Halloween Costume ideas 2015

प्रेमाचे कब्रस्तान!

एरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, :ख व्यक्त करणं हे चित्र असतं. या कब्रस्तानात अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार? मात्र, तिथं आलेल्या त्या एकमेव महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली...
    काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली. कब्रस्तानात हिंदूंच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत आणि तेही रीती-रिवाजानुसार असा उल्लेख बातमीत होता. जरा आश्चर्य वाटलं. याविषयी अधिक काही जाणून घ्यायचं ठरवलं. त्यानुसार, दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता मरिन लाईन्सच्या ‘बडा कब्रस्तान’कडे निघालो. परिचित असलेल्या एका सरकारी डॉक्टरांच्या मदतीनं मिळवलेलं कोरोनाकिट बरोबर घेतलं होतं. जिथं निघालो होतो तिथली, तिथल्या कर्मचार्‍यांची, त्यांच्या वेळापत्रकाची तपशीलवार माहिती आदल्या रात्रीच फोनवरून घेतली होती.
    ‘बडा कब्रस्तान’च्या परिसरात पोहोचलो. आतमध्ये मृतदेह असलेल्या किमान दहा-पंधरा म्ब्युलन्स रांगेत उभ्या होत्या. बरोबर नेलेलं किट घातलं आणि ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटण्यासाठी ‘बडा कब्रस्ताना’त गेलो. तिथलं दृश्य हृदय हेलावून टाकणारं होतं. सर्वत्र मृतदेह होते. एकीकडे दफनविधी सुरू होते, तर दुसरीकडे अग्निसंस्कार.
    सय्यद रिज्वान आणि अल्ताफ कुरेशी या दोन ‘योद्ध्यां’ना मला भेटायचं होतं. हे योद्धे अनेक दिवसांपासून या ‘बडा कब्रस्तान’मध्ये हिंदू रीती-रिवाजानुसार काही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करत होते अन् त्याच ‘बडा कब्रस्तान’मध्ये दफनविधीही करत होते. मी एका ठिकाणी थांबून सगळ्या घडामोडी पाहू लागलो. बाहेरच्या म्ब्युलन्समधले मृतदेह काढून घ्यावेत, असं ते चालक या दोघांना सांगत होते. कब्रस्तानमध्ये बोटावर मोजण्याइतकीच माणसं होती. रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिथले कर्तेधर्ते होते. मी तीन-साडेतीन तास तिथं होतो. एक मृतदेह, एक म्ब्युलन्स आणि एक चालक...असं तिथलं चित्र होतं. म्ब्युलन्सची वाढणारी रांग पाहून पोटात धस्स व्हायचं. लहान मुलांपासून ते नव्वदीच्या जर्जर वृद्धापर्यंतचे मृतदेह तिथं होते हे लक्षात आलं.
    कोरोना सुरू झाल्यापासून आजपर्यंत एकट्या मुंबईत पाच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सर्वाधिक अंत्यसंस्कार मरिन लाईन्सच्या या कब्रस्तानात होतात की काय असं ती गर्दी पाहून वाटायला लागलं. रिज्वान आणि अल्ताफ यांनी खाण्यासाठी थोडासा वेळ काढला. काही तरी पोटात टाकून यावं या हेतूनं ते बाहेर पडले. मीही त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. बाहेर गेल्यावर जरा अंतरावर असलेल्या खोलीत त्यांनी आधीचे कपडे बदलले. त्यांचं उघडं शरीर एखाद्या जख्ख-जर्जर म्हातार्‍यासारखं दिसत होतं. कोरोनाकिट सातत्यानं अंगात घालून वावरावं लागल्यानं त्यांच्या कातडीचा रंग बदलून तो पांढरट झाला होता. सोबत आणलेलं जेवण ते करू लागले.
    जेवता जेवता ते मला म्हणाले : “तुम्ही खूप लवकर आलात. तुम्ही दुपारनंतर याल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.”
मी ‘हो.. हो..’ म्हणत ‘किती वेळ काम करता? हा वेगळाच अनुभव आहे...’ असं त्यांना विचारू लागलो. त्या दोघांनाही वेळ नव्हता हे मला दिसतच होतं.
तशा घाईच्या स्थितीतही ते सांगू लागले : “काय सांगायचं साहेब, आपल्यावर अशी वेळ येईल असा विचारही कधी आयुष्यात केला नव्हता. आम्ही महिन्यातून दोन-तीन वेळा दफनविधी करायचो. आता इथं दिवसाकाठी कितीतरी अंत्यसंस्कार, दफनविधी पार पाडावे लागतात. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही दोघांनी आमच्या घरच्यांचं तोंड पाहिलेलं नाही.”
मी विचारलं : “अंत्यसंस्कार करण्यासाठी माणसं दिसत नाहीत...” ते म्हणाले : “कसली माणसं! एकतर जास्त माणसांना इथं परवानगी नाही आणि दुसरं म्हणजे, कोरोनानं मरण पावलेल्यांच्या मृतदेहांबरोबर येण्याची हिंमत कुणी करत नाही.” “आलेला मृतदेह हिंदूचा आहे, मुस्लिमाचा आहे हे तुम्ही कसं ओळखता?” मी विचारलं.
ते म्हणाले : “दवाखान्यानं दिलेल्या प्रमाणपत्रावर नाव आणि बाकीचा तपशील नमूद असतो. ‘तुम्ही त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार अथवा दफनविधी करावा,’ असं आम्हाला सांगण्यात आलं आहे.” त्यांनी माझ्याशी बोलता बोलता घाईघाईत जेवण आटोपलं आणि नेहमीचं किट घालून ते पुन्हा कब्रस्तानाच्या दिशेनं निघाले. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. तोंडाला मोठं कापड बांधून आलेली एक महिला रिज्वान आणि अल्ताफ यांची वाट पाहत तिथं उभी होती. ती त्यांच्या पाया पडत म्हणाली : “मला माझ्या वडिलांचं तोंड एकदा शेवटचं पाहू द्या.”
त्यांनी तिला विचारलं : “तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत का? म्हणजे त्या प्रमाणपत्रानुसार आम्हाला तुमच्या वडिलांचा मृतदेह शोधता येईल.” ती महिला म्हणाली : “मी गावाकडून थेट इथंच आले आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही.” “तुमच्या वडिलांचं नाव काय?” दोघांनी विचारलं. महिलेनं नाव सांगितलं. आज दिवसभरात आलेल्या मृतदेहांच्या यादीत त्या महिलेच्या वडिलांचं नाव तिसर्‍या क्रमांकावर होतं. “सकाळी आठ वाजताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले,” असं त्या महिलेला सांगण्यात आलं.
हे ऐकल्यावर तिनं त्या दोघांना दोष देत एकदम हंबरडा फोडला. भावनेचा भर ओसरल्यावर इतर अनेक मृतदेहांकडे तिचं लक्ष गेलं आणि ती एकदम शांत झाली.
    रिज्वान म्हणाला : “ताई, मृतदेहांचा इथं एवढा खच पडलेला आहे...त्यातून परत प्रत्येक म्बुलन्सचालकाला लवकर जायचं असतं. आम्ही कुणाची वाट कशी आणि किती वेळ पाहणार? कारण, बहुतेक मृतदेहांबरोबर त्यांचे नातलग वगैरे कुणीच नसतात असं चित्र आहे. आम्ही हे रोज अनुभवत आहोत, त्यामुळे ज्या मृतदेहाबरोबर कुणी नातेवाईक आलेले नसतात त्या मृतदेहाच्या चेहर्‍याचा फोटो आम्ही काढून ठेवतो. तुमच्या वडिलांच्या चेहर्‍याचाही फोटो आम्ही काढलेला आहे. त्या फोटोचं दर्शन तुम्ही घेऊ शकता.” अल्ताफनं त्याच्या मोबाईलमधला एकेक फोटो त्या महिलेला दाखवायला सुरुवात केली. एक फोटो पाहून ती महिला म्हणाली : “हा.. हा.. हाच फोटो. हाच आहे माझा बाप गं माय,” आणि तिनं पुन्हा एकदा हंबरडा फोडला.    मी त्या कब्रस्तानात आल्याला एव्हाना पाच तास उलटून गेले होते. एरवी अंत्यसंस्कार म्हटलं की नातलगांचं रडणं, :ख व्यक्त करणं हे चित्र असतं. इथं अनेक मृतदेह होते...पण कुणाच्या रडण्याचा आवाज नाही की कुणाच्या डोळ्यांतून अश्रू नाहीत...मृतांचे नातलगच इथं नव्हते तर हे सगळं कसं असणार? त्या महिलेनं मृत वडिलांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि ती जड पावलांनी निघून गेली. जाताना तिनं पुन्हा एकदा रिज्वान आणि अल्ताफ यांचे पाय धरले. आश्‍चर्यचकित होत दोघांनी विचारलं : “आमच्या पाया कशाला पडता?” त्यावर ती म्हणाली : “दादा, माझे चार भाऊ आहेत. चारही जण खूप श्रीमंत आहेत. त्यांचं भरलेलं कुटुंब आहे; पण त्या चौघांपैकी एकही भाऊ मुखाग्नी द्यायला आला नाही. तुम्ही ते काम केलं, म्हणून तुम्ही माझे आजपासून भाऊ झालात.”
    त्या बाईच्या भाबड्या भावना समजून घेत दोघंही पुन्हा आपल्या कामाला लागले. ती आपल्या भावना व्यक्त करून निघून गेली. एक म्ब्युलन्सचालक पलीकडच्या बाजूला डोक्याला हात लावून बसला होता. मी त्याला विचारलं : “तुम्ही किती दिवसांपासून इकडे येत आहात?”
    तो काही सांगण्याच्या म:स्थितीत नव्हता, तरीही सांगू लागला : “साहेब, अहो मी रात्रीपासून आलोय. माझ्या गाडीत मृतदेह आहे. तो उतरवून घ्या, अस मी त्यांना सांगतोय; पण त्यांचं म्हणणं असं, की अगोदरचे अंत्यसंस्कार, दफनविधी झाल्याशिवाय तुमच्या गाडीतला मृतदेह आम्ही खाली उतरवणार नाही. काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही.”
मी म्हणालो : “बरोबर आहे त्यांचं.” तो म्हणाला : “साहेब, कालच माझी बायको कोरोनामुळे गेली. दोन छोटी छोटी मुलं दवाखान्यात आहेत. अजून बायकोचा मृतदेह मी ताब्यातही घेतलेला नाही.” मी विचारलं : “अहो, तुमच्या घरी जर एवढा :खद प्रसंग ओढवला आहे, तर मग तुम्ही हा मृतदेह घेऊन आलात कशाला?”    त्यावर तो म्हणाला : “दवाखान्यात माझी म्ब्युलन्स ड्यूटीसाठी लावलेली आहे. ‘एवढा एक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचता करा आणि जा,’ असं सांगून मला या कामाला लावण्यात आलं. हा मृतदेह आणताना मृताचे अनेक नातेवाईक दवाखान्याच्या गेटसमोर होते; पण एकानंही सोबत येण्याची हिंमत केली नाही. आता सर्वांचे फोन बंद आहेत. नातेवाइकांनी दवाखान्यातून अक्षर: पळ काढला. मला माझी बायको वारल्याचं :ख आहेच; पण त्यापेक्षाही :ख आहे ते आपल्या आसपासची माणुसकी हरवत चालली आहे याचं. मी बारा वर्षांपासून म्ब्युलन्स चालवण्याचं काम करतोय दु:ख काय असतं, लोक रडतात कसे हे मी रोजच्या प्रसंगांमुळे पार विसरून गेलोय. आता या कोरोनामुळे मी खूप :खी आहे, मी खूप रडतोय...याचं कारण, मृत व्यक्तीच्या आसपास येऊन कुणी तिचं तोंड बघायला तयार नाही. या कोरोनाच्या काळात माझी बायको, आई-बाबा मला नेहमी म्हणायचे ‘आपण गावी निघून जाऊ, तिथं सुखानं राहू आणि कोरोना संपल्यावर परत येऊ.’ मात्र, मी म्हणालो, ‘ज्या शहरानं वाढवलं, मोठं केलं, दोन वेळची चूल पेटेल अशी व्यवस्था केली ते शहर असं संकटात असताना त्याला तशा संकटात सोडून जाणं योग्य नाही.’
    सात-आठ दिवसांनी मी घरी कुटुंबीयांना भेटायला गेलो. भेटून परत आल्यावर, बायकोला कोरोना झाल्याचा निरोप आला...” त्याची ही कहाणी ऐकून काय बोलावं ते सुचेना. आम्ही दोघं बोलत होतो आणि आमच्यासमोर काही अंतरावर रिज्वान आणि अल्ताफ काम करत होते. तितक्यात दोन-चार व्यक्ती तिथं आल्या आणि जोरजोरानं शिव्या घालू लागल्या...‘तुम्ही हिंदू
रीती-रिवाजानुसार अंत्यसंस्कार करत नाही. मृताचे कान फुंकायचे असतात, ते तुम्ही फुंकत नाही,’ असं ते त्या दोघांना म्हणत होते. एवढ्या भयाण परिस्थितीतही त्यांच्या मनात जाती-धर्माच्या चौकटींचा विचार येतो कसा असा प्रश्‍न मला पडला. मेल्यावरही जात माणसाचा पिच्छा सोडत नाही हेच खरं.
    मी मृतदेहांची यादी पाहिली. कुठला माणूस कसा असेल याचं अनुमान मी त्या नावांवरून करत होतो...यादीतल्या अनेकांकडे वलय असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल... असं सगळं असेलही...मात्र, अंत्यसंस्कारांच्या वेळी एकही जण त्यांच्या जवळ नव्हता. मुंबईत ज्या घरात कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती होत्या अशी अनेक घरं वाळीत टाकल्याची उदाहरणं मला माहीत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त माणसांचं अन्न-पाणीही रोखण्यात आल्याचं मला माहीत आहे. आपली माणसं अशा काळात अधिक कळतात, हे कोरोनानं स्पष्टपणे दाखवून दिलं. ज्या शहरात कोरोनामुळे द्वेषाचं वातावरण होतं, त्याच शहराच्या या ‘बडा कब्रस्तान’मध्ये प्रेमाचं वातावरण मला पाहायला मिळालं. कोण ती बाई...पण तिला वाटलं की रिज्वान आणि अल्ताफ हे दोघं तिचे भाऊ आहेत. कोण ते दोघं...जे मुस्लिमधर्मीय असूनही हिंदू धर्माचे सर्व रीती-रिवाज पार पाडत मृतदेहांवर संस्कार करत आहेत...कुणीतरी आपल्या मृत नातलगाला शेवटचं पाहायला येईल आणि अंत्यसंस्कार होऊन गेल्याचं कळल्यावर, अंत्यदर्शन झालं नाही म्हणून निराश होईल, असा विचार करून मृतांच्या चेहर्‍याचे फोटोही ते दोघं काढून ठेवतात... त्या मरणकळेच्या वातावरणातही असं प्रेमाचं वातावरण पाहून, माणुसकी फक्त कब्रस्तानातच उरलेली आहे की काय असं मला वाटून गेलं. इक्बाल ममदानी हे मरिन लाईन्स इथल्या ‘बडा कब्रस्तान’चे सदस्य. त्यांचीही भेट तिथं झाली. कोरोना सुरू झाल्यापासूनचे सगळे अनुभव त्यांनी सांगितले. त्यांचे अनुभव खूप थरारक होते. माझे अनेक प्रश्‍न ऐकल्यावर त्यांनी शांतपणे मोठा श्‍वास सोडला आणि ते म्हणाले : “कशाची जात आणि कशाचे रीती-रिवाज, साहेब? मेल्यावर तरी हे रीती-रिवाज आम्हाला सोडणार आहेत की नाही? मृतदेहांची विटंबना होणार नाही आणि त्या मृतदेहांपासून कोरोना पसरणार नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं.”    मुंबईतल्या अनेक स्मशानभूमींमध्ये, कब्रस्तानांमध्ये काम करणारे सगळेजण कोरोना आल्यापासून गायब आहेत...ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तिथं एका मृतदेहासाठी चार चार जणांची आवश्यकता भासायची अशी माहिती देणार्‍याही खूप बातम्या वाचल्या होत्या... जिथं माणसं नाहीत तिथं आता महापालिकेनं ताबा घेतलाय; पण ‘बडा कब्रस्तान’नं मात्र
सब के लिए खुला है, यह कब्रस्तान हमारा
आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी...
हा मानवतेचा संदेश देत, या कब्रस्तानात अधिक सुविधा कशा उपलब्ध होतील, याची काळजी घेतली आहे. मी इक्बालजींना म्हणालो : “इक्बालजी, या कब्रस्तानाचं नाव ‘बडा कब्रस्तान’ ऐवजी ‘प्रेमाचं कब्रस्तान’ असं ठेवलं तर किती छान होईल!” इक्बालजी काहीच बोलले नाहीत. त्यांनी केवळ आकाशाकडे बघितलं आणि त्या दिशेनं नमस्कार केला. नंतर मलाही नमस्कार करत ते आपल्या कामाला लागले. घरी परतताना तो मृतदेहांचा खच माझ्या डोळ्यांपुढे येत राहिला...पण मी तिथली माणुसकी मनात साठवून जड पावलांनी घराकडे निघालो.

- संदीप काळे
9890098868

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget