(३७) याच आदेशानिशी आम्ही हे अरबी फर्मान तुमच्यावर अवतरले आहे. आता जे ज्ञान तुमच्यापाशी आलेले आहे ते असतानादेखील तुम्ही जर लोकांच्या इच्छेच्या मागे चाललात तर अल्लाहविरूद्ध तुमचा कोणी संरक्षक व मदतगारही नाही व त्याच्या पकडीतून तुम्हाला कोणी वाचवूही शकत नाही.
(३८) तुमच्यापूर्वीदेखील आम्ही अनेक पैगंबर पाठविले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी व मुलेबाळे असलेलेच बनविले होते.५६ आणि कोणत्याही पैगंबराचे हे सामर्थ्य नव्हते की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादी निशाणी त्याने स्वत:च आणून दाखविली असती.५७ प्रत्येक युगासाठी एक ग्रंथ आहे.
(३९) अल्लाह जे काही इच्छितो त्याला नष्ट करतो आणि ज्या गोष्टीला इच्छितो तिला कायम ठेवतो. उम्मुलकिताब (मूळ ग्रंथ) त्याच्यापाशीच आहे.५८
(४०)आणि हे पैगंबर (स.)! ज्या वाईट परिणामाची धमकी आम्ही या लोकांना देत आहोत मग याचा काही भाग आम्ही तुमच्या जिवंतपणीच दाखवू किंवा तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला उचलून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत तुमचे काम फक्त संदेश पोहचविणेच होय आणि हिशेब घेणे आमचे काम होय.५९
५५)हे एका विशेष गोष्टीचे उत्तर आहे जी त्यावेळी विरोधकांकडून सांगितली जात होती. ते म्हणत होते की हे महाशय खरोखर तीच शिकवण घेऊन आले आहे जी मागील पैगंबरांनी आणली होती, असा ते दावा करतात. मग यहुदी आणि िख्र्चाश्न जे मागील पैगंबरांचे अनुयायी आहेत, ते यांचे स्वागत का करीत नाहीत? यावर सांगितले जात आहे की यातील काही लोक यावर प्रसन्न आहेत आणि काही अप्रसन्न परंतु हे पैगंबर मुहम्मद (स.)! कोणी प्रसन्न होवोत अथवा अप्रसन्न, तुम्ही स्पष्ट सांगा की मला अल्लाहने ही शिकवण दिली आहे आणि मी याचेच पालन करील.
५६)हे आणखी एका आक्षेपाचे उत्तर आहे जो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर घेतला जात होता. ते म्हणत होते की हा कसा पैगंबर आहे जो मुलंबाळं, पत्नीबरोबर राहतो. पैगंबरांचे मनोकामनांशी काय संबंध? कुरैशचे लोक तर स्वत: पैगंबर इब्राहीम व इस्माईल (अ.) यांची संतती असण्यावर गर्व करीत होते.
५७)हेसुद्धा एका आक्षेपाचे उत्तर आहे. विरोधक म्हणत, ``पैगंबर मूसा (अ.) शुभ्र चकाकणारा हात आणि लाठी घेऊन आले होते. इसा (अ.) नेत्रहीनांना नेत्रवान बनवित आणि कोढ फुटलेल्यांना निरोगी बनवित होते. सॉलेह (अ.) यांनी सांडणीचे निशाण दाखविले होते. तुम्ही कोणती निशाणी बरोबर घेऊन आला आहात?'' उत्तरात सांगितले गेले आहे की ज्या पैगंबराने जे काही दाखविले आपल्या शक्तीने अथवा आपल्या अधिकारात दाखविले नाही. अल्लाहने ज्यावेळी ज्यांच्या माध्यमातून जे काही प्रकट करणे उचित मानले, ते प्रकट झाले. अल्लाहने इच्छिले ते आता तो दाखवून देईल. पैगंबर स्वत: ईशत्वाचा दावेदार नसतो. मग तुम्ही त्याच्याशी चमत्काराची, निशाणीची मागणी कशी करता?
५८)हेसुद्धा विरोधकांच्या एका आक्षेपाचे उत्तर आहे. ते म्हणत होते की पूर्वी आलेले ग्रंथ आज उपलब्ध आहेत तर या नवीन ग्रंथाची काय आवश्यकता? तुम्ही म्हणता पूर्वीच्या ग्रंथात फेरबदल करण्यात आला, आता ते सर्व ग्रंथ निरस्त आहेत आणि म्हणून या नवीन ग्रंथाचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. परंतु अल्लाहच्या ग्रंथात फेरबदल कसा होऊ शकतो? अल्लाहने त्यांचे रक्षण का केले नाही? आणि ईशग्रंथ निरस्त कसा होऊ शकतो? तुम्ही तर सांगता की हा त्याच अल्लाहचा ग्रंथ आहे ज्याने तौरात आणि इंजिल अवतरित केले होते. मग हे कसे की तुमची पद्धत (जीवन) तर तौरातच्या विरुद्ध आहे? काही वस्तू तौरातधारक हराम (अवैध) ठरवितात तर तुम्ही मात्र त्यांना हलाल (वैध) समजून खाता. या आक्षेपाचे उत्तर पुढे सविस्तर आलेच आहे. येथे संक्षेपमध्ये व्यापक उत्तर दिले आहे. `उम्मुलकिताब' म्हणजे `मूळ ग्रंथ' म्हणजे तो स्त्रोत ज्यापासून सर्व आस्मानी ग्रंथ अवतरित झालेले आहेत.
५९)म्हणजे तुम्ही या चिंतेत पडू नका की ज्या लोकांनी तुमचा हा सत्यसंदेश अस्वीकार केला त्यांचा काय परिणाम होईल व तो कधी समोर येईल. तुम्हाला जे काम दिले गेले आहे त्याला पूर्ण एकाग्रत्तेने पार पाडा आणि निर्णय आमच्यावर सोडून द्या. येथे प्रत्यक्ष संबोधन तर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आहे परंतु खरे तर विरोधकांची कानउघडणी करणे अभिप्रेत आहे. विरोधक अनेकदा आव्हान देत म्हणत की ज्या आपत्तीची धमकी तुम्ही आम्हाला देत आहात ती येत का नाही?
Post a Comment