Halloween Costume ideas 2015

लॉकडाऊनमुळे आत्महत्यांचा प्रश्‍न आणखीन बिकट बनला


एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) ने 2019 मध्ये भारतीय नागरिकांनी केलेल्या आत्महत्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. ही आकडेवारी भीतीदायक आहे. या आकडेवारीनुसार 2019 मध्ये 1 लाख 39 हजार लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी 93 हजार 061 तरूण होते. 1 ते 45 वर्षे वयोगटातील 67 टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. हा वयोगट तरूण वयोगट मानला जातो व देशाच्या भरभराटीमध्ये मोलाची कामगिरी बजावणारा असतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरूणांनी केलेल्या आत्महत्यांमुळे देशाची अपरिमित हानी झाली याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मागच्या म्हणजे 2018 च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये आत्महत्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे. गळफास लावून घेणे ही आत्महत्येची सर्वसामान्य पद्धत आहे. 2019 मध्ये 53.6 टक्के लोकांनी गळफास लावून आपले जीवन संपविले.
    युवकांच्या आत्महत्यांच्या प्रमुख कारणांचे विश्‍लेषण एनसीआरबीने पुढील प्रमाणे केलेले आहे - कौटुंबिक कलह, प्रेम, मादक पदार्थांचे सेवन आणि मानसिक आजार ही प्रमुख कारणे आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेली आहेत. कौटुंबिक कलह आणि मानसिक आजारामुळे आत्महत्या केलेल्या लोकांमध्ये पुरूषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. कौटुंबिक कलह आणि हुंडाबळी यासारखी कारणे महिलांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेली आहेत. प्रेम प्रकरणातून आत्महत्या केलेल्यांपैकी 62 टक्के लोक अमली पदार्थ आणि दारूच्या आहारी गेलेले होते.
    या आकडेवारीवरून एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, भारतीय समाजामध्ये कौटुंबिक कलह आणि व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढलेले आहे. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये तर कोविडने माणसांच्या जीवनावर खोलवर परिणाम केलेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देश कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेला आहे. यात पुरूषांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांच्यात विचित्र असे मानसिक बदल झालेले आहेत. सातत्याने घरात राहणे ही पुरूष प्रवृत्ती नव्हे. नाइलाजाने घरात रहावे लागत असल्याकारणाने पुरूषांमध्ये आळशीपणा, व्यसनाधिनता आणि हिंसक वृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता जेव्हा लॉकडाऊन जवळ-जवळ संपलेला आहे. बदलत्या परिस्थितीशी स्व:ला जुळवून घेणे पुरूषांना कठीण जात आहे.
    लॉकडाऊनमुळे अनेकांना मानसिक आजार उत्पन्न झालेले असून, त्यातूनच स्व:ला इजा करून घेणे आणि आत्महत्या करणे यासारखे टोकाचे पाऊल अनेक लोकांनी उचललेले आहे. उदाहरणादाखल लॉकडाऊनच्या एप्रिल ते जुलै या काळात गुजरातमध्ये 108 आपात्कालीन रूग्णवाहिका सेवेकडे स्व:ला जखमी केलेल्या 800 तर आत्महत्या केलेल्या 90 घटनांची नोंद झालेली आहे. एकट्या गुरूग्राममध्ये 160 लोकांनी या काळात मानसिक तणाव सहन न झाल्याने आत्महत्या केलेल्या आहेत.
    नैराश्य येण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आपल्याला कोरोना होईल, ही प्रमुख भीती आहे. साधा ताप जरी आला तरी अनेक लोक खचून जात आहेत. अनेक कोविडग्रस्त रूग्णांनी रूग्णालयाच्या इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या केलेल्या आहेत. या काळात व्यापार आदीमध्ये झालेले नुकसान, गेलेल्या नोकर्‍या व त्यामुळे वाढलेली आर्थिक चणचण, बँकांचे थकलेले ईएमआय, भविष्यातील अनिश्‍चितता, बंद पडलेले शिक्षण, कठीण झालेले विवाह इत्यादी कारणांमुळे लोकांमध्ये विशेष: तरूणांमध्ये आत्महत्या करण्याइथपर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.

- उपाय -
    कुरआन एक ईश्‍वरीय ग्रंथ असून, त्यामध्ये जगातील सर्व माणसांच्या जीवनात उत्पन्न होणार्‍या सर्व समस्यांचे उपाय देण्यात आलेले आहेत. फक्त प्रश्‍न विश्‍वास ठेवण्याचा आहे. कोविड काळामध्ये स्व:ला सांभाळण्यामध्ये श्रद्धावान मुस्लिमांना कुठलीच अडचण आलेली नाही, असे एकंदरित चित्र आहे. याचे कारण त्यांची इस्लामी श्रद्धा आहे. कुरआनमध्ये अल्लाहने फरमाविले आहे की, 


    1.”स्व:चा आत्मघात करू नका. खात्री बाळगा अल्लाह दया करेल” (संदर्भ : सुरह निसा,आयत क्र. 29).
    2. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले की, ”नाउमेदी कुफ्र है” 


 तसे पाहता कुरआनमध्ये माणसांना जीवंत राहण्याची उर्मी निर्माण करणार्‍या अनेक आयती आहेत. शिवाय, याच अर्थाची अनेक प्रेषित वचने आहेत, उदाहरणादाखल फक्त एक आयत आणि एक प्रेषित वचन वर नमूद केलेले आहेत. फक्त श्रद्धावान मुस्लिमांनाच या दोन्ही आदेशांमध्ये जीवंत राहण्याची ऊर्जा किती ठासून भरलेली आहे, याची अनुभूती होईल. इतरांसाठी मात्र ते फक्त दोन वाक्य आहेत.
    नैराश्य आणि हताशपणा येणे सामान्य बाब आहे. तो सर्वांच्याच जीवनामध्ये येत असतो. किंबहुना तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मात्र इस्लामी इबादतीतून मिळणार्‍या उर्जेमुळे श्रद्धावान मुस्लिम त्यावर लिलया मात करू शकतात. सातत्याने होणार्‍या जातीय दंगली, त्यातून घरादारांची होणारी राख रांगोळी आणि जीवहानी, न केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये झालेल्या अटका, युएपीएच्या दुरूपयोगामध्ये अडकलेली तरूणाई, पावलोपावली होणारा भेदभाव, मॉबलिंचिंग, घोर दारिद्रय, उठसूठ पाकिस्तानला निघून जा म्हणून केली जाणारी अवहेलना, संसाधनाची प्रचंड उणीव आणि शिक्षणाचा अभाव, एवढ्या प्रचंड समस्या पाचवीला पुजलेल्या असतांनासुद्धा देशातील मुस्लिम समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण नगण्य आहे. त्याचे कारणच कुरआनमधून मिळालेली शिकवण, त्यातून निर्माण झालेली आशा, इस्लामी इबादतींमधून निर्माण झालेली ऊर्जा. वरील सर्व संकटावर मात करण्यासाठी सातत्याने धैर्य देण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. म्हणूनच  लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अनेक संकटांना पचवून मुस्लिम समाज पुन्हा उभारी घेईल, यात एक इस्लामचा विद्यार्थी या नात्याने किमान माझ्या मनात तरी शंका नाही. इस्लाम विषयी असलेल्या गैरसमजाला तिलांजली देऊन, पक्षपाती दृष्टीकोण बाजूला ठेऊन, किमान देशाच्या तरूणाईला वाचविण्यासाठी तरी इस्लामचा प्रत्येकाने अभ्यास करावा, एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

- एम.आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget