Halloween Costume ideas 2015

अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष बदलला

राष्ट्राध्यक्षपदाची किचकट प्रक्रिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

Joe Biden

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती व त्याच्या कार्यालयाला जगातील सर्वात शक्तीशाली कार्यालय मानल्या जाते म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीवर सार्‍या जगाचे लक्ष असते. दर चार वर्षांनी होणार्‍या या निवडणुकांच्या तारखा ठरलेल्या असतात. 3 नोव्हेंबला निवडणूक होते आणि 20 जानेवारीला नव्या राष्ट्रपतीचा शपथविधी होतो. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक थोडीशी किचकट आहे तसेच बॅलेट पेपरने होत असल्यामुळे मतगणनेला भरपूर उशीर होतो. कार्यालयीन वेळ संपल्याबरोबर कर्मचारी मतगणनेचे काम आहे तिथेच सोडून आपापल्या घरी निघून जातात ते थेट दुसर्‍या दिवशीच येतात, म्हणूनसुद्धा मतमोजणीमध्ये उशीर होतो. यावर्षीसुद्धा 3 तारखेला झालेल्या निवडणुकीचा निकाल हा लेख लिहिपर्यंत म्हणजे 9 नोव्हेंबरपर्यंत ही लागलेला नव्हता. जरी डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन ह्यांना 270 इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली होती व ते निवडल्यात जमा होते तरी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. एवढ्या राष्ट्रीय सहनशिलतेकडे पाहून जेव्हा अमेरिकेसारख प्रगत देश मतदान पत्रिकेने निवडणूक घेतो तेव्हा आपल्याला इव्हीएमबद्दल पुनर्विचार करण्याची गरज नव्याने अधोरेखित झालेली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मतदान पत्रिकेने अन्वये घेतलेल्या निवडणुकांमध्ये एकेक मतपत्रिका मोजता येणे शक्य असते म्हणून निकाल हा पारदर्शक असतो. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 

राष्ट्रपतीपदाची निवडणूक 

अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीपदाची थेट जरी निवडणूक होत असली तरी प्रत्येक मतदाराला तीन मते द्यावी लागतात. एक राष्ट्रपतीसाठी, दूसरा आपल्या भागातील प्रतिनिधी सभेच्या सदस्यासाठी जे की भारतीय लोकसभेसारखे खालचे सभागृह मानले जाते आणि तिसरे मत आपल्या भागातील सिनेटरसाठी. सिनेट हे राज्यसभेसारखे वरिष्ठ सभागृह मानले जाते. यात मतदारांना तीन वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार असतो. उदा.एका मतदाराने राष्ट्रपतीपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवाराला मत दिले तर तो हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हसाठी रिपब्लिकन पक्षाच्या मतदारालाही मत देऊ शकतो व सिनेटसाठी तिसर्‍याच पक्षाच्या उमेदवाराला मत देऊ शकतो. 

435 खासदार असलेल्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हमध्ये मतदानाची मोजणी होऊन ज्याला जास्त मतं मिळालेली असतील त्याची निवड हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हमध्ये होते. हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हचे मतदारसंघ भौगोलिक नसून जनसंख्येच्या घनत्वाप्रमाणे ठरलेल असतात. ज्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त त्या राज्यामध्ये खासदारांची लोकसंख्या जास्त असते. ही झाली सरळ पद्धत. 

100 खासदार असलेल्या सिनेटमध्ये सुद्धा सरळ मतदानाने निवडणूक घेतली जाते जो ज्या मतदारसंघात आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त मते घेतो त्याला विजयी घोषित केले जाते. सिनेटमधील खासदार भौगोलिक क्षेत्र किंवा लोकसंख्येचे घनत्व याच्यावर ठरत नसून प्रत्येक राज्याला दोन प्रतिनिधी या दराने 50 राज्यामधून 100 सिनेटर्स निवडले जातात.

  या सर्व मतदान पद्धतीला पॉप्युलर वोटींग असे म्हणतात. यात राष्ट्राध्यक्षाला जरी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त मते पडली तरी तो निवडून आला असे मानले जात नाही. तर निवडून येण्यासाठी 538 पैकी 270 इलेक्टोरल वोट घ्यावे लागतात. ही पद्धत अतिशय किचकट आहे. अमेरिकेतील एकूण 50 राज्यांना लोकसंख्येच्या घनत्वाप्रमाणे इलेक्टोरल वोटांची संख्या दिली जाते. त्यातून ज्याला 270 मते पडली तो राष्ट्रपती म्हणून घोषित केला जातो. यात गोम अशी आहे की, एखाद्या राज्यात एखाद्या उमेदवाराला 51 टक्के मतं पडली आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला 49 टक्के मतं पडली तरी ज्याला 51 टक्के मतं पडली त्याला 100 टक्के मत पडली, असे गृहित धरले जाते. या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे अमेरिकेमध्ये निवडणूक निकाल नेहमीच उशीरा लागतात. 

नुकत्याच संपलेल्या निवडणुकीमुळे 7 कोटी पेक्षा जास्त पॉप्युलर वोट जरी ट्रम्प यांना मिळाले असले तरी इलेक्ट्रोल कॉलेजची संख्या 214 पेक्षा पुढे नेता आली नाही. याउलट जो बायडन यांना 290 इलेक्टोरल कॉलेजची मत मिळालेली असून, 270 ची किमान मर्यादा त्यांनी कधीच ओलांडलेली आहे. 216 साली जे नेते आणि राज्य त्यांच्या बाजूने होत त्यापैकी अनेक आज त्यांच्या विरूद्ध उभे राहिलेले आहेत. हे केवळ त्यांच्या अस्थिर स्वभावामुळे घडलेले आहे. या निवडणुकीतील पराभवाबरोबर आधुनिक काळातील त्या चार राष्ट्रपतींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झालेला आहे. ज्यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पद जिंकता आले नाही. केवळ आपल्या स्वाभाविक दुर्गुणांमुळे एवढे मोठे पद त्यांना गमवावे लागले. त्यांच्याबाबतीतील ही शोकांतिका इतिहासामध्ये लिहिली गेलेली आहे. 

ट्रम्प यांची अरेरावी

चार वर्षापूर्वी 2016 साली हिलरी क्लिंटनसारख्या सभ्य स्त्रीला नाकारून अमेरिकन नागरिकांनी हडेल हप्पी स्वभावाच्या ट्रम्प यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. आणि पहिला दिवसापासूनच ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रपती गंभीर प्रवृत्तीचा असण्याची गरज नाही, हे आपल्या वर्तनुकीतून सिद्ध केले. अत्यंत सुमार ज्ञान असलेला मात्र यशस्वी व्यवसायिक असलेल्या ट्रम्प यांनी या चार वर्षात जो धुमाकूळ घातल्या त्याच्या कचाट्यात फक्त अमेरिकन नागरिकच नव्हे तर जगातील अनेक देश सापडले. आपल्या विदेश दौर्‍याची सुरूवात इसराईलमधून न करता सऊदी अरबमधून करून त्यांनी जगाला पहिला आश्‍चर्ययाचा धक्का दिला. मात्र लवकरच त्यांनी आपले गुण दाखवायला सुरूवात केली. इसराईलच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट निर्णयाचे अंध समर्थन करून त्यांनी पॅलेस्टीनियन लोकांचे जीवन अधिक यातनामय बनवूनन टाकले. 

अमेरिका फर्स्ट या आपल्या नितीला अनुसरून त्यांनी चीनी वस्तूंवर भारी कर लावून चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून चीन अमेरिकेचे संबधं कधी नव्हे तेवढे तानले गेले. भारताबरोबर जरी त्यांनी आपले संबंध चांगले असल्याचा  देखावा केला तरी भारतीय आयातीवर भारी कर लावून व भारतातील हवा अत्यंत घाण आहे, अशी टिप्पणी करून भारतासंबंधी आपल्याला किती आप्रूप आहे हे दाखवून दिले. 

ब्लॅक लाईफ मॅटर आंदोलनाला चिरडून टाकून त्यांनी अमेरिकेतील काळ्या नागरिकांची नाजी ओढवून घेतली. त्यांनी सरळ-सरळ गोर्‍या अमेरिकनांचा आपण पाठीराखाल असल्याच्या अविर्भात सव्वतःला ठेऊन आपणच त्यांचे उद्धारकर्ते अहोत व आपण पुनःश निवडून आल्यास गौरवर्णीय अमेरिकनांचे काही खरे नाही, असा देखावा उभा केला. 

कोविड-19 च्या साथीमध्ये 2 लाख 30 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी जाउन महासत्तेची नाक कापली गेल्यावर सुद्धा मी कोरोनाची लढाई जिंकली व चायना व्हायरसला हरविले, असे म्हणून टिर्‍या बडवून घेण्यात या वाचाळ माणसाला जरासुद्धा लाज वाटली नाही. 

आपल्या चार वर्षाच्या काळात तब्बल 22 हजारपेक्षा जास्त वेळा खोटे बोलण्याचा विक्रम या वाचाळविराच्या नावावर जमा आहे. त्यांनी कितीवेळेस खोटे बोलले याचे मिटरच माध्यमांनी तयार करून ठेवले आहे. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मागच्या आठवड्यात प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे रास्त प्रसारण यासाठी रोखून दिले की ते खोटे बोलत आहेत. 

सर्व आघाड्यांवर अपयशी झाल्यावर प्रचंड बेरोजगारी निर्माण झाल्यामुळे किमान विदेशनितीमध्ये तरी काही करून दाखवावे, या उद्देशाने आपल्या ताटाखालील मांजर असलेल्या आखाती राष्ट्रांवर दबाव टाकून ट्रम्प यांनी युएई आणि इजराईलमध्ये तह घडवून आणला. ज्याला इस्लामी जगतामध्ये काडीची किंमत मिळाली नाही. एकूणच सर्व प्रकारचे हतकंडे वापरूनसुद्धा अमेरिकेची सुजाण जनता ट्रम्प यांच्या बोलण्याला भुलली नाही व 2016 साली केलेली चूक त्यांनी स्वतः सुधारली. येणेप्रमाणे या विक्षिप्त माणसाच्या कचाट्यातून अमेरिकन जनता आणि जगाने सुटकेचा श्‍वास सोडला. 

अमेरिकेच्या विदेश नितीमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या बदलण्यामुळे फारसा फरक पडत नाही. म्हणूनच जो बायडन यांच्या येण्याने फारसा काही फरक पडणार जरी नसला तरी सभ्य राजकारणाची किमान सुरूवात होईल, एवढी आशा करणे चुकीचे होणार नाही.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget