Halloween Costume ideas 2015

चिंता व काळजी


"मन चिंती ते वैरी न चिंती" यांसारखे वाक्प्रचार ही आपण नेहमीच वापरतो.

"Worry is the most subtle & destructive of all human diseases." -Norman Vincet Peale.

"चिंता ही सर्व मानवी रोगांपैकी सर्वांत सूक्ष्म आणि विनाशकारी आहे." -नॉर्मन विन्सेंट पील

सकारात्मक मानसिकता ही संकल्पना लोकप्रिय करणारे अमेरिकन लेखक  व उत्तम वक्ते असणाऱ्या नाॅर्मन विन्सेंट पील यांचे The Power of Positive Thinking हे पुस्तक प्रचंड वाचकप्रिय झाले आहे.

प्रत्येक व्यक्ती कसली ना कसली चिंता करतोच. चिंता नाही असा माणूस सापडणे कठीणच. वाळवीप्रमाणे ही चिंता मानवी आरोग्याला कुरतडत असते. ही चिंता म्हणजे काय हे सांगताना नाॅर्मन विन्सेंट पील म्हणतात, "चिंता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपली रोगट आणि विनाशकारी मनोवृत्तीच आहे. आपण चिंता करण्याची सवय घेऊन जन्माला आलो नाही. तर ही सवय आपण नंतर शिकलो. म्हणून आपण योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर या सवयीपासून मुक्ती मिळवू शकतो. तिला पराभूत करू शकतो".

चिंतेच्या नकारात्मक  सवयीला लवकरात लवकर सोडून देणे हे सुखी आणि यशस्वी जीवनासाठी गरजेचे असल्याचे नॉर्मल पील यांनी सांगितले आहे.

चिंता किंवा काळजी ही माणसाला आतून पोखरून काढते. सतत चिंता किंवा काळजी करणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. चिंता किंवा काळजी करणारी व्यक्ती सतत दुर्मुखलेली असते. तीला नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागते.त्याच्या ठायी नकारात्मकता व नैराश्याची भयानक मानसिक स्थिती निर्माण होते. अनेकदा या नैराश्यामुळे आत्महत्येचा विचार ही यांच्या मनात डोकावत असतो. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची काळजी किंवा चिंता करणे हा एक असाध्य रोग आहे. तथापि यातून अत्यंत कष्टाने व प्रयत्नपूर्वक बाहेर पडणे आवश्यक असते.  प्रत्यक्षाहूनी कल्पना भयानक अशी सुध्दा काहींच्या बाबतीत परिस्थिती निर्माण झालेली असते. अलीकडच्या एका मानसिक आरोग्याच्या चाचणीत असे पुढे आले आहे की, पाचापैकी चार रोगी हे प्रत्यक्ष घटनेपेक्षा  चिंता व काळजी यामुळेच अधिक त्रस्त असतात. न्यूयॉर्कमधील मेयो हॉस्पिटलमध्ये ३५ टक्के रुग्णांच्या आजारांचे कारण चिंता व काळजी हे असते, असे दिसून आलेले आहे. चिंता व काळजीमुळे अनेक दुष्परिणाम ही होतात. रक्तदाब, मधुमेह यासारख्या व्याधी केवळ चिंता व काळजी मुळे होतात, हे आता सिद्ध झाले आहे.चिंता किंवा काळजी मुळे सतत मनावर ताणतणाव निर्माण होतात. त्यातूनच हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, निरनिराळ्या ग्रंथीतून वाहणारा स्त्राव व एकूण केंद्रीय मज्जासंस्था यांच्यावर परिणाम होतो. शारिरीक व मानसिक आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते.

काळजी ही एक भावनिक अवस्था आहे. ती दूर करण्यासाठी गोळ्या इंजेक्शन यांसारख्या बाह्य उपायांचा फारसा उपयोग होत नाही. स्वतःच्या मनोवृत्तीत, वैचारिक धारणेत प्रयत्न पूर्वक बदल करायला पाहिजे. ज्या गोष्टीची चिंता किंवा काळजी लागून राहिली आहे, त्या गोष्टींना धाडसाने सामोरे जाऊन तीचा सुक्ष्मपणे सखोल अभ्यास केला पाहिजे.. त्यातून त्या व्यक्तीला आपणांस वाटणारी आणि सतत घाबरून टाकणारी चिंता किंवा काळजी म्हणजे आपल्यात असणारे अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या भीतीमुळेच आपल्या मनात चिंता व काळजीने घर केले आहे, हे कालांतराने लक्षात येते. एकदा का चिंता किंवा काळजीचे कारण समजले तर त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना करता येतात. यातील बहुतेक माणसे किरकोळ व क्षुल्लक गोष्टींनी सुध्दा घाबरून जातात. यामुळे अनेक व्यक्ती सतत नकारात्मक व निराशावादाच्या गर्तेत अडकतात. त्यामुळे ते या सुंदर जीवनापासून वंचित रहातात.

यासंदर्भात एका शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की,....

१) मानवी जीवनात ज्या दुर्घटना प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत अशा संभाव्य दुर्घटनांची काळजी करणाऱ्यांची संख्या ४० टक्के आहे.

२) जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराला किंवा रोगाला तोंड द्यावे लागते,या आजाराची किंवा रोगाची चिंता किंवा काळजी करणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे.

३) भूतकाळात आपल्या हातून कळत नकळत बऱ्याच चुका होतात, असा निघून गेलेला काळ पुन्हा येणार नसतो, हे माहित असूनही ज्यांच्याबद्दल आता काहीच करणे शक्य नाही अशा भूतकाळात घडलेल्या गोष्टींची चिंता किंवा काळजी करणाऱ्यांची संख्या  ३० टक्के आहे.

४) प्रत्यक्षात खरंच ज्या गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत अशांची संख्या केवळ १० टक्के आहे. अर्थात यांसारख्या गोष्टींतून चिंतामुक्त किंवा काळजीमुक्त होण्यासाठी केवळ वेळ द्यावा लागतो. वेळ देणे हाच रामबाण उपाय असतो.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर खरोखरची चिंता किंवा काळजी नगण्य असते, 

याचाच दुसरा अर्थ आपली काळजी आपणच निर्माण करतो. रस्त्याने जाताना आपणास कुठल्यातरी वाहनांची धडक बसणार तर नाही, किंवा किरकोळ सर्दी पडसे खोकला झाला की, मला कोविडसारखा भयानक आजार तर झालेला नाही ना ...! अशा आपल्या बहुतेक विवंचना निराधार असतात. ज्या थोड्या खऱ्या असतात,त्याचे निराकरण करणे सहज संभव आहे. त्या करिता चिंता व काळजी या विरोधात समर्थपणे दोन हात करायला हवेत आणि त्यासाठी आपणच आपल्या मनात आत्मविश्वास जागवायला हवा. आपल्या मनात घर करून राहिलेली चिंता किंवा काळजी आपणच बाहेर काढू शकतो, हा प्रचंड आत्मविश्वास व मनोधैर्य निर्माण झाले की, आपल्या मनातील चिंता किंवा काळजीचा मागमूस ही रहाणार नाही, यांत संदेह नाही.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget