Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(१४,१५) त्यांच्याशी लढा. अल्लाह तुमच्या हाताने त्यांना शिक्षा देईल आणि त्यांना अपमानित करील व त्यांच्या मुकाबल्यात तुम्हाला मदत करील आणि बऱ्याचशा श्रद्धावंतांचे काळीज थंड करील व त्यांच्या हृदयाची आग शांत करील आणि ज्याला इच्छील त्याला पश्चात्ताप व्यक्त करण्याची सुबुद्धीदेखील देईल.१७ अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे.

(१६) तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की असेच तुम्हाला सोडून दिले जाईल? वास्तविक पाहता अल्लाहने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण आहेत ज्यांनी (अल्लाहच्या मार्गात) प्राण पणास लावले आणि अल्लाह व त्याचा पैगंबर व श्रद्धावंत यांच्याशिवाय इतर कोणासही जिवलग मित्र बनविले नाही.१८ जे काही तुम्ही करता अल्लाह त्याचा जाणकार आहे.

(१७) अनेकेश्ववादींचे हे काम नव्हे की त्यांनी अल्लाहच्या मस्जिदीचे सेवक बनावे ज्याअर्थी की आपल्याविरूद्ध ते स्वत:च द्रोहाची (कुफ्र) साक्ष देत आहेत,१९ यांची सर्व कर्मे वाया गेलीत२० आणि नरकामध्ये यांना सदैव राहावयाचे आहे.

(१८) अल्लाहच्या मस्जिदीचे नियमित उपासना करणारे मुजावर (सेवक) तर केवळ तेच लोक होऊ शकतात ज्यांनी अल्लाह आणि परलोकाला मानले आणि नमाज कायम केली, जकात दिली व अल्लाहव्यतिरिक्त कोणाचीही भीती बाळगत नाही. यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ते सरळमार्गावर चालतील.

(१९) हज यात्रेकरूंना पाणी पाजणे आणि मस्जिदेहराम (काबा मस्जिद) ची सेवा करणे याला तुम्ही त्या व्यक्तीच्या कामाबरोबर ठरविले आहे काय ज्याने श्रद्धा ठेवली अल्लाहवर व ‘पारलौकिक’ जीवनावर व ज्याने प्राण वेचले अल्लाहच्या मार्गात?२१

(२०) अल्लाहपाशी तर हे दोघे समान नाहीत व अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवीत नाही. अल्लाहच्या येथे तर त्याच लोकांचा दर्जा मोठा आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली व ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरेदारे सोडली आणि जीवित व वित्तानिशी संघर्ष (जिहाद) केले, तेच यशस्वी आहेत.

(२१) त्यांचा पालनकर्ता त्यांना आपली कृपा व प्रसन्नता आणि अशा स्वर्गाची शुभवार्ता देतो जेथे त्यांच्यासाठी चिरस्थायी ऐश्वर्याचा सरंजाम आहे.

(२२) त्यांच्यात ते सदैव राहतील. निश्चितपणे अल्लाहजवळ सेवेचे फळ देण्यासाठी बरेच काही आहे.

(२३) हे श्रद्धावंतांनो! आपले वडील व आपले बंधु यांनादेखील आपले मित्र बनवू नका जर ते ईमानवर कुफ्रला प्राधान्य देत असतील. तुम्हापैकी जे त्यांना आपले स्नेही बनवतील तेच अत्याचारी ठरतील.

(२४) हे पैगंबर (स.)! सांगून टाका की जर तुमचे वडील, तुमची मुले आणि तुमचे बंधु व तुमच्या पत्नीं व तुमचे आप्तेष्ट व नातेवाईक व तुमची ती धन-दौलत जी तुम्ही कमाविली आहे व तुमचे ते व्यापार-उदीम ज्यांच्या मंदावण्याची तुम्हाला भीती वाटते आणि तुमची ती घरे जी तुम्हाला पसंत आहेत, तुम्हाला अल्लाह व त्याचे पैगंबर (स.) आणि अल्लाहच्या मार्गात धर्मयुद्धा (जिहाद) पेक्षा अधिक प्रिय असतील तर वाट पाहा इथपर्यंत की अल्लाहने आपला निर्णय तुमच्या समक्ष आणावा,२२ आणि अल्लाह अवज्ञाकारी लोकांना मार्ग दाखवीत नसतो.

(२५) अल्लाहने यापूर्वी अनेक प्रसंगी तुम्हाला मदत केलेली आहे. नुकतेच हुनैनच्या युद्धाच्या दिवशी (त्याने केलेल्या मदतीचे वैभव तुम्ही पाहिले आहे)२३ त्या दिवशी तुम्हाला आपल्या मोठ्या संख्येचा गर्व होता, पण ती तुमच्या काहीच उपयोगी पडली नाही व जमीन विस्तृत असूनदेखील तुमच्याकरिता तंग झाली व तुम्ही पाठ दाखवून पळत सुटला.

(२६) मग अल्लाहने आपली ‘सकीनत’ (मन:शांती) आपल्या पैगंबरावर व श्रद्धावंतांवर उतरविली; आणि ते लष्कर उतरविले जे तुम्हाला दिसत नव्हते आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना शिक्षा दिली की हाच बदला आहे त्यांच्याकरिता जे सत्याचा इन्कार करतील.१७) हा एक हलकासा संबंध आहे त्या संभावनेकडे जी पुढे घटनेच्या रूपात प्रकट झाली होती. मुस्लिम हे समजत  होते  की  त्या  घोषणेनंतर  त्वरित  देशात  रक्ताचे  पाट  वाहू  लागतील. त्यांच्या  या  भ्रमाला  दूर करण्यासाठी  संकेत रूपात त्यांना दाखविले गेले.  ही प्रणाली स्वीकारल्यावर शक्यता आहे गृहयुद्ध सुरु होईल याची संभावना आहे आणि तशीच संभावना लोकांना पश्चाताप व्यक्त करण्याची संधी प्राप्त् होईल. परंतु या संकेताला अधिक स्पष्ट यासाठी केले नाही की एकीकडे  युद्ध तयारी करण्याचे मुस्लिमांचे प्रयत्न हलके पडले असते. तसेच दुसरीकडे अनेकेश्वरवादींसाठी या धमकीचा परिणाम हलका-पुसटसा झाला असता ज्यामुळे त्यांना आपल्या कमजोर स्थितीवर गंभीरतापूर्ण विचार करण्यास आणि शेवटी स्वत:ला इस्लामी जीवनव्यवस्थेत एकरूप होण्यास तयार केले गेले.

१८) हे संबोधन आहे त्या नव्या लोकांशी जे नुकतेच इस्लाममध्ये आले होते. त्यांच्याशी सांगितले जात आहे की जोपर्यंत तुम्ही या परीक्षेला सामोरे जाऊन प्रमाणित करत नाही की वास्तविकपणे तुम्ही आपले जीव व वित्त आणि सगेसोयरे यांच्यापेक्षा जास्त अल्लाह आणि इस्लामला प्रिय ठेवत आहात तोपर्यंत तुम्ही खरे ईमानधारक ठरू शकत नाही. अद्याप प्रत्यक्षाला पाहून तुमची स्थिती अशी आहे की इस्लाम सच्च्े ईमानधारक आणि प्रारंभीच्या ईमानधारकांच्या बलिदानाने विजयी झाला आणि देशात प्रभावी ठरला. त्यामुळे तुम्ही आज मुस्लिम बनला आहात. 

१९) म्हणजे ज्या मस्जिदी एकमेव अल्लाहच्या उपासनेसाठी बनलेल्या आहेत त्यांचे प्रबंधक, मुजावर, सेवक आणि उपासक बनण्यासाठी ते लोक योग्य नाहीत जे अल्लाहबरोबर त्याच्या गुणात, हक्कात आणि अधिकारात इतरांना भागीदार बनवतात. त्यांनी स्वत: एकेश्वरत्वाचे आवाहन स्वीकारले नाही आणि स्पष्ट सांगितले की एक अल्लाहच्या उपासनेला आम्ही बांधील नाही. तेव्हा त्यांना काय अधिकार आहे की एखाद्या अशा उपासनागृहाचे प्रबंधक बनून राहावे की जे फक्त एक अल्लाहच्या उपासनेसाठी बनविले आहे. येथे सामान्यत: ही गोष्ट सांगितली आहे आणि आपल्या वास्तविकतेच्या दृष्टीने ती सामान्य आहे. परंतु मुख्यता येथे तिचा उल्लेख करण्याचा हेतू म्हणजे काबागृह आणि मस्जिदे हराम यावरील अनेकेश्वरवादींच्या व्यवस्थापन प्रबंधाला समाप्त् केले जावे. तसेच ते प्रबंधन नेहमीसाठी एकेश्वरवादींच्या हातात दिले जावे आणि एकेश्वरवादी काबागृहाचे नेहमीसाठी प्रबंधक बनावेत.

२०) म्हणजे  जी  थोडी  सेवा  त्यांनी  काबागृहाची  केली  होती  तीसुद्धा  निरर्थक  ठरली  कारण  हे  लोक त्याबरोबर अनेकेश्वरत्व आणि अज्ञानतापूर्ण रीतींची भेसळ करीत होते. त्यांच्या थोड्याशा पुण्याईला भल्या मोठ्या दुष्टतेने खाऊन टाकले.

२१) म्हणजे एखाद्या दर्गास्थानाची मुजावरी व प्रबंधन आणि काही दिखाऊ धार्मिक कार्यांचे करणे याला जगातील संकुचित दृष्टी ठेवणारे लोक सौभाग्य व पवित्रतेचा आधार ठरवितात. परंतु अल्लाहजवळ हे निरर्थक आहे. वास्तविक मूल्य तर ईमानचे आहे आणि अल्लाहच्या मार्गात त्यागाचे आहे. या गुणांचा धारक व्यक्ती मौल्यवान व्यक्ती असतो मग त्याचा संबंध उच्च् परिवाराशी नसोत की त्याच्याशी काही वैशिष्ट्य चिकटलेले नसोत. परंतु जे लोक या गुणांनी वंचित आहेत व मोठ्यांची संतती आहेत, त्यांचा मुजावरीचा धंदा पारिवारिक परंपरा आहे. काही विशेष वेळी काही धार्मिक रीतींचे प्रदर्शन ते शानशौकांती करतात. ते कोणत्याच पदाचे अधिकारी होत नाहीत. हे अवैध आहे की अशा मूल्यहीन पैतृक अधिकारांना मान्य करून या पवित्र स्थानांना आणि  धार्मिक  स्थळांना  अयोग्य  लोकांच्या  हातात  द्यावे. या  कथनाने  हा  निर्णय  केला  गेला की  अल्लाहच्या  गृहाचे प्रबंधक आता अनेकेश्वरवादी असूच शकत नाही. कुरैशचे अनेकेश्वरवादी फक्त यासाठी याचे प्रबंधक  अधिकारी होऊ शकत नाही की ते हाजी लोकांची सेवा करीत होते.

२२) म्हणजे तुम्हाला हटवून सच्चा धार्मिकतेची देणगी आणि त्याच्या ध्वजावाहनाचे सौभाग्य आणि मार्गदर्शन करण्याचे पद दुसऱ्या कुणाला दिले जावे.

२३) जे लोक या गोष्टीपासून भीत होते की उत्तरदायित्वापासून अलिप्त् होण्याच्या घोषणेत या भयानक नीतीला व्यवहारात आणण्यासाठी सर्व अरब देशाच्या कानाकोपऱ्यांत युद्ध भडकेल आणि त्याचा सामना करणे कठीण होईल. त्यांच्याशी सांगितले जात आहे की या आशंकांनी घाबरू नका. अल्लाहने तर यापेक्षा जास्त भयानक धोक्याच्या वेळी तुमची मदत केली आहे. आतासुद्धा तो तुमच्या मदतीला इच्छुक आहे जर हे काम तुमच्या शक्तीवर आधारित असते तर मक्काहून पुढे वाढे होणे अशक्य  होते.  तसेच  बदरच्या  युद्धात  तरी  अवश्य  नष्ट  झालेच  असते. परंतु  इस्लामच्या पाठीशी  अल्लाहची शक्ती आहे. मागील अनुभवाने तुम्हाला  माहीत  झाले आहे की अल्लाहचीच शक्ती इस्लामी आंदोलनाला पुढे नेत आहे. म्हणून विश्वास ठेवा की आजसुद्धा तोच यास पुढे वृद्धिगंत करील. हुनैनच्या युद्धाचा येथे उल्लेख झाला आहे. शव्वाल हि. सन ०८  मध्ये या आयती अवतरित होण्याच्या केवळ बारा-तेरा महिन्यापूर्वी मक्का आणि ताइफच्या दरम्यान हुनैनच्या घाटीत हुनैनचे युद्ध झाले आहे. या युद्धात मुस्लिमांकडून १२ हजारचे सैन्य होते जे यापूर्वी कधीही एवढ्या संख्येत एकत्रित झाले नव्हते. दुसरीकडे शत्रूचे चैन्य यापेक्षा कमी होते. परंतु तरीही हवाजन कबिल्याच्या तीरंदाज लोकांनी त्यांचे हाल केले आणि इस्लामी सैन्याची दानादान झाली. त्या वेळी केवळ पैगंबर मुहम्मद (स.) आणि थोडेसे सहाबा होते ज्यांची पाऊले डगमगली नव्हती. त्यांच्या अडिग राहण्यामुळेच सैन्य पुन्हा एकत्रित करण्यात आले आणि शेवटी विजय मुस्लिमांचा झाला होता. अन्यथा मक्का विजयाने जे काही प्राप्त् झाले होते त्याच्यापेक्षा जास्त हुनैनच्या युद्धात गमवावे लागले असते.


 Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget