तत्रैव पृष्ठ १२१). 

याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात दहा/पंधरा टक्के असलेल्या मराठी मुसलमानांच्या काहीशा वेगळ्या परंतु वैशिष्टयपूर्ण असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात जितक्या प्रभावीपणे पडायला हवे आहे तितक्या प्रभावीपणे ते पडलेले आढळत नाही.

नव्या पिढीतील मुस्लिम मराठी साहित्यिकांच्या विशेषतः कवींच्या काव्यातून मुस्लिम समाजाची व्यथा वेदना आणि निराशा मोठ्या प्रमाणावर प्रतिबिंबित झालेली आढळते. अर्थात ते समाज जीवनाचे वास्तव असल्यामुळे साहित्य व्यवहारात त्याचे प्रतिबिंब पडणे साहजिक आहे. पण हे मान्य केल्यानंतरही, आशावाद हाच मुस्लिम मराठी साहित्याचा स्थायीभाव आहे असे मला वाटते. कारण तशा तऱ्हेने आश्वासित करणारे संदर्भ काही काव्य पंक्तीतून आढळतात. पण स्थलकालाच्या मर्यांदांमुळे त्या सगळ्यांची नोंद घेणे इथे शक्य होणार नाही.

आता थोडे वेगळे वळण घेऊन इस्लामी इतिहासाची वाटचाल आणि संस्कृतीचा उगम आणि विकास कसा झाला याचा वेध घेणार आहोत. कारण आपले कौटुंबिक आणि सामुदायिक जीवन साहित्य प्रमाणेच आपल्या सांस्कृतिक विकासाचा सर्वात महत्वाचा घटक असतो. आणि हे सामुदायिक जीवन एखाद्या साखळी सारखे असते. या साखळीतील प्रत्येक दुवा (सांधा) एकीकडे मागच्याला आणि दुसरीकडे पुढच्याला जोडलेला असतो. यालाच आपण जीवनाचे सातत्य म्हणत असतो. म्हणूनच कुठलाही समाज आपला भूतकाळ विसरू शकत नाही. हा भूतकाळ समजून घेतल्याशिवाय आपल्याला वर्तमान समजून घेता येत नाही. या प्राक्रियेने आपण भूतकाळ आणि वर्तमान काळ समजून घेतला की आपल्याला भविष्याची नवी दिशा समजून घेता येते. यालाच आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या विकासाची नवी डिश म्हणतो.

या पार्श्वभूमीवर आपण इस्लामी संस्कृतीच्या उगम आणि विकासाचा शोध घेतो तेव्हा ज्या अरब समाजाला, ज्ञानसाधनेची कसलीही परंपरा नव्हती त्या समाजाने पैगंबरांच्या महानिर्वाणानंतर केवळ २०० वर्षात सांस्कृतिक आणि ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती स्तिमित करणारी होती. हे आपल्या लक्षात येते. त्या दृष्टीने इ.स. ८७० ते ९५० हा कालखंड विशेष महत्वाचे. कारण याच काळात इस्लामी संस्कृतीची समृद्धीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल विशेष झाली. 

इस्लामी विचारवंत आणि संशोधकांनी वैचारिक क्षेत्रात सर्वात महत्वाचे योगदान केले आहे. त्यातही ग्रीक भाषेतील प्रचंड ज्ञानभांडार अनेक लेखक अनुवादकांनी अरबी भाषेत अनुवादित केले त्याचा विशेष उल्लेख केला पाहिजे. या ग्रीक ज्ञानभंडाराची हस्तलिखिते युरोपमधील अनेक मठाच्या तळघरात धूळ खात पडलेली होती. या हस्तलिखितांच्या महत्वाविषयी सर्व मठाधिपती पूर्णपणे अनभिज्ञ तरी होते किंवा त्याविषयी त्यांना कसलीच आस्था नव्हती. 

कॉन्स्टॅन्टिनोपल व पर्शिया जिंकल्यानंतर अरबांचा ग्रीक भाषेशी आणि त्या भाषेतील ज्ञानभांडाराशी त्यांचा संबंध आला. या अरब संशोधकांनी हे सर्व ग्रंथ अरबी भाषेत अनुवादित केले. पुढे या अनुवादाच्या माध्यमातून हे ज्ञानभांडार युरोपमध्ये गेले.

याच काळात इस्लामी तत्त्वज्ञानाचा पाय घातला गेला अबू याकूब इब्न इसहाक अल-किंदी हा या परंपरेतील आद्य तत्त्वचिंतक मानला जातो. तो बुद्धिवादी होता व त्याच्यावर सॉक्रेटिस, प्लेटो आणि पायथागोरस यांच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त त्याला वैद्यक, खगोलशास्त्र, गणित अशा अनेक विषयांत रस होता. या विषयावरचे त्याचे ग्रंथही प्रसिद्ध झाले असून त्यांच्या अनेक ग्रंथाचे लॅटिन भाषेत अनुवादही झाले आहेत.

अल-किंदीपासून सुरू झालेली ही ज्ञानसाधनेची परंपरा अनेक शतकांपर्यंत सुरू होती. या काळात अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यातील काही महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांचा ओझरता तरी उल्लेख करणे योग्य होईल असे वाटते.

इस्लामपूर्व काळातील अरब समाज सांस्कृतिक व वैचारिकदृष्टया आदिम अवस्थेत होता. पण पैगंबरांच्या निधनानंतर केवळ २०० वर्षांत या समाजाने या क्षेत्रात प्रगतीची जी झेप घेतली ती केवळ विस्मयकारक होती. 

अरब विचारवंतांनी आणि संशोधकांनी दोन शतकांत प्रगतीचा जो टप्पा गाठला तसा टप्पा गाठण्यास ख्रिश्चन समाजाला १५०० वर्ष लागली हे ख्रिश्चन अभ्यासक / संशोधकानी लिहून ठेवले आहे. “The Story of Philosophy was discovered by the Muslims and then transmitted to the west, provides one of the most fascinating chapters in the book of mankind’s progress from ignorance to enlightenment” (Islam & The Arabs, pg 143-144)

इ.स. ८७० ते ९५० या काळात अब्बासी खलिफांच्या कारकीर्दीत इस्लामी तत्त्वज्ञानाचाही उगम आणि विकास झाला. या केवळ ८० वषांच्या कालखंडात आंतरराष्ट्रीय दर्जाचे तत्त्वज्ञ निर्माण झाले या मध्ये अबू नसर अलू-फराबी आणि अत्- अशारी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सेंट थॉमस या ख्रिश्चन तत्त्ववेत्त्याने त्याच्या ग्रंथात अल्-फराबीच्या तत्त्वज्ञानाचे अनेक संदर्भ दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ॲरिस्टॉटल नंतर अल्-फराबीला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले आहे. या वरून त्याच्या तत्त्वज्ञानाचा कस काय प्रतीचा होता, हे स्पष्ट होऊ शकेल. अध्यात्मशास्त्र (Metaphysics) मानसशास्त्र, तर्कशास्त्र, पदार्थविज्ञान, वैद्यक, धर्मशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये त्याला गति होती. त्याच्या नंतरच्या काळात होऊन गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्याचा अल्  फराबी हीच त्यांच्या व्यासंगाची प्रेरणा आणि ज्ञानाचा स्त्रोत होता. असे असूनही पाश्चात्त्य जगतात इब्न सीना या तत्त्ववेत्याला जितकी मान्यता आणि प्रसिद्धी अल्-फराबीला मिळू शकली नाही. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील अल् फराबीची परंपरा इब्न सीना याने त्याच वैचारिक बांधिलकीने पुढे चालू ठेवली. त्याचा जन्म पर्शियातील अफसाना येथे ९८० मध्ये झाला व इ.स. १०३७ (रमाधान) मध्ये त्याचे निधन झाले. कालमानानुसार विचार केला तर अल फराबी आणि इब्न सीना यांच्या मध्ये शतक भराचे अंतर असले आणि त्याकाळात अल् अशारी अल् किंदी या सारखे तत्त्वचिंतकही झाले तरी अलू फराबीचा वैचारिक वारसा, इब्न सीनाला मिळाला होता असे इस्लामी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे मानले जाते. असे असले तरी विद्वन्मान्यता आणि प्रसिद्धी मात्र अल्- फराबी पेक्षा इब्न सीनाला अधिक मिळाली.

इब्न सीनाला केवळ ५७ वर्षांचे आयुष्य लाभले. पण या अल्प काळातही त्याने ज्ञानाच्या क्षेत्रात जे कर्तृत्व गाजवले ते अतुलनीय होते असेच म्हटले पाहिजे. त्याचे वडिल सरकारी अधिकारी होते. त्यामुळे त्याला उत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळाली. इब्न सीनानेही त्या संधीचे सोने केले. चौदा वर्षाचा असतानाच त्याने शरीयत (आचार संहिता) आणि (फिकह) इस्लामी न्यायशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळविले होते. दहा वर्षांचा असतानाच त्याने कुराण आणि इतर धार्मिक विषयांचा सखोल अभ्यास केला होता.

या दैनंदिन विषयांच्या अभ्यासाबरोबर ऑरिस्टॉटल, युक्लिड आणि टालेमी यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या ग्रंथावरील विविध भाष्यांचाही त्याने अभ्यास केला होता. सोळाव्या वर्षी त्याने तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त वैद्यकशास्त्रावरील सर्व ग्रंथ, गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, संगीत, भूमीशास्त्र अशा अनेक विषयांच्या त्याने अभ्यास केला होता. इब्न सीनाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. इस्लाममधील एकेश्वराची म्हणजेच ‘तौहीद’वरील आणि अल्लाह चराचर सृष्टीचा निर्भिक आहे या सूत्रावरील त्याची श्रद्धा कधीही डळमळीत होऊ दिली नाही.

तत्त्वज्ञ विचारवंतांच्या या परंपरेत, अबू हमीद इब्न मुहंमद अल तुसी अल- गझाली या विचारवंत संशोधकाच्या नावाचाही अंतर्भाव करणे आवश्यक आहे. पर्शियातील खोरासन या शहरात १०५९ साली त्याचा जन्म झाला. दुर्दैवाने त्याला छत्र मात्र फार काल लाभले नाही. पण त्याचे सुदैव असे की त्याकाळी उपलब्ध असलेले उत्तमोत्तम शिक्षण घेण्याची संधी मात्र त्याला मिळाली अल् गझालीच्या तल्लख बुद्धिमत्तेची जाणीव तत्कालीन अनेक विद्वान, विचारवंताना होती त्यांच्या सहकार्यामुळे वयाच्या केवळ सेहतीसावा वर्षी बगदाद प्रसिद्ध निझामिया विद्यापीठात त्याला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. 

या विद्यापीठाची स्थापना सेलझुक राज्यकर्त्यांचे वजीर निझाम उल-मुल्क याने केली होती. ज्ञानखेत्रातील या नोकरीमुळे त्याला एकीकडे आर्थिक स्थैर्य लाभले तर दुसरीकडे आपली ज्ञानसाधना पुढे चालू ठेवण्याची संधी ही मिळाली. पण हे भाग्य फार काळ टिकले नाही. काही वर्षानव गंभीर अशा मानसिक आणि शारिरिक आजाराना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळेच पण कायमचे वळण लागले. त्याने ज्ञानदानाचे क्षेत्र सोडले व तपस्व्याचे भटके जीवन स्वीकारले. आपल्या जीवनाच्या शेवटच्या पर्वात तर चिंतनशील तपस्व्याचा मार्ग स्वीकारला. ११११ साली म्हणजेच वयाच्या केवळ बावन्नाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनातील अशा मानसिक आणि शारिरिक उलथा-पालथीमुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनात तत्ववेत्त्याच्या व धार्मिक शिक्षकाच्या भूमिकेचा त्याग करावा लागला. गूढवादी तत्त्वचिंतक ही त्यांची शेवटची भूमिका होती व त्याच अवस्थेत त्यानी शेवटचा श्वास घेतला.

इब्न गझालीच्या जीवनात तत्त्ववेत्त शिक्षक, भटका तपस्वी आणि गूढवादी तत्त्वचिंतक अशी अनेक वळणे आली, तरी त्यांच्या चिंतनशील विचारांचा कस मात्र जराही कमी झाला नव्हता.

गूढवादी साक्षात्कारातूनच अंतिम सत्याचा प्रत्यकारी शोध घेता येतो, हे अल्-गझालीच्या तत्त्वज्ञानाचे मध्यवर्ती सूत्र होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेषांविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या वैचारिक भूमिकेविषयीची प्रामाणिक बांधिलकी आणि आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी तितक्याच खचोटीने कष्ट करण्याची तयारी, यांचा उल्लेख करावा लागेल. त्याच्या व्यक्तिमत्त्वात अविचल धार्मिक श्रद्धा आणि वस्तुनिष्ठ चिंतनशीलता यांचे समतोल संमिश्रण झालेले आढळते. सुफी आध्यात्मिक परंपरेला त्याने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, हे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाचे योगदान म्हटले पाहिजे.

बाराव्या शतकात त्याचे ग्रंथ विशेषतः तत्त्वज्ञानावरील ग्रंथ अनेक पाश्चात्त्य भाषांत अनुवादित झाले होते. त्यामुळेच त्याच्या विचारांचा आणि तत्त्वानात्मक सिद्धांताचा ज्यू आणि ख्रिश्चन तत्त्वविचारांवर खूप प्रभाव पडला होता. मानव आणि ईश्वर यांच्यात अद्वैत साधण्यासाठी कुण्या त्रयस्थाची गरज नाही, हे इब्न गझालीचे सूत्र सेंट थॉमस पासून अनेक ख्रिश्चन संतांनी पूर्ण श्रद्धेने स्वीकारले होते.

विज्ञानाच्या क्षेत्रात गणिताला सर्व विज्ञानशाखांचा स्रोत मानले जाते. मूलतः अरबांपाशी स्वतःचे असे गणितशास्त्र नव्हते. त्यामुळे त्यांना या बाबतीतही ग्रीकांकडेच वळावे लागले. परंतु कालांतराने त्यांना त्यांच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने ते अपुरे आणि अपर्याप्त वाटू लागले. म्हणून त्यांनी या शास्त्राचा स्वतंत्रपणे विकास करण्याचे ठरविले.

गणिताच्या क्षेत्रातील अरबांच्या योगदानाचा सारांश काढायचा झाला तर अंकशास्त्र आणि दशमान पद्धतीचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. अंकशास्त्राचा उगम भारतात झाला हे सर्वज्ञात आहे. अरबांनी त्याचा अभ्यास करताना ते अधिक प्रगत केले, हेही मान्य केले पाहिजे. त्याचबरोबर नव प्लॅटोनिक साधनांपासून अंकशास्त्रामध्ये ज्ञान मिळविले असे इतिहास सांगतो. (Legacy at Islam by Cara de Vaux, Pg 384- 85). याचाच अर्थ असा की ज्ञानप्राप्तीसाठी अरबांनी स्वतःवर कुठल्याही मर्यादा घातल्या नव्हत्या. ‘ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जा’ हे पैगंबरांचे वचन त्यांनी आदर्श व प्रमाण मानले होते. 

गणितात शून्याचा (सीकर) वापर, हे अरबांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. अरब गणितशास्त्रात शून्याचा वापर त्यापूर्वी किमान दोनतीन शतकांपासून होत होता. दशमान पद्धतीबरोबरच त्यांनी बीजगणित (Algebra) व त्रिकोणमितीची (Trigonometry) या क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आढळते.

(पूर्वार्ध)



तिसऱ्या निजामाने आपली राजधानी १७६१ साली हैदराबादला स्थापन केली. त्यावेळेपर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्त्वाचे केंद्र होते. अखेर १९४८ साली हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाल्यावर औरंगाबादही मराठवाड्यासह भारतात सामील झाले.

औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे निषेध करण्यात आला. मुश्ताक अहेमद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. फक्त श्रेयासाठी व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याचे मुश्ताक अहेमद यांनी सांगितले. मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी राज्य सरकारने केलेल्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका यापूर्वीच दाखल केली आहे.

उस्मानाबाद-

२५ मे १९९५ रोजी उस्मानाबादच्या नामांतराची पहिली घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुण्यात पत्रकारांसमोर केली होती. औरंगाबाद इथल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झाले. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तुळजापूर इथे झालेल्या सेनेच्या महिला मेळाव्यात या नामांतराची घोषणा केलेली होती. १९९९ साली शिवसेना-भाजप युती असलेल्या कालावधीत उस्मानाबादचे नाव बदलून ते धाराशीव करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र हे प्रकरण न्यायालयात टिकले नाही. तेव्हापासून उस्मानाबादचे नाव बदलण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. 

ग्रामीण भागातील जुनी जाणती लोकं आजही धारशिव हाच उल्लेख करताना दिसतात. धाराशिव शहराजवळ राष्ट्रकूट काळात चमार लेणी खोदल्या गेल्या या लेणीमध्ये भव्य असे शिवलिंग पहायला मिळते. हे शिवलिंग हे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुने असे शिवलिंग असून याच शिवलिंगावरून या ठिकाणी असलेल्या गावाचे नाव धारशिव असे पडले. त्याचबरोबर शहराच्या पश्चिमेला ६ व्या शतकात खोदल्या गेलेल्या लेणी ह्या धाराशिव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. तेरच्या शिव राजाचाही उल्लेख या नावाच्या संदर्भात येताना दिसतो. धाराशिव गावाची ग्रामदेवी हिचे देखील नाव हे श्री धारासुर मर्दिनी हे असून धाराशिव हे याच प्राचीन नावाकडे लक्ष वेधते.

त्याहीपेक्षा महत्वाचे उस्मानाबाद हा निजामाचा सरफेखास जिल्हा होता. म्हणजे निजाम उस्मान अली खान यांच्या व्यक्तिगत खर्चाची सोय या जिल्ह्यातील महसूलातून करण्यात येत होती. निजाम काळात नळदुर्ग हा जिल्हा होता तो बदलून धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण करण्यात आले. याचे कारण म्हणजे हा धाराशिव जिल्हा हा ब्रिटिश आमल असलेल्या भागाशी संलग्न होता भविष्यातील धोका लक्षात घेऊन निजाम सरकारने नळदुर्ग ऐवजी धारशिव जिल्हा केला गेला. विशेष म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही यांच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रातून देखील धारशिव गावाचे उल्लेख आढळून येतात.

उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव

नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन १९०० साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे. धाराशिव हे नाव १९२७ पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर... अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तेही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नाव आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

अहमदनगर-

अहमदनगरच्या नामांतरचा मुद्दा १९९७ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य संमेलनात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आल्याचे सांगितले जाते. तेव्हा या शहराचं नाव अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ करावे अशी मागणी आता आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. मात्र त्यांनी केलेली मागणी ही काही पहिली मागणी नाही. २०२१ सालच्याच जानेवारी महिन्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अहमदनगरचे अंबिकानगर करावे अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अहमदनगरचे अंबिकानगर करावे ही मागणी मनसे मार्फतदेखील करण्यात आली होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अहमदनगरचे अहिल्यादेवीनगर करावे अशी मागणी केली होती.

अहमदनगर नामांतराला विरोध

लोककल्याणपेक्षा स्वकल्याण करण्यासाठी आणि सत्ता मिळवून टिकवण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर शहरांचे नामांतर करण्याचा धडाका सुरू आहे. उन्नत चेतनेचा अभावाने धर्म आणि जातीच्या मानसशास्त्रीय अ‍ॅपचा वापर करून आणि जनतेमध्ये धर्माची गुंगी टिकून ठेवण्याचा भाग म्हणून अशा नामांतरांच्या घोषणा केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून अहमदनगरचे नामांतर करण्याचा घाट सत्ताधारी मंडळींनी धरला आहे असा आरोप करून अहमदनगरच्या नामांतराला पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला आहे.

धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण करणार्‍या लोकांविरुद्ध जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र वापरण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. तर शहर नामांतरला संघटनेचे पदाधिकारी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, डॉ. महेबुब सय्यद, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ज्ञानदेव काळे यांनी देखील विरोध दर्शविला आहे.

इस्लामपूर-

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करावे अशी मागणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तसेच भाजप व शिवसेना या पक्षांनी देखील या मागणीसाठी जोर लावलेला आहे.

या नामांतराला वंचित बहुजन आघाडी तसेच एम आय एम या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे यासंदर्भात इस्लामपूर शहराचे रहिवासी असलेले वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणतात, जे नाव इस्लामपूर शहराला देण्याची मागणी होत आहे त्याला कुठलाही संदर्भ नाही. हे नाव शहरवासीयांवर लादून अल्पसंख्यांकावर दबाव ठेवण्याचे काम हे करत आहेत. शिवसेना महा विकास आघाडी सरकारसोबत गेल्यानंतर थोडासा बदल जाणवला होता. पण इस्लामपूर येथील शिवसेना ही भाजप आणि आर एस एस सोबत असल्यामुळे त्यांचा मूळ गुणधर्म यानिमित्ताने समोर आलेला आहे. 

- प्रा सचिन गरुड (इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक)

इस्लामपुरात हिंदू जातीजमातीबरोबर मुस्लिमही सामंजस्याने राहत आहेत. देशात अनेकदा विविध ठिकाणी जमातवादी दंगे झाले तरी इस्लामपूर मध्ये कधीही असे जमातवादी दंगे व हिंसा घडून आलेली नाही. अनेक शहर व गावांची नामांतरे संस्कृत नावाने केली आहेत. जी संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण पुरुषांनाच शिकण्याची मुभा होती. अनेक शहरे व गावे मध्ययुगात मुसलमानी राजवटीत उदयाला येऊन विकसित झाली. अनेक शहर व गावांची सांस्कृतिक जडणघडण मुस्लिम सुफी परंपरेने झाली. हिंदुधर्मातील जातीय शोषणाला कंटाळून अनेक जातीजमातीतील स्त्री-पुरुषांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला. या वस्तुस्थितीकडे हिंदुत्त्ववादी हेतुत: दुर्लक्ष करत असल्याचे सांगत प्रा. गरुड यांनी इस्लामपूर शहराच्या नावाविषयीचा ऐतिहासिक संदर्भच स्पष्ट केला.

मुळात इस्लामपूर हे शहराचे नाव जबरदस्तीने दिलेले नसून ते इस्लाम धर्मवाचक असले तरी एका धर्माचे वा समाजगटाचे वर्चस्वाच्या हेतूने आलेले नाही. ते सुफी संप्रदायाच्या सर्व जाती समन्वयाच्या आधाराचे नाव आहे. मराठ्यांच्या स्वराज्याच्या काळात कोणत्याही मुस्लीम स्थळाचे नाव बदलले गेले नाही. शिवाजी राजे, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या काळातही इस्लामपूर हे नाव तसेच ठेवले गेले. इंग्रजांनीही हे नाव बदलण्याचा चुकीचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या काळात इथे ख्रिश्चन धर्माची चळवळ उभी राहिली. कोल्हापूर, मिरज येथील ख्रिस्ती धर्माच्या मिशनरी मोहिमेचा भाग म्हणून इस्लामपूरला एकोणिसाव्या शतकात ग्रेस मेमोरियल चर्च बांधण्यात आले. येथील दलितांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. राजर्षी शाहू महाराजांचा आणि कोल्हापूर, मिरज, इस्लामपूरच्या ख्रिस्ती धर्माच्या मिशनरीशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव व सहिष्णुतेचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी कुराणचे मराठीत भाषांतर केले. इस्लामपूर हे शहर आणि येथील धर्मांतर कधीही जबरदस्तीने लादण्यात आलेले नाही. हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जातीय भेद व शोषण याविरोधात येथील जनतेने मुसलमान व ख्रिश्चन होणे पसंद केले आहे. 

इस्लामपूर या शहराला बूवाफन- संभूआप्पा आणि राजेबागेश्वर या महान सुफी पिरांच्या धर्म समन्वयवादी तत्त्वांचा ऐतिहासिक वारसा आहे. बूवाफन ह्या मालगावच्या खालच्या जातीच्या मुस्लिम संताचा शिष्य संभू आप्पा ही कनिष्ठ जातीचा होता. त्याने उरूण इस्लामपूर परिसरात जातधर्म भेदभावाच्या विरोधात सर्व समाजात समतेची शिकवण दिली. त्यामुळे इस्लामपूरला आजही बुवाफन संभुआप्पा यांचा उरूस भरतो. राजेबागेश्वर पिराचाही असाच उरूस येथे साजरा केला जातो. त्यात सर्व जातधर्मीय सहभागी असतात. इस्लामपूरच्या जवळ कामेरी या गावात मशीद आणि मंदिर एकाच भिंतीच्या आधाराने अगदी शेजारी-शेजारी उभे आहे. हा सर्व परिसर धर्म समन्वयवादी तत्त्वांच्या इतिहासाचा आहे.

इस्लामपूरच्या राजकारणावर आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आहे. आणि नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती (सध्या प्रशासक आहे). जयंत पाटील यांचे हिंदुत्त्ववादी भिडे यांच्या संघटनेशी जवळचे संबध राहिले आहेत. त्यांना कोंडीत पकडून आपले राजकारण पुढे रेटण्याची सेना-भाजपच्या विरोधकांची ह्या नामांतराच्या राजकारणाची खेळी आहे. नामांतराच्या या मागणीने धार्मिक विद्वेषाचे राजकारण पसरून शहरातील शांतता आणि सामंजस्य बिघडू शकते. याची काही नागरिकांना चिंता वाटत आहे.

आता हिंदुत्ववादी शक्तीना दुसऱ्या धर्माला द्वितीय स्थान द्यायच्या उद्देशाने इस्लामपूर या नावाला आक्षेप आहे. पण हे वास्तवाला धरून नाही गावांच्या नावाला शतकांचा इतिहास असतो.  त्यांचे इस्लामपूर का? आपल ईश्वरपूर का असू नये अशा प्रकारे तरुणांची माथी भडकविण्याचा प्रकार सुरु आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून सत्तेची गणिते जुळविण्यासाठी नामांतराचा मुद्दा समोर केला जात आहे.

पुणे-

२०२१ मध्ये पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली. पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर हे माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून याचे नामांतर व्हावे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर औरंगाबाद ऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’ करा, अशी मागणी केली होती. पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. या नामांतराच्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. आनंदर दवेंनी मिटकरी यांच्या नामांतराच्या मागणीला विरोध करत, पुण्याच्या नामांतराची गरज नसल्याचे म्हटले आहे.

सिंदखेड राजा गावाच्या नामांतराला विरोध

आता सिंदखेडराजा नगरीचे सुद्धा नाव बदलून जिजाऊ नगर होणार आहे. त्यामुळे सिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जाधव घराण्यातील वंशजानी या नामांतराला विरोध केला आहे. सिंदखेड राजा हे ऐतिहासिक शहर असून राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील राजे लखोजीराव जाधव यांनी सिद्धपूर या शहराचे नाव त्यावेळी सिंदखेड राजा असे केले होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असल्या कारणाने सिंदखेडराजा शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यास जिजाऊंच्या जाधव घराण्यातील वंशजांनी आता विरोध केला आहे. त्याचबरोबर नामांतर करायचे असेल तर बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी ही मागणी एका निवेदनाच्या माध्यमातून जिजाऊंच्या वंशजांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सिंदखेड राजा शहराच्या नामबदलावरून आता नवा वाद तयार झाला आहे.

- सरफराज अहमद (इतिहास संशोधक, सोलापूर)

औरंगाबाद हे मुस्लिमांच्या सांस्कृतिक मूल्यांचा महत्त्वाचा आधार आहे. दक्षिणेतील मुसलमानांचे ते पहिलं आणि प्रमुख केंद्र राहिलं आहे. दक्षिण भारतामध्ये मुसलमान संस्कृतीची स्थापना औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. त्यामुळे मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल, दखनी मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे.

हा देश मुसलमानांना आपला वाटावा, या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं, म्हणून मुसलमानांच्या खाणाखुणा, मुसलमानांची संस्कृती जपणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असते. पण राज्यकर्ते हे कर्तव्य पार पाडताना दिसत नाहीयेत. मुसलमानांची संस्कृती, मुसलमानांच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी ते प्रयत्न करताहेत जेणेकरून मुसलमान उपरे ठरतील आणि मुसलमानांना हा देश आपला वाटणार नाही, अशी परिस्थिती ते निर्माण करून ठेवताहेत.

दखनी मुस्लिमांचा विरोध औरंगजेबाच्या नावाशी निगडित असलेल्या नामांतराला नाही तर औरंगाबादचं नामांतर हे दखनी मुस्लिमांच्या संस्कृतीवर आघात करणारं आहे. कारण दखनी मुस्लिमांची संस्कृती आणि त्याची स्थापना औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. औरंगाबाद शहरामध्ये दखनी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिला गेला. दखनी भाषेची सुरुवात ही औरंगाबाद शहरापासून आहे. मुहम्मद तुघलकाची स्वारी आल्यानंतर दौलताबादमध्ये राजधानी बनवल्यानंतर त्याने अनेक विद्वानांना आपल्या सोबत आणलं. त्यामध्ये हजरत राजू खत्तान हे बंदान नवाज जे गुलबर्ग्याला खूप मोठे सूफी आहेत, हे तुघलकाच्या सोबत दखनेमध्ये आले ते खुलताबादला, दौलताबादला राहिले आणि त्यांनी इथल्या मुसलमानांशी किंवा येथील स्थानिक लोकांशी संवादाची भाषा म्हणून दखनी भाषेचा वापर केला आणि त्या दखनी भाषेच्या माध्यमातून आपली पहिली साहित्यकृती लिहिली आणि त्या साहित्यकृतीच्या माध्यमातून कुरआनाच्या आयती या ओव्यांच्या स्वरूपात, काव्यांच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दखनी भाषेची सुरुवात, कुरआनप्रणित सांस्कृतिक राजकारणाची सुरुवात ही खुलताबाद, दौलताबाद या दोन महत्त्वाच्या शहरांपासून झाली जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात. त्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद या शहरात जवळपास ७०० सूफींची स्मारकं आहेत, त्या सातशे सुफींनी खुलताबाद शहरात मोठं सुफींची ज्ञानकेंद्र बनवलं होतं, त्या सूफी ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून त्यांनी दखनेमध्ये सूफी चळवळ पसरवण्याच्या, इस्लामचा प्रसार करण्याचा, वारकरी संप्रदायाशी संवाद साधण्याचा, बसव अनुयायांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळे प्रयत्न खुलताबाद, औरंगाबाद शहरांशी जोडले गेलेले आहेत, त्याचा इतिहास औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळे औरंगाबाद हे मुसलमानांचं सांस्कृतिक केंद्र आहे.

त्याचबरोबर औरंगाबाद शहरामध्ये मुसलमानांच्या पाच महत्त्वाच्या राज्यकर्त्यांच्या कबरी आहेत. औरंगाबादशेजारी खुलताबादमध्ये ज्या कबरी राज्यकर्त्यांच्या आहेत त्यामध्ये औरंगजेबाशिवाय बहामनीचा एक प्रमुख राज्यकर्ता अब्दुल्लाह बहामनी यांची कबर आहे, तसेच कुतुबशाहीचा शेवटचा राज्यकर्ता अबूल हसन सालार शाह ज्याला पदच्युत केल्यानंतर औरंगजेबानं खुलताबादमध्ये बंद केलं होतं, त्याची कबरदेखील तेथे आहे, हैद्राबादमधील निजामशाहीचा संस्थापक असणाऱ्या निजाम अली खानची कबर आहे, मलीक अंबर ज्यांना प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी राष्ट्रीय प्रसाद आहेत म्हटलं, त्यांचीदेखील कबर तिथेच आहे. त्याशिवाय अनेक सूफी विचारवंतांच्या, अनेक विद्वानांच्या, कवींच्या कबरीदेखील या औरंगाबाद शहरामध्ये आहेत. त्यामुळे दखनेच्या मुसलमानांचं, मराठी मुसलमानांचं औरंगाबाद शहराशी एक महत्त्वाचं नातं ते या नामांतराच्या माध्यमातून संपवलं जाऊ नये, त्या सांस्कृतिक नात्यावर आघात केला जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

या शहराचं नामकरण ज्यानं या शहराची स्थापना केली त्या मलीक अंबर यांच्या नावावरून अंबराबाद असं करावं. मौलाना आझाद यांच्या नावावरून आझादनगर असं करू शकता किंबा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावावरून कलामाबाद हे नाव देऊ शकलं असतं. हे शहर दखनी मुसलमानांच्या राजवटीचं केंद्र राहिलेलं आहे, दखनी मुसलमानांची राजवट तेथे स्थापन झालेली आहे, मलीक अंबर यांनी तिथे राजकारण केलेलं आहे त्यामुळे अहमदनगरचंही नामकरण करू नये अशी आमची भूमिका आहे. त्याचबरोबर हा देश आम्हाला आपला वाटावा म्हणून तुम्ही ह्या देशात आमच्या खाणाखुणा जपाव्यात येवढीच आमची विनंती आहे. यासाठी आमचा या नामांतराला विरोध आहे.

( उत्तरार्ध)

- शाहजहान मगदुम

8976533404



गेल्या ७० वर्षांत जर कोणते महत्त्वाचे कार्य केले गेले नसेल तर ते मुख्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोणत्या कायद्याद्वारे केली जावी याचा निर्णय घेणे. १९५० सालापासून विविध आयुक्त आणि न्यायाधीशांनी या प्रश्नावर आपले भाष्य केलेले आहे. १९७५ साली तत्कालीन न्यायाधीश व्ही. एम. तारकुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. नंतर १९९० साली दिनेश गोस्वामी समितीने आणि नंतर २००७ व २०१५ साली देखील या मुद्द्यावर विचार झाला होता, पण या बाबतीत कोणता कायदा आजवर झालेला नाही. २०१५ साली निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह लावले गेले होते आणि एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांनी मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवले होते.

सध्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती अशा प्रकारे केली जाते की कायदामंत्री काही उमेदवारांची नावे निश्चित करतात त्यानुसार पंतप्रधानांद्वारे ही नावे राष्ट्रपतींकडे पाठवले जातात आणि राष्ट्रपती पंतप्रधानांशी विचारविनिमय करून या नियुक्त्या करत आहेत. आजवर हीच प्रक्रिया अंमलात येत आहे. नंतर आणखीन काही याचिका मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक युक्तांविषयी न्यायालयात प्रलंबित होत्या. त्या सर्व याचिकांची सुनावणी अगोदर झाली नव्हती. न्या. के. एम.जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गेल्या सप्टेंबर महिन्यात या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि निकाल राखून ठेवला होता. या खंडपीठातील पाच न्यायाधीशांनी सर्वसंमतीने निकाल जारी केला. या निकालात असे म्हटले गेले आहे की जोपर्यंत लोकसभेद्वारे निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकीबाबत कोणता कायदा बनवला जात नाही तोपर्यंत येथून पुढे सर्व नियुक्त्या पंतप्रधान, विरोधीपक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या समितीद्वारे केल्या जातील. या निकालात हेदेखील स्पष्ट केले गेले आहेकी जर लोकसभेत विरोधीपक्षाचा नेता नसेल तर सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला या समितीमध्ये स्थान दिले जावे.

महत्त्वाचा प्रश्न हा नाही की निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कुणी करावी तर प्रश्न असा की या बाबतीत लोकसभेद्वारे ७० वर्षांनंतरही कायदा का करण्यात आला नाही. जी पद्धत सध्या अस्तित्वात आहे याचा फायदा आजवरच्या सर्वच पक्षांच्या सरकारांनी घेतला. आपल्या मर्जीतील निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करून कोणते कोणते राजकीय हित आजवर या सर्वच राजकीय पक्षांनी साध्य केले. निवडणूक आयुक्तांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उभे केले जाऊ नयेत, असे करणे उचित नाही. पण त्याचवेळी मानवी स्वभावाचाही विचार करणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती असो कितीही उच्चपदावर असो ज्या पद्धतीने ज्या सत्ताधाऱ्यांनी त्यांची नियुक्ती केलेली असते त्याव्यक्तीची मर्जी सांभाळणे म्हणजे स्वतःचे हित जपण्यासारखे असते आणि स्वहितासाठी माणूस कोणत्या शासनाचे कोणत्या राष्ट्राचे भले-बाईट याचा विचार करू शकत नाही, कारण हा मानवी स्वभावधर्म आहे. हे चुकत असले तरी काही वेळा अशा समस्यांना त्याला तोंड द्यावे लागते ज्यांची इच्छा नसतानाही त्याला काळजी घ्यावी लागते आणि जर ७० वर्षांत कोणत्याच सरकारने हा कायदा केला नाही तर याचा सरळ अर्थ असाच लावावा लागेल की त्या त्या वेळच्या सरकारांनी आपले हित साध्य केले असेल, जरी त्यांनी तसे केले नसले तरी आजवर कायदा न बनवण्यामागे त्यांची भूमिका कोणती, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेसाठी निवडणूक आयोगाची जबाबदारी किती महत्त्वाची असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की कितीही कडक कायदे आणि नियम केले असले तरी जर राजकीय पक्ष आणि सत्ताधारीवर्गामध्ये त्याबाबतच्या नैतिक मूल्यांचे पालन करायची इच्छाच नसेल तर कोणत्याही कायद्याची पळवाट शोधून काढणे काही अशक्य नसते. यासाठी नैतिकता आणि नीतिमूल्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे असे राजकीय पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी निर्धार केला तरच कायदे व नियमांचे पालन योग्यरित्या होईल. 

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७



फादर हिलेरियन हेगी या ख्रिश्चन धर्मगुरून इस्लाम धर्म स्विकारल्याची बातमी 27 फेब्रुवारी 2023 ला आली आणि अमेरिकेसह युरोपमध्ये खळबळ उडाली. फादर हेगी एक लेख प्रकाशित करून आपण इस्लाममध्ये घरवापसी करत असल्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी ‘रिटर्निंग टू द होम लँड’ असा वापरला. अमेरिकेमध्ये प्रभावशाली लोकांच्या इस्लाममध्ये होत असलेल्या धर्मांतरांमुळे चर्चांना उधान आलेले असून, आता धर्मगुरूही जर इस्लाम स्विकारत असतील तर काय होईल? असा प्रश्न लोक आपसात विचारत आहेत. 

संत हिलेरियन हेगी यांनी स्पष्ट केलेले आहे की, त्यांनी आपले इस्लामी नाव सईद अब्दुल लतीफ असे ठेवलेले आहे. त्यांनी हे ही स्पष्ट केलेले आहे की,  ’’मी अचानक धर्मांतर केलेले नसून गेल्या अनेक वर्षांपासून मी इस्लामचा अभ्यास करत होतो. फक्त इस्लाम स्विकारण्याचा क्षण आता आलेला आहे. माझा हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे आणि इस्लामशिवाय दूसरा सत्य धर्म नाही, असे माझे स्पष्ट मत आहे’’ त्यांनी प्रसिद्ध इंग्रजी कवी टी.एस. एलीयट यांच्या कवितेच्या ओळी उधृत करून म्हटलेले आहे की, ’’ श्रद्धेच्या बाबतीत मनावर कोणाची सक्ती चालत नाही. संत हिलेरियन हेगी यांचा जन्म हंग्रीमध्ये 1980 च्या दशकात झालेला असून, सध्या ते 40 वर्षांचे आहेत. त्यांनी 14 वर्ष चर्चमध्ये सेवा दिलेली असून, त्या दरम्यान ते नियमितपणे इस्लामवर टिका करायचे. ते कट्टर कॅथलिक होते. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर असे लिहिले आहे की, खरे तर इस्लामचे स्फुलिंग माझ्या मनामध्ये 20 वर्षापूर्वीच फुलले होते.’’ त्यांचा समावेश ख्रिश्चन जगाच्या आघाडीच्या धर्मगुरूमध्ये होत होता. ते आपल्या अगदी तरूण वयापासून धर्मगुरू म्हणून काम करत होते. आणि ते एक मीडिया फ्रेंडली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पुढे लिहिलेले आहे की, एक व्यक्ती  आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून आणि वैयक्तिक जीवनामध्ये मुस्लिम म्हणून वावरू शकत नाही. त्यांनी सांगितले की, ’’कुरआनच्या अभ्यासामुळे ते इस्लामकडे वळले. कुरआनमध्ये जो मार्ग दाखविले आहे तोच मार्ग प्रेषित मोजेस, प्रेषित झिजस क्राईस्ट आणि प्रेषित अब्राहम अलै यांनी दाखविला होता आणि त्याच परंपरेची अंतिम कडी प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. याचा मला विश्वास झाला. शिवाय, इस्लाममध्ये ईश्वरासमोर सरेंडर (लीन) होणे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही किंवा ते कुठल्या संताच्या, ईशदुताच्या किंवा इतर लोकांच्याही ईच्छेवर अवलंबून नाही. ते फक्त ईश्वरी इच्छेवर आहे. त्यासाठी त्यांनी सुरे आराफच्या आयत नं. 172 चा संदर्भ दिला आहे. ‘‘आणि हे नबी (स.), लोकांना आठवण करून द्या त्या प्रसंगाची जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने आदमच्या संततीच्या पाठीतून समस्त मानवजातीला अस्तित्वात आणले होते आणि त्यांना स्वतः त्यांच्यावरच साक्षीदार ठरवीत विचारले होते, ’’काय मी तुमचा पालनकर्ता नाही?’’ त्यांनी सांगितले, ’’निश्चितच आपण आमचे पालनकर्ता आहात, आम्ही याची ग्वाही देतो,’’ हे आम्ही याकरिता केले की एखादे वेळी पुनरुत्थानाच्या दिवशी असे सांगू नये की, ’’आम्ही तर या गोष्टीपासून अनभिज्ञ होतो.’  (सुरे आराफ 7: आयत नं. 172) 


लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया म्हणजे दूध उकळून लोणी काढण्यासारखे असते. दूध जर विषारी असेल तर लोणी त्याहून जास्त विषारी निघते. जनता भ्रष्ट असेल तर निवडून गेलेले लोक महाभ्रष्ट असतात. आपल्या देशात हेच होत आहे.



इसी जगह इसी दिन तो हुआ था एलान

अंधेरे हार गए जिंदाबाद हिंदुस्तान

कुठल्याही सरकारची रचना त्या देशातील जनतेच्या कल्याणासाठी केली जाते. शासन हे सरकारच्या आधीन असतं. त्याच्या मदतीने जनकल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच लोकशाहीला लोकांची, लोकांच्या कल्यासाठी चालविली जाणारी शासनपद्धती म्हणून ओळखतात. या कसोटीवर 1947 पासून आतापर्यंत देशात, केंद्रात आणि राज्यात आलेल्या सर्व सरकारांच्या रचनेकडे पाहिले असता हा प्रश्न उपस्थित होतो की खरंच या सरकारांनी जनकल्याणाचे आपले उद्देश्य साध्य केेले काय? 

कुठलाही समजदार माणूस या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक देऊ शकणार नाही. म्हणायला देशाचा विकास झालाय, काही क्षेत्रात देशाने नेत्रदिपक प्रगती केलीय मात्र व्यापक जनकल्याणाचा विषय त्यातून साध्य -(उर्वरित पान 7 वर)

झालेला नाही. याचा पुरावा म्हणजे आज 75 वर्षानंतरही 130 कोटी जनतेपैकी 80 कोटी लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी सरकारी अन्नधान्य दुकानातून मिळणाऱ्या मोफतच्या रेशनवर अवलंबून रहावे लागते. यातच सर्वकाही आले. 75 वर्षाचा हा कालावधी काही कमी नाही. मात्र या 75 वर्षात देशात राहणाऱ्या लोकांचे कल्याण का झाले नाही? गरीबांची संख्या सातत्याने का वाढत आहे? एवढा मोठा देश आणि एवढी मोठी नैसर्गिक साधनसंपत्ती असतांना सुद्धा लोकांना रोजगार का मिळत नाही? काही लोक तर एवढे निराश का झालेले आहेत? की त्यांनी रोजगार शोधण्याचे प्रयत्नच सोडून दिले आहेत? गरीब आणि श्रीमंत यांच्यातील खाई उत्तरोत्तर का रूंद होत आहे. काही ठराविक लोकांची संपत्तीच कॅन्सरसारखी का वाढत आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत का होत आहेत? 75 वर्षानंतर सुद्धा मुलींना जन्म घेण्याचा अधिकार का नाकारला जात आहे? वेश्या व्यवसाय का फोफावत आहे. घरेलू हिंसा का वाढत आहे? दारू आणि ड्रग्जच महापूर का आलेला आहे? शेतकऱ्यांच्याच नव्हे तर व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या का होत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने वारंवार तंबी देऊनही काही नेते आपल्याच देशातील काही नागरिकांच्या विरूद्ध घृणा पसरविणारी भाषणे का करत आहेत? निरपराध लोकांची मॉबलिंचिंग का होत आहे? मॉबलिंचिंग करणाऱ्यांना शिक्षा का होत नाहीये? 

या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे सत्ता वाईट चारित्र्याच्या लोकांच्या हातात आहे. हे जरी खरे असले की सरसकट सगळेच राजकारणात चरित्रहीन  आहेत. मात्र बहुतेक चरित्रहीन आहेत आणि जे चरित्रहीन नाहीत त्यांच्या हातात फारसे काही नाही, हे मनमोहनसिंग यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून सहज लक्षात येते. चारित्र्यहीन या शब्दाचा अर्थ येथे व्यापक स्वरूपात अभिप्रेत आहे, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलेलेच असेल. 

खऱ्या लोकशाहीचा मुलभूत आधार

खऱ्या लोकशाहीचा मुलभूत आधार काय आहे याविषयी जमआते इस्लामी हिंदची काय धारणा आहे, याचे अवलोकन करणे नितांत आवश्यक आहे, असे माझे मत आहे. ती धारणा खालील शब्दात. ’’लोकशाहीच्या रक्षणाची सतत काळजी घ्यावी लागते. चांगली माणसे निवडून जातील, हे पहावे लागते.  खऱ्या लोकशाहीचा मूलभूत आधार हाच आहे. त्यासाठी जनतेला सदैव जागृत रहावे लागते. इतिहास साक्षी आहे, जेव्हा-जेव्हा या कर्तव्याप्रती जनतेकडून बेपर्वाई दाखविण्यात आली तेव्हा-तेव्हा लोकशाही मुल्यांची पायमल्ली झाली आहे. म्हणून जमाअते इस्लामी हिंदची केंद्रीय सल्लागार समिती जनतेला आठवण करून देऊ इच्छिते की देशाच्या लोकशाहीला यथायोग्य व निरोगी मूल्यांवर कायम राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. 

केंद्रीय सल्लागार समिती सर्वसामान्यपणे येथील जनतेला व विशेषकरून सर्वच राजकीय पक्षांना असे आवाहन करते की आपल्या देशासमोर ज्या बिकट समस्या उभ्या आहेत, त्या सोडविण्यासाठी त्यांनी अधिकाधिक सहकार्य करावे व गटबाजीऐवजी परस्परांशी विधायक स्वरूपाचे सहकार्य करण्याचे वर्तन स्वीकारावे.

केद्रीय सल्लागार समितीचा असा विश्वास आहे की खरी लोकशाही त्याच वेळी मूळ धरू शकते जेव्हा समाजातील व्यक्ती अहंकारापासून, आत्मप्रियतेपासून व बुद्धी व विचारांसंबंधी स्वतःची मक्तेदारी या सारख्या घातक विकारांपासून मुक्त राहील. अशा कल्पनांत माणूस विशेषकरून सत्ता मिळाल्यानंतर गुरफटत असतो. तसेच खरी लोकशाही त्याच वेळी मूळ धरू शकते, जेव्हा लोकांत विनम्रपणा निर्माण होईल. जेव्हा ज्ञान व बुद्धी यांच्या दृष्टीने आम्हीही इतर माणसांप्रमाणे अपूर्ण आहोत म्हणून आम्हालाही इतर माणसांच्या सल्ल्यांची व त्यांच्या सहकार्याची गरज असते, याचे भान त्यांच्यात निर्माण होईल. तसेच इतर माणसांनाही तेच हक्क व अधिकार आहेत जे आमचे आहेत व इतर माणसांप्रमाणेच आमचीही काही कर्तव्ये आहेत, अशी जाण त्यांच्यात निर्माण होईल.

जमाअते इस्लामी हिंदच्या आवाहनातील, दोन मौलिक तत्त्वे; ईश्वराची बंदगी व त्याच्याकरवी जाब विचारणा आणि मानवी एकता हे लोकशाहीसाठी यथायोग्य आधारभूत पाया उपलब्ध करतात. सर्व माणसे ईश्वराचे दास असून सर्वांनी ईश्वराचे दास बनून राहिले पाहिजे, ही श्रद्धा माणसाला गर्व व अहंकारापासून, घमेंड व आत्मप्रेमापासून तसेच आपण ज्ञानात परिपूर्ण व चुकीपासून मुक्त आहोत, अशा दर्पापासून दूर ठेवते. अशा प्रकारची महानता ईश्वरालाच शोभते. तोच सर्वाधिकारी आहे. त्याचेच ज्ञान व त्याचेच शहाणपण चुकांपासून मुक्त आहे. त्याचे सर्व दास त्याचे गरजवंत आहेत व ते सर्व ज्ञानात व बुद्धीत अपूर्ण आहेत. या वास्तवतेचा त्यांना विसर पडता कामा नये. त्याचप्रमाणे मानवी एकतेच्या कल्पनेमुळे माणसा-माणसात समानता व परस्परांशी सहकार्य व सल्लामसलत करण्याची वृत्ती निर्माण होते.

केंद्रीय सल्लागार समितीचा असा विश्वास आहे की राजकीय जीवनात लोकशाहीची स्थापना त्याचवेळी शक्य होईल, जेव्हा सामाजिक जीवनात न्याय व समानतेच्या तर आर्थिक जीवनात परस्पर सहकार्याची व एकमेकांचे भार उचलण्याच्या पद्धत स्वीकारल्या जाईल. अन्याय व असमानता, भेदभाव व पक्षपाती वर्तन, द्वेषमूलक संघर्ष व शोषण अशा गोष्टींवर आधारलेला समाज, ज्यांच्यात लोकांची बहुसंख्या, गरिबीच्या, अस्पृश्यतेच्या, मागासलेपणाच्या व निरक्षरतेच्या दलदलीत अडकलेली आहे, त्याने लोकशाही व्यवस्था अंगिकारली असली तरी लोकशाहीच्या खऱ्या आत्म्यापासून तो वंचित राहील. ईश्वरभक्ती व तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या नैतिक मूल्यांच्या जोपासनेमुळेच आम्ही लोकशाहीसाठी घातक असलेल्या आपत्तीपासून मुक्ती प्राप्त करू शकतो. (संदर्भ : केंद्रीय सल्लागार समिती जमाअते इस्लामी हिंदचा ठराव : मार्च 1977).

लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया म्हणजे दूध उकळून लोणी काढण्यासारखे असते. दूध जर विषारी असेल तर लोणी त्याहून जास्त विषारी निघते. जनता भ्रष्ट असेल तर निवडून गेलेले लोक महाभ्रष्ट असतात. आपल्या देशात हेच होत आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा जो क्रायटेरिया आहे तो चुकीचा आहे. जे नेते जनतेच्या चुकीच्या मागण्या मान्य करतील त्यांनाच निवडून देण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पैसे घेवून मतदान केले जाते. हा जनतेचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे निवडून आलेले लोक जनतेला घाबरत नाहीत आणि मनसोक्त राजकीय लाभ घेऊन संपत्ती गोळा करण्याला भ्रष्टाचार समजत नाहीत. म्हणून नेते भ्रष्टाचार निर्मुलन कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. सर्वपक्षीय प्रथम फळीच्या नेत्यांच्या संपत्तीच्या आलेखाकडे एक नजर जरी टाकली तरी एक गोष्ट लक्षात येते की, पूर्णवेळ राजकारणात राहून त्यांची आर्थिक प्रगती नेत्रदिपक अशी झालेली आहे. त्याचवेळी जनतेची संपत्ती मात्र कमी-कमी होत आहे. या सर्व दुष्टचक्रासाठी नेते नाही तर भ्रष्ट जनता जबाबदार आहे. 

- एम.आय. शेख


महाराष्ट्राची एकात्मतेची आणि शांततेची संस्कृती बिघडविण्याचा सातत्याने होतोय प्रयत्न !


महाराष्ट्रावर सध्या चोहोबाजूंनी आक्रमण सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सहिष्णुतेवर कुठल्या न कुठल्या प्रकारे हल्ला चढवला जात आहे. कधी शासकीय संस्थांना हाताशी धरून तर कधी संवैधानिक मुल्य पायदळी तुडवित. लोकशाहीत लोकांना बोलायचा अधिकार आहे मात्र कायदा सुव्यवस्था बिघडून लोकांची मने दुखविण्याचा अधिकार मुळीच नाही. महाराष्ट्रातील नेते अजूनही उघडपणे धार्मिक द्वेषाचे बोलत नाहीत परंतु, हे राज्याबाहेरील नेते बोलावून आपले राजकीय हित साधत असल्याचे पहावयास मिळत आहे. धार्मिक द्वेष वाढेल असे वक्तव्य करण्यात तेलंगणाचे आमदार टी.राजासिंग आणि सुदर्शन चॅनलचे चव्हाणके आघाडीवर आहेत. अशा व्यक्तींना वारंवार शांततेचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातुरात बोलावून वातावरण खराब करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत घटनेच्या दहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

वाचाळवीर, द्वेष पसरविणाऱ्या मंडळींना बोलावण्यात साहजिकच भाजप आणि त्यांच्या समविचारी संघटना आघाडीवर होत्या. खासदार, आमदार आणि काही संघटनांनी मिळून धार्मिक द्वेष वाढेल अन् महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेत आपल्याला एकगठ्ठा मत मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आखलेला डाव दिसतोय, अशी प्रतिक्रिया  जनसामान्यांतून उमटत आहे.     

इतिहास विकृत करून सांगणे आणि धार्मिक द्वेष वाढेल अशी वक्तव्य करणे भाजप व त्यांच्याशी निगडित संघटनांचे रोजचचे काम झाल्याचे कुठे ना कुठे पहायला मिळत आहे. खरंच धार्मिक द्वेष आणि इतिहासाची विकृती करून लोकांसमोर सादर करण्याने काय महाराष्ट्राचा वा देशाचा सर्वांगीण विकास होणार आहे? निश्चितच नाही. परंतु, लोकशाही आणि संविधानाला तोडून मोडून आपले इप्सित साध्य करण्याकडे काही लोक लागले असल्याने महाराष्ट्रातील एकात्मताप्रिय जनतेत अस्वस्थता पसरली आहे. महापुरूषांच्या जयंती साजरी करताना त्यांचे सत्य विचार सांगून जनतेला नैतिक मार्गाकडे वळविण्याऐवजी त्यांच्याच पुतळ्याखाली थांबून द्वेषी विचार लोकांत पसरवून वातावरण खराब करण्याचे काम राजनीतिक हव्यासापोटी केले जातेय असे दिसून येत आहे. 

नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लातूर येथे तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या गोशामहाल मतदारसंघाचे आमदार टी. राजासिंग यांना भाजप व त्यांच्या समविचारी संघटनांनी बोलावले होते. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल  रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. समारोप कार्यक्रमात आमदार टी. राजासिंग यांनी आक्षेपार्ह भाषण केले. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला. समाजात द्वेष निर्माण होईल, अशी वक्तव्य करण्यात आली. या कार्यक्रमात खा.सुधाकर शृंगारे,  माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांसहित भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रॅलीतील लोक समोर बसलेले होते. 

यावेळी आमदार टी. राजासिंगच्या भाषणाचे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरले. समाजमाध्यमांवर आणि शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. लातूर हे शांततेचे शहर असल्याने येथील सुजान नागरिकांनी आयोजकांवर टिका करायला सुरूवात केली.  छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यामध्ये लातुरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मावळे सामील असतात. त्यामुळे या घटनेचे पडसाद जनसामान्यांत मोठ्या प्रमाणात उमटले आणि आयोजकांसह आमदार टी. राजासिंग यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. पोलिस अधीक्षकांसह प्रशासनाला लातुरातील सर्व शांतताप्रिय संघटनांना ज्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जमाअते इस्लामी हिंद, जमियते उलेमा हिंद, दलितबांधवांच्या संघटनांनी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या मागणीची निवेदने दिली. काहींनी पोलिस अधीक्षकांसमवेत लातूरच्या एकात्मतेचा वारसा निदर्शनास आणून दिला आणि टी.राजासिंगवर कारवाईची मागणी केली. सध्या सर्वत्र भाजपाप्रणित सरकार असल्याने प्रशासनाला ताक फुकून प्यावे लागत आहे. त्यामुळे अखेर लातूरच्या पोलिस प्रशासनाने याबाबत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता संचालनालयाला आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी अभिप्राय मागितला तो सोमवारी प्राप्त झाला. जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल, असे वक्तव्य केल्याचे अभिप्रायात म्हटले आहे.

त्यावरून घटनेच्या दहा दिवसानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 28 फेब्रुवारी रोजी पोलिस उपनिरिक्षक पंकज नीळकंठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार टी. राजासिंग लोध विरोधात गु.र.नं.90/2023 कलम 145 (अ), 153 (ब),294 (अ), 505 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विशाल शहाणे करीत आहेत. 

लातूर शांततेचे शहर आहे आणि हे शिक्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. उद्योग, व्यापार येथे भराभराटीस येत आहेत. 40 हजारांहून अधिक जिल्ह्याबाहेरील राज्यातील मुलं-मुली येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे शांतता अबाधित असणे गरजेचे आहे. अशातच येथील नागरिक संवेदनशील असल्याने त्यांनी पुढाकार घेत शहर शांत ठेवले आणि पोलिसांना आ. टी. राजासिंग आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

लातूरच्या सूजान नागरिकांनी शांतता आणि एकात्मतेचे प्रदर्शन करीत कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम केले. मात्र इतर ठिकाणी असे होईलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक शहरातील नागरिकांनी धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या तसेच शांतता आणि एकात्मतेला धक्का पोहोचविणाऱ्या राजकीय नेते आणि संघटनांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने पुढे येत गुन्हे दाखल केले पाहिजेत. तेव्हाच अशा वाचाळविरांना लगाम लागेल. 

महाराष्ट्रात राजकीय वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या राजकारण्यांना संवैधानिक मार्गाने धडा शिकविणे हीच सध्याची निकडीची गरज आहे. जिथे शांतता आणि एकोपा नांदतो तिथे प्रगतीचे द्वार उघडतात. महाराष्ट्राला संत परंपरा आणि दिशादर्शक महापुरूषांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे अजूनही इथली जनता त्यांच्या विचारांना आदर्श माणून चालते. संयम आणि धैर्याने वाईटाचा प्रतिकार करते. मात्र हल्ली लोकशाहीचे स्तंभ धडाधडा कोसळू लागल्याने एकात्मताप्रिय जनता कुठेतरी निराश होताना पहायला मिळत आहे. अशातच सामाजिक आणि सांस्कृतिक वारश्यांना विकृत करून समाजासमोर मांडले जात असल्याने मने दुभंगत आहेत. त्यामुळे लेखक, सुजान नागरिक, पत्रकार आणि  प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढे येत महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का लागणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावा, अशी मागणी करीत मी थांबतो. 


-बशीर शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget