Halloween Costume ideas 2015

महाक्रांतीच्या दिशेने वाटचाल...


देशभरातील सर्व प्रचार व प्रसार माध्यमांतून आज ’कोरोना’ महामारीचे चर्चितचर्वण सुरू आहे.यापूर्वी प्लेग, देवीसारख्या महाभयंकर महामारीला या देशवासियांनी निकराने तोंड दिले होतेच. त्यावेळी तर आजच्यासारखे वैद्यकशास्त्र विकसित ही झालेले नव्हते. आजच्या संगणक युगात विज्ञान इतके पुढे गेले आहे की मानवाने एडस, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू सारख्या अनेक रोगांना अल्पावधीत अटोक्यात आणले आहे. मात्र सध्या ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग सुरू जगभरात झाल्यापासून सर्वच माध्यमातून अतिरिंजित वार्ता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात भयगंड निर्माण झाला आहे. संपूर्ण देशभरातील वातावरण भयावह व संशयग्रस्त झाले आहे. खरे काय आणि खोटे काय? या विचाराने सर्वसामान्यांसह उच्चपदस्थ ही संभ्रमावस्थेत आहेत. सर्वच घटकांमध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अर्थात दररोजचे प्रसारीत होत असलेले कोरोना विषयीच्या प्रसार माध्यमांतील, बातम्या, मुलाखती, रूग्णांचे आकडे, वैद्यकीय क्षेत्रातील असमर्थता, यामुळे नकारात्मकतेचे रतीब दिवसभर सुरू आहेच.हे सर्व गूढ व रहस्यमय वातावरण लोकांना ही नकोनकोसे वाटू लागले आहे. कोरोनाने संपूर्ण चराचर व्यापले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.या वातावरणातील  सत्यता किती आहे,हेच समजेना झाले आहे, कोरोनाचे संकट खरेच असेल तर आधुनिक विज्ञान शास्त्राने त्याच्यापुढे हात टेकले आहेत काय? असे अनेक प्रश्न माणसाच्या मनाभोवती पिंगा घालत आहेत. गेल्या 13-14 महिन्यातील हे भयग्रस्त वातावरण आता लोकांनाही नकोसे वाटू लागले आहे. काहीतरी सकारात्मक बातम्या कानावर पडू द्यात, अशी कळकळीची विनंती लोक आता करू लागले आहेत.

‘जे पेरले जाते तेच उगवते’ हा सृष्टीचा नियम आहे. दुर्दैवाने गेल्या वर्ष सव्वावर्षात पेरलेल्या नकारात्मकतेची कटू फळे आता उगवली आहे. यामुळे मानसिक रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अनेकजण मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. दररोज न चुकता समोर येणारे रुग्णांचे द्रूतगतीने वाढणारे आकडे, मृतांची संख्या, दीर्घकाळ नकारात्मकता पसरविणारी भावनिक दृश्ये, अतिरंजित व भडक वृत्ते यामुळे आधीच मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले समाजपुरुषाचे मन अधिकच खचले जात आहे.

ब्रिटीशांनी ‘फोडा आणि राज्य करा' ही कुटील निती अवलंबून भारतावर दिडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेमुळे संपूर्ण जगावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. त्यामुळे इंग्रजी सत्तेचा सूर्य मावळत नाही. असे म्हटले जात असे. जगाच्या इतिहासाला साम्राज्यवाद हा काही नवीन नाही. यापूर्वी संपूर्ण जगावर निरंकुश सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी मोठमोठी संहारक युद्धेही झालीत. फॅसिस्ट प्रवृत्तीने संपूर्ण जग गिळंकृत करण्याचा ही प्रयत्न झाला. दुसर्‍या देशाच्या मजबुरीचा फायदा घेवून तिसर्‍या देशावर निशाणा रोखण्याचा व आपले ईप्सित कसे साध्य होईल हे पाहण्याचा प्रयोगही करून पाहीला, अशाप्रकारे अतीमहत्वकांक्षेने अंध झालेल्या देशाकडून साम्राज्यवादाचे भूत जगासमोर दाखविले जाते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, हे वास्तव आहे.

अलिकडे कोरोना महामारीच्या या पार्श्वभूमीवर मनात अनेक विचार पिंगा घालू लागले आहेत. जागतिक महासत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेतून ‘भय दाखवा आणि राज्य करा’ अशी नव कुटनिती अवलंबिली जात नाही ना, असा दाट संशय घेण्यास जागा निर्माण झाली आहे. कोरोना या तथाकथित महामारीबद्दल लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. रुग्णांच्या वाढीचे आकडे, त्यातून मृत्यू पावलेल्यांचे वाढणारे आकडे, भय पसरविण्यासाठी माध्यमांचा प्रचंड प्रमाणावरील व सततचा केलेला वापर, आणि रस्त्यारस्त्यावर, गावांगावात, शहराशहरात कडक निर्बंध लादून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे, हे लोकांना आता हाताबाहेरचे वाटू लागले आहे. लोक या बाबींकडे संशयाने पाहू लागले आहेत, एखाद्या प्रायोजित कार्यक्रमाप्रमाणे प्रशासन लोकांना ‘वापरू’ लागले आहेत. कोरोनाच्या नावावर लोकांवर लावले गेलेले कडक निर्बंध हे अन्यायाचे व अत्याचाराचे डोंगर डोक्यावर घेऊन चालण्यासारखे दिव्य वाटू लागले आहे. ’वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो मग वाघ्याच म्हणू या’ अशी मानसिकता सर्वसामान्य जनतेची होवू लागली आहे. मरायचेच आहेत तर घरात बसून मरण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करून लढून मरू या, अशी समाजाची मोठ्या प्रमाणात मानसिकता होत आहे. कडक निर्बंध लादल्याने व लॉकडाऊनमुळे घरात बसून राहणे म्हणजे पायात साखळदंड बांधल्यासारखी समाजमनाची अवस्था झाली आहे. सर्वसामान्य माणसांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. सामान्य माणूस विशेषत: मध्यमवर्गीय आर्थिक, मानसिक व सामाजिक कोंडीमुळे त्रस्त झालेला आहे. अजूनही तो आपली दु:खे पोटात ठेवून जगण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. आज ना उद्या ही कोंडी फुटले आणि परिस्थिती पूर्ववत होईल, या भाबड्या आशेवर आला दिवस घालवत आहे. पोटाला लागेल तेवढेच खात आहे, जीवनाश्यक वस्तूंचा काटकसरीने वापर करीत आहे, तो संयमाने परिस्थितीचा स्वीकार करून शांत आहे. याचा अर्थ तो पूर्णपणे संपला आहे असे नव्हे. महामारीच्या वातावरणामुळे तो जरूर हतबल झालाआहे. मात्र निष्क्रिय झालेला नाही. मनातील संभ्रमावस्थेमुळे तो आपल्या पोटातील ज्वालामुखी दाबून ठेवत आहे, तो संघटीत आवाज उठविण्याच्या मानसिकतेत नाही. मात्र परिस्थितीचा अचूक वेध घेण्याच्या पावित्र्यात आहे. ही वादळापूर्वीची भीषण शांतता ही असू शकते. कारण आजवर जगात झालेल्या प्रत्येक सामाजिक-वैचारिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर अशीच संभ्रमावस्था सर्वसामान्यांच्या मनात तयार झाली होती, अर्थात या क्रांतीच्या होमकुंडात मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांनीच उड्या घेतल्या होत्या, आजही हा मध्यमवर्गीय समाज जमेल तेथे आवाज उठवण्याच्या प्रयत्न करीत असतो, कोरोना महामारीचे वास्तव ज्यावेळी समोर येईल, त्यावेळी हाच जगभरातील मध्यमवर्गीय समाज निश्चितपणे या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाही, एकंदरीत आजची ही परिस्थिती पाहता, नजिकच्या काळात होवू घातलेल्या जागतिक महाक्रांतीच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल तर नाही ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget