Halloween Costume ideas 2015

इतर धर्मियांना मुस्लिमांच्या माहीत नसलेल्या बाबी


2015 च्या एका अभ्यासानुसार संपूर्ण जगात जवळपास 180 कोटी इस्लामधर्मीय आहेत. म्हणजे विश्व लोकसंख्येच्या 24.1% इस्लामधर्मीय मुस्लिम लोक जगाच्या विविध देशामध्ये आपली आस्था टिकवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विश्वातील बहुतांश देशात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांचे अस्तित्व आहे. या साऱ्या मुस्लिमांमध्ये  समान असलेले धागे म्हणजे- त्यांची केवळ अल्लाहवर असणारी श्रद्धा, त्यांचा एक प्रेषित-मुहम्मद(स.अ.स.) , त्यांचा धर्म इस्लाम,त्यांचा एकच ग्रंथ कुरआन मजीद आणि त्यांच्यामध्ये समान असलेल्या काही सांस्कृतिक बाबी.  

        जगभरात मुस्लिम व्यक्ती कुठेही रहात असली तरी काही बाबींचा अवलंब आपल्या जीवनात नकळत करत असते. विश्वातील सारेच मुस्लिम ज्या समान बाबींनी जोडले गेले आहेत, आणि आपल्या दैनंदिन जीवनात इस्लाममुळे ते ज्या गोष्टी सहजपणे करत असतात त्या गोष्टी इतर धर्मीयांना माहीत नाहीत. मुस्लिमांच्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टींचा उहापोह या लेखाद्वारे करण्याचा मानस आहे.

कलमा

जगातील सारेच मुस्लिम एकमेकांशी एका विधानाने (लाईलाहा ईल्लल्लाह मुहम्मदुर्रसुल्लुल्लाह) जोडले गेले आहेत, यालाच कलमा असे म्हटले जाते. म्हणजे जगातील सर्व मुस्लिमांच्या या गोष्टीवर विश्वास असतो की अल्लाह शिवाय उपासने योग्य कोणीच नाही आणि मुहम्मद (स.अ.स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. मुसलमान फक्त अल्लाहची उपासना करतात आणि प्रेषितांना अल्लाहचा संदेश मानवजातीला सांगणारे दूत मानतात.

कुरआन मजीद आणि रिहाल

साधारणपणे जगातल्या सर्व मुस्लिम घरात  कुरआन मजीदची अरबी भाषेतील प्रत असते. तर काही जणांच्या घरी या प्रतीशिवाय स्थानिक भाषेतील कुरआन मजीदच्या भाषांतराची प्रत असते. हा ग्रंथ घरातल्या उंच आणि सुरक्षित ठिकाणी लाकडाच्या किंवा पीव्हीसीच्या फोल्ड होऊ शकणाऱ्या बैठकीवर ठेवले जातो ज्याला रिहाल असे म्हणतात. लहान मुलांकडून किंवा इतर कोणाकडूनही  कुरआन मजीदची बेअदबी होणार नाही याची प्रत्येकाकडून खास काळजी घेतली जाते. प्रत्येक मुस्लिम घरात  कुरआन मजीदची  प्रत असली तरी आपल्या मुलीच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला कुरआन मजीदची एक प्रत,रिहाल आणि मुसल्ला दिला जातो. कुरआन मजीदचे पठण झाल्यानंतर पठण करणारी व्यक्ती कुरआन मजीद बंद करून ठेवण्याआधी त्याचा अत्यंत आदराने मुका घेते, डोळ्यांना लावते, कधी-कधी आपल्या छातीशीही घट्ट धरते.

मुसल्ला

  प्रत्येक मुस्लिम घरात किमान  एक मुसल्ला किंवा ज्याला जानमाज म्हटले जाते ते असतेच. हा मुसल्ला फक्त नमाज  पढण्यासाठी असतो. मुसल्ला  कापडी, चटईचा अथवा गालिचाच्यारुपात  असतो. कुटुंब कितीही गरीब असले तरी त्या मुस्लिम घरात कुरआन मजीदची प्रत आणि मुस्सल्ला हमखास असतो. या लहान चटईवर,कापडावर किंवा छोटेखानी गालिचावर घरात नमाज पढली जाते. घरातील महिलाही या मुसल्ल्यावर नमाज पढतात,आणि पुरुषही सुन्नत किंवा नफील नमाज याच जानमाजवर  पढतात. अनेक घरात एकापेक्षा जास्त जानमाज आढळतात. अनेकदा नातेवाईक, आप्त, मित्रमंडळी जेव्हा हज यात्रेस जातात तेव्हा आपल्या जवळच्या लोकांसाठी भेट म्हणून जानमाज आणतात. मुसल्ला किंवा जानमाजचा वापर फक्त नमाज पढण्यासाठीच केला जातो, नमाज  व्यतिरिक्त आणखी कशासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. प्रत्येक मुलीच्या लग्नातही सासरी जाताना तिला माहेरकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये जानमाज दिला जातोच.

किबला

                 मक्का या सौदीअरबस्थित शहरास इस्लामधर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मस्जिद अल-हरम म्हणजेच काबा ही वस्तू आहे. ही जगातील पहिली मस्जिद म्हणून ओळखली जाते. यालाच अल्लाहचे घर असेही संबोधले जाते. ही वास्तू चौकोनी असून अंदाज़े 42ु 36 फूट इतकी असून या वास्तुची उंची 43 फूट इतकी आहे. ही वास्तू काळ्या दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूस एक दरवाजा असून ती आतून पूर्णपणे रिकामी आहे. ही मस्जिद असुन प्रेषित इब्राहिम (अ.स)यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. ही मस्जिद विश्वाच्या मधोमध आहे आणि विश्वातील सारे मुस्लिम या मस्जिदला आपला किबला मानतात. किबला म्हणजे ज्याकडे तोंड करून नमाज पढली जाते ती दिशा. जगातील सर्व मुसलमान म्नक्यातील काबा या किबला असलेल्या वास्तूकडे तोंड करून नमाज पढतात. आशियातील मुस्लिम पश्चिमेला तोंड करून तर पश्चिमेकडील राष्ट्रातील मुस्लिम पूर्वेकडे म्हणजे मक्का कडे तोंड करून नमाज पढतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणताही मुस्लिम काबाकडे पाय करून कधीही झोपत नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही मुस्लिम घराची रचना अशा प्रकारे केली जाते की ज्यामध्ये स्वच्छतागृह कधीही काबाकडे तोंड करून असत नाही. म्हणजेच मुस्लिम स्त्री-पुरूष शुचिर्भूत होतांना काबाकडे कधीही तोंड करत नाहीत. ते कधीच मल-मूत्र विर्सजन काबाकडे तोंड करून  करत नाहीत किंवा ते त्याकडे तोंड करून कधीही थुंकतही नाहीत.

दस्तरखान                   

 बहुतेक मुस्लिम कुटुंब शक्यतो सर्वजण  एकाचवेळी एकत्र बसून आपले भोजन करतात आणि शक्यतो जमिनीवर बसूनच आपले अन्नग्रहण करतात.  जेवताना ते शक्यतो एकमेकांसमोर बसतात, आणि त्याच्यामध्ये जे कापड अथंरले जाते त्यास दस्तरखान असे म्हणतात, हे दस्तरखान नेहमी स्वच्छ ठेवले जाते. बहुतेक वेळा हे कापड लाल रंगाचे असते. या कापडावरच जेवतांना ताटे ठेवली जातात. शक्यतो सारे कुटुंबिय स्त्री असो की पुरूष आणि मुलेही  एकत्रपणे जेवण करण्याचा  प्रयत्न करतात.  अनेकदा   एका ताटात बसून जेवले जाते. अशाने बरकत येते आणि आपसातील प्रेम वृध्दिगंत होते अशी मुस्लिमांची आस्था आहे.  मुस्लिम लोक एकत्र जेवताना एकमेकाचे उष्टे आहे असे काही मानत नाहीत. आणि ताटात उष्टे अन्नही सोडत नाहीत. अनेकदा दस्तरखानवर पडलेले अन्नही उचलून खाल्ले जाते. अनेकदा पेल्यात पिऊन राहीलेले पाणी दुसरी व्यक्ती त्यातच पाणी टाकून पिते ते पाणी उष्टे आहे असे समजले जात नाही.

सलाम

प्रत्येक मुस्लिम एकमेकांशी बोलण्याआधी अस्सलामु अलैकुम अर्थात तुमच्यावर (अल्लाहची) शांती असो असे अभिवादन करतात. प्रत्येकजण आधी अभिवादन करण्यात पुढाकार घेतो. मग समोरचा व्यक्ती वयाने,मानाने लहान असली तरी कमीपणा वाटून घेत नाही. ओळख असो वा नसो समोरील व्यक्ती मुस्लिम आहे असे वाटल्यास त्या व्यक्तीस तो सलाम करतोच. अशा प्रकारे ते शांतीचा संदेश पसरवत असतात. लहान-लहान मुलेही घरात प्रवेश करतांना सलाम करतात. खरेतर सलाम करणे ही प्रेषित मुहम्मद(स.अ.स) यांची प्रथा आहे. परंतु एखाद्याने सलाम केल्यास त्यास व अलैकुम सलाम अर्थात तुमच्यावरही (अल्लाहची) शांती असो असे प्रतिउत्तर देणे अनिवार्य असते. म्हणजेच दोन व्यक्ती जर एकमेकांशी अबोल्यामध्ये असतील आणि त्यातील एकाने सलाम केला तर दुसऱ्याला त्यास उत्तर देणे अनिवार्य ठरते. सलाममुळे अबोला, दुरावा कमी होण्यास मदतच मिळते.

  आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणत्याही देशातील मुस्लिम एकमेकांना अस्सलाम अलैकुम असेच अभिवादन करतात. फारफार तर अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाही व बरकातुहू  अर्थात तुमच्या वर (अल्लाहची)  शांती असो,अल्लाहची दया आणि आशीर्वाद असो असे प्रति उत्तर देतात.

 इस्तिंजां

  इस्तिंजा  म्हणजे शुचिर्भूत होणे. अनेकदा आपण मुतारी मध्ये जातो तेव्हा सार्वजनिक मुतारीत काही वेळेला आपणास वीटकराचे  तुकडे आढळतात.  हे तुकडे कोण कशासाठी ठेवतो या प्रश्नाचे उत्तर असे आहे की- प्रत्येक मुस्लीम स्त्री-पुरुष जो पाच वेळा नमाज पडतो त्यास शुचिर्भूत राहणे आवश्यक असते.

     त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष खाली बसूनच मूत्र विसर्जन करतो. मुत्राचे थेंब आपल्या अंगावर, कपड्यांवर उडू देत नाही. कारण ज्या वस्त्रांवर मुत्राचे थेंब पडलेले आहेत त्या वस्त्रानिशी नमाज पढता येत नाही. त्यामुळे नमाज पढणारी प्रत्येक व्यक्ती मूत्रविसर्जना नंतर प्रत्येक वेळी आपली मूत्र विसर्जनाची जागा मूत्र विसर्जना नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करते. त्यामुळे नमाजी मुस्लिम अशा ठिकाणीच मूत्रविसर्जन करण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी पाण्याची सोय असते. परंतु जेव्हा केव्हा नमाजी पुरुषाला मूत्रविसर्जन करणे आवश्यक आहे असे वाटते तेव्हा सार्वजनिक ठिकाणी पाणी नसल्यास तो वीटकराच्या तुकड्यांचा  वापर करतो. मुत्राचा अखेरचा थेंब जो शिश्नाच्या टोकास असतो तो थेंब अंगावर, कपड्यावर पडू न देता वीटकराच्या तुकड्याने  टिपून घेतला जातो. मुस्लिम नमाजी स्त्री-पुरुष  वैयक्तिकरित्या किती स्वच्छ असतात हे यावरून लक्षात येते. ही बाब बहुतेक इतर धर्मीयांना माहिती नसते.

गुस्ल 

गुस्ल म्हणजे आंघोळ करणे. परंतु ही आंघोळ साध्या अंघोळी सारखी नसते. केवळ डोके आणि अंगा-खांद्यावर पाणी घेणे म्हणजे गुस्ल नव्हे. जेव्हा-केव्हा पुरुषाला वीर्यस्खलन होते,  एखाद्या स्त्रीस मासिक पाळी येते किंवा पती-पत्नीच्या समागमाने वीर्यस्खलन होते तेव्हा असे स्त्री-पुरुष धार्मिकदृष्ट्या अपवित्र किंवा अशुद्ध होतात. अशा स्थितीत गुस्ल केल्याशिवाय नमाज पढता येत नाही.  कुरआन मजीदचे पठण करता येत नाही. त्यामुळे अशा अशुद्ध किंवा अपवित्र  स्त्री-पुरुषांना गुस्ल  करणे अनिवार्य असते. गुस्ल  करण्याआधी मनात अशी नियत करणेही आवश्यक असते की - हे अल्लाह मी अपवित्र किंवा अशुद्ध आहे मला या गुस्लने शुद्ध आणि पवित्र कर. गुस्ल  करताना सर्व शरीर पाण्याने ओले व्हायला हवे. सर्व अंग पाण्याने भिजायला हवे. अंगावरचा एकही केस सुका राहता कामा नये.  नापाक अपवित्र किंवा अशुद्ध असलेली व्यक्ती गुस्ल  केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही. अनेकदा मुस्लिम मंडळी जुमा के जुमा अंघोळ करतात असे म्हणून त्यांना हिणवले, चिडवले जाते. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सर्व जगाच्या पाठीवर मुस्लिमांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या प्रदेशांची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असते . कुठे कुठे प्रचंड उकडा आणि कडक ऊन्ह  असते  तर काही प्रदेशात गोठवणारी थंडी असते. कडाक्याच्या थंडीत राहणारे लोक रोज आंघोळ करतीलच असे नाही. परंतु  प्रेषितांच्या आदेशानुसार कितीही थंडी असली तरीही नापाक अशुद्ध /अपवित्र झाल्यास गुस्ल अत्यावश्यक असते. त्याच प्रमाणे दर शुक्रवार या दिवशी गुस्ल करणे अनिवार्य असते. तसेच ईदच्या दिवशी ही गुस्ल करणे आवश्यक असते.

वुजू 

      कोणत्याही मशिदीत प्रवेश केल्यास त्या ठिकाणी चार कक्ष हमखास असतात. यामध्ये तहारतखाना (स्वच्छतागृह), गुस्लखाना( स्नान कक्ष), वुजूखाना आणि नमाज पढण्याचा कक्ष असतो. नमाज पढण्याआधी काही अटींचे पालन करावे लागते त्या म्हणजे - ती व्यक्ती पाक असावी, नापाक नसावी. वीर्यस्खलनाने, समागमाने, मासिकपाळीने अशुद्ध अपवित्र नसावी. त्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत त्यावर मल-मूत्राचे, वीर्याचे किंवा रक्ताचे डाग नसावेत. त्याचबरोबर नमाज पढण्याआधी त्या व्यक्तीने वुजू केलेले असावे. म्हणजे नमाज पढण्या आधी किंवा कुरआन पठण करण्याआधी पाक साफ असणे अनिवार्य असते.

         वुजू करताना आधी दोन्ही हात मनगटापर्यंत धुतले जातात, तीन वेळा चूळ भरून तोंड स्वच्छ केले जाते. त्यानंतर तीन वेळा नाक आतून स्वच्छ केले जाते. मग तीन वेळा संपूर्ण चेहरा धुतला जातो. मग कोपरापर्यंत दोन्ही हात तीन वेळा धुतले जातात. हे केल्यानंतर दोन्ही हातात पाणी घेऊन ओले हात डोक्यावरून मानेपर्यंत फिरवले जातात व दोन्ही कानांची छिद्रे आणि कानामागील जागा हाताने स्वच्छ केली जाते. सर्वात शेवटी आधी उजवा पाय आणि मग डावा पाय घोट्यापर्यंत स्वच्छ धुतला जातो. नमाज पूर्वी स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेस वुजू असे म्हणतात. म्हणून प्रत्येक मशिदीत नमाज पढणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची आणि वुजू करण्याची व्यवस्था असतेच असते. 

एकच नमाज पद्धत

इस्लाम धर्मियांमध्ये वेगवेगळे पंथ असले तरी हे सर्व लोक फक्त अल्लाहलाच  पूजनीय मानतात. प्रेषित मुहम्मद( स. अ. स.) यांना अखेरचे प्रेषित मानतात. इस्लामधर्मीय उपासक अल्लाह शिवाय इतर कोणाचीही उपासना करत नाहीत.  कोणाच्या पायावर आपला माथा टेकत नाहीत. या साऱ्यांचा कयामत (महाप्रलय) वर ठाम विश्वास असतो आणि या कयामतच्या दिवशी सर्व मानवांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब  होईल यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कयामत नंतरचे मरणोपरांत जीवन हे कधीही न संपणारे असून आपल्या ईहलोकातील जीवनात आपण केलेल्या पाप-पुण्यानुसार जन्नत (स्वर्ग) किंवा  जहन्नम (नरक) मध्ये आपण पाठवले जाणार आहोत यावर त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वास असतो. इस्लामधर्मीय सर्व पंथाचे लोक नमाज, रोजा, जकात आणि हजयात्रा याद्वारे अल्लाहची उपासना करतात. 

        कोणताही मुस्लिम मग तो कोणत्याही देशात असो किंवा कोणत्याही भाषेचा असो तो नमाज पढताना संपूर्ण नमाज अरबी भाषेतूनच पढतो. त्यासाठी त्याला कुरआन मजीदमधील छोटे छोटे का  असेना किमान दहा सूरह (प्रकरण) तरी मुखोद्गत असायला लागतात. नमाज नंतर मागितली जाणारी दुआ मात्र तो आपल्या भाषेत मागू शकतो. परंतु नमाज मात्र जगात सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अरबीत पढली जाते. नमाज पढताना हात छातीवर बांधायचे  की पोटावर यात मतभेद असू शकतात. 

     पण मुस्लिमांच्या अशाप्रकारच्या अनेक बाबी  इतर धर्मियांना माहिती नसतात. अशा अनभिज्ञ असणाऱ्या एकमेकांच्या अनेक गोष्टी माहीत करून घेतल्यास आपले सहजीवन सोपे, सहज आणि सुखकर होईल यात शंका नाही. 

- डॉ. इ्नबाल मिन्ने

7040791137


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget