कोरोना रिलीफ टास्क फोर्सचीही निर्मिती : 48 हजार नागरिकांना वाटप केले राशन कीट
मुंबई (बशीर शेख)
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडत आहे. यामुळे जमाअते इस्लामी हिंद आणि एसआयओच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील अनेक शहरांमध्ये जनतेची मदत करण्यासाठी कोरोना रिलीफ टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या माध्यमातून गरजूंना मदत करणे सुरूही झाले आहे. नागपूर व दिल्ली येथे सुसज्ज कोविड हेल्थ केअर सेंटरचीही उभारणी केली आहे. शक्य होईल तिथे प्रशासनासोबत संयुक्तपणे असे सेंटर्स राज्यभर उभारण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्रातही 22 जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना रिलीफ टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली असून, अन्यत्रही लवकरच सुरू होईल असे सेवा विभागाचे सचिव मजहर फारूख म्हणाले. तसेच ऑक्सीजनचा तुटवडा पाहता ऑक्सीजन प्लांट उभारणीचाही मानस असल्याचे ते म्हणाले. पुणे व जळगाव येथे ऑक्सीजन कॉन्ट्रॅस्टर मशीनद्वारेही ऑक्सीजन पुरवठा केला जात असून, ऑक्सीजन सिलेंडर्सही विकत घेवून गरजूंना दिले जात असल्याचे ते म्हणाले.
देशभरात सुरू केलेल्या रिलीफ टास्कफोर्समध्ये एक हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक काम करत आहेत. या माध्यमातून हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेले कॉल्स त्या-त्या शहरातील टास्क फोर्सकडे वर्ग करून गरजूंना मदत केली जात आहे. मग ते हॉस्पिटलमध्ये बेडची समस्या असो, औषधींची असो वा ऑक्सीजन किंवा प्लाज्मासाठीची. टास्कफोर्सचे स्वयंसेवक स्वतःहून त्या रूग्णाकडे जावून त्यांची मदत करत आहेत. तसेच टास्कफोर्स खाजगी व सरकारी दवाखान्यातील परिस्थितीवर नजर ठेवून असून, तेथील माहिती संकलित केली जात आहे. तसेच शासकीय संकेतस्थळाचीही मदत घेतली जात आहे. जमाअतचेे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी नुकतेच देशभरातील कार्यकर्त्यांना रूग्णांची मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार देशभरातील कार्यकर्ते हिरहिरीने सेवेच्या कामी लागले आहेत.
नागपूर येथील कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन 1 एप्रिल रोजी नागपूर शहर महापौरांनी केले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख, नाना पटोले, महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री, नितीन राऊत, शहर आमदार आणि इतर नेत्यांनी तसेच बऱ्याच महत्त्वाच्या मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन कौतुक व्यक्त केले. कोविड सेंटरमध्ये 78 बेडची क्षमता आहे. दररोज सरासरी रूग्णांची संख्या 15 ते 20 च्या आसपास आहे. आतापर्यंत 500 हून अधिक रूग्ण दाखल झाले. 100 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपूर महानगरपालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामी हिंद, नागपूर संयुक्तपणे त्याचे व्यवस्थापन करीत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंचपावली येथील कोविड हेल्थ सेंटरला भेट दिली. त्यांनी कोविड सेंटरमधील व्यवस्थापक, डॉक्टर आणि रूग्णांसह वेळ घालवला आणि सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली. फडणवीस यांनी जमात-ए-इस्लामी हिंद, नागपूर आणि मेडिकल सर्व्हिस सोसायटीचे कौतुक केले. त्यांच्यासमवेत दयाशंकर तिवारी (नगराध्यक्ष, नागपूर महानगरपालिका), डॉ. संजय चिलकर (वैद्यकीय अधिकारी - नागपूर महानगरपालिका) आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
दिल्ली येथील मस्जिदे इशआते इस्लाम या ठिकाणी कोविड हेल्थ केअर सेंटरची उभारणी केली आहे. शिवाय जवळच शिफा नावाचे जमाअतचे हॉस्पिटलही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यान्वित आहे. तेथेसुद्धा कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, त्याचे नुकतेच लोकार्पण झाले.
Post a Comment