Halloween Costume ideas 2015

रामदेव बाबा : निंदकाचे घर असावे शेजारी


वक्त-ए-फुर्सत है कहां काम अभी बाकी है

नूर-ए-तौहिद का इतमाम अभी बाकी है

२ फेब्रुवारीला राजस्थानच्या बाडमेर येथे हिंदू संतांच्या एका मेळाव्यामध्ये बोलतांना रामदेवबाबा यांनी इस्लाम व मुस्लिमांवर सडकून टिका केली. ते म्हणाले, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना धर्माच्या वेडाने झपाटले आहे. मुस्लिमांची अशी धारणा आहे की नमाज हिंदू मुलींच्या अपहरणांपासून ते आतंकवादांपर्यंतच्या सर्व गुन्ह्यांना धुवून टाकते. तुम्ही कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला विचारा की तुमचा धर्म काय आहे? ती व्यक्ती मग उत्तर देईल की, ’’ बस्स ! पाच वेळेस नमाज अदा करा मग काहिही करा’’ हिंदू मुलींना उचलून न्या, जे पाप करायचे ते करा. ते इस्लामचा अर्थ फक्त नमाज समजतात. आमचे मुस्लिम बंधू फार पाप करतील परंतु नमाज जरूर अदा करतील. कारण त्यांना हेच शिकविले गेले आहे की नमाज अदा करा बाकी जे करायचे आहे ते करा. म्हणूनच ते आतंकवादी बनले आणि त्यांच्यातील काही गुन्हेगार देखील बनले. त्यांची स्वर्गाची संकल्पना म्हणजे गुडघ्याच्या वर इजार असावी, मिशा साफ असाव्यात, डोक्यावर टोपी असावी, असे कुरआन किंवा इस्लाम म्हणते असे माझे म्हणणे नाही. मात्र लोक असेच करत आहेत. मग म्हणे त्यांचे जन्नतमध्ये स्थान पक्के होते! जन्नतमध्ये काय मिळते म्हणून त्यांना विचारले असता ते म्हणतात ’हूर’ आणि ’मद्य’ मिळते, अशी जन्नत तर जहन्नमपेक्षा बेकार आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे. परत यांना सर्व जगाला इस्लाममय करायचे आहे. असे करून ते काय साध्य करणार आहेत? हे समजून येत नाही. परंतु या चक्करमध्ये ते पडले आहेत. या उलट हिंदू धर्म अहिंसा आणि प्रामाणिकपणा शिकवितो.’’ रामदेवबाबाच्या या बेताल वक्तव्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणे हे दोन अपराध होतात. त्यासाठी बाबांवर 153 ए आणि 295 ए भादंविप्रमाणे बाडमेर येथे गुन्हा दाखल झाला आहे. खरे तर देशभरात त्यांच्याविरूद्ध अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल व्हायला हवेत. रामदेवबाबा हे एक प्रतिष्ठित व्यक्ती असून, देशात योग गुरू म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांचा प्रभाव बहुसंख्य समाजाच्या अनेक लोकांवर आहे.  त्यांच्या या भाषणातील फोलपणा जर का दाखवून दिला गेला नाही तर बाबा जे बोलले ते खरेच आहे, असा एक चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.

रामदेवबाबा यांनी इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा शांत डोक्यांनी वस्तुनिष्ठ आढावा घेऊ. कारण निंदकाचे घर असावे शेजारी. त्यांनी केलेली टिका ही पूर्वग्रह दुषित आहे म्हणून सरसकट फेटाळून लावणे जरी शक्य असले तरी तसे करणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. इस्लाम आणि मुस्लिम यांच्याबद्दल त्यांचे असे (नकारात्मक) मत का बनले? याचे आत्मपरीक्षण मुस्लिम समाजाने सुद्धा करावयास हवे. त्यासाठी त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्यांचा समाचार खालीलप्रमाणे घेऊ. 

1. ’’पाच वेळेसची नमाज अदा करा, त्यानंतर मनात येईल तसे करा जे पाप करायचे ते करा.’’

रामदेवबाबा यांच्या भाषणातील हा प्रमुख मुद्दा. हा मुद्दा अत्यंत आक्षेपार्हच नाही तर खोटा सुद्धा आहे. कारण, कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’इनस्सलाता तन्हा अनिल फहशाई वल मुन्कर’  म्हणजे निश्चितच नमाज अश्लीलता आणि वाईट कृत्यांपासून रोखते. हा प्रत्येकाचा अनुभव आहे की, नमाजी व्यक्ती कधीच कुठलेही पाप करत नाही. कधी कोणाला त्रास देत नाही. 

2. ते इस्लामचा अर्थ नमाज एवढाच समजतात. बाबाचे हे म्हणणे केवळ त्यांचे अज्ञान दर्शविते. नमाजशिवाय, देशात जकातची व्यवस्था मुस्लिम समाजामध्ये व्यापक प्रमाणात उभी केलेली आहे. देशातील इतर समाजाबरोबर मुस्लिम समाजसुद्धा सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरूनसुद्धा स्वमर्जीने आपल्या बचतीवर अडीच टक्के वार्षिक जकात काढून गरीबांना आर्थिक मदत करतो. कोट्यावधी लोक दरवर्षी रमजानचे उपवास करतात, लाखो लोक हज आणि उमराहसाठी जातात, अनेक मुस्लिम अनेक मुस्लिम अशासकीय संस्था आणि धर्मार्थ रूग्णालय चालवितात, शाळा, महाविद्यालये चालवितात. ज्याचा लाभ सर्व समाजाला मिळतो. 

3. ’हिंदूंच्या मुली मुस्लिम घेऊन जातात’ रामदेवबाबांचे हे विधान फक्त आक्षेपार्हच नसून हिंदू मुलींचा अपमान करणारे आहे. मुस्लिम मुलं हिंदू मुलींना उचलून घेऊन जातात आणि त्या गुपचुप त्यांच्याबरोबर जातात. म्हणजे हिंदू मुलींना बाबा नादान समजतात काय? बाबांचे हे म्हणणे अतिशय आक्षेपार्ह असे आहे. हां! एवढे मात्र खरे की भारत एक बहुधर्मीय देश असल्यामुळे अनेक आंतरधर्मीय प्रेमप्रकरणे आणि लग्नसुद्धा होतात. मात्र या सर्व प्रक्रियेला मुस्लिम मुलं हिंदु मुलींना उचलून घेऊन जातात असे म्हणणे चुकीचे आहे. 

4. मुस्लिम आतंकवादी बनले आणि त्यांच्यातील काही लोक गुन्हेगार बनले. बाबांचे हे वाक्य सुद्धा चुकीचे आहे. मुस्लिमांना आतंकवादाशी जोडण्याची फॅशन 90 च्या दशकात होती. मात्र शहीद हेमंत करकरे यांनी यातील सत्य उघडकीस आणल्यानंतर सुद्धा पुन्हा मुस्लिमांना आतंकवादाशी जोडणे म्हणजे खोडसाळपणाचे लक्षण आहे. राहता राहिला गुन्हेगारीचा प्रश्न तर ही गोष्ट प्रांजळपणे स्वीकार करण्यास कसलीच हरकत नाही की मुस्लिम समाजातील काही लोक गुन्हेगारी कृत्यामध्ये आढळून येतात. मात्र ते त्यांच्या धर्मामुळे नव्हे तर गरीबीमुळे असे करतात. जगात जिथे कुठे गरीबी असेल तिथे गुन्हेगारी असतेच. उलट मुस्लिम लोक छोटे-मोठे गुन्हे जरूर करतात मात्र देशाची संपत्ती लुटून विदेशात पळून जात नाहीत, बँकांना बुडवत नाहीत, व्हाईट कॉलर क्राईम करत नाहीत. किरकोळ गुन्हे करणाऱ्यांपेक्षा हे असे गुन्हे करणारे देशासाठी जास्त घातक असतात, हे बाबांना कळेल तो सू दिवस. 

5. मुस्लिमांची स्वर्गाची कल्पना म्हणे त्यात फक्त मद्य आणि हूर मिळते. हे ऐकीव माहितीवर आधारित आहे. बाबा असो का बाबासारखे अन्य लोक ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, त्यांना इस्लामची पारलौकिक जीवन, मृृत्यूनंतर होणारी विचारपूस, अंतिम निवाड्याचा दिवस, स्वर्ग आणि नर्क ही कल्पना समजणेच शक्य नाही. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे उचित नाही, असे माझे मत आहे. 

6. त्यांना सर्व जग इस्लाममय करायचे आहे, असे करून काय साध्य करणार आहेत? बाबांचे हे म्हणणे इस्लामच्या इतिहासाविषयी त्यांचे अज्ञान सिद्ध करणारे आहे. इस्लाम जेव्हा सातव्या शतकात अरबस्थानात आला तेव्हापासून अवघ्या शंभर वर्षात अरबी मुस्लिमांनी जगाच्या एक तृतीयांश भूभागावर इस्लामची सत्ता स्थापित केली होती. परंतु त्यांनी कधीच ती सत्ता स्वतःसाठी हस्तगत केली नव्हती. याचा पुरावा असा की, आज मध्यपुर्वेतील मोजून पाच-सात चिमुकले देश व एक मोठा देश सऊदी अरेबिया वगळता जगात अरबांची सत्ता कुठेच नाही. जगात 55 मुस्लिम देश आहेत पण प्रत्येक देशात तेथील स्थानिक नागरिकांच्याच हातात सत्तेची सुत्रे आहेत. त्यांचे युद्ध फक्त तत्वासाठी होते. साम्राज्यविस्तार हा त्यांच्या खिजगणतीतच नव्हता. त्यांनी इराण जिंकला इराण्यांना परत दिला. इराक जिंकला इराकींना परत केला. सीरिया जिंकला सीरियनना परत केला. इजिप्त जिंकला इजिप्शिनींना परत केला. थोडक्यात त्यांनी कधीच आपली संस्कृती दुसऱ्यांवर लादली नाही. त्यामुळे मुसलमान हे सत्तापिपासू असतात. हा जो त्यांच्यावर आरोप होतो तो चुकीचा आहे. हां! एवढे नक्की  की इस्लाम एक मिशनरी धर्म असून, प्रत्येक सश्रद्ध मुस्लिम व्यक्ती ही दुसऱ्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचण्यासाठी इच्छुक असते. त्याचे कारण प्रत्येक मुस्लिम व्यक्ती प्रामाणिकपणे असे समजते की इस्लाम हीच कल्याणकारी जीवन व्यवस्था आहे आणि प्रत्येक माणसाचे जीवन इस्लाममय व्हावे. हा त्याचा भ्रम नसून मुस्लिमांच्या या विचाराला कुरआनचे भक्कम अधिष्ठान प्राप्त आहे.

’’अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 19)

येणेप्रमाणे मुस्लिम समाज आपल्याबरोबर इतरांचेही कल्याण व्हावे या प्रामाणिक इच्छेमुळे इस्लामचा संदेश पोटतिडकीने इतर समाजापर्यंत पोहोचवत असतो. याला सत्तेशी जोडणे हे अज्ञानतेचे लक्षण आहे. एकंदरित रामदेवबाबा हे अनावश्यक बोलण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. अलिकडेच त्यांनी महाराष्ट्रात अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत महिलांच्या बाबतीत जे अपमानजनक उद्गार काढले होते, त्यासाठी त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती, हे ही वाचकांनी लक्षात घ्यावे. थोडक्यात बाबांचे इस्लाम आणि मुस्लिमांविषयीचे मत पूर्वग्रह दुषित असे असून, मुस्लिम समाज यासाठी त्यांचा निषेध करतो. 

मिलियन डॉलर क्वश्चन

रामदेव बाबांचे हे विचार त्यांचे एकट्याचेच नसून अशा विचारांचे अनेक लोक बहुसंख्य बंधूंमध्ये आहेत. त्यांचे हे विचार पूर्वग्रह दुषित आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून शांत बसणे हे सुद्धा गफलतीत राहण्यासारखे आहे. या लोकांचे असे विचार का बनले? याचा शोध घेणेसुद्धा गरजेचे आहे. याचा शोध घेतला असता एक गोष्ट लक्षात येते की त्यांचे असे मत होण्यासाठी भारतीय मुस्लिम समाज सुद्धा दोषी आहे. मुस्लिम समाजातील मोठ्या भागाचा कुरआनशी व्यावहारिक संबंध तुटलेला आहे. त्यामुळे कुरआनच्या म्हणजेच इस्लामच्या आत्म्यापासून ते स्वतः वंचित आहेत. म्हणून ते बहुसंख्य बंधूंपर्यंत त्यांच्या भाषेत इस्लामचा संदेश पोहोचविण्याची योग्यताच हरवून बसलेले आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील मोठा भाग कुरआनशी व्यावहारिकरित्या स्वतःला जुळवून घेणार नाही आणि त्याचा संदेश खालील ईश्वरीय मार्गदर्शनाप्रमाणे देण्याचा प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत बहुसंख्य बंधुंमधील हे गैरसमज नष्ट होणार नाहीत. हे काम कसे करावे? याचे मार्गदर्शन कुरआनच्या खालील आयातीत दिलेले आहे. 

’’हे पैगंबर (स.), आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल. तुमचा पालनकर्ता अधिक उत्तम जाणतो की कोण त्याच्या मार्गापासून भ्रष्ट झाला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे.’’ (सुरे नहल 16: आयत नं. 125). रामदेवबाबांच्या या अनर्गल वार्तालापापासून मुस्लिमांनी किमान एवढा जरी बोध घेतला तरी पुरे की यासाठी आपण स्वतःही यासाठी जबाबदार आहोत. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला इस्लामचा संदेश देश बांधवांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget