Halloween Costume ideas 2015

नेहमी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने जगा


आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे निराकरण नसून स्वतःला दुर्बल समजण्याची भीती बाळगून जीवन संपविणे होय. आयुष्यात कोणाला त्रास नाही? कोणाला कमी तर कोणाला अधिक असतो आणि वेळ नेहमीच सारखी राहत नाही, वेळ बदलत असतो, आणि बदलतच राहणार. आयुष्य प्रत्येकाला संधी देते कधी लवकर तर कधी उशीरा, फक्त कठोर परिश्रम करणे, हे आपले काम आहे. दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण फारच वाढत आहे. दर वर्षी, दशलक्षाहूनही अधिक लोक स्वतचे जीवन संपवतात. डब्ल्यूएचओच्या मते, दररोज सुमारे 3000 लोक आत्महत्या करतात आणि आपल्या देशातील सुमारे चारशे लोक दररोज नैराश्याने ग्रस्त होवून दुःखाने आत्महत्या करतात. सर्वाधिक आत्महत्या करण्याचे प्रमाण असलेल्या देशांमध्ये भारत मोजला जातो. 78 टक्के जागतिक आत्महत्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. भारतातील आत्महत्येचे प्रमाण जागतिक सरासरीच्या 60 टक्क्यांहून अधिक आहे. आतातर कोरोना काळात आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. भारतात दर एक लाख लोकांमध्ये 11 लोक आत्महत्या करतात, यात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात होतात.
आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या संदर्भात ”जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” देश, संस्था, समुदाय आणि व्यक्तींकडून संयुक्त प्रयत्नांसाठी कारवाईचे आवाहन आहे. जगातील आत्महत्येच्या वाढत्या प्रवृत्तीवर या समस्येबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या उद्दीष्टाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन सुरुवात केली होती. 2003 पासून प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबर रोजी “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” म्हणून साजरा केला जातो. या वर्षी “आत्महत्या रोखण्यासाठी एकत्र काम करूया” ही थीम आहे.
आधुनिक जीवनशैलीत आत्महत्येचे प्रमाण फार वाढले :- आजच्या आधुनिक युगात माणूस धावपडीच्या जगात व्यस्त आहे आणि आपल्या आदर्श, संस्कृती, निसर्गापासून दूर होत आहे. सगळीकडे स्वार्थीपणा, अभिमान, देखावा, द्वेष, चिडचिडेपणा, प्रदूषण, शोर व सर्वांना शॉर्टकट मार्गाने लवकर पैसे कमवायचे, नशा, भेदभाव, भेसळ, निकृष्टता, भ्रष्टाचार, तणाव, नकारात्मक विचार, भीती, नैराश्य यासारख्या कारणांमुळे मानवाची मानसिकता खराब होत आहेत. मानसिक रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत ज्यामुळे सध्या मानवांमध्ये लवकरच राग येतो आणि सहनशीलता कमकुवत आहे. मानवांवर अशी वाईट परिस्थिती येणासाठी फार प्रमाणात मानवच जबाबदार आहे. आज एखाद्याच्या आनंदात आनंदी होण्याऐवजी माणसाला हेवा वाटतो आणि ही प्रवृत्ती सतत वाढतच जात आहे. माणसाचे आयुष्य मौल्यवान आहे, त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. माणूस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबात त्याचे स्थान कायमचे रिक्त राहते. आत्महत्या केलेल्या व्यक्तिच्या गेल्यावर त्याचा कुटुंबाची काय अवस्था असते हे शब्दात सांगणे कठीण आहे.
जगात प्रत्येक चाळीस सेकंदाला आत्महत्या होतात. आर्थिक संकटातून शेतकरी आत्महत्या, घरगुती महिलांची आत्महत्या, परीक्षेत नापास, बेरोजगारीमुळे, प्रेम प्रकरणात अपयश, गंभीर आजारपण, वाईट वर्तन, हुंडा, वाद, संघर्ष, अत्याचार, कौटुंबिक कलह यासारख्या समस्या आत्महत्यांचे प्रमाण वाढवतात. बहुतांश आत्महत्येचे प्रमाण तरूणात अधिक आहेत आणि आता अगदी अल्पवयीन मुलांमध्येही आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल उग्र होणे, निर्बुद्धिपणा, राग येणे, अपयशावर स्वताला कमी लेखणे, कमजोर समझणे, अयोग्य गोष्टिसाठी हट्ठपणा, इंटरनेटचे व्यसन हे देखील आत्महत्या वाढविण्यात जबाबदार आहे. आतातर देशात वृद्धाश्रम सतत वाढत आहेत आणि लोकांना स्वतः साठी मोकळेपणा ऐकटेपणा मिळावा म्हणून संयुक्त कुटुंब सोडून दूर छोट्या-छोट्या घरात शिफ्ट होत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मन व विचारही लहान होत चालले आहेत.
आत्महत्या हे कोणत्याही समस्येचे निराकरण नाही :- जगात कोणाला दुखं नाही, पण ज्याने समाधान मानले तोच सुखी. मोठे व्यापारी, अगदी नोकरी करणारे लोकही काळजीत आहेत, फरक इतकाच आहे की कोणी आपल्या समस्या सांगतो तर कोणी मनात ठेवतो. जेव्हा आपण स्वतःला कमकुवत समजतो तेव्हा लक्षात ठेवा की जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक अधिक दुःखी आहेत, त्यांचासमोर आपले दुःख काहीही नाही. जगाचा एक मोठा भाग जगण्यासाठी भुकेला झोपतो, डोक्यावर छप्पर नसते, फुटपाथवर लाखो लोक जगतात, अनेक लहान मुले लावारीस जगतात, दोन वेळचा जेवनाची सोय करण्याकरीता आई-बाबा आपल्या चिमुकल्या लेकरांना झोपडीत सोडून कामासाठी हिंडतात. जगातील अनेक दुष्काळी भागात पाण्यासाठी स्त्रिया दररोज कित्येक किलोमीटर कडक उन्हात फिरतात, आजही दुर्गम खेड्यातील लहान मुले शालेय शिक्षणासाठी उबड-खाबड रस्ते, नदी, नाले, वन येथून बरेच किलोमीटर चालतात. दरवर्षी जगातील लाखो गावे पावसाळ्यात पाण्यामध्ये असतात आजही जगात अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे लहान मुलांना देखील रोज पोटभर अन्न मिळत नाही. पण हे लोक देखील जीवनासाठी संघर्ष करतातच, आपल्या जीवनाशी अपयश स्विकारून थांबणार नाहीत. आज जगात दिव्यांगांनी क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसेच प्रत्येक क्षेत्रात, नाव उज्जवल केले आहे. आपण त्यांचापासून आत्मविश्वास आणि सशक्त जीवन जगणे शिकले पाहिजे कारण ते शारीरिकदृष्ट्या अपूर्ण असून सुद्धा एक सामान्य माणसापेक्षा अधिक यशस्वीरित्या जगतात आणि स्वतचे कार्य चांगल्यारीत्या करतात.
आजच्या युगात जर आपल्यावर एखादी अप्रिय घटना घडली तर आपण त्वरीत तुटून जातो मनाचे खच्चीकरण करतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याचे धाडसच करत नाही. पण, हे चुकीचे आहे. लहानशी मुंगी सुद्धा वारंवार अपयशी झाली तरीही ते आपले लक्ष्य सोडत नाही, मग तर आपण माणूस आहोत, आपण का प्रयत्न सोडायचे. आयुष्यातील प्रत्येक छोटीशी गोष्ट आपल्याला मार्गदर्शन करते तेव्हा चांगली गोष्ट होईपर्यंत आपले प्रयत्न सोडू नका, आव्हान म्हणून समस्या स्वीकारा आणि समस्यांपासून पळ काढण्याऐवजी त्यास दृढ लढा द्या. इतिहास साक्ष देतो की जगात अशी हजारो व्यक्तिमत्त्वे होती ज्यांनी लाखो संकटांना आणि अपयशाला पराभूत करून जगात किर्तीमान रचलाय आणि आयुष्यात नेहमी अशाच लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा.
आत्महत्या नियंत्रणाचे काही उपायः-
⦁    परिस्थिती कितीही वाईट असली तरीही राग आणि तणावात नकारात्मक निर्णय घेऊ नका कारण त्यावेळी आपल्याला योग्य आणि चुक यातील फरक चांगल्यारित्या समजत नाही, बर्याच वेळा आपण रागाचा भरात चुकीचे निर्णय घेतो नंतर आपल्याला आपली चूक समजते, तेव्हा खूप वेळ झालेला असतो, तेव्हा पश्चाताप आणि दुःख व्यतिरिक्त काहीच उरले नसते.
⦁    वाईट सवयी आणि नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर रहावे, आनंदाच्या वातावरणात जगावे, हसत-खेळत रहावे. नैराश्यावर किंवा कोणत्याही शारीरिक, मानसिक समस्येवर डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलावे व तज्ञाद्वारे आपल्या समस्येचे निराकरण करावे.
⦁    आपल्या द्वारे झालेल्या चुकांपासून शिकावे, सतत एकटेपणात राहू नका, आपल्या लोकांसोबत मनातील बोला, शक्य असल्यास नेहमीच कुटुंबातच रहावे.
⦁    स्वतःची काळजी घेणे, र्निव्यसनी लोकांशी संपर्क साधणे, ध्यान-योगा करणे, स्वतसाठी वेळ काळावे. सात ते आठ तासांची झोप, वेळेवर जेवण हे खूप गरजेचे आहे. खेळ, व्यायाम आणि निरोगी छंद विकसित करावे, निसर्ग आणि पाळीव प्राणी त्यांच्याबरोबर वेळ घालवणे देखील तणावमुक्त जीवन प्रदान करते.
⦁    पालकांनी खासकरून आपल्या मुलावर मित्रांसारखी वागणूक दिली पाहीजे लहानपणापासूनच चागल्या आणि वाईट गोष्टिंची समझ दिली पाहीजे. लहान मुलांना सोशल मिडीयापासून नेहमी दूर ठेवावे, मोठे व्यक्ति, वयोवृद्ध महिलांचा सन्मान करणे आणि असहाय्यांना मदत करणे, चांगले संस्कार, योग्य वातावरण चांगली शिकवण मुलांना द्यावी.
⦁    नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवावी आणि आपल्या कुटुंबातील लोक, त्यांचे आनंद, त्यांच्याप्रती आपले कर्तव्य, जबाबदारी लक्षात ठेवावी.
⦁    लोक, गट, मित्रांशी संपर्कात रहावे जे तणाव सोडण्यास प्रवृत्त करतात आणि स्वतला नेहमी व्यस्त ठेवावे.
⦁    कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक जबाबदारी समझणे आणि आपले कर्तव्य पार पाळणे सोबतच मानवांमध्ये परोपकाराची भावना असणे खूप महत्वाचे आहे, म्हणजेच, कोणत्याही स्वार्थाशिवाय लोकांचा चेहरेवर हसू आणणे मनाला खूप समाधान देते.
-डॉ. प्रितम भी. गेडाम, भ्रमणध्वनी क्रमांक- 82374 17041

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget