काही लोक बघता-बघता विकासाचे असे शिखर गाठतात की, लोकांना कळत नाही त्यांना हे कसं जमलं, आम्हाला का जमलं नाही. विकासाच्या संपत्तीच्या भांडवलाचे शिखर नाही तरी राहायला घर जेवायला अन्न आणि जगण्याची दुसरी साधने तरी सहज सुलभ का हस्तगत करता येत नाही. अख्खे आयुष्य या प्रश्नाची उत्तरे शोधण्यात घालविली तरी ती मिळत नाहीत.
समुद्रात बर्फाचे मोठ-मोठे पर्वत असतात. त्यांना आईसबर्ग म्हणतात. ते समुद्राच्या पाण्यात बुडलेले असल्याने वरून थोडीसी झलक दिसते. खोली किती मोठी आहे याचा अंदाज देखील लावता येत नाही. असाच हिन्डेनबर्ग नावाचा एक हीमपर्वत समुद्रात होता. वरून लहानसा तुकडा पण खोली भलीमोठी. या पर्वताला भारतातील एका उद्योगपतीचे टायटॅनिक सारखे आलीशान विशाल आणि विलासिता भरलेले जहाज जाऊन आदळले आणि त्या जहाजाचा चक्काचूर झाला. जहाजात काय लपवले होते; फसवेगिरी करून किती अफाट संपत्ती गोळा केली होती. किती लोकांना, सरकारला गंडा घातला होता. या सर्व वस्तू त्या जहाजातून बाहेर पडून सध्या समुद्रात तरंगत आहेत. त्या उद्योगपतींचे नाव सर्वांना माहित आहे.
गेली 10-12 वर्षे अडाणी समूह यांच्याच नावाची सर्वत्र चर्चा आहे. भारताचा 75 वर्षांच्या विकासाचा टप्पा त्यांच्याच नावावर केला गेला आहे! त्यांच्याविषयी इथे जास्त कोणती माहिती देणे आवश्यक नाही. कारण सामाजिक माध्यमे त्यांच्या कृत्यांनी भरलेली आहेत. राष्ट्रीय माध्यमे असोत की प्रिंट माध्यमे ज्यांचे हितसंबंध असतात त्यांना या प्रकरणात काही जास्त गुंतायचे नाही म्हणून तिथे बरीच कमी माहिती मिळणार.
या उद्योगपतींनी अवाढव्य संपत्ती कशी गोळा केली याचा तपशील हिन्डेनबर्ग संस्थेने विस्ताराने दिलेला आहे. पण शेअरबाजार म्हणजे काय? शेअर्सच्या किमती कशा प्रमाणे वाढल्या जातात. लोक त्यांची खरेदी कसे करतात, का विकतात, कशी कमाई केली जाते या साऱ्या गोष्टी सामान्य माणसांना समजण्यासारख्या नाहीत. म्हणून त्याच्या खोलात जाऊन चर्चा करण्याची गरज नाही. हिन्डेनबर्ग यांनी या महाशयाच्या शेअर बाजारातील उलाढाल, खोट्या कंपन्या परदेशात उभारून त्यांच्याद्वारे केली जात असलेली मनी लाँड्रींग करून खरबो रूपयांची संपत्ती गोळा केली होती. कोरोना काळात त्यांची संपत्ती 100 टक्क्यांनी कशी वाढली ही बाब सामान्यांना समजता येणारी नाही. मात्र या प्रश्नाचे उत्तर हिन्डेनबर्ग संस्थेने आपल्या अहवालात दिले आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ज्यांचा क्रमांक तिसरा होता, तो आता हा अहवाल चव्हाट्यावर आल्याने त्यांच्या संपत्तीला अब्जावधींचा फटका बसला आणि तिसऱ्या क्रमांकावरून ते खाली 15 व्या क्रमांकावर फेकले गेले. यावरून त्या अहवालाचे गांभीर्य कोणालाही समजू शकते.
हिन्डेनबर्ग ने जो अहवाल प्रसारित केला त्याचे उत्तर या महाशयाकडे नव्हते म्हणून त्यांनी राष्ट्रवादाच्या पडद्याचा आड घेतला. हा भारतावरील हल्ला आहे. इथल्या अर्थव्यवस्थेवर आणि उद्योग जगतावर हल्ला आहे. याचे उत्तर त्या संस्थेने दिले की आपण जे फ्रॉड केले आहे त्याला राष्ट्रवादाच्या पडद्यात लपवण्याचे प्रयत्न करू नका. खरे तर तुम्हीच भारताच्या विकासात अडसर उभे करत आहात.
उद्योगपतींच्या अवाढव्य कमाईचे गुपित काय हे सामान्यांना माहित नाही. कोणी पेट्रोल पंपावर तर कोणी स्कूटरवर फिरून व्यापार करणारे अचानक इतकी संपत्तीची जमवाजमवी कशी करतात? उत्तर सोपे आहे; राजकारण आणि सत्ता संस्थांशी त्यांचे लागेबांधे !
आपण सामान्य माणसे एखाद्या बँकेकडे कर्ज घेण्यासाठी गेलो तर बँकांचे अधिकारी भुवया उंचावून कसे तिरस्काराने आपल्याकडे पाहतात. वाटते आपण इथून निघून जावे. पण जेव्हा राजदरबाराचे चाहते हे उद्योगपती या बँकांना विचारतात तेव्हा त्यांचा सत्कार केला जातो. पाहुणचार केला जातो. अब्जावधींचे कर्ज माफ केले जाते.त्या महाशयांना अडीच लाख कोटींचा लाभ कशाप्रकारे झाला. काही लोक कोट्यावधींचे कर्ज घेऊन देश सोडून पसार झाले. बाकीच्यांचे कर्ज जवळपास 12 लाख कोटी सरकारने बँकांच्या वह्यातून काढून टाकले. हा पैसा कोणाचा? सामान्य माणसांनी रक्तजाळून बँकामध्ये जमा केलेला किंवा जीवन विम्याचे हफ्ते भरलेला. ही कला सर्वाना जमत नाही. सर्वांना शासन दरबारी संधी मिळत नाही. महिनाकाठी 5 किलो अन्नधान्य जनतेच्या नशीबी. ज्याला विधीचे विधान म्हणा की आपले दुर्दैव म्हणा एकच गोष्ट.
- सय्यद इफ्तेखार अहमद
Post a Comment