महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे महाविकास आघाडी सरकार यांचे संबंध एक दिवस तरी सौहार्दाचे होते का, हे शोधावेच लागेल. मध्यंतरी राज्य सरकारचे विमान राज्यपालांनी आपल्या प्रवासासाठी मागणे आणि सरकारने ते कोतेपणाने नाकारणे, यात अनपेक्षित असे काही घडलेले नाही. महाराष्ट्राचे ‘हसे’ तेवढे झाले. घटनात्मक संरचनेला आजचे राजकीय नेते मनोमन किती किंमत देतात, हे यातून दिसते. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. विधिमंडळात मंजूर होणाऱ्या विधेयकांवर त्यांची संमती स्वाक्षरी असते. याशिवाय, ते कुलपती या नात्याने राज्यातील साऱ्या शिक्षण व्यवस्था आणि यंत्रणेचे अध्वर्यू आहेत. कोणत्याही निमित्ताने होणारा त्यांचा पाणउतारा हा काही कोश्यारी या व्यक्तीचा अवमान नसतो, ते त्या पदाचे अवमूल्यन असते. आपल्या वागण्यातून असे होऊ नये, इतकी तरी समज मुख्यमंत्री कार्यालयाने दाखवायला हरकत नव्हती. अर्थात, यातून राज्यपालांच्या पूर्वीच्या अनेक वर्तनांचे दाखले देऊन उणी-दुणी काढण्यात आली. हे राज्याच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. हे राज्यपाल म्हणजे काही डॉ. पी. सी. अलेक्झांडर किंवा एअर चीफ मार्शल आय. एच. लतीफ या राज्यपालांची परंपरा राखणारे नव्हेत. त्यांचा एक पाय आणि मन भाजप प्रणीत पक्षीय राजकारणात अडकलेले आहेच. हे न लपून राहिलेले गुपीत आहे. तसे नसते, तर त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर टीकाटिपणी केली नसती. दिल्लीतून येणारे दूरध्वनी झेलत पहाटे, आडवेळेला अंधाराचा फायदा घेवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना औट घटकेची शपथ देणेही टाळले असते. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विवेकाला अशी अनेकदा सोडचिठ्ठी दिली आहे. आपण भाजपचे नेते आहोत, याचा निदान पदाच्या प्रतिष्ठेपुरता तरी विसर पडायला हवा, हे त्यांना जमत नाही. याचा अर्थ त्यांचा जाहीर अपमान केल्यानेच आपले राजकीय चातुर्य आणि धूर्तपण सिद्ध होते, असे ज्यांना वाटते, त्यांना या देशात होऊन गेलेल्या अनेक उदारमनस्क, मोठ्या मनाच्या नेत्यांचे चरित्रच समजलेले नाही. त्याची त्यांना आवश्यकताही वाटत नसावी.कोणत्याही खुलाशाची संधी नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे लपून, आपले राजकीय हिशेब चुकते करण्याची रीत महाराष्ट्रात 1980 नंतर क्रमाक्रमाने वाढत गेलीच आहे. सत्तेत बसलेले केवळ काही काळासाठी नेमलेले विश्वस्त आहेत; मात्र विेशस्तांना मालकी हक्काचा भ्रम होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढतच चालले आहे. या साऱ्याचा वाईट परिणाम असा होतो, की नेते व राज्यकर्ते अनुदारपणे वागतात, तेव्हा त्यांच्याकडे पाहून चालणारे दुय्यम नेते, तळागाळातील कार्यकर्ते किती तरी पटींनी अधिक अनुदार होतात; कारण ते आपल्या नेत्याच्या वागण्यातून काही ना काही संदेश टिपत असतात. तो प्रत्यक्षात आणत असतात. संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात ’वनिता देखोनि गोमटी; विवेकाची होय नत दृष्टी’ असे म्हटले आहे. राजभवनातील किंवा मंत्रालयातील सत्तासुंदरीच्या स्पर्शाने विवेकाची दृष्टी हरपणे, हे काही चांगले लक्षण नाही. पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभनिय नाही, तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील बेबनाव सतत टोकाची भूमिका घेवून महाराष्ट्राची इज्जत घालविणारे वर्तन संपूर्ण देशाला दाखवत आहेत. वास्तविक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जनता हवालदील झालेली आहे. हा संसर्ग थोपवण्यासाठी खरंच सरकारची मानसिकता सकारात्मक आहे की नाही? असा संशय सर्व थरांतून व्यक्त होत आहे. अशावेळी कोविड प्रतिबंधक लस मिळविण्याच्या बाबतीत सरकारने केलेली दिरंगाई व बेशिस्तपणा महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीला गालबोट लावणारा आहे. आज या नैसर्गिक संकटाला थोपविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे असताना शासन आणि प्रशासन यांच्यातील बेबनाव महाराष्ट्राची मोठी हानी करणारा ठरणार आहे. तेव्हा कोरोना पूर्णपणे घालविण्यासाठी कटिबद्ध व्हावं अन्यथा महाराष्ट्राची जनता कदापीही माफ करणार नाही.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment