प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की तुमच्यातील जे लोक अल्लाह आणि परलोकावर श्रद्धा ठेवतात त्यांनी पाहुण्यांचा आदर करावा. पाहुणचाराची मुदत एक दिवस आणि एक रात्र इतकी आहे. आणि सामान्यतः ही मुदत तीन दिवस आहे. त्यानंतर बाकी सर्व दान दिल्यासारखे असणार. पाहुण्याने इतके दिवस थांबू नये ज्यामुळे ज्यांच्या घरी तो थांबला असेल त्यांना त्रास व्हावा. (ह. अबू शुरैह र., अदबुल मुकर्रद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की तुमच्याकडील गुलाम आणि सेविका तुमचे भाऊ-बहिणींसारखे आहेत ज्यांना अल्लाहने तुमचे साहाय्यक बनवले आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे गुलाम, सेविका असतील त्यांनी स्वतः जे खातात तेच अन्न त्यांना द्यावे, जी वस्त्रे तुम्ही परिधान करता तसेच कपडे त्यांना द्यावेत आणि त्यांच्याकडून असे कोणते काम करून घेऊ नये जे त्यांच्या सामर्थ्यापलिकडचे असेल. गरज पडली तर स्वतःदेखील त्यांना मदत करावी. (ह. अबू जर र., बुखारी, मुस्लिम, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या तोंडातून त्यांच्या मृत्यूसमयी शेवटचे शब्द हे होते. "नमाज, नमाज आणि जे तुमचे साहाय्यक आहेत त्यांच्या बाबतीत अललाहची भीती बाळगा." (ह. अली र., अदबुल मुकर्रद)
ह. मसअब बिन उमैर यांचे बंधू अजीज बिन उमैर म्हणतात की, मी बदरच्या युद्धातील कैदींमधला एक कैदी होतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताकीद दिली की कैद्यांशी चांगला व्यवहार करा. मी अन्सार लोकांच्या अधीन होतो. ते लोक सकाळचे आणि रात्रीचे जेवण मला देत होते. ते स्वतः खजुरीवर गुजरान करायचे आणि मला भाकरी वगैरे खायला देत. (तिबरानी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की अल्लाह अशा समूहाला पावित्र्य प्रदान करत नाही ज्या समूहातील दुर्बल घटकांना त्यांचे अधिकार दिले जात नसतील. (मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की सारी निर्मिती अल्लाहची संतती आहे आणि मानवांमधील अशी व्यक्ती अल्लाहला सर्वांत जास्त आवडते जो दुर्बल, निराधार आणि वंचितांशी उत्तम प्रकारे व्यवहार करतो. त्यांच्याशी भलाईने वागतो. (ह. अनस र. आणि ह. अब्दुल्लाह र., बैहकी, मिश्कात)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की भाग्यवान मुस्लिमाची ओळख अशी की- (१) ज्याच्याकडे प्रशस्त घर असावे, (२) त्याचा शेजारी चांगला असावा आणि त्याच्याकडे स्वारीसाठी वाहन असावे. (ह.. राफे र., अदबुल मुफर्रद)
संकलन
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment