Halloween Costume ideas 2015

मुस्लिम महिलांची नव्याने विटंबना करण्याचा प्रयत्न


जुलै 2021 मध्ये सुल्ली डील नावाच्या अ‍ॅपवरून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर सक्रीय असलेल्या 83 मुस्लिम महिलांचे फोटो टाकून त्यांचा लिलाव करण्याचा घृणास्पद प्रकार पुढे आला होता. तेव्हा एफआयआरही दाखल झाले होते. परंतु, कोणालाही अटक झालेली नव्हती. म्हणून त्यांची किंवा त्यांच्या सारखी मानसिकत ठेवणाऱ्या दूसऱ्या संगणक गुन्हेगारांची हिम्मत इतकी वाढली की, बुल्ली डील नावाने नव्या अ‍ॅपवर पुन्हा 112 सक्रीय मुस्लिम महिलांचा लिलाव पुकारण्यात आला. मुळात ही मुस्लिम स्त्रियांची विटंबना नव्हे तर पुरूषांच्या विकृत मानसिकतेचे हे प्रदर्शन आहे. यात फक्त मुस्लिम महिलांचे फोटो असल्यामुळे ज्यांना, ’’आपल्याला काय त्याचं’’ असे वाटत असेल. त्यांनी लक्षात घ्यावे की, ज्याप्रमाणे बलात्कार फक्त मुस्लिम महिलांवरच होत नाहीत तर हिंदू महिलांवरही होतात, लिंचिंग फक्त मुस्लिमांचीच होत नाही तर हिंदूंचीही होते. तसेच हा लिलावाचा प्रकार सुद्धा हिंदू महिलांचा होण्यास वेळ लागणार नाही. किंबहुना दिल्लीच्या एका सामाजिक्नलबच्या हिंदू महिलांचा सुद्धा असाच जाहीर लिलाव या विकृत लोकांनी लावला होता. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, मागच्या वेळेस फक्त एफआयआर दाखल करून शांत बसलेल्या दिल्ली पोलिसांसारखी भूमीका मुंबई पोलिसांनी न घेता त्यांनी एफआयआर दाखल करून उत्तराखंडमधून श्वेता सिंग या 18 वर्षीय मुलीला व बिहार मधून विशाल झा तर कर्नाटकामधून एक अशा तीन आरोपींना तात्काळ अटक केली. याबद्दल मुंबई पोलिसांचे हार्दिक अभिनंदन. यासोबतच पोलिसांना एक विनंती अशी की ज्यांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केले, लाईक, कॉमेंट केले तसेच बोली लावली अशांनाही अटक करावी. जेणेकरून भविष्यात हे पुन्हा असे करण्याचे धाडस करणार नाहीत. यात श्वेता सिंग या मुलीचा सहभाग आश्चर्यचकित करणारा आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी माध्यमांना बोलताना असे सांगितले की, तिला क्षमा करावी कारण तिची मनस्थिती बरोबर नसावी. कोरोना काळात तिचे आई आणि वडिल या दोघांचा मृत्यू झालेला आहे. वडिलधाऱ्या महिलांनी तिची भेट घेऊन समुपदेशन करायला हवे. विशाल झा याचे नाव सुल्ली डीलच्या वेळेसही पुढे आले होते. 

मुस्लिम महिला किती दृढ मानसिकतेच्या असतात याचा अनुभव देशाला सीएए, एनआरसी आंदोलनामध्ये आलेलाच आहे. मुस्लिम महिला या इमानवंत असतात. आत्मविश्वासाने ओतप्रोत असतात. ईश्वराशिवाय कोणालाच घाबरत नाहीत. त्यामुळे अशा पुचाट लिलावाला भीऊन त्या मागे हटतील, असे मुळीच नाही. याच आठवड्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांची आठवण केली गेली. महिलांच्या  उद्धाराला त्यांनी लावलेल्या हातभाराचे कौतुक केले गेले. त्यांच्या कार्याला सक्रीय सहकार्य केलेल्या फातीमा यांचीही आठवण केली गेली. नुकत्याच निवर्तलेल्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली. हा पुरूषांचा असा चेहरा आहे ज्याबद्दल आदर द्विगुणित व्हावा. परंतु, याच देशामध्ये श्वेतासिंग आणि विशाल झा सारखे विकृत मानसिकतेचे पुरूषही आहेत. ज्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

वेगवेगळ्या अ‍ॅपमधून केल्या जाणाऱ्या बदनामीच्या बाबतीत तो अ‍ॅप बंद करून कारवाई झाली असे मानण्याचा प्रघात आपल्या समाजात पडलेला आहे. परंतु, ही कारवाई नव्हे कारण नवीन अ‍ॅप तयार करायला काही मिनीटाचाच कालावधी लागतो. कारण या प्रकरणात तसेच झालेले आहे. सहा महिन्यात दुसरे अ‍ॅप पुढे आलेले आहे. मुस्लिम महिलांच्या या विटंबनेच्या या प्रयत्नाला एक स्वतंत्र घटना म्हणून पाहता येणार नाही. ही घटना त्या मानसिकतेचीच एक अभिव्यक्ती आहे. जी मानसिकता धर्मसंसदेच्या माध्यमातून मुसलमानांचे शिरकान करण्याचे आव्हान करते. 

आसीफा सारख्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढते. मुस्लिमांची मॉबलिंचिंग करते. त्यांच्याशी फटकून वागते. पावलोपावली त्यांच्याशी भेदभाव करते. सर्वधर्म समभावनेचे सर्वोच्च प्रतिक महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना करते आणि सांप्रदायिक मानसिकतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नथुराम  गोडसेची स्तुती करते. पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचे आभार. यात मुस्लिम महिलांची विटंबना झाली नाही, हे पुन्हा एकदा निक्षुण सांगते. 

- मिनाज शेख, पुणे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget