अशा अनेक कारणांमुळे पोलिसांविषयी पूर्वी सारखा भितीयुक्त आदर राहिलेला नाही. यास पोलीसांची राजकीय अपरिहार्यता काहीअंशी कारणीभूत आहे. परंतू, याचे मुख्य कारण काही पोलीसांची आर्थिक लालसा हेचआहे. काही लाचखोर पोलीसांनी धनदांडग्यांचे, नेत्यांचे, अवैध व्यावसायिकांचे बटीक होवून त्यांचा फायदा करुन देण्यासाठी पदाचा गैरवापर करीत आर्थिक लोभापायी संपूर्ण पोलीस खात्यालाच बदनाम करुन टाकले आहे. शहरात ट्राफीक नियंत्रणासाठी कर्तव्यावर असणार्या पोलीसांना वाहनधारकांवर कारवाई करताना आपण नेहमीच पाहतो. एखाद्या सर्वसामान्य नागरिकावर केवळ नंबर नीट दिसत नाही म्हणून दंड करणार्या कर्तव्यदक्ष पोलीसाने ‘दादा’ ‘मामा’ ‘भाऊ’ ‘साहेब’ अशी आकड्यांची नक्षीची नंबरप्लेट असणार्या एखाद्या नेत्याची गाडी आडविल्याचे मात्र ऐकीवात नाही. या साध्या उदाहरणासह मटका, दारू, जुगार, वाळू माफिया, वेश्या व्यवसाय अशा अनेक अवैध व्यवसायिकांकडे लाचखोर पोलीसांनी आर्थिक लालसेपोटी आपली प्रतिष्ठा विकली असल्याची सामान्यांची धारणा झाली आहे. सर्वसामान्यांवर जोरजबरदस्ती करुन पोलीसी खाक्या दाखवणारे पोलीस अर्थकारणासाठी राजकीय नेते, अवैध व्यवसायिक व धनदांडग्यांना मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, असा जनतेत संदेश जात असल्याने पोलीस सामान्यांपासून दूर होत आहेत. काही लाचखोरांमुळे संपूर्ण पोलीस खात्यावरुन सामान्यांचा विश्वास कमी होणे, लोकशाहीसाठी घातक आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्यांनी कळपातील या काळ्या कोल्ह्यांना वेळीच ओळखून त्यांचा आणि त्यांच्या धन्यांचा कायमचा बंदोबस्त करणे आता गरजेचे झाले आहे. तरच, सामान्यांचा गमावलेला विश्वास पोलीस पुन्हा मिळवू शकतील. अशाप्रकारे, कालीयामर्दनासाठी या काळ्या डोहात उडी घेणार्या अधिकार्यांच्या पाठीशी जनता व सच्चे पत्रकार नेहमीच उभे असतात हे माजी पोलीस महानिरीक्षक विश्र्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी त्यांना आलेल्या अनुभवावरुन स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या काळात पोलिसांविषयी समाजात कमालीचा तिरस्कार आहे, याचा प्रत्यय माझ्या जवळच्या पोलिस असणाऱ्या मित्र व नातेवाईक यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीत येत आहे,अनेक जण पोलिस किंवा पोलिसांच्या मुलामुलींशी विवाह संबंध जोडायला तयार नाहीत, पोलिसांच्या बरोबर सोयरीक नकोच,असा काहीसा नकारात्मक सूर वाढलेला आहे, काही लाचखोर व भ्रष्ट पोलिसांच्या काळ्या कारनाम्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणात बदनाम झाली आहे,याचा गांभीर्याने विचार कधी करणार आहात का नाही,असा प्रश्न पडतो.
परवाच पंचगंगा विहार मंडळाच्या शिवजयंती उत्सवाचे निमित्ताने माझे शिवरायांच्या प्रशासकीय कारभार याविषयी व्याख्यान झाले, आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत समारंभाचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जनतेच्या आशिर्वादानेच आम्ही खतरनाक बिष्णोई टोळीविरूध्द धाडसी कारवाई करु शकलो, असे स्पष्ट मत व्यक्त केले, ते कौंटुबिक आघाडीवर सुखी समाधानी आहे यांचे सर्व श्रेय त्यांनी आई-वडिलांनी केलेले संस्कार व खाकी वर्दीशी प्रामाणिकपणा, तसेच सर्व सामान्य जनतेचा कामातून घेतलेल्या आशिर्वाद यांना दिला.
अशाप्रकारे 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या न्यायाने कर्तव्य बजावत असताना लाचखोर पोलिसांनी आपण व आपल्या कुटुंबाला आधार देणाऱ्या खाकी वर्दीशी प्रामाणिक राहून सर्व सामान्य जनतेचा दूवा घ्यावा आणि पोलिस हा जनतेचा रक्षक आहे या भावनेतून गमावलेला आदर व प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करावा.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
( लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment