Halloween Costume ideas 2015

संविधान की कु़रआन?


संविधान मोठं कि कु़रआन? देश मोठा की धर्म? असे प्रश्‍न सहसा मुस्लिमांनाच विचारले जातात. एखाद्या सरदारजीला किंवा निकोबारच्या जारवा आदिवासिला विचारलं जात नाही. या भावनिक प्रश्‍नाचं वास्तव काय आहे, ते आपण बघू या.

घटनेचं कलम 25 हे सर्वांना आपापल्या धर्मावर, आपापल्या विचारधारेवर आचरण करण्याचे आणि त्याचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देते. याचा अर्थ एखाद्याला आपलं दैवत हे सर्वोच्च वाटत असेल तर तो प्रगटपणे तसे बोलू शकतो. कलम 19 (अ) नुसार त्याला त्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच मुसलमान दिवसात पाच वेळा उंच आवाजात याची घोषणा करतात की, अल्लाह हू अकबर! म्हणजे अल्लाहच सर्वोच्च आहे! याचाच अर्थ सर्व पैगंबर, काबा, आई, वडिल, सर्व महापुरूष, सर्व देश अन् त्यांचे सर्व संविधान यापेक्षा अल्लाहचं अस्तित्व सर्वोच्च आहे. नमाज पढतांनाही अल्लाहू अकबर म्हणावंच लागतं. हे अल्लाह हू अकबर अगदी अशफाकउल्लाहपासून तर अब्दुल कलाम यांच्यापर्यंतच्या लोकांनी अल्लाह हू अकबर (अल्लाह सर्वोच्च आहे) म्हटलेले आहे. पण त्यामुळे त्यांच्या देशप्रेमावर, देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर कुणीही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही. कारण कुणी अल्लाह अन् त्यांच्या वाणीला सर्वोच्च जरी मानत असला तरी ते संविधानाच्या कायद्याचं पालन करतो की नाही ते महत्वाचं असतं. एखाद्याच्या जीवनात एखादा महापुरूष अव्वल स्थानी असतो किंवा त्याचे आई वडिल अव्वल स्थानी असतात अन् संविधान दुसर्‍या किंवा तीसर्‍या स्थानी असू शकते किंवा आणखी बाराव्या तेराव्या स्थानी असू शकते. त्याने काय फरक पडतो? तुम्ही जीवनात संविधानाला कितव्या नंबरवर ठेवता, यापेक्षा तुम्ही दैनंदिनी सार्वजनिक जीवनात त्याचं किती पालन करतात, ते महत्वाचं आहे.

संविधानाला तुम्ही सर्वोच्च मानत असाल किंवा अव्वल स्थानावर ठेवत असाल तरच तुम्ही देशाचे नागरिक अन् तरच तुम्हाला तुमचे संवैधानिक अधिकार मिळतील असे संविधानात कुठंही लिहलेले नाहीये.

संविधानाला तोंडाने सर्वोच्च असल्याचे वदवून घेण्याचा आग्रह म्हणजे संविधानाचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. एखादी व्यक्ती दररोज सकाळी उठून संविधान सर्वोच्च आहे असा जप करत असेल, संविधानाची प्रत देव्हार्‍यात ठेऊन दररोज त्याची पूजा करत असेल, अन् जो कुणी संविधान सर्वोच्च असल्याचे म्हणत नसेल तर तो देशद्रोही असल्याचा फतवा देत असेल तर तो संविधानाची विटंबनाच करतो. 

आपल्या देशात उठ सूट प्रत्येक महत्वाच्या गोष्टींचं दैवतीकरण करून त्याचं अवडंबर माजवून दैवतीकरण केलेल्या गोष्टीवरच अन्याय करण्याची आपल्यापैकी अनेकांची जुनी खोड आहे. आपल्या देशात मातृ देवो भव अन् पितृ देवो भव म्हणणार्‍यांच्या अनेकांचे   -(उर्वरित लेख पान 7 वर)

माय-बाप वृद्वाश्रमात सापडतील. शोकांतिका तर ही आहे की, ज्या देशात गाईला पूज्य मानले जाते, त्याच देशात पॉलीथीन खाऊन सर्वात जास्त गाई मरतात. छोटा राजन परदेशातून भारतात एअरपोर्टवर उतरल्यावर सर्वप्रथम त्याने जमिनीचं चुंबन घेतलं अन् आपण किती देशप्रेमी आहोत ते मीडियाला दाखवले. दाऊद इब्राहिमनेही मेल्यावर मला मायदेशात मुंबईतच दफन करण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली. आता या सगळ्या अवडंबराला देशप्रेम म्हणावं का? देशासाठी घातक असलेली तस्करी करून, संविधानाचे कायदे धाब्यावर बसवून अशा देशप्रेमाच्या अवडंबराला काहिएक अर्थ उरत नाही.

ही उदाहरणे देण्याचे तात्पर्य हे की, नुसतं सर्वोच्च म्हणून दैवतीकरण करण्यापेक्षा सार्वजनिक जीवनात संविधानाचे कायदे प्रमाण मानून ते दैनंदिनी जीवनात आचरणात आणण्याची गरज आहे. एखादी गोष्ट अव्वल स्थानी असेल तरच ती महत्वाची, दुसर्‍या, तिसर्‍या स्थानाला काही महत्वच नाही, ही उतरंड म्हमजे कुणाला तरी वर अन् कुणाला तरी खाली ठेवण्याची वर्णवादी मानसिकता दर्शवते. काही गोष्टींचे महत्व कालस्थलसापेक्ष असू शकतात, या वैज्ञानिक तथ्याशी नव्हे तर वरखाली स्थान देणार्‍या मनुस्मृतिच्या भुमिकेशी ही मानसिकता अधिक जवळ आहे. म्हणूनच मुसलमानांना हा प्रश्‍न विचारला जातो. कारण भारतीय मुस्लिम समाजात भले अनेक गोष्टी वाईट असतील, पण भीतीपोटी आपल्या धर्माविरूद्ध जाऊन वरकरणी खोटं बोलण्याची अन् वेळ निभाऊन नेण्याची सवय सहसा या समाजात आढळत नाही. संविधान की कु़रआन? या प्रश्‍नावर एकतर सरळ सरळ कु़रआन असे तो उत्तर देणार किंवा पळवाट काढण्यासाठी गोल गोल उत्तर देणार, पण कु़रआनापेक्षा संविधानाला मी श्रेष्ठ मानत असल्याचं तो अजिबात सांगणार नाही. कारण श्रेष्ठ-कनिष्ठ, वर खाली, मागं पुढं असं लौकिक गोष्टींना सांगण्याचे त्यावर संस्कारच झालेले नाहीत. सर्वांपेक्षा अल्लाहच सर्वोच्च यावर त्याचे इमान असते, म्हणूनच तो मुस्लिम असतो.  ही गोष्ट काही वर्णवाद्यांना चांगली ठाऊक आहे. म्हणून मुसलमान या देशाच्या संविधानाला दुय्यम लेखून आपल्या धर्मालाच जास्त महत्व देत असल्याचं दाखवून त्यांचं खलनायिकीकरण करण्याचा हा डाव आहे. या डावातून त्यांना फक्त मुस्लिमद्वेष नव्हे तर अप्रत्यक्षपणे त्यांचा संविधानद्वेषाचा कंडू शमवायचा असतो. म्हणून ते आमच्या बहुजन तरूणांच्याही डोक्यात असे असंवैधानिक प्रश्‍न घुसवतात. तसेच मुसलमानांनी संविधानाची ग्वाही देऊन आपले संवैधानिक अधिकार मागू नये, कारण ते संविधानाला सर्वोच्च मानत नाही, असेदेखील षडयंत्र यामागे आहे.

मुसलमान अल्लाहला सर्वोच्च मानत असले तरी सर्वात आधी घटनेला मुसलमानांनीच स्वीकारले आहे. याचा पुरावा म्हणजे जेंव्हा भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला संसदेच्या पटलावर ठेवलं, तेंव्हा सर्वात आधी कमरूद्दीन नावाचे मुस्लिम नेते उभे राहिले आणि त्यांनी घटनेचे अनुमोदन करून बाबासाहेबांचे अभिनंदन केले.

लिखित संविनानाद्वारे राज्यकारभार चालविण्याची पद्धत सर्वात आधी मुसलमानांनीच सुरू केली आहे. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी कु़रआन असतांनाही मिसाक ए मदिना (मदिना करार) नावाचे जगातले पहिले लिखित संविधान लागू केले होते. यावरून कोणत्याही देशाचं संविधान हा इस्लामनुसार एक ’करार’ असतो, दिलेले वचन असते अन् वचन पाळण्याची सक्त ताक़ीद कु़रआनात वारंवार आलेली आहे. आपण सर्व देशबांधव एका वचनात, एका करारात बांधील आहोत, ही भावनाच या देशाला एकसंघ ठेऊ शकते.  एखाद्या देशाच्या संविधानाचा आधार एखादा धर्मग्रंथ किंवा एखाद्या महापुरूषाची शिकवण किंवा प्रेरणा असू शकते. ’मिसाक ए मदिना’चा आधारही कु़रआनच होता. आपल्या संविधानाचा आधार तथागतांची प्रेरणा असल्याचं अनेक जन बोलत असतात. पण धर्मग्रंथ अस्तित्वात असतांनाही पैगंबर सल्लम यांना मदिना करार लागू करण्याची गरज यासाठीच पडली की, कोणताही देश कोणत्या तरी संविधानावरच चालू शकतो,  देश एकसामायिक नियमावर चालतो. एका धर्मग्रंथाची तत्वे दुसरे धर्मीय का म्हणून मान्य करतील? त्यासाठी कोणते तरी एकसामायिक नियम बनवणे गरजेचे असते. पण याचा अर्थ ते धर्मग्रंथ कनिष्ठ आहेत, असं नाही. बिजगिणाताची परीक्षा देण्यासाठी कुणी कु़रआन वाचत नाही तर बिजगणिताचं पुस्तकच वाचतो, याचा अर्थ कु़रआन दुय्यम आहे असा होत नाही किंवा ज़कात देण्याचे कोणते नियम आहेत हे बघण्यासाठी मी कु़रआन वाचतो, म्हणजे मी संविधानाला दुय्यम मानतो असेही नाही.

डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचे नियम आणि त्यात दिलेले धर्मस्वातंत्र्य हे कु़रआनाशी विसंगत नव्हते, म्हणून ते आम्ही स्वीकारले, हे वास्तव आहे. पण ते संविधान बदलून टाकून संविधानाच्या नावाखाली कुणी मनुस्मृतीचे भेदाभेद करून नागरिकता देणारे कायदे लागू करत असेल तर समतामूलक मुस्लिम समाज अजिबात नाही माणनार त्या वर्णवादी कायद्यांना, हे ही तेवढेच कटू सत्य आहे.

दिल्लीत काही लोकांनी घटना जाळून मनुवादाचा जयजयकार केला होता तसं मुसलमानांनी कधीही घटना जाळली नाही. घटना जाळणारे हे घटनेविरूद्ध कारस्थान करण्यासाठीच मुसलमानांचा वापर तर करत नाही ना? यावर विचार करण्याची गरज आहे. 

आज घटनेच्या कलम 19 व 25 मुळेच आम्ही उंच आवाजात अज़ान देऊ शकतो, दाढी ठेऊ शकतो, टोपी नेसू शकतो, मस्जिदीत नमाज़ पढू शकतो, महिला बुरखा नेसू शकतात, निकाह लाऊ शकतो, तलाक देऊ शकतो, महिला खुला घेऊ शकतात, जनावरांची कु़रबानी करू शकतो. घटनेने दिलेल्या या स्वातंत्र्यामुळेच मुसलमानांचं पाकिस्तानकडे होणारं स्थलांतर थांबलं. पाकिस्तान की भारत हे पर्याय उपलब्ध असतांना आम्ही हा देश निवडला तो डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच! 

लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे, कु़रआन व संविधानाचा केंद्र बिंदू माणुस आहे. माणसासाठीच कु़रआन आहे, माणसाचासाठीच संविधान आहे. संविधानापेक्षा देश महत्वाचा अन् देशापेक्षा देशवासी महत्वाचा अन् एखाद्या देशवासीयाला देशापेक्षा देशनिर्माता मोठा वाटत असेल तर तसे वाटून घेण्याचं स्वातंत्र्यही संविधानच देतो. म्हणून आम्ही आमच्या मनात संविधानाला कितव्या नंबरवर ठेवतो, तो मुद्दा गौण आहे, तर सार्वजनिक जीवनात लोकांशी न्यायपूर्ण वागतांना, बोलतांना तुमच्या आचरणात संविधान आहे की नाही, ते महत्वाचं आहे.

- नौशाद उस्मान

9029429489


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget