खेड येथील माजी नायब तहसीलदार बशीर अमीन मोडक यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने बेलापूर, नवी मुंबई येथे २७ एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले. बशीर मोडक यांचा जन्म ५ मे १९३६ रोजी स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी झाला. बालपणापासून प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
सन १९६४ मध्ये तहसीलदार ऑफीस देवरुख येथे नोकरीस रुजू झाले. ३० वर्षांच्या शासकीय कार्यकाळात ते देवरुख, खेड, मंडणगड, रत्नागिरी या ठिकाणी आपली सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात प्रेषितांच्या शिकवणींनुसार त्यांनी प्रामाणिकपणा, त्याग, सचोटी, न्याय, देशप्रेम इत्यादी मूल्यांचे पुरेपूर अनुसरण केले. आपल्याकडे कामानिमित्त आलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यांनी कधी निराश केले नाही. त्यांच्या कामात सर्वतोपरी सहकार्य करून आपले कर्तव्य पार पाडले. ज्या ज्या ठिकाणी ते नोकरीस गेले तेथे आपल्या साध्या राहणीमानामुळे व सचोटीमुळे तेथील स्थानिक नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले. १९९४ साली ते खेडू येथून निवृत्त झाले. गेली जवळजवळ ४० वर्षे ते साप्ताहिक शोधनचे वाचक होते. निवृत्तीनंतर त्यांनी ‘शोधन’साठी विविध सामाजिक व धार्मिक विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण केले. त्यांनी आपले जीवन समाज व देशासेवेसाठी वाहिले होते.
आपल्या कामाप्रती प्रामाणिक, कर्तृत्ववान, निस्वार्थी, निष्कलंक व्यक्तिमत्त्व. मागील वर्षभरात अनेक कर्तृत्ववान तसेच चांगली माणसे आपल्यातून या जगाला कायमचा निरोप देऊन गेली. त्यांच्यापैकीच एक स्वच्छ प्रतिमा असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व सर्वांना सुपरिचित मोडक भाऊ व त्यांची पत्नी अझीझा (मृत्यू २ मे २०२१) आपल्यातून निघून गेले. अल्लाह त्यांच्या आत्म्याल्या शांती देओ आणि त्यांना स्वर्गात उच्च स्थान देओ हीच अल्लाहपाशी प्रार्थना.
Post a Comment