भारत जोडो यात्रेची सांगता करताना राहूल गांधी यांनी लाल चौक श्रीनगर येथील आपले भाषण करताना आपल्या आजी आणि पिता यांच्यावर आतंकवादी हल्ल्यात झालेल्या हत्येचे दुःख आवरले नाही. काही सुरक्षाकर्मींनी त्यांना सल्ला दिला की आता आपण जम्मू-काश्मीरमध्ये आहात तेव्हा ही यात्रा पायी पूर्ण करण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने वाहनातून करावी. यावर त्यांनी उत्तर दिले की जर त्यांना माझ्या टी-शर्टचा पांढरा रंग 'लाल' करायचा असेल तर मी घाबरत नाही. लाल चौकात त्यांनी आपल्या टी-शर्टचा रंग लाल करण्याची गोष्ट केली. ते म्हणाले की त्यांचे वय चौदा वर्षांचे असताना त्यांना फोन कॉल आले होते की इंदिरा गांधी याची गोळ्या झाडून हत्या केल्याचे. तसेच अमेरिकेत शिकत असताना माझ्या पित्याला गोळ्या घातल्याचेही फोन कॉल आला होता. या वेळी ते भावूक झाले आहेत. त्यांच्यावर हँडग्रेनेड फेकले जाऊ शकतात अशी शक्यता सुरक्षाकर्मींनी वर्तवली होती. पण ते म्हणाले की तसे काही झाले नाही. काश्मिरींनी माझे स्वागत आपल्या प्रेमाने व आपुलकीने केले.
काश्मीरमध्ये यात्रा पोचत असताना त्यांना आपल्या स्वतःच्या मूळ ठिकाणाला परतण्याचाही आनंद होता. त्यांच्या पूर्वजांनी काश्मीर सोडून प्रयागराज (पूर्वाश्रमीचे अलाहाबाद) याला आपली कर्मभूमी मानली होती. ह्या संवेदनाही त्यांनी बोलून दाखवल्या. राहूल गांधी यांनी या यात्रेतून काय साध्य केले किंवा त्यांच्या पक्षाला याचा काय लाभ होणार हे सगळे प्रश्न गौण आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच ही पदयात्रा राजकीय उद्दिष्टासाठी किंवा काँग्रेस पक्षाला जीवदान देण्यासाठी नसल्याचे अनेकदा स्पष्टपणे जाहीर केले होते. हे त्यांच्या शुभचिंतक तसेच त्यांच्या टीकाकारांनी एकदाचे समजून घेतले तर वारंवार अशा प्रश्नांची पुनरावृत्ती होणार नाही.
भारत जोडो यात्रेसाठी त्यांनी आणि त्यांच्याबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी, इतर नेते, सामान्यजण यांनी आपले पहिले पाऊल टाकले असेल त्या वेळी त्यांनाच नव्हे तर भारतातील कोणालाही याचा अंदाज आला नव्हता की ही यात्रा जाताना सगळीकडे लोक त्यांच्या स्वागतासाठी तासन् तास उभे होते. का इतका प्रतिसाद? ज्या राहूल गांधींची प्रतिमा इतकी मलीन केली गेली होती ते यात्रेवर निघाले म्हणून अचानक लोकांचे हृदयपरिवर्तन झाले? याचे कारण एकच की त्यांना कोणते स्वतःचे हित साधायचे नव्हते, त्यांना द्वेषाच्या बाजारात प्रेमचं दुकान लावायचं होतं. लोकांना प्रेम वाटायचे होते. समाजात राष्ट्रप्रेम आणि सद्भावनेची पेरणी करायची होती आणि म्हणूनच त्यांची ही यात्रा सफल झाली. दुसरे कोणते उद्दिष्ट असते तर लोकांनी इतके भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद दिला नसता. त्यांनी हे जाहीर केले होते की ही त्यांची तपस्या आहे. तपस्या कोणत्या डोंगरावर किंवा गुहेत बसून करायची गरज नाही. रणांगणातही अशी तपस्या केली जाते ही ऐतिहासिक गोष्ट राहूल गांधी यांच्याद्वारे जगासमोर आली. या तपस्येच्या यात्रेदरम्यान अनेक नैसर्गिक आव्हाने त्यांचा रस्ता रोखण्यासाठी समोर आले. पर्जन्यवृष्टी असो की कडक ऊन की बर्फवृष्टी, राहूल गांधी आणि यात्रेतील त्यांच्या साथीदारांना कशालाही भीक घातली नाही. त्यांचे लक्ष कधीही विचलित झाले नाही. त्यांनी द्वेषाविरुद्ध जरी ही यात्रा काढली तरी ते कोणत्या एका जातीचे, धर्माचे, एका प्रांताचे, कोणत्या विशिष्ट वर्गाचे नाहीत हे त्यांनी सिद्ध करून दिले आहे. त्यांनी बेरोजगारी, गरीबीसारख्या ज्वलंत प्रश्नांवर आपले विचार मांडले. त्यासाठी कोण जबाबदार हे भारतीय नागरिकांसमोर आले. त्यांनी आपली एक विचारधारा मांडली जी देशाच्या साऱ्यांसाठीची विचारधारा आहे. कोणत्या विशिष्ट संस्कृती-धर्माची विचारधारा नाही. राजकीय पक्ष निवडणुकीचे राजकारण करण्यात व्यस्त असताना त्यांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली आणि राज्यव्यवस्थेने राजकारण मांडले. यात्रेदरम्यान निवडणुका लागल्या. त्यांनी यात भाग घेतला नाही. त्यांनी ही यात्रा शांतता, सद्बावना आणि लोकांच्या समस्यांची मांडणी करण्यासाठी काढली होती. दररोज २०-२१ कि.मी. चालणे, चालता चालता २००-३०० जणांशी संवाद साधणे, अनेक जाहीर सभा, पत्रकार परिषदा घेतल्या. कधी त्यांना थकवा आला नाही. थंडी-ताप नाही. काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित का केला नाही की राहूल गांधींचे स्वास्थ्य इतके कसे चांगले आहे. कारण अनेक क्षुल्लक गोष्टी त्यांच्याविषयी प्रचलित केल्या गेल्या होत्या. पण कशाचीही पर्वा न करता राहूल गांधी आणि त्यांच्या असंख्य साथीदारांनी यशस्वीपणे ही यात्रा संपवली आणि जगाला संदेश दिला की उद्दिष्ट नेक असेल तर निसर्गाच्या शक्तीसुद्धा मदत करायला पुढे येतात.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment