प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, लोकांशी नैतिकतेचा व्यवहार करा, याशिवाय तुम्ली सदाचारी असू शकत नाही. लोक असे समजतात की सदाचार म्हणजे केवळ अल्लाहच्या अधिकारांचे पालन करणे. तसे नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटत राहणे म्हणजे सदाचार आहे. तुमच्या नैतिकतेत प्रामाणिकपणा असावात, एकमेकांशी बंधुभावाचा व्यवहार करा, हा सदाचार आहे. सर्वोत्तम मुस्लिम तो आहे ज्याचे चारित्र्य सर्वोत्तम असेल.
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की, अशा लोकांसाठी स्वर्ग तयार केले गेले आहे जे कोणत्याही परिस्थितीत आपला माल खर्च करतात. मग ते संपन्न असोत की गोरगरीब. जे लोक आपल्या रागावर नियंत्रण करतात, एकमेकांच्या चुकांना क्षमा करतात, असेच लोक नेक आहेत, ज्यांना अल्लाह पसंत करतो.
असे लोक आपल्या विधात्यावर निष्ठा व्यक्त करतात जे पापांपासून, व्यभिचारापासून अलिप्त राहतात. आपल्या कार्यात एकमेकांशी सल्लामसलत करतात. आम्ही जी काही साधने त्यांना दिलेली आहेत, त्यातून ते खर्च करतात. त्यांच्यावर अतिरेक केला जात असेल तर त्याचा सामना करतात. कुणी तुमच्याशी वाईट वर्तन केले असेल तर तितकाच वाईट व्यवहार तुम्ही करू शकता, पण जर तुम्ही क्षमा केली तर यासाठी अल्लाह तुम्हाला मोबदला देईल. अल्लाहला अत्याचारी लोक पसंत नाहीत. तुम्ही जर चांगले वर्तन करत असाल तर ते तुमच्यासाठीच भल्याचे असते. आणि जर तुम्ही कुणाशी वाईट केले तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे. (पवित्र कुरआन सार)
आपसातील देवाणघेवाणीमध्ये व्यावहारिकता
गरीब, श्रीमंत, व्यापारी, कर्मचारी, मजूर कुणीही असो, प्रत्येकास कधी ना कधीया ना त्या कारणामुळे कुणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते. देवाण-घेवाण करावी लागते. कुणाकडून कर्ज घेऊन आपल्या अडचणी सोडवण्यात काही गैर नाही. पण कर्ज घेण्याचे आणि त्याची परतफेड करण्याचे काही नियम-कायदे आहेत. तसे आपल्या देशात तर बँकांकडून कर्ज घेणे हा मोठ्या उद्योगपतींचा शंभर टक्के फायद्याचा एकमेव धंदा बनलेला आहे. ते कर्ज घेतात ते बुडविण्यासाठी. परतफेड करण्यासाठी नाही.
पवित्र कुरआनात दोन माणसांमध्ये कर्ज देवाणघेवाण कशी व्हावी यासाठी नियम दिले आहेत. यात सर्वप्रथम जी अट घातली आहे तीअशी की कर्ज ठराविक मुदतीसाठी घ्यावे म्हणजे परतफेड कधी करायची ते अगोदरच निश्चित केले जावे. दुसरे असे की कर्ज घेताना त्याचा लेखी करार करावा. उभय पक्षांतील एकाने ते लिहून घ्यावे, करार लिहिण्यास कुणी नकार देऊ नये. या करारात काय लिहायचे आहे, कोणत्या अटी आहेत, कर्जाचा अवधी काय असेल या सर्व बाबी कर्ज घेणाऱ्याकडून ठरवाव्यात. देणाऱ्याने आपल्या मर्जीत येईल तशा जाचक अटी घालू नयेत. कर्ज घेण्याची ज्याच्यावर पाळी असेल त्यालाच स्वतःची आर्थिक क्षमता माहीत असते. जर कर्ज घेणाऱ्यास स्वतः करार लिहून काढणे जमत नसेल तर त्याच्याकरवी त्याच्या पालकाने, वकिलाने लिहून द्यावे. लिहिणाऱ्याने यात कमीजास्त करता कामा नये. लिहून झाल्यावर ते कर्जदाराला वाचून दाखवावे. त्या करारावर दोन व्यक्तीच्या स्वाक्षरी घ्याव्यात. जर दोन पुरुष हजर नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रियांनी साक्षीदार व्हावे. अल्लाह म्हणतो, कर्ज अल्पावधीचे असो की दीर्घावधीचे, हीच पद्धत न्याय्य आहे. साक्षीदारांनीही प्रामाणिकपणा दाखवावा. कर्ज घेणाऱ्यास कराराची भाषा समजत नसेल तर त्याला समजावून सांगावे. लिहिणारा आणि साक्षीदार यांनी संगनमत करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात एका व्यक्तीने कर्ज घेतले, पण त्याची परतफेड जमत नव्हती. अशा वेळी प्रेषितांनी इतर लोकांना त्याला मदत करण्यास सांगितले आणि ज्याच्याकडून कर्ज घेतले होते त्यास प्रेषितांनी काही कर्ज माफ करण्यास सांगितले. हे लक्षात असू द्यावे की इस्लाममध्ये व्याजावर कर्ज दिले जात नाही. (संदर्भ- पवित्र कुरआन, २:२८१)
- सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment