Halloween Costume ideas 2015

खचत चाललेल्या शहरांचा आक्रोश


जोशीमठ हिमालयाच्या कुशीत सहा हजार फुटांवर वसलेले हे एक निसर्गरम्य आणि प्राचीन इतिहासाचा समृद्ध वारसा असणारे गांव. इ.स. 7 व्या शतकात कुमाऊ खोऱ्यात कत्युरी राजवटीचा हे गांव भाग होते. पुढे इ.स. 11 व्या शतकात कत्युरी राजवटीच्या जागी पनवार राजवट राज्य करू लागली. कत्युरी राजवट वासुदेव कत्युरी या राजाने स्थापन केली. हा राजा बौद्ध धर्मीय होता. पण कालांतराने तो ब्राह्मण्यवादाकडे झुकला. आदीशंकराचार्याच्या प्रभावाने हे घडले असण्याची एक शक्यता आहे. जोशीमठ येथील बासदेव मंदिर हे या वासुदेव राजाचे. आदीशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांमधील एक पीठ, ज्योतिर्मठ, याच गावांत आहे. याच गावांत शंकराचार्यांनी नरसिंहाचे मंदिरही उभे केले. स्थानिकांची अशी श्रद्धा आहे की या मूर्तीचा उजवा हात बारीक होत चालला आहे. हा हात ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी बद्रीनाथच्या वाटेवर असणारे जय-विजय पर्वत एक होतील आणि बद्रीनाथ मंदिरातील बद्रीनाथ हे अंतर्धानपावून जोशीमठाजवळील ‘भविष्य बद्री’ या जागी काळ्या शाळिग्रामाच्या रूपात अवतरतील. हिवाळ्यात बद्रीनाथ मंदिर बंद केले जाते तेव्हा बद्रीनाथाची मूर्ती जोशीमठातील नरसिंह मंदिरात आणली जाते आणि सहा महिने तिची पूजा या मंदिरात होते. बद्रीनाथ, हेमकुंडसाहिब या धार्मिक स्थळांकडे जाण्याचे हे प्रवेशद्वार. औली या जगप्रसिद्ध स्कीइंग स्थळाकडे आणि युनेस्को वर्ल्ड हेरीटेज स्थळ, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सकडे या गावातूनच जावे लागते. औलीकडेजाणारा रोप वे या गावातूनच सुरू होतो. गरम पाण्याचे झरे असणारे तपोवन या गावाच्या जवळच आहे. भारतीय लष्कराचेही ते अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे लष्कराचा असणारा मोठा तळ हा चीनच्या सीमेला सर्वात जवळ असणारा तळ आहे. थोडक्यात सर्वार्थाने जोशीमठ हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. 

गेल्या वर्षापासून या छोट्या शहरांत रात्रीच्या भयाण शांततेत एकामागून एक घरांच्या खालून भयानक आवाज येत राहिले आणि घरे खचत राहिली. भयभीत रहिवासी भर थंडीत घरे सोडून मिळेल तिथे आश्रय घेत राहिले. आणि अनेक रहिवासी कोसळू पाहणाऱ्या घरांमध्येच राहत राहिले. राहते घर सोडणे माणसाला किती अवघड जात असते याचे हे बोलके उदाहरण. घरांबरोबर गावातले रस्तेही खचत राहिले. 

गेल्या 22 डिसेंबरला तर गावाला जगाशी जोडणारा हमरस्ताच खचला. लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयाला जोडणारा रस्ताही खचू लागला. काही छोटी मंदिरेतर कोसळली. अनेक हॉटेलांना गंभीर तडे गेले. जोशीमठ हे तर धार्मिक स्थळांपेक्षा पर्यटनावर चालणारे शहर. पिण्याच्या  पाण्याच्या जलवाहिन्या आणि सांडपाण्याच्या अनेक वाहिन्याही तुटल्या. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शहरातील साडेचार हजार इमारतींपैकी 687 इमारतींना धोकादायक तडे गेले आणि आजही रोज नव्या इमारतींना तडे जात आहेत. हे सारे घडत असताना प्रशासन  निद्रिस्त होते. रहिवासी आक्रोश करीत रस्त्यांवर उतरल्यावर प्रशासनाला जाग आली. आणि मग स्थानिक प्रशासन, मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान कार्यालय हलू लागले. आपत्कालीन व्यवस्थापन दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या, तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या, कुटुंबे हालविण्यात येऊ लागली, आर्थिक मदती जाहीर होऊ लागल्या, सर्वेक्षणे सुरू झाली, समित्या नेमल्या गेल्या. सर्वात मोठा विनोद म्हणजे जोशीमठ हे शहर ‘भूस्खलनप्रवणक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले.

देवाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या जोशीमठ या शहराचे हे खचणे आज किंवा कालचे नाही. या शहराच्या खचण्याच्या धोक्याची चाहूल 1886 मध्ये अ‍ॅटकिन्स या इंग्रज अधिकाऱ्याला लागली होती. जोशीमठ हे शहर खचू शकणाऱ्या भूभागावर वसलेले आहे हे त्याने गॅझेटमध्ये नमूद करून ठेवले होते. त्यानंतर याची चाहूल पुन्हा थेट 1964 मध्ये, म्हणजे सहा दशकांपूर्वी लागली. त्यावेळच्या सरकारने गढवालचे जिल्हाधिकारी एम.सी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांची एक समितीही नेमली. या समितीने 1976 मध्ये सादर केलेला अहवाल लक्षात घेण्यासारखा आहे. या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले की जोशीमठ या भागाची निर्मिती ही अनेकशतकांपूर्वी झालेल्या भूस्खलनानंतर झाली आहे. भूस्खलनानंतर कोसळून आलेल्या दगड मातीच्या थरांवर जोशीमठ वसले आहे. हिमालय हा जगातील सगळ्यात तरुण पर्वत. त्याच्याखालील भूस्तर आजही अस्थिर आहेत. त्यात जोशीमठ हे वैक्रिता थ्रस्ट, मुख्य केंद्रीय थ्रस्ट आणि पांडूकेशवार थ्रस्ट या भूस्तरातील तीन तड्यांवरच्या (फॉलटलाईन्स) वर वसलेले आहे. असे भूस्तर हे सतत एकमेकांखाली सरकत असतात. ही भूस्तरीय हालचाल भूकंप निर्माण करीत असते. त्यामुळे हा सर्व भाग मुळातच भूकंप प्रवण. भूकंप प्रवणता आणि त्याची शक्य तीव्रता यानुसार भारताचे चार भौगोलिक भाग पडतात. त्यातला झोन व्ही, ज्या भागात भूकंप झाल्यास त्याची तीव्रता रिश्टर स्केल वर 9 पेक्षा अधिक राहील. ही तीव्रता अतितीव्र सदरात मोडते. जोशीमठ झोन व्ही वर वसलेला आहे. याबरोबर शेकडो वर्षे वातावरणाचा होणारा परिणाम, पाऊस, बदलणारे पाण्याचे प्रवाह, झिरपणारे पाणी या सर्वांच्या परिणामातून ही जमीन अत्यंत भुसभुशीत होत गेली आहे आणि होत राहील. म्हणजे आधीच भूकंप प्रवण त्यात भूस्खलनशील. थोडक्यात या सर्व नैसर्गिक कारणांमुळे जोशीमठ परिसर हा नैसर्गिकरीत्या धोकादायक आहे. येथील जमिनीची, बांधकामे पेलण्याची क्षमता खूप कमी आहे. यामुळे या भागात बांधकामे, प्रकल्प उभे करताना, रस्ते बांधताना या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात हे मत मिश्रा समितीने सहा दशकांपूर्वीच नोंदवून ठेवले होते. 

हा अहवाल दुर्लक्षिण्यात आला. याव्यतिरिे वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीने 2001 साली या भागाचाच नाही तर चारधाम, मानस सरोवर यात्रा मार्ग, डेहराडून, टेहरी, उत्तरकाशी, पौडी, रुद्रप्रयाग, पिठोरगड, नैनिताल, चामौलीया सर्व भागांचा पुन्हा अभ्यास करून आणखीन अनेक बाबी समोर आणल्या. मुख्य म्हणजे त्यांच्या अहवालात, हा भाग फक्तनैसर्गिक कारणांमुळे धोकादायक बनलेला नसून त्यात मनुष्यनिर्मित अशी अनेक कारणे आहेत असे त्यांनी मांडले. विष्णूप्रयागपासून वाहत येणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांमुळे होणारी जमिनीची धूप यांत भर घालते. 2013 मध्ये झालेल्या केदारनाथ प्रलयाने यात भर घातली. अलकनंदा नदीच्या प्रवाहाने प्रचंड माती वाहून आणली ज्यामुळे अनेक नैसर्गिक नाले बुजले. यामुळे हे नाले मुळात जे पाणी वाहून नेत ते पाणी आता भलतीकडून बाहेर पडते. यामध्ये भर घालत आहे ती वैश्विक तापमान वाढ. उत्तराखंड राज्यात यामुळे पावसाची सरासरी वाढत चालली आहे. वाढणाऱ्या पावसामुळे डोंगर उतारांवरील जमिनीची धूप वेगाने होत आहे. या सर्व वस्तुस्थितीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत जोशीमठभागात बेसुमार बांधकामे होत राहिली. हॉटेल्स फोफावत राहिली. अनेक मजली इमारती उभ्या राहू लागल्या. रस्ते बांधण्यात आले. बद्रीनाथ येथे जाण्याचे हे द्वार असल्याने बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांना जाणे सोपे व्हावे म्हणून इथल्या जमिनीला न झेपणारे मोठे रस्ते बांधण्यात आले. इतकेच नाही तर धरणे आणि वीजप्रकल्प उभारण्यात आले. विष्णूगढ जलविद्युतप्रकल्पासाठी जमिनीखाली बोगदे खणण्यात आले. हे सर्व विकासाच्या नावाखाली घडत होते. हा विकास पुन्हा जंगले साफ करीत घडत होता. साफ होणाऱ्या जंगलांमुळे जमिनीची धूप वाढत होती. या सर्व सत्यांकडे दशकानुदशके दुर्लक्ष होत गेल्याने आज एक शहर कोसळण्याच्या आणि नामशेष होण्याच्या अवस्थेला पोहोचले आहे. भारताच्या उत्तर भागातील अनेक शहरांची अवस्था कोणत्याही क्षणी जोशीमठासारखी होऊ शकते हे पण विसरून चालणार नाही. सरकारांमागून सरकारे आली पण अनेकतज्ज्ञांनी अभ्यास करून पुढे आणलेल्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत राहिले. गेली तीस वर्षे आपल्या देशावर कोसळणाऱ्या प्रत्येक मोठ्या आपत्तीनंतर ‘आरोग्य सेने’ची पथके त्या भागात पोहोचत गेली आहेत. लातूरचा भूकंप असो, तामिळनाडू-केरळच्या किनाऱ्यांना उद्ध्वस्त करणारी त्सुनामी असो, बिहारचा कोसी प्रलय असो, काश्मीरचा पूर असो वा केदारनाथचा प्रलय असो या प्रत्येक आपत्तीमागे निसर्गाबरोबर अनेक मानवी घटक होते. हे मानवी घटक वेळीच टाळले गेले असते तर किमान मनुष्यहानी तरी मोठ्या प्रमाणावर टळली असती या निष्कर्षाप्रति आम्ही त्या भागात काम केल्यावर प्रत्येक वेळी पोहोचलो. जोशीमठ आणि उत्तराखंड-हिमाचल भागातील अनेक गावे आपल्या पोटात टाईम बाँम्ब घेऊन जगत आहेत. या टाईम बाँम्बचा स्फोट होण्याची वाटबघत आम्ही बसणार आहोत का हा खरा प्रश्न आहे! भारतातील शहरे आणि गावे वाढत नसून सुजत आहेत. ही सूज कर्करोगाच्या गाठींसारखी आहे. पण कर्करोगाची गाठ निदान शस्त्रक्रिया करून काढून टाकता येते किंवा किमोथेरपी वा रॅडीओथेरपीने विरघळवून टाकता येते. शहरे वा गावांना विकासाच्या नावाखाली येणारी ही सूज टाळणे हा एकच उपाय आहे. निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेली शहरे आणि गावे आपण विद्रूप करीत चाललो आहोत. पण ही कुरूपता माणसाला तेवढीच घातक ठरू शकते याचे भान ठेवावे लागेल. आपल्या देशाने नगरविकास शास्त्राकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. गेल्या दशकात याचा कडेलोट झाला आहे. देशात गेले दशकभर सत्ता गाजवणाऱ्या पक्षाचा एका राज्याचा अध्यक्ष हा ‘रस्ते, गटारे हे प्रश्न महत्त्वाचे नसून लव्ह जिहाद सारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत’ असे जाहीरपणे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो अशा पक्षाची सत्ता असे पर्यंत विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस आणि शहरांचे वाटोळे होण्याशिवाय काय घडणार? हिंदुराष्ट्राची भाषा करणाऱ्यांना हिंदूंचे परम श्रद्धास्थान असणाऱ्या बद्रीनाथाकडे जाणाऱ्या ‘देवाच्या द्वारा’कडे लक्ष द्यायची इच्छा नाही. किमान गेल्या सात-आठ वर्षांमध्ये लक्ष दिले असते तरी देवाचे हे द्वार खचले नसते आणि तेथील रहिवाशांना रस्त्यावर यावे लागले नसते.जोशीमठ नावाच्या खचणाऱ्या गावाचा आक्रोश हा भविष्यातील एका मोठ्या संकटाचा इशारा आहे! या इशाऱ्याकडे गंभीरपणे पाहण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे हवी संवेदनशीलता आणि हेतूंचा प्रामाणिकपणा! 

- डॉ अभिजित वैद्य

(साभारः पुरोगामी जनगर्जना)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget