Halloween Costume ideas 2015

दंगल स्विडनमध्ये अन् प्रतिक्रिया भारतामध्ये

उत्तरीय युरोपमध्ये स्विडन, डेन्मार्क, फिनलँड, आईसलँड आणि नॉर्वे हे देश नॉर्डिक्ट देश म्हणून ओळखल्या जातात. यापैकी नॉर्वे आणि स्वीडन शेजारी देश आहेत. दोन्ही देश कॅथोलिक ख्रिश्‍चन बहुल देश असून, अत्यंत यशस्वी अशा लोकशाहीसाठी प्रसिद्ध आहेत. चांगल्या लोकशाहीचे जे काही गुण असतात ते या दोन्ही देशांमध्ये प्रचूर मात्रेमध्ये उपलब्ध आहेत. जनता सुखी आणि आनंदी आहे. शासन आणि प्रशासन खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. मात्र मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये त्यातल्या त्यात डेन्मार्क, नॉर्वे आणि स्विडनमध्ये मुस्लिम विरोधी भावना तीव्र झालेल्या आहेत.
    नॉर्वे पासून 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या स्वीडनमधील मालमो या बर्‍यापैकी मुस्लिमांची संख्या असलेल्या शहरामध्ये 28 ऑगस्ट 2020 रोजी कुरआनची प्रत मस्जिदीसमोर जाळण्यात आली. त्याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिमांमधील एका छोट्याशा गटाने संध्याकाळी 7.30 वाजता दंगल करण्यास सुरूवात केली. दंगलीत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, कुणी जखमी झाले नाही, मात्र काही दुकानांच्या काचा फुटल्या, रस्त्यावर टायर जाळण्यात आले, काही वाहनांना पेटवून देण्यात आले. 8 तासाच्या आत स्वीडन पोलिसांनी दंगल आटोक्यात आणली. या दंगलीस जबाबदार दोन्ही गटातील लोकांना पोलिसांनी अटक केली. दंगल शमविण्यासाठी ख्रिश्‍चन आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मदत केली. फुटलेल्या काचा, जळालेली वाहने हटविण्यासाठी लोकांनी कष्ट उपसले. अनेक ख्रिश्‍चन लोकांनी आपण मुस्लिमांच्या सोबत असल्याचा मजकूर लिहिलेले फलक हातात घेऊन दुसर्‍या दिवशी शांततेत मार्च काढला. शासनात असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या कुठल्याही नेत्याने या संदर्भात कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.
    मीडियाने वस्तूनिष्ठ बातम्या दिल्या व चोवीस तासात दंगली संबंधी बातम्या दाखविणे बंद करून कोविड आणि अर्थव्यवस्थेसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. दंगल कशी झाली? कोणी केली? यावर कसल्याही उग्र चर्चा मीडियामध्ये झाल्या नाहीत. मात्र या दंगलीचे पडसाद स्वीडनपेक्षा जास्त भारतामध्ये उमटले. भारतीय माध्यमांमध्ये विशेष: समाजमाध्यमांमध्ये नुकीच बंगलुरूमध्ये झालेल्या दंगलीशी जोडून गरळ ओकण्यात आली. मुस्लिम कुठेच स्व: शांततेने राहत नाहीत आणि दुसर्‍याला शांततेत राहत नाहीत म्हणत स्वीडनच्या कुरआन जाळणार्‍या लोकांची पाठराखन केली.

दंगल कशी झाली?
स्वीडिश लोकांना डच असे म्हणतात. मागच्या काही वर्षांपासून स्विडनमध्ये मुस्लिम विरोधी भावना पसरविण्यामध्ये डच लोकांपेक्षा नार्वेच्या लोकांचा जास्त हात आहे. नॉर्वेचा दक्षीणपंथी राजकीय पक्ष स्ट्रॉम्प कोर्स हा मुस्लिम विरोधी भावना भडकाविण्यामध्ये आघाडीवर असतो. याच पक्षाचा एक नेता रास्मो पालुदान याने या पूवीर्र्ही मुसलमांनाचा विरोध म्हणून कुरआन जाळण्याचा प्रयत्न केला होता.
पण पोलिसांनी  तो विरेाध हाणून पाडला होत. त्यावेळेस त्याला अटकही आणि दोन वर्षासाठीसाठी स्वीडनमध्ये येण्यास प्रतिबबंध करण्यात आला होता. अश या नेत्याला 28 तारखेला माल्मो शहरात मस्जिदीसमोर मुस्लिमांच्या विरोधात सभा घेण्याची परवानगी मागितली होती, ती पोलिसांनी नाकारली होती. त्यावर त्याने स्थानिक कोर्टात अपीलही केली होती. कोर्टाने त्याची अपील फेटाळलीही होती. तरी तो नॉर्वेमधून 28 तारखेला सभेसाठी निघाला होता. परंतु पोलिसांनी त्याला मॉल्मोमध्ये प्रवेश करण्याआधीच अटक केली. परंतु, त्याच्या समर्थकांनी कुरआन जाळून त्याचे चित्रण करून प्रसारमाध्यमांवर टाकले.
    स्वीडीश पोलिसांसाठी ही दंगली घटना कायदा व सुव्यवस्थेची घटना होती व ती त्यांनी तशीच हाताळली. त्यात त्यांनी राष्ट्रवादाचा लवलेषही येऊ दिला नाही. कुठलाही पक्षपात केला नाही. भारतमाध्ये ज्यांनी कुरआन जाळण्याच्या घटनेची पाठराखण केली त्यांना याची पुसटशीही कल्पना नाही की दक्षीणपंथी राजकीय पक्ष स्ट्रामकोर्स आणि त्याचे नेते हे स्थानिक, गौरवर्णीय लोकांचे समर्थक असून, फक्त मुस्लिमच नव्हे तर कोणत्याही देशाच्या नागरिकांना स्वीडनमध्ये प्रवेश देण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. त्या ठिकाणी मुस्लिमांच्या ऐवजी हिंदू किंवा बौद्ध जरी गेले तरी त्यांचा असाच विरोध करतील यात तीळमात्र शंका नाही.

दंगली मागची कारण मीमांसा
    माल्मोमधील कुरआन जाळण्याच्या या घटनेनंतर दोन दिवसांनी डेन्मार्कमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे व्यंगचित्र काढण्याची घटना घडली. एवढेच नव्हे तर फ्रान्समधील शार्ली हेब्दो या मॅगझीननेही ज्याच्या कार्यालयावर 2015 मध्ये याच कारणामुळे मुस्लिमांच्या एका गटाने हल्ला केला होता. ज्यात या कार्यालयातील 12 लोक ठार झाले होते. त्यांनी परत या आठवड्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे व्यंगचित्र पुन्हा प्रकाशित केले.
    माल्मोमधील घटना असो की स्वीडन आणि फ्रान्समधील प्रेषित सल्ल. यांचे कार्टुन प्रकाशित करण्याच्या घटना असो या पाठीमागे एक विशिष्ट अशी मानसिकता आहे. ती फक्त युरोपमध्येच नसून संपूर्ण जगामध्ये आहे. त्या मानसिकतेतूनच इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध केला जातो, त्यांच्याविरूद्ध हिंसक कारवाया केल्या जातात, त्यांचा अनेकवेळा झुंडीद्वारे बळी घेतला जातो.
    असे का घडते हे आपण जाणून घेऊया. इस्लाम आणि मुस्लिमांचा विरोध करणारे दोन प्रकारचे लोकसमुह आहेत. एक मीडियाद्वारे इस्लाम विरूद्धच्या दुष्प्रचाराला बळी पडलेला लोकसमुह ज्याला इस्लामबद्दल फारशी माहिती नसते. दूसरा लोकसमुह तो जो इस्लामच्या शिकवणीचा अभ्यास करून त्यानंतर त्याचा आणि मुस्लिमांचा विरोध करतो. पहिल्या प्रकारातील विरोध हा गैरसमजातून झालेला विरोध असतो तो वस्तूस्थिती समजल्यावर गळून पडतो. परंतु, दुसर्‍या प्रकारचा विरोध हा जाणून बुजून केला जाणारा विरोध असतो. म्हणून तो सहजासहजी गळून पडत नाही. फार कमी लोक इस्लामची शिकवण संपूर्णपणे लक्षात आल्या-आल्या इस्लामचा विरोध बंद करतात. डच संसदेतील फ्रिडम पार्टी नावाच्या मुस्लिम विरोधी पक्षाचे एक खासदार जोराम वँट क्लिव्हरेन ज्यांनी एकेकाळी, ” कुरआन हे विष आहे” असे म्हटले होते त्यांनी इस्लामच्या विरोधासाठी पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नातून इस्लाम विषयी सत्यता जाणून घेतल्यानंतर 2019 मध्ये स्व: इस्लामचा स्विकार केला आणि मोठ्या हिमतीने त्याची घोषणाही केली. आज ते स्वीडनमध्ये इस्लामची शिकवण आपल्या देशबांधवांना देण्याचे काम करीत आहेत.

स्विडन आणि मुस्लिम
स्विडनच नव्हे तर युरोपमधील जवळ-जवळ 27 देशात मुस्लिमांची संख्या लक्षणीयरित्या अलिकडच्या काळात वाढलेली आहे. प्रसारमाध्यमे याला मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशातून पलायन करून आलेल्या शरणार्थ्यांमुळे मुस्लिमांची संख्या युरोपमध्ये वाढत असल्याचा निष्कर्ष काढतात. जो की फारसा बरोबर नाही. मुळात मध्यपुर्वेतील युद्धास अमेरिका आणि युरोप हे जबाबदार असून, मुस्लिमांचे पलायन त्यांच्या युद्धखोर नितीमुळेच होत आहे. नसता कोणता दळभद्री जनसमूह असेल जो आपले लोक, आपली संपत्ती आणि आपला देश सोडून विदेशात कुठलेही निश्‍चित भविष्य नसतांना आनंदाने जाईल? या घटकाशिवाय, मुस्लिमांची युरोपमध्ये संख्या वाढण्यामागे जे महत्त्वाचे कारण आहे त्याची चर्चा माध्यमांमध्ये कधीच होत नाही. ते कारण म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे युरोपमधील महिला एक तर मुलं जन्माला घालण्यास उत्सुक नसतात किंवा एखाद दुसरे मूल जन्माला घालतात. त्यामुळे युरोपातील लोकसंख्या गेल्या अनेक वर्षांपासून घसरत चाललेली असून, वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे. स्पष्ट आहे देशातील अंगमेहनतीची कामे करण्यासाठी जो तरूण कामगार वर्ग लागतो तो त्यांच्याकडे नाही. हीच जागा युरोपच्या जवळ असलेल्या तुर्कस्थान आणि इतर मुस्लिम देशांमधील तरूण भरून काढतात. त्यांना रोजगारसुद्धा मिळतो आणि नैसर्गिकरित्या ते तेथे राहू लागतात. त्यातूनच जे स्थानिकांशी त्यांचे संबंध येतात त्यातून अनेक नवीन नाती निर्माण होतात. या परिस्थितीला स्व: कारणीभूत असून, सुद्धा हे गौरवर्णीय युरोपीयन लोक मुस्लिम लोकांच्या नावाने पुन्हा शंख करायला मोकळे होतात. आणि त्यांच्यातीलच एक छोटासा रॅडिकल घटक पुढे येवून मुस्लिमांच्या विरूद्ध गरळ ओकत कधी कुरआन जाळ तर कधी प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्र काढ तर कधी मुस्लिमांवर हल्ले कर अशी कामे करत असतात. स्विडनमधील ताजी दंगलीची घटनासुद्धा अशाच एका छोट्या दक्षीणपंथी समुहाकडून कुरआन जाळल्यामुळे घडली, हे सत्य प्रसारमाध्यमे जनतेपासून लपवून ठेवतात.

इस्लामचा विरोध नैसर्गिक आहे
वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून होणारा इस्लामचा विरोध हा त्यांच्या दृष्टीकोनातून नैसर्गिक विरोध असतो. इस्लाम आणि कुरआन या दोघांना शत्रू समजून ते प्रामाणिकपणे त्यांचा विरोध करत असतात. कारण की, इस्लाम प्रत्येक वाईट गोष्टींचा विरोध करतो आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन होत नाही. इस्लाम व्याजाचा विरोध करतो म्हणून भांडवलदारांना ते सहन होत नाही. इस्लाम व्यसनाचा विरोध करतो म्हणून दारू आणि ड्रग्सचा व्यवसाय करणार्‍यांना इस्लाम सहन होत नाही. इस्लाम अश्‍लीलतेचा विरोध करतो. म्हणून फिल्म आणि फॅशनचा व्यवसाय करणार्‍यांना इस्लाम सहन होत नाही. थोडक्यात मानवकल्याणाच्या विरूद्ध होणार्‍या प्रत्येक कृतीचा इस्लाम ठामपणे विरोध करतो म्हणून मानवकल्याणाच्या विरोधामध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते सर्वच इस्लामचा विरोध करतात. दुर्दैवाने अशा व्यवसायांची आणि लोकांची संख्या ही समाजामध्ये जास्त असल्यामुळे व चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे बिगर मुस्लिमांमधून इस्लामचा विरोध जास्त आणि समर्थन कमी होते. इस्लामचा विरोध करणार्‍यांचे दुर्दैव असे की, इस्लामचे समर्थक त्यांच्या अत्याचारांच्या पुढेही नमते घेत नाहीत. मरूण जातात परंतु, त्यांच्या पुढे गुडघे टेकत नाहीत.
    सातव्या शतकात इस्लामची घोषणा केल्याबरोबर प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या मुठभर सहाबी रजि. (साथीदारांना)  जो विरोध झाला व ज्या मानसिकतेतून झाला तोच विरोध आणि तीच मानसिकता आज 21 व्या शतकातही कायम आहे. इस्लाममध्ये घडलेली मॉबलिंचिंगची पहिली घटना व त्यात बळी गेलेली पहिली स्त्री हजरत सुमैय्या रजि. पासून ते अलिकडे भारतात लिंच झालेल्या अख्लाक आदी लोकांचा बळी घेऊनही मुस्लिम हे आपल्या धर्मावर निष्ठा ठेऊन चांगली कामे करण्याचे बंद करत नाही. अगदी आपल्या जीवावर खेळून कोविडमधील सर्वधर्मीय मृतांचे अंतीमसंस्कार कुठलाही अभिनिवेष न बाळगता करून ते आपला चांगुलपणा सिद्धच करत असतात. कोरोना जिहादी म्हणून हिनवल्या गेल्यानंतरही अत्यंत जबाबदारीने वागून तबलिगी जमाअतचे लोक आपला प्लाझ्मा दान करतात व कोणावर उपकार केल्याच्या भावनेचा लवलेशही त्यांच्याकडे नसतो.
    वास्तविक पाहता इस्लाम आणि अन्य यांच्यामधील चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती यांच्यातील हे युद्ध असून, हे प्रलयाच्या दिवसापर्यंत सुरू राहणारे आहे. कारण चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्तीचे लोक पृथ्वीतलावर कायम राहणार आहेत.

उपाय
”आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.” (संदर्भ : आले इमरान आयत नं. 110)
    वर नमूद आयातीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या जीवाचे आणि संपत्तीचे होत असलेले नुकसान सहन करूनही मानवतेच्या व्यापक हितासाठी मुस्लिमांनी इस्लामच्या कल्याणकारी शिकवणीचा संदेश देशातीलच नव्हे तर जगातील लोकांपर्यंत शक्य तितक्या ताकदीने, उपलब्ध माध्यमांने तसेच आपल्या वर्तणुकीने द्यावा, हाच इस्लाम आणि मुस्लिमांविरोधी घृणा कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे.
    शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ”हे अल्लाह! पक्षपात बाजूला ठेऊन इस्लामचा अभ्यास करण्याची सद्बुद्धी दे. जेणेकरून ते सत्यमार्गावर येवून स्व: व समाजासाठी उपयोगी सिद्ध होतील.” आमीन.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget